अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोंभाळणे (पोपेरेवाड़ी) हे छोटेसे गांव (खरं तर छोटीसी आदिवासी वस्ती), अचानक जगभर गाजलं ते राहीबाई सोमा पोपेरे या असामान्य महिलेमुळे !त्यांना २०२० चा पद्मश्री पुरस्कार घेतांना पाहून मन अभिमानाने भरून आले. राहीबाई ते बीजमाता या अनोख्या प्रवासाचा मागोवा घेतांना थक्क व्हायला झाले.
महादेव कोळी आदिवासी समुदायात जन्म झालेल्या राहीचे कुटुंब खूप गरीब होते. तिला पाच भावंडे होती, पण पैशाअभावी त्या शाळेत जाऊ शकल्या नाहीत. म्हणून, त्या पालकांना शेतीत मदत करीत. त्यांचे लग्न वयाच्या १२ व्या वर्षी त्याच गावात झाले. लग्नानंतर, त्यांनी पतीला वेगवेगळ्या पिकांची लागवड करण्यात मदत करायला सुरुवात केली. कुटुंब पूर्णपणे शेतीवर अवलंबून होते आणि ते एका टेकडीवर बांधलेल्या झोपडीत रहात होते.
छोट्याशा आदिवासी पाड्यात जन्माला आलेल्या राहीबाईंकडे लौकिकदृष्ट्या शिक्षण नाही पण निसर्गाच्या शाळेत त्या खूप काही शिकल्या. लहानपणापासून शेतावर काम करणाऱ्या राहीबाईंच्या मनावर त्यांच्या वडिलांनी “जुनं ते सोनं”, असं बिंबवलं आणि तेच त्यांच्या आयुष्याचं ब्रीदवाक्य बनलं. आपल्या कृषिप्रधान देशात अनेक प्रकारचे पिकांचे वाण उपलब्ध आहेत. परंतु हरित क्रांतीनंतर देशात संकरित (हायब्रीड) बियाणांचा पुरवठा मोठया प्रमाणात होऊ लागला, भरमसाठ उत्पादनामुळे शेतकरी हायब्रीड बियाणांकडे वळले. एक गोष्ट मान्य करावी लागते ती म्हणजे आपल्या अन्नाची, म्हणजे अगदी फळे, भाज्या, अन्नधान्य यांची जी पूर्वी चव होती ती कुठेतरी गमावली आहे. हायब्रीड वाण आणि रासायनिक शेती यामुळे कुपोषणासहित आरोग्याच्या इतर समस्या सारीकडेच वाढल्या. हे राहीबाईंच्याही लक्षांत आले व त्यांनी भाजीपाल्यासह अन्य काही पिकांचे गावरान वाण जपण्याचा, त्यांच्या बिया संकलित करून ठेवण्याचा वसा हाती घेतला.

सुरुवातीच्या काळांत राहीबाईंना हे काम करतांना अनेकांनी वेड्यात काढलं. अगदी घरच्यांनाही कांहीतरी फॅड, वेळेचा अपव्यय वाटत होते. पण त्यांनी आपला विचार बदलला नाही. पारंपारिक पद्धतीने त्या बियाणे गोळा करायच्या, शेतात त्याचा वापर करायच्या. राहीबाई यांनी भात, वाल, नागली, वरई, उडीद वाटाणा, तूर, वेगवेगळी फळे, भाज्या अशा गावरान ५३ पिकांच्या ११४ वाणांच्या बियांचा संग्रह केला आहे. हे कोणत्याही आंतरराष्ट्रीय सीड कंपनीकडे उपलब्ध नाहीत. प्रत्येक बियाणाची माहिती त्यांना तोंडपाठ आहे. ते बियाणे औषधी आहेत कां, त्याचा उपयोग काय, त्याची वैशिष्टय़े कोणती हे सगळे त्या सांगतात. त्यामुळे बियाणांचा चालताबोलता ज्ञानकोश त्यांच्या रूपाने आपल्याला मिळाला आहे. राहीबाईकडे जे बियाणे आहे ते शेकडो वर्षे आपले पूर्वज खात होते त्या मूळ स्वरूपात आहेत. त्यांच्याकडे फक्त वालाचेच वीस प्रकार उपलब्ध आहेत.
आपल्या कामाबद्दल सांगतांना त्या म्हणाल्या, “गांडूळ खत कसे करायचे ते कळल्यावर मी दुसरे कोणतेच खत वापरले नाही. फवाराही गांडूळ खत पाण्याचाच मारतो. देशी वाणाचं धान्य हे केवळ पावसाच्या पाण्यावर येते. या बियाण्याला हायब्रीड पिकासारखे कोणतेही रासायनिक खत व पाणी देण्याची आवश्यकता नाही. निखळ पाण्यावर ही पिके वाढतात.जुने भात तर आता नाहीसेच होऊ लागले आहेत. रायभोग, जीरवेल वरंगळ, काळभात, ढवळभात, आंबेमोहोर, टामकूड हे जुने भात होते. भाज्यांमध्ये गोड वाल, कडू वाल, बुटका वाल, घेवडा, पताडा घेवडा, काळ्या शिरेचा घेवडा, हिरवा लांब घेवडा, हिरवा आखूड घेवडा, बदुका घेवडा इ. पाऊस पडला की आम्ही रानभाज्याच खातो. मग त्याच्यात सातवेची, बडदेची भाजी,आंबट वेलाची, भोकरीची, तांदुळक्याची, चाईची भाजी अशा विविध प्रकारच्या आहेत. सांडपाण्यावर परसबागेतील झाडे वाढविली. त्याच झाडांना आता फळे आली आहेत.”
राहीबाई सांगतात, आजकाल महिलांना पाठदुखीचा त्रास होतो. बाळंत झाल्यावर स्त्री तीन ते चार महिने घराबाहेर पडत नाही. आम्ही चार दिवसांत घरातील सर्व कामे करू लागायचो. घरच्या गिरणीत पीठ दळणे, भात मळणे, शेतात जाणे, घरासमोरील तळ्यातून पाणी आणणे, सारे काही.कोणाच्या मनात यायचे नाही की बाईला आराम द्यायला हवा ! अर्थात आम्हांलाही कधी थकवा जाणवला नाही कारण आम्ही गावठी भात, गावठी भाजीपाला, वारली, वरई, काळे भात, सावा, भाताची भगर खात असू आणि दिवसभर कठोर परिश्रम करत असू.
राहीबाईंना आठवतही नाही की त्या कधी आजारी पडल्या. त्या ठामपणे सांगतात की, “ग्रामीण धान्य खाल्ल्याने शरीरात शक्ती टिकून राहते तर संकरित धान्य खाल्ल्याने शरीरातील शक्ती कमी होते आणि आजार वाढतात. मी माझ्या स्वतःच्या शेतातून याचे उदाहरण दिले. माती ही आपल्या आईसारखी असते. जेव्हा एखादी विवाहित स्त्री तिच्या सासरहून उरी माया घेऊन माहेरी येते तेव्हा तिला तिच्या पालकांकडून खूप प्रेम मिळते. हेच आपल्या धरती मातेशी आपले नाते आहे. आपण त्या भावनेने बीज पेरतो आणि ती त्याच्या कित्येक पट आपल्याला मायेने देते.”

बायफ या संस्थेच्या मार्गदर्शन व सहकार्याने, अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून राही बाईंनी गावरान बियाणांच्या प्रसार व प्रचाराचे कार्य केले. पुढे त्यांच्या या कार्याला एक दिशा मिळाली. त्यांनी गावरान बियाणांची बँक सुरु केली. कळसूबाई परिसरातील पारंपारिक बियाणे गोळा केले आणि गावरान बियाणांचा मोठा संग्रह करून बीजबँक सुरु केली. त्यांच्या बीज बँकेत सफेद वांगी, हिरवी वांगी, सफेद तूर, टोमॅटो, घेवडा, वाल, उडीद, हरभरा, हुलगा, बाजरी, गहू, नागली, तीळ, भुईमुग, सूर्यफूल, जवस, भात, राळा, नाचणी, रायभात, वरंगल, अनेक प्रकारच्या रानभाज्या, अनेक प्रकारच्या पिकांची वाणं आहेत. त्यांच्या घराभोवती असणाऱ्या अडीच तीन एकर परिसरात विविध प्रकारची चारशे-पाचशे झाडे आज उभी आहेत आणि घरातील सारी मंडळी त्यांची काळजी घेतात.
राही बाईंनी तीन हजार महिला व शेतकरी यांचा बचतगट बनवलाय. त्यांच्यामार्फत या भाज्या अस्सल गावठी व संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने पिकवल्या जातात व त्यांचे बियाणे मडक्यात जतन केले जातात. हे पारंपारिक चविष्ट व नैसर्गिक बियाणे मूळ नैसर्गिक स्वरूपात जगात कोणत्याही कंपनीकडे नाही.
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर सरांनी एका कार्यक्रमात त्यांचा ‘सीड मदर’, म्हणजेच बीजमाता असा उल्लेख केला. राहीबाईंच्या अजोड कार्याची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली आहे. २०१८ मध्ये बीबीसीने विविध क्षेत्रात काम करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या जगातल्या शंभर प्रभावशाली महिलांत त्यांचा समावेश केला आहे.

आपल्या नेहमीच्या साध्यासुध्या वेषांत पद्मश्री पुरस्कार घेणाऱ्या अद्वितीय राहीबाईंचे कौतुक करावे तेवढे थोडेच. ८ नोव्हेंबर २०२० रोजी राष्ट्रपतींनी पद्मश्री प्रदान केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली आणि ‘पीपल्स पद्म’ पुरस्काराने सन्मानित झालेल्यांचे अभिनंदन केले. त्याबद्दल सांगतांना राहीबाई म्हणाल्या, “आम्ही बराच वेळ बोललो. ते मला नांवाने ओळखतात हे पाहून मला खूप छान वाटलं. त्यांनी मला माझ्या दैनंदिन दिनचर्येबद्दल विचारले आणि माझ्या गावात भेट देण्याचे आश्वासन दिले. मला खूप आनंद झाला. पण ते कसे येतील ? माझे गाव एका दुर्गम ठिकाणी आहे आणि तिथे अजून पक्का रस्ता नाही.” त्यांनी तीन वर्षांपूर्वी देखील हा मुद्दा उपस्थित केला होता. त्याबद्दल सांगतांना त्या म्हणाल्या, “मला तीन वर्षांपूर्वी नारी शक्ती पुरस्कार मिळाला होता. मी त्यावेळीही येथील रस्त्याच्या समस्येबद्दल सांगितले. पण अजून एकही रस्ता बांधलेला गेला नाही. रस्ता नाही, पाणी नाही. मला अनेक पुरस्कार मिळाले आहेत, पण आमच्या समस्या कोणीही सोडवत नाही.”
राही बाईंच्या कुटुंबालाही, पती, तीन मुले आणि एक मुलगी यांना प्रथम राहीबाईंचा उद्देश समजू शकला नाही “पण त्यांनी मला कधीच थांबवले नाही” त्या आवर्जून सांगतात.काही काळाने याची दखल घेतली जाऊन त्यांना ठिकठिकाणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येऊ लागले.
“घर इतके लहान होते की माझ्याकडे पुरस्कार ठेवण्यासाठी किंवा बियाणे संग्रह करण्यासाठी जागा नव्हती. काही राजकारण्यांनी – मला त्यांचे नाव आठवत नाही किंवा ते कोण आहेत – मला एक मोठे घर बांधण्यास मदत केली” साध्या राहीबाई मनातील कृतज्ञता व्यक्त करतात. तथापि, महाराष्ट्रातील त्याच्या गावाला जाणाऱ्या रस्त्याची त्याची चिंता अजूनही कायम आहे.
मोठया शहरांत, २०/२५ मिनिटे वाचविण्यासाठी मानवतेला चिरडून, जंगलेच्या जंगले क्रूरपणे तोडून, पशुपक्ष्यांना निराधार करून सहा पदरी रस्ते उभारले जात आहेत. अशावेळी पारंपरिक बियाणे जतन करून, शेतकऱ्यांना नवी दिशा देणाऱ्या राहीबाई, आपल्या गावांसाठी रस्ता व्हावा, पाणी मिळावे म्हणून विनवणी करीत आहेत. त्यांच्या कार्याचे नुसतेच कौतुक करण्यापेक्षा त्यांची ही इवलीशी पण गावकऱ्यांसाठी आत्यंतिक उपयोगी मागणी पुरी करण्यास कोणी पुढाकार घेईल कां ?

— लेखन : नीला बर्वे. सिंगापूर
(स्रोत:आंतरजाल)
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800