भाऊबीज
दिवाळी पाडव्यानंतरचा दिवस म्हणजे भाऊबीजेचा दिवस ! भाऊबीज म्हणजे दिवाळीमधील एक महत्त्वाचा दिवस. कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज साजरी केली जाते. यास बहीण भावाच्या प्रेमाची साक्ष देणारा दिवस म्हणून सर्वजण ओळखतात. बहीण भाऊ यांचा सण म्हणजेच भाऊबीज ! भाऊ बहिणीच्या घरी जातो. बहिण गोडधोड करून भावाला भोजन देते व औक्षण करून भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. दोघे एकमेकांना भेटवस्तू देतात. दिवाळी सण आला म्हणजे प्रथमतःच सासरी गेलेल्या मुलीला किंवा आपल्या बहिणीला आपल्या घरी दिवाळीला आणण्याची प्रथा असते.
कार्तिक शुद्ध द्वितीया ही यमद्वितीया म्हणूनही ओळखली जाते.दंतकथेप्रमाणे यमराज आपली बहीण यमीला भेटायला गेले होते. यमीने भावाला जेवायला बोलवले आणि ओवाळले हाच तो दिवस. या दिवशी जे भाऊ बहीण भाऊबीज साजरी करतात त्यांना अकाली मृत्यूची भीती राहणार नाही असा आशिर्वाद दिला. म्हणून आजच्या दिवशी जी बहीण आपल्या भावाला निमंत्रित करून त्याला स्वतःच्या घरचे भोजन खाऊ घालेल आणि त्याच्या कपाळावर टिळा लावेल, त्याला यमाचे भय राहू नये, अशी प्रार्थना यमराजाने ‘तथास्तु’ म्हणणे या सर्वांतून तेव्हापासून कार्तिक शुक्ल द्वितीयेला बहीण आपल्या भावाला भोजन देऊन टिळा लावणे. इ. यामुळे भाऊ-बहीण यांच्यामधील मायेला एक वेगळे परिमाण लाभले आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही.
कर्नाटकात भाऊबीज, ‘सौदरा बिदिगे’, बंंगालमध्ये ‘भाई फोटा’ , गुजरातमध्ये ‘भौ’ किंवा ‘भै-बीज’, अधिकतर प्रांतांमध्ये ‘भाईदूज’ तर महाराष्ट्रात काही भागात विशिष्ट परंपराही आहेत. या दिवशी बहिणी उपवास ठेवतात आणि भावाचे औक्षण करुनच भोजन करतात. औक्षणानंतर भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो.
यानिमित्ताने बहिणी आपल्या भावांना औक्षण करुन साखरेचे बत्तासे खाऊ घालतात. उत्तर प्रदेशात भाऊबीजेला सुके खोबरे देण्याची परंपरा आहे. या दिवशी बिहारमध्ये एक अनोखी परंपरा पाळली जाते. या दिवशी बहिणी भावांना फटकारतात आणि त्यांना चांगले-वाईट बोलतात आणि नंतर त्यांची माफी मागतात. येथील नागरिक सांगतात, ही परंपरा भावांनी भूतकाळात केलेल्या चुकांसाठी पाळली जाते. चुकांचे परिमार्जन होऊन उत्तम भविष्य व्हावे, हा यामागचा उद्देश आहे. या विधीनंतर बहिणी आपल्या भावांना औक्षण करुन मिठाई खाऊ घालतात.
भाऊबीज नेपाळमध्ये ‘भाई तिहार’ म्हणूनही प्रसिद्ध आहे. तिहार म्हणजे कपाळी लावला जाणारा कुंकवाचा टिळा. याशिवाय येथे भाऊबीज ‘भाई टिका’ नावाने साजरा केला जातो हे वर आले आहेच. नेपाळमध्ये या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या कपाळावर सात रंगांचा टिळा लावतात आणि त्यांच्या दीर्घायुष्य, सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करतात.
नेपाळमध्ये हा भाई टीका म्हणून पाच दिवस उत्सव साजरा करतात. पहिल्या दिवशी कावळ्याचे पूजन होते त्याला काक त्योहार म्हणतात. दुसऱ्या दिवशी कुकर पूजन होते. तिसऱ्या दिवशी बैलपूजा होते. चौथ्या दिवशी गायपूजा तर पाचव्या दिवशी भाई टीका म्हणजे भाऊबीज साजरी केली जाते.
भगवान श्रीकृष्ण आपली बहीण सुभद्रेला भेटायला भाऊबीजेच्या दिवशी गेला होता अशीही दंतकथा प्रचलित आहे. सुभद्रेने आनंदाने त्याचे स्वागत करून आपल्या हातांनी स्वयंपाक करून त्याला भोजन वाढले. त्याच्या कपाळाला टिळा लावून औक्षण केले.
भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाचे औक्षण करते. स्त्रीमध्ये असलेल्या विविध प्रकारच्या भावांपैकी एक आहे ‘वात्सल्यभाव’ यामधून प्रतीत होतो! यामध्ये करुणेचे प्रमाण अधिक असते. भाऊबीजेच्या दिवशी आपल्या भावाचे औक्षण करतांना तिच्यामध्ये वात्सल्यभाव कार्यरत असतो. भावाविषयी अत्यंतिक प्रेम ही असते. जेव्हा बहीण भावाचे औक्षण करते, तेव्हा तिच्यामध्ये असलेली अप्रकट अवस्थेतील शक्तीस्पंदने प्रकट स्वरूपात कार्यरत होतात. त्यानंतर त्यांचे प्रक्षेपण भावाच्या दिशेने होते. यामुळे भावाला कार्यशक्ती प्राप्त होते.
भाऊबीजेला भावाचे भोजन झाल्यानंतर त्याला विडा खायला देण्याचे अधिक महत्त्व आहे. ‘विडा दिल्यामुळे बहिणीचे सौभाग्य अखंड रहाते’, असे म्हटले जाते.
देशाच्या विविध भागात भाऊबीज हा सण जरी आपल्या स्थानिक परंपरेनुसार साजरा केला जात असला तरी यात एक गोष्ट सारखी आहे आणि ती म्हणजे भावा-बहिणीच्या पवित्र नात्यातील प्रेम. प्रत्येक ठिकाणी या सणाला नावे वेगळी आहेत मात्र बहिणीचे भावाला दीर्घायुष्य व सुख-समृद्धीसाठी औक्षण करणे, भावाने बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देणे हे सर्वत्र एकसारखंच आहे.
बहीण सासरी जरी गेली तरी भाऊ हा बहिणीचा सदैव पाठीराखा आहे. आई-वडिलांच्या पाठीमागे तो बहिणीचा प्रमुख आसरा आहे. सासर आणि माहेर यांना जोडणारे नाते म्हणजे भावाबहिणीचे नाते. भाऊ दीर्घायुषी व्हावा, भावाची प्रगती व्हावी अशीच सात्विक भावना बहिणीच्या मनी असते. तर बहिणीच्या सौख्यासाठी समृद्ध जीवनासाठी भाऊ सर्वस्व त्यागायाला तयार होतो. ही उदात्त भावना या सणामागे आहे. पूर्वीच्या काळातील जीवनाची क्षणभंगुरता, साथीचे आजार, वेगवेगळ्या कारणांनी माणसाचे मृत्युमुखी पडणे. या सर्वांतून अकाली मृत्यूतून भावाची सुटका व्हावी, त्याला इतर कोणतीच भीती राहणार नाही म्हणून यमाची पूजा आणि यमपूजनही आणि भाऊ बहिणी मागे त्याचाच आशीर्वाद भाऊबीजेमध्ये परंपरेने आलेले आपल्याला दिसून येते.
आपल्या प्रत्येक सणांमध्ये अशा प्रकारे नात्यांची गुंफण दिसून येते. परंपरेच्या बाबींतून भावनांची गुंफण, वस्तू प्राणी आणि जिवंत माणसाबद्दल असलेला कृतज्ञता भाव प्रगट करण्यासाठी जागा करून ठेवलेल्या आढळून येतात. यातून सांस्कृतिक उपचारात समाजभानं असल्याचेही दिसून येते.
— लेखन : राजेंद्र गुरव. औंध -सातारा
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
छान आणि उपयुक्त माहिती…असेच लिहीत रहा.
धन्यवाद सर
आपली प्रतिक्रिया हा माझ्यासाठी आशीर्वाद आहे