Sunday, July 20, 2025
Homeयशकथाजिचे तिचे आकाश… १२

जिचे तिचे आकाश… १२

दीपाली केळकर

मराठी भाषा खूप समृध्द आहे. आपल्या सगळ्यांना, आपल्या मराठीचा सार्थ अभिमान आहे. पण तरी कधी कधी वाटतं, आपल्याला आपली ही माय मराठी अजून कळलीच नाही. विशेषत: जेव्हा काही जणांच्या तोंडून ती इतकी लडिवाळ, रेशमाच्या लडी सारखी, अर्थपूर्ण ऐकायला मिळते, तेव्हा तर ते जास्तच जाणवते.

मी जेव्हा दीपाली केळकर ह्यांचा कार्यक्रम पहिल्यांदा ऐकला तेव्हा, खूपच भारावून गेले. दीपालीताई दिसायला एकदम सुंदर, गोऱ्यापान, घारे आश्वासक, बोलके डोळे आणि साखरेच्या पाकातून काढल्यासारखी गोड वाणी … अतिशय आकर्षक व्यक्तीमत्व आणि मराठी भाषेवर प्रेम … त्यांची ओळख करून देतांना किती विशेषणे लावावीत ?

त्या सुप्रसिध्द वृत्तनिवेदक आहेत. २००० सालापासून त्या सह्याद्री वाहिनीवर, सायं. ७ च्या बातम्या देत आहेत. टिव्ही वरच्या बातम्या ऐकतांना रटाळ वाटतात, पण दीपालीताईंचे स्पष्ट उच्चार, सांगण्याची पध्दत, आवाजातला संयम, हसरा सुरेख चेहरा यामुळे त्या बातम्या श्रवणीय वाटतात.

दीपालीताई अतिशय सोज्वळ दिसतात. त्यामुळे मॅाडेल म्हणूनही त्या काम करत होत्या. एका मोठ्या ब्रॅंड्च्या, सोन्याच्या दागिन्यांची जाहिरात करण्यासाठी, मॅाडेल म्हणून त्यांना निवडण्यात आले होते. फार्मा कंपनी, हेअरॲाईल, युनिसेफ सारख्या काही सरकारी जाहिरातीतही त्या होत्या. १० वर्षे त्या मॅाडेल कोॲार्डिनेटर म्हणूनही काम करीत होत्या. त्यांनी अनेक नामवंत कलाकारांच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आहे. मुळच्या कार्यक्रमाला त्यांच्या सूत्रसंचालनामुळे आणखी उच्च दर्जा मिळतो. सगुणाबाग नेरळ इथल्या चंद्रशेखर दादा भेडसावळे यांचा एस्.आर. टी कृषी सन्मान कार्यक्रम २२ मे रोजी असतो.. त्याचे त्या सतत ४ वर्षे सूत्रसंचालन करत आहेत. उदयदादा लाड ह्यांचा कृतज्ञता सोहळा २९ मे रोजी असतो, त्याचे सूत्रसंचालन तर त्या सतत १४ वर्षे करत आहेत. इतक्या त्या लोकप्रिय आहेत.

स्टेजवर दिपालीताई ज्या आत्मविश्वासाने, पूर्ण तयारीने वावरत असतात त्यामुळे त्यांच्या एकपात्री प्रयोगांनाही प्रचंड दाद मिळते. त्यांचे भाषेवर इतकं प्रभुत्व आहे, की उत्तम व्याख्यात्या हे विशेषण त्या सार्थ ठरवतात. मराठीतल्या ओव्या, म्हणी, गंमती, प्रसिध्द लेखकांचे लेखन, कवींच्या कविता.. ह्यांचा योग्य ठिकाणी वापर करून त्या सभागृहाला अगदी खिळवून ठेवतात. त्यांच्या कार्यक्रमांची नांवही खूपच सुंदर आहेत. शब्दांच्या गावा जावे, वसंतोत्सव, आला पाऊस, गाणं शब्दांचं, गंमत म्हणी वाक्प्रचारांची, स्त्रीधन (उखाण्यातली गंमत), पसायदान आणि व्यक्तिमत्वविकास, मनप्रसन्न, अभंग लावण्य आणि मनोविकास, हास्यसंजीवनी… अशा विविध विषयांच्या एकपात्री कार्यक्रमात त्या व्यग्र असतात. आतापर्यंत त्यांनी देश विदेशात ८०० हून जास्त कार्यक्रम केले आहेत.

सखोल अभ्यास, प्रगल्भ ज्ञान, मराठीची आवड, ओघवती भाषा आणि गोड वाणी ह्यामुळे त्या मुलाखती घेतांना, सूत्रसंचालन करत असतांना किंवा स्वतःचे एकपात्री कार्यक्रम करत असतांना … त्या प्रत्येक कार्यक्रमात नाविन्य आणतात. या सर्वातच त्या प्राविण्य मिळवून थांबल्या नाहीत, तर सुसंवादाचे १० मंत्र, संवादकौशल्य, निवेदन हे शिकवण्यासाठी त्या विविध ठिकाणी कार्यशाळा घेऊन अनेकांना या क्षेत्रात येण्यासाठी मार्गदर्शन करतात, हा ही त्यांचा मोठेपणाच म्हटला पाहिजे.

दिपालीताईंनी आपल्या खास शैलीत “खेळ मांडियेला” नावाचे पुस्तक लिहीले आहे. त्याच्या दोन आवृत्त्या संपल्या असून लवकरच तिसरी आवृत्ती येत आहे.

इतकं वाचल्यावर दीपालीताईंनी मराठी विषय घेऊनच शिक्षण पूर्ण केलं असे वाटेल.. पण नाही ! त्या मुळच्या मुलुंडच्या.. तिथल्या मुलुंड कॅालेज ॲाफ कॅामर्समध्ये त्यांनी शिक्षण घेतले. प्रथम मार्केटिंग, कौन्सिलींग क्षेत्रात कामं केली. आकाशवाणीवर युवावाणीमध्ये काम केले. पण कधीतरी संधी मिळाली आणि स्टेजवर त्यांनी कार्यक्रम केला आणि मग त्यांना तिथेच त्यांचे आकाश सापडले. त्या तिथे रमल्या. आता त्या यूट्यूबवरही काही छोटे कार्यक्रम करतात. “तुम्हाला काय वाटतं“…. या कार्यक्रमात त्या मराठीतल्या शब्दाचे अर्थ सोप्या पध्दतीने सांगतात. उदा. व्यग्र आणि व्यस्त, अहंकार आणि अभिमान ह्यातला फरक .. मराठीची सेवा करायचा विडा त्यांनी उचलला आहे. त्या बालपणापासून स्टेजवर जात असतील असं वाटणं सहाजिक आहे. पण त्यांनी आठवी पर्यंत कधीच वक्तृत्व स्पर्धेत वगैरे भाग घेतला नव्हता. नववीत मैत्रिणीचे पाहून भाग घेतला, सवय नसल्यामुळे फजिती झाली.

पण जिद्दीने आपल्या कमतरतेवर मात करून, दीपालीताईंनी मेहनत करून, पुढच्या वर्षी स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवला आणि मग मात्र त्यांची घोडदौड सुरूच राहिली. त्यांचे आईवडिल त्यांना चांगल्या कार्यक्रमांना नेहमी बरोबर नेत. त्यामुळे प्रसिध्द लेखकांच्या गोष्टी, व्याख्यानं, पुस्तक प्रदर्शनं, अनेक दर्जेदार कार्यक्रमामुळे त्यांना मराठीची गोडी लागली होती. ११ वी, १२ वीत कॅालेजात, मराठी उत्तम शिकवणाऱ्या प्राध्यापक सुहासिनी किर्तीकर आणि अलका कुलकर्णी ह्यांच्यामुळे ती गोडी वाढली. तिथले मराठी मंडळ, वाद्यवृंद यातल्या कार्यक्रमांतील सहभागामुळे आत्मविश्वास वाढून, त्यातूनच मेहनतीने, दीपाली ताई कार्यक्रम करण्यात यशस्वी झाल्या आहेत. आपल्या यशाचे श्रेय, त्या आपल्या आई वडिलांनी केलेले संस्कार, दोन्ही प्रोफेसर आणि आकाशवाणीवर निवेदक असलेले आपले पती श्रीराम केळकर तसंच जाणकार रसिक, कार्यक्रम आयोजक आणि परमेश्वराला देतात. त्यांची मुलगीही आता त्यांच्या तालमीत तयार होऊन, मराठीचाच अभ्यास करत आहे. तिचीही त्यांना आता मदत होते. लग्नानंतर त्या बदलापूरला आल्या आणि पतीच्या प्रोत्साहनामुळेच एकपात्री कार्यक्रम करायला लागल्या.

दीपालीताईंना स्वराभिनय पुरस्कार, व्यावसायिक सेवा पुरस्कार, कलागुण गौरव पुरस्कार, नवदुर्गा पुरस्कार असे अनेक सन्मान, पुरस्कार मिळाले आहेत. ते आणखी मिळत राहोत आणि त्यांनी मराठीची सेवा करत असेच आणखी छान छान कार्यक्रम द्यावेत, ह्यासाठी त्यांना खूप शुभेच्छा !

चित्रा मेहेंदळे.

— लेखन : चित्रा मेहेंदळे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

6 COMMENTS

  1. चित्रा ताई तुम्ही खुप छान वर्णन केले आहे आमच्या मैत्रिणीचे. एक उत्तम व्यक्ती, मैत्रीण, व्याख्याती,मुलाखतकार, अभ्यासक अशी अनेक आभूषणे लाभलेली आमची मैत्रीण आमच्या दूरदर्शनचा अभिमान आहे. सोज्वळ रहाण,बोलणं, वागणं ह्यामुळे ती सगळ्यांचीच मैत्रीण आहे. खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत तिच्याकडून. आपल्या माणसांना पुढे घेउन जाणे त्यांच्या कलागुणांना ओळखून आपल्या बरोबरीने सन्मान घडवून आणणे हे दिपालीच करू शकते.सादरीकरणाची सुंदर, मधुर शैली ह्यामुळे तिचे प्रत्येक कार्यक्रम मंत्रमुग्ध होऊन ऐकत रहावे असेच असतात .ती आमची मैत्रीण असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे 🥰

  2. अगदी योग्य लिहिले आहे. अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे त्यांना कवितेची उत्तम जाण आहे. अगदी हायकू काव्यप्रकाराचीही त्यांना माहिती आहे. त्यांच्या कार्यक्रमात त्या कविता उत्तमरीत्या सादर करतात.

  3. एका वाक्यात सांगावयाचे झाल्यास, “झाले बहुत होतील बहुत परन्तु यासम याच ” Retired Professor Anant Datey Pune.

  4. सुंदर शैलीत परिचय आणि व्यक्ती चित्रण केले आहे चित्र मेहेंदळे ह्यांनी. नेहेमी प्रमाणे उत्तम लेखन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माध्यमभूषण याकूब सईद
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on आनंदी जीवनासाठी समतोल आवश्यक – देवेंद्र भुजबळ
कविता बिरारी on मम गाव राहिले दूर…..
प्राची उदय जोगळेकर on सांगा, कसं जगायचं ?