Homeयशकथास्मरण

स्मरण

“विदुषी मृदुला जोशी”

त्यांचे घरच विद्वान, विदुषी यांनी भरलेले.. त्यांचा जन्म अशा घरात १५ नोव्हेंबर १९४३ रोजी झाला तेव्हाच विदित होते की ही सुकन्या कशी निपजेल आणि ते तिने सार्थ करून दाखवले. त्यांच्या आजीपासूनच ही विद्वत्ता आपल्याला दिसून येते…आजी कमळाबाई नारायण विजयकर त्या काळात अख्ख्या मुंबईत अस्खलित इंग्रजीतून भाषण करणाऱ्या आणि व्यासपीठ गाजवणाऱ्या होत्या. झेवियर्स कॉलेजची “पहिली हिंदू विद्यार्थिनी“ म्हणून त्यांची इतिहासात नोंद आहे. त्यांची अभ्यासू आणि चतुर संभाषणाची कला हेरून ब्रिटिशांनी ऑनररी मॅजिस्ट्रेट हे पद देऊ केलं होतं. त्यांची आई देखील त्याच पद्चिन्हावर चालणारी.. कामिनी गोविंद आगासकर.. संस्कृत विषयात त्यांनी एम ए १९४१मध्ये केले होते. असा वारसा घेऊन आलेली आमची .. मृदुला .. विदुषी कशी होणार नाही ?

तसेच त्यांचे वडील, वडिलांचे वडील सर्व उच्च विद्याविभूषित, मोठ्या पदांवर कार्य करणारे आणि लग्नानंतर त्यांचे पती पोद्दारचे प्राचार्य आणि मोठे दीर, हे ही सर्व सुशिक्षित, शिक्षण क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे असेच होते .. त्यांचे दीर तर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू ही होते ..असे दोन्ही ही घरातून त्यांच्यावर विद्वत्तेचे उच्च संस्कारच होत राहिले.

एका वेगळ्या वाटेवर चालणे आणि ते क्षेत्र अक्षरशः पादाक्रांत करणे हे अशक्य ते शक्य करून दाखविले त्यांनी.

माझ्या आयुष्यात त्या खूप उशीरा आल्यात पण त्यांचा ऋजू स्वभाव, सगळ्यांना आपलेसे करण्याचे वैशिष्ट्य आणि लहानांना प्रेम, मोठ्यांना मान देण्याचं व्यवच्छेदक स्वभाव लक्षण…..प्रत्येकाला आपलंस करी.. माझ्यासाठी त्या एकट्या मृदुला ताई असल्या तरी त्यांच्यासाठी माझ्यासारख्या असंख्य स्वाती होत्या हे मला माहीत होतं.

त्यांनी संस्कृत – मराठी मध्ये एम ए प्रथम वर्गात केले. मुंबई विद्यापीठातून १९६६ मध्ये…भाषेच्या प्रेमामुळे तेथूनच एका नवीन प्रवासाची सुरुवात झाली. मराठी प्रकाशन क्षेत्र त्यांना खुणावत होते. त्यांनी लगेच ते कार्य सुरू केले.. १९७२ साली पॉप्युलर प्रकाशन या विख्यात संस्थेत त्या मराठी पुस्तकांची संपादक म्हणून रुजू झाल्यात ते शेवटपर्यंत अव्याहतपणे सेवा करीत राहिल्या.

ते कार्य अजिबात सोपे नव्हते…लेखकांची मोठमोठी हस्तलिखित वाचून काढणे.. त्यांचे स्वतः चे अक्षर अप्रतिम होते…मोत्यांचे दाणे जणू.. त्यामुळे एखाद्या लेखकाचे अक्षर गिचमिड असेल तर त्यांना काय वाटत असेल हा विचार करूनच मला आश्चर्य वाटते.. पण त्यांच्या मूळ नम्र, हसऱ्या, सहनशील स्वभावामुळे त्यांनी कधीच कोणतीही तक्रार केली नाही आणि असंख्य लेखक त्यांच्या कामापुरतेच संबंधित न राहता घरचेच एक सदस्य होऊन गेले आणि फक्त तेवढेच काम न करता त्यांनी स्वतः च प्रत्येक बारीक सारीक कामांकडे लक्ष दिले, स्वतः शिकून घेतले. त्यात हस्तलिखितांचे मूल्यमापन, संपादकीय संस्करण, परिष्करण, मुद्रितशोधन, पुस्तकाची मांडणी व रचना, मुखपृष्ठापासून मलपृष्ठापर्यंतचा ले आउट व डिझाईन, चित्रकारांशी संपर्क, जाहिरात लेखन, लेखकांशी चर्चा व प्रत्यक्ष संपर्क इत्यादी अनेक अंगांनी पुस्तक निर्मितीत सक्रिय सहभाग घेतला.

अगदी किरकोळ कामे खिळे जुळणी सुद्धा त्यांनी मन लाऊन बघितले, शिकले  आणि करवून घेतले ..त्यानंतर छापण्याच्या प्रक्रियेत नवनवे बदल होत गेले ते सर्व त्यांनी आनंदाने आत्मसात केले फक्त त्यांच्या चौकस, नवीन शिकण्याची आवड, बुद्धिमत्ता या मुळेच त्या हे सर्व करू शकल्या.. पुस्तकाचे मुखपृष्ठ कसे असावे या साठी देखील त्या किती दक्ष असत हे  बघून मी अवाक झाले होते.

चित्रकारांशी त्या स्वतः च संपर्क करीत, कल्पना सांगत आणि रंगापासून ते रेखाचित्रांच्या  मांडणी पर्यन्त सर्व उत्साहाने करीत. म्हणूनच .. पॉप्युलर मध्ये त्या खरोखरी पॉप्युलर झाल्या, स्वतः प्रकाशक सुप्रसिद्ध श्री रामदास भटकळ त्यांच्यावर लेकी प्रमाणे प्रेम करीत होते. ताई देखील लिहितात…आम्हा सर्वांवर चिरंतन प्रभाव पडला आहे तो रामदासांचा… त्यांच्या प्रगल्भ भूमिकेचा, प्रतिभाशाली संपादक असण्याचा, चिंतनशील व्यक्तिमत्वाचा आणि एका बहुश्रुत, चतुरस्त्र, कार्यकुशल प्रकाशकाचा..
मी जेव्हा रामदासांना भेटले तेव्हा त्यांनी असेच प्रेमाने ताईंबद्दल उदगार काढले होते. त्या दोघांनी मिळून लिहिलेले पुस्तक “पॉप्युलर रीतिपुस्तक .. खूप गाजले .. कारण अशा तऱ्हेचे .. प्रकाशनाचे सर्व अंग समजावणारे पुस्तक पूर्ण मराठी विश्वात सर्वप्रथम ठरले .. एकमेवद्वितीय असे गणले गेले.. या पध्दतीने गेल्या 53 वर्षांत असंख्य मराठी, इंग्लिश, संस्कृत, प्राकृत पुस्तकांच्या/ ग्रंथांच्या/ कोशांच्या निर्मितीला त्यांनी  हातभार लावला आहे.
१९९५ पासून २०१० पर्यंत १५  वर्षे “Journal of the Asiatic Society of Mumbai” ह्या विश्वविख्यात जर्नलच्या प्रमुख संपादकांना मुद्रणप्रत तयार करण्यात व मुद्रितशोधनात साहाय्य केले होते.

संस्कृतचे देवनागरी लिपीतून रोमन लिपीत लिप्यंतर करण्यात तज्ज्ञता प्राप्त केली होती.. दिगंत कीर्ती मिळवलेल्या लेखकांना संशोधन साहाय्य आणि संपादन साहाय्य केले. ह्या कामाकडे केवळ व्यवसाय म्हणून न पाहता बौध्दिक आनंद मिळवण्याचे साधन म्हणून पाहण्यामुळे एक वेगळीच कृतार्थता त्यांना लाभत असे.

मध्यंतरी त्यांना श्री हृदयनाथ मंगेशकरांचा फोन आला. त्यांनी विचारले दीदींसाठी तेवीस श्लोक दोन दिवसात इंग्रजीत करून द्याल का ? त्यांनी हो म्हटले आणि करून ही दिले. त्यासाठी दीदींनी किती कौतुक केले ते अवर्णनीय आहे.

लेख, कवी त्यांच्याबद्दल काय सांगत हे वानगी दाखल काही उदाहरणं देण्याचा मला मोह आवरत नाही. कवी तुमच्या भेटीला … या कार्यक्रमात तर कवी ग्रेस यांनी चक्क मृदुलाताई  यांचे पाय धरले आणि सांगितले….या नसत्या तर माझी चंद्रमाधवीचे प्रदेश आणि चर्चबेल ही पुस्तकं निघालीच नसती… अर्थात ताईंचा, मृदु नावाप्रमाणे स्वभाव असल्याने त्या खूपच संकोचल्या.

मराठी रियासती…चे थोर इतिहासकार स. मा.गर्गे आपल्या शेवटच्या आठव्या खंडात लिहितात….”सौ मृदुला जोशी यांनी सर्व कामे ज्या जागरूक बुध्दीने, रेखीव पद्धतीने आणि प्रसन्न मनाने केली त्याचा उल्लेख केलाच पाहिजे आणि रियासत जास्तीत जास्त निर्दोष होण्याच्या दृष्टीने त्यांनी परिश्रम घेतले, त्याबद्दल मी आभारी आहे .. (हे मी संक्षिप्त केले आहे त्यांनी आणखी कौतुक केले आहे) जी ए कुलकर्णी रामदासांना पत्र लिहून कळवतात…”मृदुला जोशींशी झालेली माझी भेट अविस्मरणीय होती. त्यांच्यासारखी एखादी व्यक्ती मराठी प्रकाशन क्षेत्रात असू शकते यावरच माझा विश्वास बसत नाही.” अनेक लेखक, मोठमोठे कवी त्यांना आपल्या प्रसिद्धीचे श्रेय देतात.

फारच थोड्या भाग्यवंतांचे बाबतीत प्रेयस हेच श्रेयस असण्याचा दुर्मिळ सुवर्ण योग नशिबात येतो आणि ताई त्या भाग्यवंतांमधील एक होत्या असे वाटते. त्यांना ही सर्व कामे मनापासून आवडत…म्हणजेच प्रेयस होते आणि ते सामाजिक हितासाठी श्रेयस ही होते ..

इतरांचे कौतुक करताना त्यांनी कधीही लेखणीवरील हात आखडता घेतला नाही. भरभरून लिहायच्या. तसेच त्यांची प्रगल्भता, वैचारिक बैठक आणि दुसऱ्याचे मत समजून घेण्याचा प्रयत्न ही वाखाणण्याजोगाच होता. प्रतिकूल मतांचाही आदर करावा हा ही त्यांचा गुण मी बघितला. अहंकार डोकावणारी टीका कोणी दुसऱ्यांवर जरी केली तरी त्यांना वाईट वाटत असे. हे मी अनुभवलंय. शील, चारित्र्य, नम्रता हे त्यांच्या लेखी मोठेच सद्गुण होते .. त्याचा त्यांनी सतत अंगिकार केला आणि दुसऱ्यांना शिकवत राहिल्या.
त्यांना परिपूर्णतेचा ध्यास होता. पुस्तकाची एकूण एक बाजू व्यवस्थित झाली आहे ना हे तपासल्याशिवाय पुस्तक संस्थेच्या बाहेर निघत नसे त्याचमुळे अनेक लेखक कवी यांचा मृदुलाताईंवरील विश्वास आणि लोभ दृढ होत गेला.

त्यांचे लेखन मला आवडत असे. भाषा सरळ, सोपी, सुटसुटीत वापरत, उगाच फापटपसारा नव्हता. जड जड अलंकारिक शब्द किंवा मोठमोठ्या दुर्बोध वाक्यांची गुंतवळ नव्हती. एवढ्या प्रख्यात प्रकाशनाची संपादिका पण वाक्ये सुबोध.
ताईंच्या हस्त लेखनात कुठेही खाडाखोड मला आढळली नाही. म्हणजे लिहिताना विचारात किती सुसूत्रता, सुसंबद्धता असेल असे मनात येई. त्या दर्दी होत्या, त्या रसज्ञ होत्या, मर्मज्ञ होत्या, चिंतनशील होत्या त्यांच्या एका पुस्तकात तर “चिंतन” नावाचा भागच आहे. अभ्यासक होत्या.. त्यांना कुठलाही विषय वर्ज्य नव्हता. गीत, संगीत, कला, चित्रकला, शिल्पकला, जुनी मंदिरे, इतिहास, भूगोल असो वा बंगाली भाषा असो..प्रत्येक विषयावर प्रभावीपणे बोलत .

त्यांच्या मुलीला .. अनुपमाला .. मी विचारले की तू आईबद्दल आठ दहा ओळीत काय लिहीशील ? त्याचे अगदी चपखल, योग्य, सुंदर शब्दात तिने उत्तर दिले..
”ती मनाने खूप साधी होती. आत वेगळं बाहेर वेगळं असं तिचं अजिबात नव्हतं. तिला काय वाटतंय ते तिच्या चेहऱ्यावर दिसायचं. आपण म्हणजे कोणीतरी, असं तिला मुळीच वाटायचं नाही. लोकांनी तिच्या बाबतीत विदुषी हा शब्द वापरला तेव्हा तिने आक्षेप घेतला होता. म्हणजे उगाच humility म्हणून नाही. तिचं स्वतःच्या बाबतीत हेच मत होतं, की तिने कोणत्याही विषयाचा पाठपुरावा करून व्यासंग केला नाही. तिच्या आजारात मला तिचा जवळून सहवास मिळाला आणि तिच्या मानसिक शक्तीची ओळख झाली. ती कधीच निराश, हतबल वगैरे दिसलीच नाही. बाबा गेले तेव्हाही नाही. तिच्यासाठी ती वेळ म्हणजे दुःखाचा कडेलोट होता. अनेक वर्षानंतरही बाबांच्या आठवणीने तिचे डोळे भरायचे. पण त्या प्रसंगाला ज्या धीराने ती सामोरी गेली, तीच मानसिक शक्ती तिच्या आजारतही कायम होती.“..

शेवटची काही वर्षे त्यांनी दुर्धर रोगाचा धीरोदातपणे सामना केला.. त्यांच्या लेकीने लिहीले आहे ते अगदी खरे.. मी देखील बघितलेय. शेवटपर्यंत पुस्तक, लेखन यातच रमल्या तोच त्यांचा श्वास होता, प्राण होता ..
त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची पूर्ण यादी देणे अवघड आहे पण तरीही एक झलक देत आहे ..

पुरस्कार :
1) संत नामदेव पुरस्कार, 2000, (आयडियल बुक डेपो, दादर तर्फे)

2) Distinguished Editor Award, दिल्लीस्थित ”फेडरेशन ऑफ़ इंडियन पब्लिशर्स” तर्फे, 2000 मध्ये डॉ. करणसिंग यांच्या हस्ते…

3) प्रभुप्रभात तर्फे ‘कै. भगवान मानकर साहित्यसेवा सुवर्णपदक.’ 2013
4) पाठारे प्रभु सोशल समाजातर्फे ‘कै. प्रमोद सच्चिदानंद नवलकर स्मरणार्थ साहित्यसेवा सुवर्णपदक,’ 2016
5) महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, यांच्यातर्फे ‘पॉप्युलर रीतिपुस्तक’ या ग्रंथाला ‘शरच्चंद्र मनोहर भालेराव (लक्षवेधी साहित्य ग्रंथ) पारितोषिक’, 2016
4) ‘पॉप्युलर रीतिपुस्तक’ या ग्रंथाला महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार; ‘नरहर कुरुंदकर पुरस्कार’, 2016

प्रकाशित पुस्तके :
वर्धा जिल्ह्याच्या स्वातंत्र्यसंग्रामाचा इतिहास [संकलित]; 1994
प्रभुराम (प्रा. प्रभुराम जोशी स्मरणग्रंथ) [संपादित] ; 2005
प्रिय सुहृद [स्वलिखित पत्रांचे संकलन]; 2009, पद्मगंधा प्रकाशन, पुणे.
Pursuit and Rhetoric of Dinkar Kelkar: Preserving Heritage of India – इंग्लिशमधून चरित्रलेखन – पुण्याच्या राजा दिनकर केळकर म्युझियमचे संग्राहक कवी अज्ञातवासी ऊर्फ दिनकर गंगाधर केळकर यांचे इंग्लिशमधून चरित्र, 2012.
अभिजन प्रियजन [ललित लेख]; 2014, विश्वसखा प्रकाशन, बदलापूर
पॉप्युलर रीतिपुस्तक, [रामदास भटकळ आणि मृदुला जोशी]; 2015, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई प्रभुराम जयराम [स्मरणग्रंथ]; 2015, विश्वसखा प्रकाशन, बदलापूर
संग्रहालय महर्षी डॉ. दिनकर गंगाधर केळकर ऊर्फ कवी अज्ञातवासी [चरित्र]; 2017, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई
अभिजन प्रियजन 2 [ललित लेख]

इतर : आकाशवाणी, दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील कार्यक्रमांतून चिंतन, मुलाखती इत्यादी ‘संवाद’ मध्ये मुलाखत (2003)

छंद : निरंतर वाचन, लेखन, नृत्य, नाट्य, संगीत, गायन, चित्रकला इ.

विशेष सन्मान :
1) गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या ‘सुमिरन’ सीडीसाठी संस्कृत श्लोकांचे इंग्लिशमध्ये भाषांतर करण्याबद्दल लता मंगेशकर यांच्या हस्ते सत्कार. 2007
2) रामनारायण रुइया कॉलेजच्या संस्कृत विभागाच्या अमृतमहोत्सवात विशेष योगदानासाठी सत्कार. 2011
3) इंडियन एज्युकेशन सोसायटीज गर्ल्स स्कूल नं. 2 (आता दिगंबर पाटकर विद्यालय)
यांच्या अमृतमहोत्सवात लक्षणीय कार्याबद्दल निवडक माजी विद्यार्थिनींच्या सत्कारात मानपत्र. 2011

शेवटी त्यांच्याच आईने १९४९ मध्ये काढलेल्या हस्तलिखित मासिकात संपादन केले होते आणि कविता लिहिली होती त्यातील दोन ओळी .. मृदुलाताईंसाठी वापराव्यात असे वाटते.

लास्य नव्हे का मृदु प्रतिभेचे अन् विलसे बुद्धी
विनयशालिनी, ओज आगळे, करिते रंजनवृद्धी

आजारी असताना देखील “चाकोरी बाहेरील चार चौघी… ” या मेधा जांबोटकर यांच्या तेराव्या एपिसोड मध्ये आपण मृदुला ताईंची  मुलाखत  यूट्यूब वर बघू शकतो..खाली लिंक दिली आहे.
*https://youtu.be/ZSCjOqot7XI?si=wLwub564GsBXP_WZ*

२१ डिसेंबर २३ रोजी त्यांचे महाप्रयाण झाले.

स्वाती वर्तक

— लेखन : सौ स्वाती वर्तक. खार (प), मुंबई ५२.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

Previous article
Next article
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments