पूर्वी लोकल गाडीत पुरुष मंडळी भजन, कीर्तन, गाणी म्हणत. तर महिला वर्ग हळदी कुंकू, डोहाळे जेवण असे कार्यक्रम करीत. आता मात्र हे गाडी ग्रुप गाडीच्या बाहेर पडून स्नेह संमेलन घेऊ लागले आहेत. मजा घेऊ या, अशा एका संमेलनाची. वृत्तांत लिहिला आहे, सौ योजना नरेश पाटील (पडवळ) यांनी. त्या बांधकाम विभाग, पंचायत समिती, कल्याण येथून कनिष्ठ सहायक म्हणून निवृत्त झाल्या असून त्यांना लेखनाची आवड आहे. न्यूज स्टोरी टुडे परिवारात त्यांचे हार्दिक स्वागत आहे.
— संपादक
नोकरी करीता दररोज कर्जत ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असा जाताना येताना प्रवास करणाऱ्या २० /२५ वर्षे १८-१९ जणींचा आमचा २० /२५ वर्षे ग्रुप होता. आपापले स्थानक आले की आम्ही उतरुन जात असू. पुन्हा संध्याकाळी कार्यालय सुटले की परतीचा प्रवास सोबत करायचो.
आमच्या पैकी कुणी कोर्ट, मंत्रालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महानगरपालिका, सेल्स टॅक्स, एमएसईबी, बॅंक, शाळा, ऑर्डनन्स फॅक्टरी अशा विविध ठिकाणी नोकरी करणाऱ्या होतो. बोलता बोलता आम्हा महिलांचा ग्रुप तयार झाला.
रोजच्या प्रवासात आम्ही सर्व सण, उत्सव साजरे करासचो. उदा. गुढीपाडवा व दसरा आला की आदल्या दिवशी आम्ही ट्रेनमध्ये ज्या ठिकाणी बसायचो तो परिसर हार फुले व पताकांनी सुशोभित करायचो. तसेच नवरात्रोत्सवात सुट्टीचे दिवस वगळून बाकी दिवशी भोंडला व भोंडल्याची गाणी म्हणायचो. अशा प्रकारे नोकरीच्या प्रवासात आम्ही आपल्या संस्कृतीचे जतन करीत आलो.
या प्रवासात आम्ही परमार्थासाठी देखील वेळ दिला. त्यात सकाळी मारुती स्तोत्र, रामरक्षा, घोरकष्टोधारण स्तोत्र, भजन, भक्ती गीते म्हणायचो. कर्जत ते बदलापूर पर्यंत आमचा परमार्थ चालायचा. अशा प्रकारे आमच्या ग्रुपने मजेत प्रवास केला. केवळ या प्रवासातच नाही तर प्रसंगी प्रत्यक्ष जीवन प्रवासातही येणाऱ्या असंख्य अडीअडचणीना आम्ही एकत्रित सामोरे गेलो आहोत. आज मागे वळून बघतना तर त्या सर्व गोष्टींचे विशेष अप्रूप वाटते.
नियत वयोमानानुसार आता आमच्या या गाडी ग्रुप मधील ब-याच सख्या सेवानिवृत्त झाल्यात. त्यात सर्वांची घरे दूर दूर.. त्यामुळे भेटी गाठी होणे बंद झाले. नाही म्हणायला मोबाईलवर बोलणे व्हायचे पण प्रत्यक्षात भेट काही होत नव्हती आणि याची हळहळ प्रत्येकीला वाटत असायची.
पण आता माहिती तंत्रज्ञानाचे युग आले आहेच, तर आम्हीही त्याचा उपयोग करून घ्यायचे ठरविले. मागे राहून कसे चालेल ? नाही का ? नाही तरी व्हॉट्सॲप वर शाळेचा ग्रुप, कॉलेजचा ग्रुप, कार्यालयाचा ग्रुप असे विविध ग्रुप पहावयास मिळू लागले आहेतच. त्यामुळे आम्ही सर्व सख्यांनी आमच्या गाडीचा व्हॉट्स ॲप ग्रुप करायचे ठरविले. त्यानुसार रथसप्तमीच्या शुभ मुहूर्तावर, म्हणजेच ४ फेब्रुवारी २०२५ रोजी आम्हा गाडीच्या सख्यांचा एक व्हॉट्स ॲप ग्रुप तयार करून आम्ही पहिले पाऊल पुढे टाकले….
ग्रुप तयार झाल्यावर व्हॉट्स ॲप वर फक्त चॅटींग करीत न बसता आपण प्रत्यक्ष भेटण्यासाठी एक दिवस स्नेहसंमेलन करु या असे सर्वानुमते ठरले. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९९ व्या जयंतीच्या दिवशी, १९ फेब्रुवारी २०२५ रोजी आम्ही कर्जत तालुक्यातील एका रिसॉर्ट मध्ये भेटलो.
प्रेम, आपुलकी, आस्था यासह स्नेहसंमेलनात आम्ही सर्व जणी जमलो. आमच्या ग्रुप मध्ये आमच्या पेक्षा वयाने खूप मोठ्या असलेल्या व एका मैत्रिणीला पर्यावरण संतुलन संदर्भात दिल्ली येथील संसद भवनात मा. मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या हस्ते गौरविण्यात आले होते, तिला आणि जेष्ठतम अशा तिघी शिक्षिका, म्हणजेच श्रीमती कण्हेरीकर (वय वर्षे ८५), श्रीमती कोतवाल (वय वर्षे ८३) आणि सौ.सुचिता वांजळे पाटील (वय वर्षे ६६) यांना शाल व गुलाब पुष्प देऊन गौरविले.तर
तर उर्वरीत सर्वजणींचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.

या स्नेहसंमेलनात सौ शोभा देशपांडे पुणे येथून, मी स्वतः (सौ योजना पाटील) कल्याण येथून, सौ.सिमा गायकर, सौ.आशा गडकरी, सौ.अपर्णा गानु सर्व कर्जत येथुन आलो होतो.

सत्कार व स्वागत झाल्यानंतर आम्ही सर्व सख्या खुप वेळ गप्पा मारत बसलो. छान हितगुज साधलं. आमच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. एकत्र स्नेहभोजन केले. मौजमजा, मस्ती, गाणी, जोक्स या बरोबरच बरेच खेळ खेळलो.

मैत्रीचे नाते हे फार वेगळे असते. ज्ञानदेवांनी पसायदानात म्हटले आहे,
// भुता परस्परे जडो मैत्र जीवांचे //
फार वर्षांनी एकत्र आल्यामुळे आम्हा सर्व जणींना खुप आनंद झाला. समाधान वाटले. एक वेगळी उर्जा मिळाली. शेवटी चहा बिस्किटे घेऊन पुन्हा लवकरच भेटण्याच्या आणाभाका घेत या स्नेहसंमेलनाची सांगता झाली.
— लेखन : सौ योजना नरेश पाटील (पडवळ). कल्याण
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
योजना ताई खुप छान उपक्रम..ऊर्जा देणारा..आपलं अर्धं आयुष्य ऑफिस आणि प्रवासातच जात..त्यामुळे अश्या मैत्रीच्या आठवणी जपण म्हणजे उर्वरित आयुष्याला ऊर्जा देण नाही का.. पुढील अनेक कार्यक्रमासाठी शुभेच्छा 🤝🙏😍🥰