“विभा विनोद काळे”
“कुठलही काम करतांना तिन्ही वेळा माणसाने ईश्वराची आठवण ठेवायला हवी. काम करण्यापुर्वी अथक प्रयत्न करतांना (कर्मयोग), प्रत्यक्ष काम सुरू असतांना बुद्धीचा वापर करून कौशल्याने, नेटके काम करतांना (ज्ञानयोग) व नंतर एकूणच त्याचे यश-अपयश, ईश्वराला अर्पण करतांना, समर्पित भावनेने त्याचे स्मरण करतांना (भक्तीयोग).. हे तिन्ही योग आपल्याला आपल्या सद्गुरूंमधे सहजपणे दिसतात. हाच पुर्णयोग. गीतेत यालाच स्थितप्रज्ञ म्हणतात.“
अशा सुंदर चार ओळी सांगून सोप्या शब्दात गीता समजवणाऱ्या विभाताई म्हणजे सर्व गुण संपन्न असं एक व्यक्तिमत्व आहे. जो त्यांच्या एकदा संपर्कात येतो, तो त्यांच्या मधुर वाणी मुळे, सुंदर लिखाणामुळे कायम संपर्कात रहातो. त्यामुळे त्यांचा जनसंपर्कहि विशाल होत गेला आहे.
विभा विनोद काळे, पूर्वाश्रमीची विभावरी हिंगवे. त्यांना सासरे गंमतीने म्हणाले “we dont want any worry .!” आणि त्या विभावरीच्या विभा झाल्या, असे त्या स्वतःच गमतीने सांगतात. त्यांचे शिक्षण नागपुरला झालं. बीएससी नंतर त्यांनी मराठीत ॲडीशनल बी.ए. केलं. मराठीचा अभ्यास करतांना त्यांना खूप आनंद होत होता. त्यांना जाणवलं की मराठी साहित्य आपल्याला आवडतं. त्या निसर्गप्रेमी आहेत. कविता आवडत होत्याच, काहीबाही लिहितही होत्या आणि मग एम.ए. मराठी साहित्याला त्यांनी ॲडमिशन घेतली. त्यावेळी “कवी ग्रेस“ हे त्यांना शिकवायला होते. आयुष्याकडे बघायचा एक वेगळा दृष्टीकोन त्यातून विभाताईंना मिळाला.
जीवनाकडे बघण्याच्या दृष्टीत एकदम गांभीर्य आलं. त्यानंतर लग्न झालं. आधी त्या पुण्यात गेल्या तिथे त्यांनी एम. फील् केलं.

विभाताई मुंबईला आल्यावर चांगल्या ठिकाणी नोकरी, चांगलं सुंदर कंपनीचं घरं, दोन मुली आणि त्यांची शाळेची नोकरी असं सुरू होतं. कॅालनीत आणि शाळेत नाच, नाटकं बसवणे, रांगोळ्या काढणे, सिरॅमिक शिकवणे, असे खूप उपक्रम त्यांनी केले. शिक्षकांच्या स्पर्धेत सुद्धा हरतऱ्हेची कला, एकपात्री प्रयोग, निबंध स्पर्धा, वकृत्वस्पर्धा, लेखन, पुष्परचना, पेंटींग अशा अनेकविध गोष्टी सादर केल्या. खूप बक्षिसं मिळवली. कार्यक्रमांच्या धुमश्चक्रीत आयुष्याचा काळ आनंदात, वेगात सरला. एक रसिक, उत्साही शिक्षिका म्हणून त्या सर्वांच्या आवडत्या होता.
विभाताईना 2004 साली पुण्याच्या “स्वामी विद्यानंद” यांचा अनुग्रह लाभला. त्याच वर्षी त्यांची आई देवाघरी गेली. त्यांची थोरली लेक अमेरिकेला जाण्यासाठी निरनिराळ्या परीक्षा देत होती. धाकटी बारावीत होती. त्या सांगतात, ”आई गेल्याचे मला खूप दुःख झाले. ते मी सहन केलं. पण ते आतल्या आत दाबल्या गेलं आणि मला जबरदस्त एन्झाइटी अटॅक आला. खूप रक्तदाब वाढला. मला रुग्णालयात दाखल व्हावं लागलं. ब्रेथलेस वाटलं म्हणून ऑक्सिजन लावला. हे सर्व सविस्तर सांगण्याचे कारण म्हणजे, गुरूंनी सांगितले आजारपणं उगाच येत नाहीत. खूप काही शिकवून जातात..”
त्याच वर्षी दोघी मुली शिक्षणासाठी बाहेर पडल्या. त्यांच्या भोवती फिरणारं आयुष्य एकदम थांबलं. मैत्रिणी नव्हत्या. विभाताईना एकाकी वाटू लागलं. योगासनं शिकू म्हणून त्यांनी निंबाळकर गुरुजींचा योग वर्ग लावला आणि त्यांचे आयुष्य बदललं. “योग” याचा खरा अर्थ कळला. योग हा आसना पुरता सीमित नसून योग म्हणजे जोडले जाणे ! प्रत्यक्ष परमेश्वराशी जोडले जाण्याचा तो मार्ग आहे. मुनी पतंजलींच नाव कानी पडलं. त्यांनी योग थेरपी केलं. पण मन शांत बसलं नाही. म्हणून योगशास्त्र सांख्य विषयात एम.एस. केल.
कोल्हटकरांचं “पातंजल भारतीय मानसशास्त्र” पुस्तक वाचून, पतंजली व्यास भाष्य अभ्यासलं. पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये एम.ए.केलं. त्या रेकी मास्टर पण झाल्या.
त्या म्हणतात, ”मला वाटत होतं आपणच करतोय हे सगळं ! पण 2020 साली माझ्या गुरूंनी समाधी घेतली. मी छोटे छोटे चिंतन वजा लेख लिहून, गृपवर पाठवू लागले. अभ्यासाचा खूप उपयोग झाला. पुष्कळांना माहिती मिळू लागली. मला कळले ही सगळी गुरू किमया… त्यांनी छान तयारी करून घेतली … ते म्हणतात…
“जे जे आपणास ठावे ते ते इतरां सांगावे ..”
गीता शिकवण्याची प्रेरणा त्यांचीच !”
आज विभाताईंच्या ४०० कविता, ८०० चिंतनपर लेख आहेत. ह्या सर्वाचे श्रेय त्या गुरूला देतात. त्या म्हणतात…
“दिवस उजाडला की काहीतरी सुचतं. आनंद आहे. ही सगळी गुरूकृपा आहे हे मी जाणते. निवृत्त झाल्यावर आनंदात, इतरांना उपयोगी असं जीवन जगण्यासारखा आनंद नाही. शिवाय अपेक्षा काहीच नाही. ही निरपेक्ष आनंदाची जातकुळी समजणं हीच जीवन भराची कमाई .. गुरूचरणी अर्पित !”
गुरूंनी जे प्रेम,आत्मीयता, आत्मविश्वास दिला तो सगळ्यांना वाटणे, हाच जीवनाचा एकमेव उद्देश त्यांनी ठरवला आहे. तो त्या कवितेतून सांगतात…..
“सहस्र करांनी निसर्ग देतो
माझीच छोटी झोळी….
वाच मना रे त्याने लिहील्या
शब्दावाचून ओळी …..
ऐक मना रे त्याचे गाणे
हो जरासा मुक्त…
देणाऱ्याचे ऋण मानावे
परतू नको रे रिक्त.”

विभाताईंचा हा विनम्र भाव आणि त्यांचे निरपेक्ष काम नक्कीच प्रेरणादायी आहे. त्यांच्या काही कविता तुम्हालाही नक्कीच आवडतील.
मातृदिनाच्या दिवशी त्या लिहीतात….
“आता माझं आभाळ वेगळं आई..
मांडवभर आता पसरलीय जाई.
तूच दिलस ना पंखात बळ..
पेलायला शिकवलस कुठलही वादळ…
आता रहा निश्चिंत, करू नकोस चिंता…
मीच सोडवीन माझ्या आयुष्याचा गुंता….”
त्यांच्या कवितेत सोपी सहज शब्द रचना आणि मेाठा आशय असतो.
जे जे काय होतं घरात,
ते माझं तुझं, तुझं माझं…..
पण केंव्हाही “जा ” म्हणालास
तर घर फक्त होतं तुझं….
म्हणुनच आपल्या पेक्षा
चिमणा चिमणीचं जीवन बरं असतं…..
कष्ट कोणाचेही असोत,
घरटं नेहमी चिमणीचं असतं..
घरटं नेहमी चिमणीच असतं…
विभाताईना असेच छान छान लिहायला, गीता सर्वांपर्यंत पोहोचवणाच्या त्यांच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा !

— लेखन : चित्रा मेहेंदळे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
खूप सुंदर शब्दांकन, व कमीतकमी आशय, विभाताईंच्या खुप मोठ्या कामाची ओळख करून देतो, ही लेखिकेची हातोटी.
विभाताईंना मी social media च्या माध्यमातून ओळखते, व फोन वर संवाद घडला.त्यातूनच त्यांच्या ज्ञान योगाची ओळख झाली.
चित्रा ताईंना धन्यवाद.
शब्दांकन छान आहे, अभिनंदन!
सौ. विभा विनोद काळे, ह्यांचा व त्यांच्या शब्दांचा आधार मलाही लाभला आहे. विशेष सांगावेसे वाटते की विभा आत्या श्री भगवद्गीता ही उत्तम प्रकारे समजावून सांगतात.