आज जागतिक जलदिन आहे. त्या निमित्ताने पाण्याचे, पाणी काटकसरीने वापरण्याचे महत्व सांगणाऱ्या काही कविता पुढे देत आहे.
— संपादक
१. जल हे जीवन
(वृत्त –चंद्रकान्ता)
माणसे आणि पक्षी सारीच तहानलेली
सोशिता ग्रीष्मतापा पृथ्वी करपून गेली
अंबराची निळाई कोठे हरवून गेली
दाटुनी मेघ येता सृष्टी हरखून गेली
मानसी आस होती वाटेवर नेत्र त्यांचे
पावसाच्या सरींचा वर्षाव मनात नाचे
वाहता द्वाड वारा स्पर्शात शहारती ती
डोलती त्या शिवारी पाती हिरवी तृणाची
थेंब हे अमृताचे देहास सुखावणारे
देणगी ईश्वरी ही पाणी मनुजास तारे
२. पाणी प्रवाही
पाणी प्रवाही, करते खळखळ
लहरी जल हे, असते अवखळ
अंतरंगी परी, नीतळ, निर्मळ
नसते कधीही, सुस्ती; मरगळ
कडेकपारीतूनी धावत जाते
खडकावरती आदळत असते
उंचावरूनी उडी मारता
प्रपातातूनी हास्य फुलवते
हिवाळ्यामधे गोठत असते
उन्हामधे हे तापत असते
काट्याकुट्यातून मार्ग काढूनी
जीवनपथ हा चालत असते
अंती सागरी विलीन होते
मिलनात मग हरवून जाते
जीवनप्रवास असा असावा
सतत प्रवाही, सदा हासरा !
— रचना : सुरेश शेठ. कोथरूड. पुणे
३. “पाणी प्राण पांडुरंग”
नाही पाऊस, नाही पाणी
नशिबाला का दोष देता,
पाणी येतं, वाहून जातं…
हात बांधून पहाता !
दिलं दान आभाळानं
तुझी फाटलेली झोळी,
सारं वाहुनिया जातं…
तुझी ओंजळ मोकळी !
ओढ्या- नाल्यांना आडवा
जात्या पाण्याला थांबवा,
तहानेली काळी आई…
तिला पाण्याला भेटवा !
नका असे स्वस्थ बसू
नका दैवावर रूसू,
पाणी आडवा नेटानं…
पीकवाल हिरव हसू !
पाणी जीव, पाणी देव
पाणी आडवा, जिरवा,
पाणी.. प्राण पांडुरंग…
साऱ्या शेतात फिरवा !
नको उपास- तापास
नको पंढरीची वारी,
पाणी खेळता शिवारी…
रानी पिकेल पंढरी !
पाणी मातीला भेटेल
कोंब वाजवील टाळी,
तुझे दैव तुझ्या हाती…
का रे शोधिशी आभाळी !
— रचना : साहेबराव ठाणगे. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800