माणसाला आपल्या आयुष्याचं ध्येय सापडलं तर छोटी माणसंही डोंगरा एवढं काम करतात. आपले जीवन ध्येयं सापडणं ही आपल्या जीवनातील क्रांती असते. तो क्रांतीचा क्षण अचूक पकडता यायला हवा. मग आयुष्यात आनंदच आनंद असतो. मग ब्रम्हपुत्रा नदीच्या काठावर, ब्रम्हपुत्रेने तयार केलेल्या वाळूच्या माजुली नामक बेटावर राहणारा जादव मोलाई पायेंग नावाचा एक सामान्य माणूसही स्वतःबद्दल म्हणू शकतो आणि म्हणतो,’मी जगातील सर्वात आनंदी माणूस आहे’
आसाम राज्यात १९६३ मध्ये मिसिंग या आदिवासी जमातीत जन्मलेला जादव पायेंग ! मोलाई हे घरातल्या आणि गावातल्या लोकांनी त्याला दिलेले टोपण नाव. १९७९ साली ब्रम्हपुत्रेला पूर येऊन गेल्यानंतर माजुली बेटावरील वाळूच्या टेकड्यांवर फिरत असतांना, पूराच्या पाण्यासोबत वाहून आलेले हजारो साप तापलेल्या वाळूमुळे मृत झाल्याचे भयंकर दृश्य मोलाई पाहतो. दुःखावेगाने मटकन खाली बसतो आणि रडू लागतो. त्या दुःखद क्षणीच त्याला आपले जीवन ध्येय सापडते. मृत सापांना व प्राण्यांना वाचवायचे असेल तर झाडे लावली पाहिजेत या विचाराने तो पेटून उठतो. गावकऱ्यांची मदत मागतो. वाळूत कुठं झाडं येतात का ? म्हणत लोक हसतात. मग तो वन विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटतो. बांबूसारख्या काही वनस्पती येऊ शकतात असे म्हणत, ते त्याला काही रोपे देतात. त्या पहिल्या २० रोपांनी त्याचे काम सुरू होते. तो पहिले रोप लावतो. खूप आनंदी होतो. मग रोपांमागून रोपे लावत जातो. आपल्या छोट्या बोटीतून माती वाहून आणत रोपांचे आळे भरतो. पाणी, माती, खत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आईची माया देत त्या रोपांना वाढवतो. रोपांना आधार देतो, कुंपण करतो. त्यांचे राखण करतो. आला दिवस झाडांच्या संगतीत घालवतो.

ही झाडं मोठी होतात. जंगल बहरू लागतं. ते जंगलच मोलाईचं घर बनतं. उदरनिर्वाहासाठी तिथंच आपली जनावरं सांभाळत तो जंगलात राबत राहतो. बघता बघता… नव्हे… नव्हे तर ३५ वर्षे राबराब राबून १३६० एकरांचं जंगल उभं करतो. आसामी भाषेत जंगलाला कथोनी म्हणतात. मोलाईच्या कथोनीत पट्टेरी वाघ, हरणं, माकडं, ससे, गेंडे, साप आणि नाना प्रजातींचे पक्षी पाहुणे राहायला येतात. दरवर्षी ४/५ महिन्यांसाठी १०० हत्तींचा कळपही येऊ लागतो.

उत्कृष्ट जंगलाचा एक महत्त्वाचा निकष असतो, की ज्या जंगलात हत्तींचा निवास असतो ते उत्कृष्ट जंगल! उत्कृष्ट जंगलाचे प्रमाणपत्र प्रथमतः त्या हत्तींनीच मोलाईला दिले. हत्ती येतांना – जातांना रस्त्यातील पिकांची- झोपड्यांची नासधूस करत. मोलाईची झोपडीही उध्वस्त व्हायची. लोक भांडत, तुझ्या जंगलामुळेच हे नुकसान होते म्हणत आणि जंगलातील झाडांवर कुऱ्हाडीचे घाव घालण्यासाठी सरसावत ; त्यावेळी झाडांना मिठ्या मारत स्वतःची मान पुढं करत पहिला घाव माझ्यावर घाला म्हणत तो जंगलाचे रक्षण करीत राही.
कर्मधर्मसंयोगाने एक छायाचित्रकार त्या जंगलात येतो. झाडे लावणारा, झाडांची निगा राखणारा मोलाई त्याला दिसतो. अप्रूप वाटून तो मोलाईचे आणि त्याच्या जंगलाचे फोटो घेतो. वर्तमानपत्रांतून आणि समाजमाध्यमांतून हे फोटो प्रसिद्ध करतो. आणि मग हा “फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया” जगाला माहीत होतो.

एकट्याच्या बळावर तब्बल ३५ वर्षे मेहनत करून ११० प्रकारच्या वनस्पतींचे, ५५० हेक्टरचे जंगल उभे करणाऱ्या वनपुरुष मोलाईंना २०१५ चा पद्मश्री किताब मिळतो. सत्कारानंतर लोक कामाचं कौतुक करतात. तेव्हा प्रसिद्धीपराङ्मुख मोलाई या जंगल निर्माणाचं श्रेय वारा आणि पशुपक्ष्यांच्या बीज प्रसाराच्या कार्याला देऊन मोकळा होतो. कोणी संदेश विचारला तर म्हणतो,”दोन झाडं लावा आणि स्वतःचा ऑक्सिजन मिळवा.”
खरं तर मोलाई सारखी माणसं तोंडाने शब्दांच्या वाफांची शक्ती न दवडता आपल्या कामातूनच खूप काही सांगत असतात. नंतर अर्थातच कामच बोलू लागतं. नदीतील सर्वात मोठे जंगल उभे करुनही प्रसिद्धीचं तोळाभरही मास अंगावर चढू न देता जंगलात रमणाऱ्या ह्या झाडवेड्या छोट्या माणसाची, ही डोंगराएवढी कहाणी सुफळ संपूर्ण. पेड लगाओ ऑर्गन में सास पाओ मुफ्त में ।
— लेखन : प्रा डॉ संजय गोरडे. संगमनेर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800