जात निहाय संमेलन भरविणे का आवश्यक आहे, या विषयावर मागच्या भागात निवृत्त लेखक, कवी, महाराष्ट्र शासनाचे निवृत्त सहसचिव श्री राजाराम जाधव यांनी बंजारा समाजाचे साहित्य संमेलन भरविणे का आवश्यक आहे, या विषयी प्रतिपादन केले होते. तर चांद्रसेनिय कायस्थ प्रभू समाजाचे साहित्य संमेलन का भरवावे लागले, या विषयी लिहित आहेत ज्येष्ठ लेखक श्री दिलीप गडकरी.वाचू या त्यांचे अनुभव आणि विचार.
— संपादक
आम्हा घरी धन
शब्दांचीच रत्ने l
शब्दांचीच शस्त्रे
यत्न करू ll
शब्दची अमुच्या
जीवाचे जीवन l
शब्द वाटू धन जनलोका ll
तुका म्हणे पहा
शब्दची हा देव l
शब्दची गौरव
पूजा करू ll
शब्दावर वाणी – लेखणीच्या सामर्थ्यावर संत तुकाराम महाराजांचा सार्थ विश्वास व्यक्त करणाऱ्या या पंक्ती आहेत. त्या चांद्रसेनिय कायस्थ प्रभू समाजाच्या साहित्यिकांसाठी योग्य ठरु शकतात.
१७ व्या शतका पासून १९ व्या शतकापर्यंत अनेक बखरकार साहित्यिक म्हणून अग्रेसर होते. खंडो बल्लाळ चिटणीस यांनी इ. स. १७९२ मध्ये शिवदिग्विजय बखर लिहिली. त्यामुळे ते चांद्रसेनिय कायस्थ प्रभू समाजाचे आद्य साहित्यिक असावेत. या समाजाच्या वा.सी.बेंद्रे, राम गणेश गडकरी, र. वा. दिघे, प्रबोधनकार ठाकरे, माधव गडकरी, प्रवीण दवणे, शिरीष कणेकर, कवी ‘ बी ‘, अशोक चिटणीस, श्रीप्रकाश अधिकारी, प्रवीण कारखानीस, इत्यादी अनेक साहित्यिकांनी शब्दाना देव मानून शब्दांचीच पूजा केली त्यामुळे ते साहित्य क्षेत्रात अग्रेसर राहिले आहेत. असे असूनही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आजवर या समाजाचा एकही साहित्यिक अध्यक्ष कां झाला नाही ? असा माझ्यापुढे प्रश्न पडतो. पूर्वाश्रमीच्या कुसुमावती जयवंत लग्नानंतर कुसुमावती देशपांडे झाल्यामुळेच त्यांना ग्वाल्हेर येथील १९६१ साली झालेल्या ४१ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळाले होते. त्या सोडल्यास अद्याप एकही साहित्यिक अध्यक्षपदा पर्यंत पोहोचू शकला नाही.
मराठी भाषेचे पहिले साहित्य संमेलन १८७८ साली पुणे येथे झाले. त्यानंतर १४७ वर्षानंतर २१ फेब्रुवारी २०२५ रोजी दिल्ली येथे झालेल्या ९८ संमेलनात जवळ जवळ सत्तर पेक्षा जास्त अध्यक्ष हे एकाच जातीचे आहेत. त्यामुळे येथे तसेच इतर कार्यक्रमांमध्ये सुद्धा इतर जातीच्या व्यक्तींना संधी कां मिळत नाही ? या प्रश्नाचा विचार झाला पाहिजे.

प्र. ल. मोकाशी यांनी १९९२ साली ८६० पानी ग्रंथ प्रकाशित केला. त्यात सर्वप्रथम चांद्रसेनिय कायस्थ प्रभू समाजातील साहित्यिकांची माहिती दिली आहे. त्यानंतर मी २००७ साली ” सीकेपी समाजाचे साहित्यातील योगदान ” ह्या पुस्तकात प्रबोधनकार ठाकरे यांच्या पासून त्यांचा पणतू कवी आदित्य ठाकरे अशा चार पिढीतील चाळीस साहित्यिकांची माहिती असलेले पुस्तक प्रकाशित केलं. त्यावेळेस माझ्या लक्षात आले की आपल्या जातीत लिहिणारे अनेक जण आहेत परंतु त्यांना फारसा सन्मान मिळत नाही.
मधू मंगेश कर्णिक यांच्या लक्षात आले की अखिल भारतीय साहित्य संमेलनात कोकणातील साहित्यिकांना वाव मिळत नाही म्हणून त्यांनी कोकण मराठी साहित्य परिषद स्थापन केली. कामगारांना संधी मिळत नाही म्हणून नारायण सुर्वे यांच्या प्रयत्नातून “कामगार साहित्य संमेलन” सुरु झाले.
मी २०११ साली अखिल भारतीय सीकेपी समाजाचा उपाध्यक्ष झालो तेव्हा आपण “अखिल भारतीय सीकेपी साहित्य संमेलन” आयोजित करावे असा प्रस्ताव मांडला होता. पण त्यावेळेसच्या पदाधिकाऱ्यांना असे साहित्य संमेलन यशस्वी होईल कां ? याबाबत शंका होती. त्यामुळे त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. पण मी जेव्हा २०१४ साली संस्थेचे मुखपत्र
“कायस्थ युगंधर” चा संपादक झालो तेव्हा या मुखपत्राच्या माध्यमातून साहित्य संमेलना संदर्भात योग्य वातावरण निर्मिती केली.
त्याचे फलित म्हणून २०१८ साली ठाणे येथे “पहिले सीकेपी साहित्य संमेलन” आयोजित केले. त्याला अखिल भारतीय पातळीवर चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचे अध्यक्ष प्रवीण दवणे, स्वागताध्यक्ष ठाण्याचे माजी महापौर मोहन गुप्ते होते तर
उद्घाटक माजी राज्यपाल राम प्रधान हे होते.या संमेलनात सहाशे पन्नास जण हजर होते. तर दुसरे साहित्य संमेलन पुणे येथे २०२२ साली झाले. त्याचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक अनंत देशमुख होते.अर्थात अशी साहित्य संमेलने भरवणे खर्चिक आहेत.
सध्या व्हाट्सअपवर “कायस्थ कलांगण” नावाचा समूह आहे. त्यात अनेक ज्येष्ठ कवी, लेखक, समीक्षक, नाटककार, उत्तम निवेदक आहेत. विविध ठिकाणी होणाऱ्या स्पर्धा संदर्भातील निवेदने ह्या समूहात टाकली जातात. त्यात अनेक सभासद सहभागी होतात. एकमेकांना प्रोत्साहन देणे, मार्गदर्शन करणे ह्यासाठी हा समूह तयार झाला आहे. दोन वर्षापूर्वी ह्या समूहातर्फ कर्जत येथे “काव्य संमेलन” आयोजित केले होते. त्यास सुद्धा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.शक्य असल्यास, या समूहातर्फे दरवर्षी जिल्हास्तरीय सीकेपी साहित्य संमेलन आयोजित करून जास्तीत जास्त जणांना लिहिण्यासाठी व वाचण्यासाठी प्रवृत करावे, असे मला मनोमन वाटते.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करणाऱ्या संयोजकांनी दोन वर्षानंतर म्हणजे २०२७ साली होणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी सीकेपी साहित्यिकाची निवड करावी ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो.

— लेखन : दिलीप गडकरी. कर्जत – रायगड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
दिलीपजी ,
योग्य आणि प्रभावी ओघवती भाषेत आपण व्यक्त झाला आहात.
*१०० व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आपल्या ज्ञातिबंधूने भूषवावे*
हीच मनोकामना,
मनःपूर्वक धन्यवाद 🌷🌷
जयश्री अनिल भिसे.
दिलीपजी, खूप छान विचार व्यक्त केला आहेत. मनःपूर्वक धन्यवाद 🙏🌹