‘नवलाई’ ही “सुंदर माझं घर” मधील मालिका लोकप्रियतेच्या एकेक पायऱ्या चढत चरम सीमेवर पोहोचत होती. सुहासिनी मुळगांवकर यांच्या दूरदृष्टीला आणि विषयांच्या चोखंदळ निवडीला या यशाचं श्रेय जात होतं हे खर आहे. पण माझ्या बाबतीत मात्र “नवलाई”च्या यशाच श्रेय सुहासिनीबाईंच्या हातात जो अज्ञात चाबूक होता त्याला जात होतं. हा अज्ञात चाबूक रट्टे मारत नाही. पण त्याचं नुसतं दर्शन नाठाळांना योग्य मार्गावर आणण्यासाठी पुरेसं असतं. त्याचीच गंमत सांगते.
नेहमीप्रमाणे शनिवारी दुपारी आमच्या भेटीची वेळ ठरली. माझी नोकरी सुरू असल्याने सुहासिनीबाई समंजसपणे प्रत्येक वेळी मला शनिवारी दुपारी भेटीची वेळ देत असत. मी समोर बसताच सुहासिनीबाईंनी हातांतल्या रजिस्टरवर शेवटची स्वाक्षरी केली आणि ते बाजूला सारलं. मला म्हणाल्या, “या आठवड्यातल्या “नवलाई”च्या कार्यक्रमात मला माशांचा व्यवसाय करणारी स्त्री हवी आहे. पण एक लक्षांत ठेव माधुरी. मला कोळीण नको. नाहीतर एखादी कोळीण घेऊन येशील”.
मी एकीकडे शांतपणे ऐकत होते. दुसरीकडे विचार करत होते की आता कोळीण नको तर अशी कुठली मासे विक्रेती घेऊन येऊ ?
एव्हाना माझ्या बाबतीत सुहासिनी बाईंचा एक पवित्रा माझ्या लक्षांत आला होता. त्या मला कधीही रेडीमेड टॅलेंट देत नसत. विषय सुचवत आणि त्या विषयातील तज्ञ व्यक्ती अर्थात टॅलेंटचा शोध मात्र माझा मलाच घ्यायला लावत असत. त्यावेळी याचा मला खूप राग येत असे. त्या फलाण्या निवेदिकेला विषयापासून टॅलेंटपर्यंत सगळच रेडिमेड हातांत ठेवलं जातं आणि मला मात्र टॅलेंटच्या शोधांत दुनियाभर पळवलं जातं. त्यावेळी राग, असूया अशा सगळ्या भावना मनांत दाटून येत !
पण खरं सांगते, आज मात्र मला सुहासिनीबाईंच्या दूरदृष्टीला सलाम ठोकावासा वाटतो. आपल्या निवेदिकेकडे कोणत्या क्षमता आहेत याचा अचूक शोध घेऊन, त्या क्षमतांचा तिला वापर करायला लावायचा आणि त्यातूनच त्या निवेदिकेची जडणघडण करायची हा त्यांचा दूरगामी विचार !
निवेदिकेची नुसती निवड न करता उमेदवारीच्या काळांत, त्या कच्च्या मातीतून सुबक घटाची निर्मिती करायची हा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न!त्या अननुभवी निवेदिकेतून परिपक्व सर्वांगपरिपूर्ण निवेदिका घडवायची हे सुहासिनी बाई त्या काळी जाणीवपूर्वक करत असाव्यात हे मला आज ठळकपणे जाणवतं. मात्र त्यावेळी मला त्यांचं हे वागणं त्रासदायक वाटे. हे एक प्रकारचं रॅगिंग आहे असंही वाटे. पण वय आणि अनुभवांचं जेष्ठत्व लाभलेल्या सुहासिनीबाईंना “व्हिजन” होती. वर्तमान काळच नव्हे तर भविष्यकाळाचा वेध घेण्याची “नजर” त्यांच्या ठायी होती, हे तेव्हा कळत नव्हतं. आज मात्र हे प्रकर्षाने जाणवतं.
तर मला त्यांनी ऑर्डर दिली, मासे विक्रेती आण. मात्र कोळीण नको. आता कुठे शोधायची अशी मासे विक्रेती ? ठिकाण एकच. कुलाब्याची दांडी !
दुसऱ्या दिवशी भल्या पहांटे मी कुलाब्याच्या दांडीला पोहोचले. माय गॉड! तिथली पहांट कमालीची गोंधळाची आणि गडबडीची होती. माशांनी भरलेल्या भल्या मोठ्या टोपल्या सतत किनाऱ्यावर येत होत्या. त्या मालाची पसंती आणि त्यांचे खरेदीचे भाव ठरत होते. सौदा पक्का झाला की तिथून त्या भल्या मोठ्या टोपल्या दणकट हमाल डोक्यावरून वाहात कोळणींच्या ठरलेल्या गाळ्यांमध्ये घेऊन जात होते. तिथल्या प्रचंड गर्दीत धक्केबुक्के खात मी फिरत होते. नजरेने एखाद्या मासे विक्रेतीचा वेध घेत होते. पण तिथे सगळ्या कोळणीच दिसत होत्या. आवळ काष्ट्याची साडी नेसलेल्या, डोक्यातल्या अंबाड्यावर चकचकीत कलाबतुच्या फुलांच्या वेण्या माळलेल्या आणि अंगभर दागिने ल्यायलेल्या रापलेल्या चेहऱ्याच्या कोळणी !
मी बऱ्याच गाळ्यांमध्ये डोकावत होते. चौकशी करत होते. पण कोळणींखेरीज कोणीच मासे विक्रेती मला सापडत नव्हती. आता उन्हं तापायला लागली होती. आता उद्या सुहासिनीबाईंच्या समोर “नवलाई” साठी कोणती मासे विक्रेती उभी करावी या विचारांत निराश मनाने मी परत फिरले. तेवढ्यात माझी नजर गर्दीतल्या एका जरा वेगळ्याच दिसणाऱ्या बाईंवर गेली. मध्यम उंचीची, गोरीशी, साधी पांढरी सुती साडी नेसलेली, एक सुशिक्षित स्त्री त्या तुफान गर्दीत फिरत असताना माझ्या नजरेने अचूक टिपली. त्या बाई शांतपणे कोळी बांधवांशी माशांच्या टोपल्यांचे भाव करत होत्या. स्वर अत्यंत खालच्या पट्टीत. पण ठाम. हिशोब पक्का. त्या तसल्या कोलाहलाच्या वातावरणात त्या स्त्रीचं साधंसुधं व्यक्तिमत्त्व विसंगत वाटत होतं. त्यांचं वागणं बोलणं मात्र आग्रही, ठाम होतं. संकोच, भिडस्तपणा यांचा लवलेश बोलण्यात नव्हता. अत्यंत सराईतपणे त्यांचं कोळी बांधवांशी भाव करणं चाललं होतं. आजूबाजूच्या गर्दीचे धक्के खात, त्या कधी मोकळ्या होत आहेत याची वाट बघत मी दूर उभी राहिले. थोड्या वेळाने त्यांचे सौदे आटपले. त्या परत फिरल्या. मी त्यांच्या मागे मागे जाऊ लागले. त्या शांतपणे पावलं टाकीत त्या गर्दीतून त्यांच्या गाळ्याकडे निघाल्या. मी सुद्धा हळूहळू त्यांच्या मागे मागे जात राहिले. त्या त्यांच्या गाळ्यात पोहचताच मी तत्परतेने पुढे झाले आणि त्यांना गाठलं. म्हटलं, “मी माधुरी प्रधान. तुम्ही या कोळणींच्या गर्दीत जरा वेगळ्या वाटलात म्हणून तुम्हाला भेटायला आले. तुमचा मासे विक्रीचा व्यवसाय आहे का ?”
“हो. मी हॉटेल्सना मासे पुरवण्याचा व्यवसाय करते”.
मी मनांतल्या मनांत आनंदाने उडीच मारली. सुहासिनीबाईंना जशी टॅलेंट हवी होती तशाच या आहेत. सुटले एकदाची !
त्या सुषमाताईंना मी माझ्या भेटीचा हेतू सांगितला. त्या दूरदर्शनला येऊन सुहासिनीबाईंना भेटायला तयार झाल्या. त्यांचा व्यवसाय खरंच चॅलेंजिंग होता. रोज पहांटे कुलाब्याच्या दांडीला येऊन, या प्रस्थापित कोळी समाजामध्ये फिरून सराईतपणे त्या मासे खरेदी करत. त्यानंतर टेम्पो मधून तो माल वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये पोहोचता करत आणि दुपार टळल्यावर घरी परतत.
सधन, सुशिक्षित घरातील अत्यंत शांत व्यक्तिमत्त्वाच्या या स्त्रीने मला खूपच प्रभावीत केलं. सुहासिनीबाईंना हवी तशी टॅलेंट शोधण्यात मला यश आलं या खुशीत मी घरी परतले. सकाळपासूनची मच्छीच्या उग्र वासातली पायपीट, तळपत्या उन्हात, तहानभूक विसरून घेतलेला मासे विक्रेतीचा शोध आणि त्याला अचानक आलेलं यश– या सगळ्याने शरीर थकलं असलं, तरी मन प्रसन्न झालं होतं.
दुसऱ्या दिवशी भर दुपारी सुहासिनी बाईंसमोर जाऊन बसले. त्यांना सांगितलं, ‘नवलाई” साठी मासे विक्रेती स्त्री मिळालेय”. त्या ही खुश झाल्या. थोड्याच वेळात सुषमाताई तिथे पोहोचल्या. मी ओळख करून दिली. सुहासिनी बाई त्यांना एका मागोमाग एक प्रश्न विचारत होत्या.
त्यांनी कधीपासून आणि कशी या वेगळ्या व्यवसायाला सुरुवात केली? व्यवसायाचे स्वरूप, त्यातल्या अडचणी आणि आव्हानं कोणती ? सुषमाताई अत्यंत मृदू आवाजात शांतपणे सुहासिनी बाईंच्या प्रत्येक प्रश्नाचे समर्पक उत्तर देत होत्या.
बऱ्याच वेळानंतर सुहासिनीबाईंनी त्यांना निघायला सांगितलं. आभार मानून सुषमाताई उठल्या. निघाल्या. पाठमोऱ्या सुषमाताईंना एकटक बघत सुहासिनी बाई मला म्हणाल्या, “माधुरी इथे ये. समोर बस. चांगली व्यावसायिक स्त्री आणलीस तू नवलाई साठी ! अगं पण त्यांचं बोलणं ऐकु आलं तुला ? नाही ना ? किती हळू आवाजात बोलत होत्या त्या ! त्यांच्यासमोरच बसलेली असूनही मला त्यांचं बोलणं ऐकू येत नव्हतं. तर माझ्या करोडो प्रेक्षकांना ते कसं ऐकू येईल ? एवढा टफ व्यवसाय करणाऱ्यांमध्ये हिंमतीने वावरणाऱ्या स्त्रीचं व्यक्तीमत्व कसं असायला हवं? डॅशिंग! स्ट्रॉंग! पण त्या किती शांत आणि मवाळ दिसत होत्या! हॉटेल्सना मासे पुरवणारी ही स्त्री ! हॉटेलियर पुरुषांशी व्यवहार करणारी स्त्री किती धीट आणि बिनधास्त बोलणारी, वागणारी असायला हवी नाही का? होती का ती तशी ?”
मी मान खाली घातली. हा असा विचार मी केलाच नव्हता. सुहासिनीबाईंना हवी तशी मासे विक्रेती मिळाली या आनंदात होते मी ! सुहासिनीबाई पुढे बोलत राहिल्या. “हे बघ तू आकाशवाणीसाठी कार्यक्रम करतेस तेव्हा त्या टॅलेंटचा आवाज, शब्दोच्चार कसे आहेत एवढंच तुला पाहायला हवं. अर्थात त्या व्यक्तीचं संबंधित विषयातील ज्ञान तू पाहणारच. पण जेव्हा तू दूरदर्शनसाठी टॅलेंट शोधतेस, तेव्हा ज्या विषयासाठी तू त्या व्यक्तीची निवड केली आहेस, त्या विषयाचं ज्ञान तिच्याजवळ पुरेसं असायला हवचं. पण त्याचबरोबर ते ज्ञान, ती माहिती प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तिचं व्यक्तिमत्वसुद्धा तितकच प्रभावी हवं. त्या व्यक्तीचे ठाम पण सुस्पष्ट विचार स्वच्छ शब्दोच्चारांच्या द्वारे प्रेक्षकांपर्यंत त्या व्यक्तीला पोहोचवता येणं खूप गरजेचं असतं. एक लक्षांत ठेव. दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम आहे. इथे नुसता आवाज नव्हे, तर त्या टॅलेंटचं संपूर्ण व्यक्तिमत्व प्रेक्षकांना दिसत असत. त्या व्यक्तीच्या बोलण्या वागण्यातून तो विषय अत्यंत प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असतो. म्हणूनच टॅलेंट निवडताना अशी काळजी घ्यावी लागते.
त्याशिवाय आणखी एक गोष्ट तुला लक्षांत घ्यावी लागेल. बऱ्याच व्यक्तींना चेहऱ्याला कुठेतरी सतत हात लावण्याची, हातवारे करण्याची किंवा खोकण्या खाकरण्याची एखादी संवय असते किंवा एखादी व्यक्ती एखाद्या विषयातली तज्ञ असते. पण तिच्या बोलण्यात दोष असेल आणि तीला जर अडखळत बोलण्याची संवय असेल तर ! आपल्या टॅलेंटला अशी एखादी संवय आहे का हे सुद्धा तुला सजगपणे बघायला हवं. आपलं टॅलेंट ज्ञानी तर हवच. पण तेवढच पुरेसं नाही. रिहर्सलच्या निमित्ताने टॅलेंटची भेट घेऊन या सगळ्या गोष्टी तपासून टॅलेंट ठरवणं महत्त्वाचं ! दूरदर्शनसाठी टॅलेंटचा शोध घेताना नेहमीच तुला एवढा व्यापक विचार करावा लागेल”. “नवलाई”च्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुहासिनीबाईंनी मला टॅलेंट निवडण्याची एक वेगळी “नजर” दिली. गेली ५० वर्ष दृकश्राव्य माध्यमं अथवा मुद्रित माध्यमांसाठी या “नजरे”ने टॅलेंट चा शोध अचूक घेतला. योग्य टॅलेंटचा शोध घेणं हे सुद्धा माध्यमातील यशाचं गमक असतं. त्यामुळेच आजवर माध्यमांसाठी योग्य व्यक्तीचा शोध घेताना कधीही हितसंबंधाला महत्व न देता, उलट कधी कधी एखाद्या अपरिचित व्यक्तीशी बोलत असतानासुद्धा नकळत समोरची व्यक्ती कोणत्या माध्यमासाठी उपयुक्त आहे याचे विचार मनांत आपोआप सुरू होतात आणि अशाही पद्धतीने माध्यमांना उपयुक्त टॅलेंट आणि विषय दोन्हीही मिळून जातात.
पण “नवलाई” साठी मासेविक्रेती स्त्री शोधताना माझा प्रश्न मात्र आता अधिक जटील झाला होता. मत्स्य व्यवसाय करणारी अशी कोणती स्त्री आता नव्याने शोधावी असा मला प्रश्न पडला.
विचारांच्या तंद्रीत स्टेशनवरून घरी परत येत असताना एका दुकानाकडे नजर गेली. माशांच्या एक्वेरियमच दुकान होतं ते ! काचेच्या पेटीत अनेक रंगीबेरंगी मासे मनमुक्त विहरत होते. युरेका ! मी दुकानात घुसले. त्या दुकानदाराला विचारलं, “या माशांच्या काचपेट्या तुम्ही कुठून आणता ?” तो उत्तरला, “आमचे बरेच ब्रिडर्स आहेत. त्यांच्याकडून आम्ही हे मासे घेतो. कळव्याच्या पुढे सिमेंन्स कॉलनीत एक स्त्री आहे. ती माशांचं ब्रिडिंग करते. तिच्याकडूनही आम्ही हे मासे विकत घेतो आणि पेट्या तयार करतो.’
“मला त्या बाईंचा पत्ता मिळेल का ?” अत्यानंदाने पण सावधपणे माझा प्रश्न ! त्याने मोघम पत्ता दिला. दुसऱ्या दिवशी अख्खी सिमेंन्स कॉलनी पालथी घातली आणि मला शोध लागला “सपना चावडे” यांचा ! त्यांच्या घरभर माशांच्या पेट्या. मी त्यांना भेटले. त्यांच्याशी बोलले. सुहासिनीबाईंशी त्यांची भेट घडवली. बाईंना विषय फार आवडला. त्यांनी सपना चावडेंना तीन-चार माशांच्या एक्वेरियमच्या काचपेट्या कार्यक्रमाच्या दिवशी आणायला लावल्या. एक अतिशय आगळावेगळा कार्यक्रम ‘सुंदर माझं घर’ च्या ‘नवलाई’ या कार्यक्रमात सादर झाला. सुहासिनी बाईंनी शब्दांनी नव्हे, पण अत्यंत स्नेहाळ नजरेने मला शाबासकी दिली. माझ्या कष्टांचं चीज झालं. त्याचबरोबर टॅलेंटचा शोध कसा घ्यावा याची मोलाची शिकवणही या कार्यक्रमामुळे मिळाली. पुढे माझ्या बऱ्याच निर्मात्या गंमतीने म्हणत, “माधुरीला विषय दिला कि ती सप्तपाताळातून टॅलेंट शोधते.” हा ‘सप्त पाताळा” पर्यंत पोहोचण्याचा नेमका रस्ता मात्र मला दाखवला तो सुहासिनीबाई मुळगावकरांनी !
क्रमशः
— लेखन : माधुरी ताम्हणे. ठाणे
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800