“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस”
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने न्यूज स्टोरी टुडे परिवारातर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. या निमित्ताने पाहू या, त्यांनी घेतलेली गरुड झेप !
— संपादक
मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांचा जन्म २२ जुलै १९७० रोजी नागपूर येथील जनसंघाचे ज्येष्ठ नेते गंगाधरराव फडणवीस यांच्या हिंदुत्ववादी घराण्यात झाला, अन् जणू महाराष्ट्राचा भाग्यविधाता नागपूरच्या भगव्या जन्मभूमीवर उदयास आला. देवेंद्रजी यांच्या मातोश्रींचे नाव श्रीमती सरिताताई फडणवीस.
सन २००५ मध्ये देवेंद्रजी यांचा विवाह अमृता रानडे यांच्याशी संपन्न झाला. अमृता मॅडम यांची भारतीय बँकर, अभिनेत्री, गायिका व सामाजिक कार्यकर्त्या अशी जनमानसात ओळख आहे. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे त्या ॲक्सिस बँकेच्या संचालकपदीही राहिल्या आहेत.देवेंद्रजी त्यांच्या कन्येचं नाव कु.दिविजा असून, तिने मागील वर्षी १० वीच्या बोर्ड परीक्षेत तब्बल ९२ टक्के प्राप्त करून थोरामोठ्यांची शाबासकी मिळविली. यास्तव कु.दिविजाचे मनस्वी अभिनंदन अन् पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !

मित्रहो, देवेंद्रजी हे लहानपणापासूनच हुशार व चाणाक्ष बुद्धिमत्तेचे विद्यार्थी. त्यांचे प्राथमिक शिक्षण नागपूरच्या सरस्वती विद्यालयात तर, उच्च माध्यमिक शिक्षण धरमपेठ ज्युनियर कॉलेजमध्ये झाले. याशिवाय त्यांनी शासकीय विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी संपादन केली. एवढे करून देवेंद्रजी थांबले नाहीत. त्यांनी बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे देवेंद्रजींनी जर्मनीतील बर्लिन इन्स्टिट्यूटमध्ये डिप्लोमा इन मेथडस अँड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट ही पदविका प्राप्त केली.
शैक्षणिक क्षेत्रात प्राविण्य मिळविल्यावर देवेंद्रजींनी “अर्थसंकल्प सोप्या भाषेत” आणि आत्मनिर्भर महाराष्ट्र-आत्मनिर्भर भारत” ही पुस्तके लिहिली आहेत.

मित्रहो, देवेंद्रजी यांची शांत, मितभाषी, बुद्धिमान व संयमी नेते म्हणून राज्यासह देशाच्या राजकीय क्षेत्रात ओळख आहे. त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून झाली. त्यानंतर १९९७ ते १९९९ या कार्यकाळात त्यांनी नागपूर महापालिकेत महापौर पद भूषविले.
देवेंद्रजी हे २००९ पासून महाराष्ट्र विधानसभेत नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताहेत. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आजीवन सदस्य तर, भारतीय विद्यार्थी परिषदेत सक्रिय सदस्य म्हणून राहिले आहेत. महत्वाचे म्हणजे देवेंद्रजी यांना वडील गंगाधरराव आणि काकू शोभा फडणवीस यांच्यापासून राजकीय वारसा लाभला आहे. हे दोघे राज्य विधिमंडळाचे सदस्य राहिले आहेत.
देवेंद्रजी यांचा लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळचा संबंध राहिला असल्याने त्यांना भारताचे माजी पंतप्रधान वंदनीय अटलबिहारी वाजपेयी यांचा सहवास लाभला. वाजपेयी हे माझे आदर्श नेते आहेत, असे देवेंद्रजी नेहमी सांगत असतात. त्यांचा आदर्श घेऊनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपली राजकीय वाटचाल करताहेत, हे भूषणास्पद आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तीन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत, हा एक विक्रमच म्हणावा. मुख्यमंत्री पदावर सर्वाधिक कार्यकाळ राहणारे ते राज्यातील तिसरे मुख्यमंत्री म्हणून गणले गेले आहेत. पहिले माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक तर, दुसरे माजी मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख अन् तिसरे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस.
खरं तर, देवेंद्रजी यांनी मुख्यमंत्री होण्याची जणू हॅट्ट्रिक केली आहे, असे म्हणणे संयुक्तिक ठरेल. माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या कार्यकाळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचाही यशस्वीपणे कार्यभार सांभाळला.
मुख्यमंत्री पदाच्या मागील अन् आत्ताच्या कार्यकाळ मिळून ना.देवेंद्र फडणवीस यांनी आजमितीपर्यंत जलयुक्त शिवार योजना; रेन हार्वेस्टिंग; पाणी अडवा पाणी जिरवा; स्वच्छ भारत अभियान-स्वच्छ महाराष्ट्र अभियान; स्मार्ट सिटी योजना; प्लास्टिक बंदी; प्रधानमंत्री आवास योजना; सेवा हमी कायदा; मुख्यमंत्री-लाडकी बहीण योजना आणि कुणबी मराठा जातीमधील लोकांच्या मुला-मुलींसाठी विविध शैक्षणिक सोयी- सुविधा, सवलती आदी लोकहिताच्या महत्वाकांक्षी योजना त्यांनी राबविल्या आहेत.
महत्वाचे म्हणजे दहशतवाद्यांच्या कारवायांवर प्रतिबंध आणण्यासाठी देवेंद्रजी हे सी सी टी व्ही यंत्रणा राज्यात राबविणारे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. तसेच पोलिसांच्या स्वरक्षणासाठी बुलेटप्रुफ जॅकेट्स देण्याचा निर्णय गृहमंत्री म्हणून घेतला. पुढील काळातही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे लोकहिताच्या अनेक योजना राबवतील, याचा राज्यातील सर्वधर्मीय जनतेला ठाम विश्वास आहे.
माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या कार्यकाळात नावारूपाला आलेल्या मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना ला अधिक चालना देण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रण असून, त्या दिशेने कार्यवाही चालू केली आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने एकनाथजी शिंदे यांच्या कार्यकाळात जो विक्रम प्रस्थापित केला होता. त्याच गतीने सदर कक्ष कार्यान्वित करण्याचा फडणवीस साहेबांचा मानस असून, त्या दिशेने वाटचालही सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या संयुक्त प्रयत्नातून समृद्धी महामार्ग, मेट्रो रेल्वेचे जाळे, अटल सेतू, विविध उन्नत महामार्ग, मिसिंग लिंक असे विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारले गेले आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेची मोठी दळणवळणाची सोय होऊन त्यांचा वेळ, पैसा व श्रम वाचले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे समृद्धी महामार्गमुळे तर राज्यातली असंख्य खेडी शहरांना जोडली गेल्याने शेतकऱ्यांचा कृषीमाल शहरांमधील बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी आणणे सुलभ झाले आहे.

मा.देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. कारण यंदाच्या पावसाळी अधिवेशनात राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची कर्जमुक्ती केली. एवढी मोठी कर्जमुक्ती करणारे महायुती सरकार हे राज्यातील पहिले सरकार ठरले आहे. इतकेच नव्हे तर, फडणवीस सरकारने शेतकऱ्यांच्या साडेसात हॉर्स पॉवरपर्यंतची कृषी पंपावरील जुनी थकीत वीज बिले माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून, त्याचा लाभ सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना होणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे हे कर्ज माफीसंदर्भातले ऐतिहासिक निर्णय पहाता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार बळीराजाचे खऱ्या अर्थाने आधारवड आहे, हे सिद्धीस येते.
याशिवाय मागील मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजना, पाणी अडवा पाणी जिरवा, मागेल त्याला शेत तळ, ह्या प्रभावी योजनांमुळे शेतीला मुबलक पाणीपुरवठा झाल्याने शेतकरी वर्ग आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाला. तर रेन हार्वेस्टिंग योजनेमुळे शहरांमधील पाण्याची समस्या संपण्यास मोठा हातभार लागला. राजकारणातून समाजकारण करण्याच्या उद्देशाने राज्यकारभार करत ग्रामीण व शहरी लोकांची पाण्याची समस्या सोडविण्यात दैदिप्यमान कामगिरी केली.
सर्वात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे राज्यातल्या महायुती सरकारच्या संयुक्त प्रयत्नांमुळे केंद्रातील मोदी सरकारने मराठीला अभिजित भाषेचा दर्जा देण्यास मान्यता दिली. त्याचप्रमाणे “गर्जा महाराष्ट्र माझा” या गीताला राज्य गीताचा दर्जा देण्यात महायुती सरकारची प्रमुख भूमिका राहिली आहे. यासाठी ना. फडणवीससाहेब अन् ना. शिंदेसाहेब यांचे मनस्वी आभार !
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुशाग्रबुद्धीने उभारलेल्या १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या वारसा यादीत मानाचे स्थान मिळाल्याने शिवप्रेमींच्या आनंदाला उधाण आलं आहे. इतकेच नव्हे तर, जागतिक वारसा समितीच्या ४७ व्या सत्रात मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया अंतर्गत सिंधुदुर्ग किल्लाचा समावेश करण्यात आला आहे. वास्तवात हीच खरी शिवछत्रपतींच्या महान शौर्यगाथेला मानवंदना आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे देवेंद्रजी यांना जगातील नामवंत विद्यापीठांकडून खालील मानद पदव्या देऊन सन्मानित करण्यात आले आहे. जपानमधील ओसाका सिटी युनिव्हर्सिटीकडून मानद डॉक्टरेट (२०१५) ; जपानच्या कॉमसन विद्यापीठातून मानद डॉक्टरेट (२०२३) ; जॉर्ज टाऊन विद्यापीठ, युनायटेड स्टेटस कडून उत्कृष्ट नेतृत्व विकास पुरस्कार (२०१८) ; सिंगापूर येथील ली कुआन यू एक्सचेंज फेलो पुरस्कार (२०१७) ; कॉमन वेल्थ पार्लमेंटेंरियन असोसिएशनतर्फे सर्वोत्कृष्ट संसदपटू ह्या आंतरराष्ट्रीय मानद पदव्या व अवॉर्ड देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे.
इतकेच नव्हे तर, नाशिक येथे पूर्णवाद परिवार तर्फे राजयोगी नेता पुरस्कार ; पुण्याच्या मुक्त छंद संस्थेतर्फे प्रमोद महाजन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कार ; राष्ट्रीय आंतर विद्यापीठ वादविवाद स्पर्धेत सर्वोत्कृष्ट वक्ता पुरस्कार ; रोटरी क्लब मोस्ट चॅलेंजिंग युथ विभागीय पुरस्कार ; नागपूर स्थित नागभूषण फाउंडेशनतर्फे नागभूषण पुरस्कार हे राष्ट्रीय-राज्यस्तरिय पुरस्कार फडणवीस साहेबांना प्राप्त झाले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसानिमित्त ह्या शुभेच्छापर दोन ओळी…
जीवन के रास्ते हमेशा गुलज़ार रहे…
चेहरे पर आपके सदा मुस्कान रहे…
देता हु दिलसे दुवा…
जिन्दगीं में आपके हर दिन
खुशियोंकी बौछार रहे !

— लेखन : रणवीर राजपूत. निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी, ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
