Wednesday, June 19, 2024
Homeबातम्याकोजागिरी पोर्णिमेच्या चांदण्यात रायगडाचे दर्शन घ्या ! - राजू देसाई

कोजागिरी पोर्णिमेच्या चांदण्यात रायगडाचे दर्शन घ्या ! – राजू देसाई

कोजागिरी पोर्णिमेच्या चांदण्यात आग्र्याला जाऊन ताजमहालचे थडगे पहाण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगडाचे दर्शन घ्यावे, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी आग्रही भूमिका मांडली.
बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेत एका प्रकट मुलाखतीत शिवभक्त राजू देसाई यांनी ही भूमिका मांडली.

शिवचरित्राचे गाढे अभ्यासक आणि शिवभक्त श्री राजू देसाई यांनी १७ मार्च २०२४ रोजी पाचशेव्यांदा रायगड सर करुन एक ऐतिहासिक विक्रम केला. यानिमित्ताने ज्येष्ठ पत्रकार श्री. विजय वैद्य यांच्या संकल्पनेतून तसेच प्रा. सौ. नयना रेगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली शिवभक्त श्री राजू देसाई यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम यंदाच्या ४२ व्या वर्षाच्या जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेत आयोजित करण्यात आला होता.

यावेळी पाचशेव्यांदा रायगड सर केल्याबद्दल राजू देसाई यांना शिवरायांच्या मावळ्याची पगडी आणि संपूर्ण मावळ्याची वस्त्रे, शाल श्रीफळ देऊन विजय वैद्य यांच्या शुभहस्ते तर सौ. रेवा राजू देसाई यांना साडी, खण आणि श्रीफळाची ओटी भरुन सौ. माया योगेश त्रिवेदी यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.

ज्येष्ठ पत्रकार श्री योगेश वसंत त्रिवेदी यांनी प्रकट मुलाखत घेतांना प्रश्नांच्या उत्तरांच्या ओघात राजू देसाई यांनी संपूर्ण शिवकाल उपस्थितांसमोर उभा केला. प्रत्येक शाळेमध्ये रोज शिवरायांची आरती प्रार्थनेवेळी लावण्यात यावी. तसेच कोजागिरी पोर्णिमेच्या चांदण्यात ताजमहाल नावाचे थडगे पहाण्यापेक्षा रायगडाचे दर्शन घ्यावे. अरबी समुद्रातील शिवस्मारकाबद्दल विचारले असता, देसाई म्हणाले की, ‘या स्मारक बांधणीचा कोट्यावधी रुपयांचा खर्च गडकिल्यांसाठी वापरावा कारण गडकिल्ले हेच छत्रपतींचे खरे स्मारक आहे‌.’ छत्रपती शंभूराजे यांचे औरंगजेबाने जे अतोनात हाल केले तो संपूर्ण प्रसंग राजू देसाई यांनी उपस्थितांसमोर सादर केला तेंव्हा उपस्थित शिवभक्तांच्या अंगावर काटा उभा राहिला. त्याच भारलेल्या वातावरणात प्रकट मुलाखतीची सांगता झाली. एका रात्रीत टकमक टोक चढून जाण्याचा रोमांचकारी आणि अंगावर काटा उभा राहण्याचा प्रसंग, राजू आणि रेवा देसाई यांचा मोजक्या मित्रांच्या उपस्थितीत रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षीने झालेला शुभविवाह, छत्रपती शिवाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास सांगण्यात येणे, राज्याभिषेक नव्हे तर राजाभिषेक असे ठासून सांगणे या शिवचरित्र कथनामुळे जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेतील या कार्यक्रमास श्रोत्यांचा भरपूर प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सौ‌. नयना रेगे यांनी केले. पाच दिवसांच्या या वसंत व्याख्यानमालेत लोककलेचे गाढे अभ्यासक डॉ. गणेश चंदनशिवे यांचा शाहिरांचा पोवाडा, रवींद्र देवधर, हृषिकेश कानडे आणि नयना रहाळकर यांनी सादर केलेला ‘मी भारतीय’ हा दीर्घांक; ख्यातनाम सदाबहार चित्रपट अभिनेते देव आनंद यांच्या जन्मशताब्दीनिमित्त प्रख्यात चित्रपट समीक्षक श्री. दिलीप ठाकूर यांनी सांगितलेल्या असंख्य आठवणी आणि संतोष पिसाट, प्रमोद कुंभार, संगीता मिरकर, रश्मी मुळे व सहकाऱ्यांनी सादर केलेली अजरामर गाणी; विजय मडव (शारदा), दिलीप चव्हाण, वसंत सावंत (जय महाराष्ट्र नगर भूषण), विजय घरटकर (प्रेरणा), हर्षिता वायंगणकर (मल्लखांब सुवर्ण पदक) यांना शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आलेले विविध पुरस्कार; ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्याम कदम यांनी ४२ व्या व्याख्यानमाले निमित्त श्री. विजय वैद्य यांना ४२ गुलाबपुष्पांची माळा व शाल देऊन सन्मानित केले.

सातत्याने ४२ वर्षे जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेत उपस्थिती लावणारे वर्तक गुरुजी यांनाही सन्मानित करण्यात आले. अनेकांनी आठवणी कथन केल्या. सचिन वगळ यांनी पुरस्कार सन्मानित मान्यवरांच्या सन्मान पत्राचे आपल्या खड्या आवाजात वाचन केले.

— टीम एन एस टी.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments