बीड जिल्ह्यातील पूस येथील युवा कवी मंगेश सावंत यांच्या काळया मातीतील काही कसदार कविता आपण आज वाचू या. त्यांच्या कविता, लेख गुहागर सत्ता, विश्वजगत, सेवाशक्ती टाईम्स, युवा ध्येय, शौर्य स्वाभिमान, साई संध्या, इ. दैनिक वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित झाल्या आहेत. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ, (बालभारती) पुणे यांच्यातर्फे प्रकाशित होणाऱ्या “किशोर” या लोकप्रिय मासिकाच्या गेल्या डिसेंबर महिन्याच्या अंकात त्यांची कविता प्रसिद्ध झाली आहे. त्यांचा “हा प्रकाश अस्मितेचा” हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे.तानाजी धरणे यांच्या “हेलपाटा” या तसेच “कल्पकतेची भरारी” या प्रियंका जगझाप यांच्या कादंबरीवर त्यांनी लिहिलेले परीक्षण ही प्रकाशित झाले आहे.
श्री मंगेश सावंत यांचा अनेक साहित्यिक उपक्रमांमध्ये सतत सक्रिय सहभाग असतो. विशेष म्हणजे ते कल्पदिप साहित्य मंच या समूहामध्ये वेगवेगळे ऑनलाइन उपक्रम आयोजित करीत असतात.
श्री मंगेश सावंत यांना वसुंधरा महाविद्यालय घाटनांदूर यांच्यातर्फे “ग्रंथालय आदर्श वाचक, शेतकरी साहित्य समुह यांच्या तर्फे “काव्यभूषण”, भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा फ्रिडम स्टोरी यांच्यातर्फे “काव्यभुषण”, अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई अक्षरमंच यांच्यातर्फे “अष्टपैलू” आदी पुरस्कार” मिळाले आहेत.
श्री मंगेश सावंत यांचे न्यूज स्टोरी टुडे परिवारात हार्दिक स्वागत आहे.
— संपादक
१. तुझ्या डोईवरचे ओझे
माझ सारं आयुष्य बाबा
आज तुला घेशील का
तुझ्या डोईवरचे ओझे
बाबा मला देशील का ?.( धृ )
मला साहेब बनविण्या
बाबा तू एकटा झिजला
माझ पोट भरण्यासाठी
बाबा तू उपाशी निजला
तुझे उपकार बाबा तू
मला फेडू देशील का ? (१)
तुझ्या डोईवरचे ओझे…..
बाबा तुला होत नाही
आज शेतातले काम
तुझ्यासारखे कष्ट करून
मला येऊ दे रे घाम
तुझ्या आधाराची काठी
मला होऊ देशील का ? (२)
तुझ्या डोईवरचे ओझे….
मला शिकविण्या तू
कर्ज सावकाराचे काढले
बघ बाबा तुझ्या डोई
कर्जांचे व्याज वाढले
सावकारचे कर्ज बाबा
मला फेडू देशील का ? (३)
तुझ्या डोईवरचे ओझे….
तुझ्या हाताला आलेला फोड
बाबा मला अजून आठवतो
तुझ्या साऱ्या आठवणींना
आता मनामध्ये साठवतो.
बाबा मंगेशचे म्हणणे तू
जरा ऐकून घेशील का ? (४)
तुझ्या डोईवरचे ओझे….
२. पेरणी
लई दिवसान देवा
आल आभाळ भरून,
खुश होईल रे आता
बाप पेरणी करून.!!१!!
आहे र माझ्या बापाला
सर्जा पवळ्याची साथ,
त्यांनी कायम धरला
माझ्या बापाचा रे हात.!!२!!
रात्रं-दिन बाप माझा
कष्ट शेतात करतो,
काळ्या आईच्या खुशीत
बाप बियाणे पेरतो.!!३!!
कर्ज काढून रे मुला
बाप करतो पेरणी,
हिरवा शालू नेसूनी
आनंदी होई धरणी.!!४!!
पिक डोलते पाहून
मनाला आनंद होई,
काळ्या आईची लेकरं
कधी उपाशी न राही.!!५!!
शेती करुनिया आज
करी स्वतःचा उद्धार,
आहे बापाला रे माझ्या
काळ्या आईचा आधार.!!६!!
३. बाप
राहू दे तुझा आधार
पाठीवरी तुझी थाप,
शेतकरी राजा तूच
आमचा बाप.!!१!!
निघून गेले आयुष्य
या मातीत राबताना,
हरपून गेले स्वप्न
आयुष्य हे जगताना.!!२!!
नको लावून घेऊस
तुझ्या गळ्याला रे फास,
तुझ्या या मुक्या पिलांना
तुझी लागेल रे आस.!!३!!
राहू दे वेड्या मजला
आज तुझ्याच साथीला,
राबेल मी शेतामधी
सांगतो काळ्या मातीला.!!४!!
जोपर्यंत श्वास आहे
खेळ तू झुंज वैऱ्याशी,
देईन साथ मी तुला
घाव घेईन जीवाशी.!!५!!
काळ्या आईसाठी अश्रू
तुझ्या डोळ्यातून वाहे,
ऋणी धरणी आईचा
माझा शेतकरी आहे.!!६!!
४. नकोस तापू सूर्या तू
नकोस तापू सूर्या तू
बाप शेतात राबतोय,
मुला बाळांना जगविण्या
बाप दिन रात जागतोय.!!१!!
काळ्या आईच्या खुशीत
स्वतः धान्य पिकवितो,
बघ कष्ट करून शेतात
लेकरा बाळांना जगवितो.!!२!!
डोईवर येता संकटे तरी
बाप एकटाच लढतोय,
दुष्काळाच्या झळामध्येही
बाप माझा शेती करतोय.!!३!!
सांग ना सूर्या मला माझा
शेतकरी बाप कुठे चुकतो,
मग कारे सूर्या तू एवढ्या
उन्हाच्या झळा ओकतो.!!४!!
सूर्या माझ्या बापाला आहे
बघ फक्त शेतीचा आधार,
करू दे रे त्याला शेती
होऊ दे त्याचा उद्धार.!!५!!
५. आई-वडिलांचे कष्ट
शेतकऱ्यांच्या मुलांनो
मी सांगतोय का जरा,
आई-वडिलांचे कष्ट
तुम्ही डोळ्यापुढे धरा !!१!!
कष्ट करुनी शेतात
केले जीवाचे ते रान,
कोरडे शेत पाहून
उदासले त्यांचे मन !!२!!
शेतात राबल्यावर
मिळे भाकर पोटाला,
उन्हात करून काम
घट्टे पडले हाताला !!३!!
काळ्या मातीत पेरून
धान नाही उगवले,
भेगाळले शेत माझे
नाही मला बघवले !!४!!
कष्ट करता करता
हरवली त्यांची भूक,
शेतकरी मायबाप
काय झाली त्यांची चूक !!५!!

— रचना : मंगेश सावंत. पुस, जिल्हा बीड.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
विशाल हृदय असणाऱ्या आमच्या मंगेश दादाच्या कविता सुद्धा तेव्हढ्याच सुखद आहेत ,खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा
बीड जिल्ह्यातील उभरते उभार्ते कवी, लेखक श्रीमान मंगेश
सावंत सर ह्यांच्या कविता वाचण्यात आल्या आणि खरोखरच एक वेगळ्याच दुनियेत आम्हाला सैर करवून आणल्या.
एका प्रखर सूर्याला विनंती करून त्यांनी बापाचे कष्ट
त्यापुढे मांडले ,तर दुसऱ्या कविता डॉक्टर बाबासाहेबांचे अभ्यासिक विचार आजच्या जनरेशन पुढे त्यांनी मांडले .एकंदर बहुविष्यय व बहु आयामी चा मस्त कलंदर कवी खरोखरच आजच्या युसाठी प्रेरणा दयी आहे असे मत मी आपल्या पुढे छातीठोक आजmandu ichito धन्यवाद आपलाच कवि मित्र किशोर ,वसंतराव इंगोले यवतमाळ
ग्रामीण कवी मंगेश सावंत यांचे काव्य अप्रतिम ग्रामीण भाषेत ग्रामीण दर्शन घडवून देणारी. खुप छान
ग्रामीण कवी. मंगेश सावंत खुप अप्रतिम काव्य मनाला स्पर्श करून ग्रामीण दर्शन घडवून देणारी कविता खूपच सुंदर छान
मंगेश सरांच्या कविता खूप खूप छान आहे
मंगेश सरांना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा