१. रंगपंचमी
आज धुळवड,
रखुमाईच्या मनात आले
रंग उडवावा विठ्ठलावर
अठ्ठावीस वर्षे
हात ठेऊन कटीवर
शेजारी उभा,
नजर सरळ भक्तांवर
लक्ष नाही माझ्याकडे
रंग उडवून लक्ष वेधून घेते !
विठू, विठ्ठला, विठ्या, काळ्या
समोर ये, कुठे लपला आहेस ?
तुला सदैव भक्तांची याद
कधी देणार मला प्रतिसाद
आज धुळवड साजरी करू दे
तुझा काळा रंग, सजवू दे
माझी व्यथा तुला कळू दे
युगानुयुगे मी उभी शेजारी
हाती माझ्या प्रेमाची पिचकारी
तू भजनात दंग,
कीर्तनात भरीशी रंग
मी उभी निःसंग
अरे देवा विठ्ठला काय करू ?
हा तर जनाबाईचे
दळतोय दळण
भान जनीचे याला
विसरून येईल शेला
माझा विठू गबाळा
कुणा राजाच्या दरबारी
कुठली कोण नृत्यांगना
कान्होपात्रा गणिका
तिला उचलून स्वर्गाला नेतो
रेडा वदवतो,
फुले तोडतो, भाज्या खुडतो
भान माझे विसरून जातो
मला सांगतो रुक्माई,
तू लोकांची हो आई
आज होळी, कर पुरण पोळी
मला भक्त सोडत नाही
पायी मिठी मारतात,
म्हणतात माऊली
“हा कधी सुधारणार नाही
दाखवते इंगा
तुकोबाच्या विमानात बसून
मीच स्वर्गाला जाते,
माझी वीट बरोबर नेते
रहा एकटा उभा,
मी नाही शेजारी
सारे संत तुझे शेजारी”
रुक्माई, रुक्माई
नको सोडून जाऊ
तुजवीण मी अनाथ,
प्रेम तुझे माझ्या ठायी
धावत आलो तुझा पायी
चल रंगपंचमी खेळू
प्रेमरंगी रंगून जाऊ
— रचना : सुलभा गुप्ते. पुणे
२. सण होळीचा
येतो ऋतु वसंताचा
मांगल्याचा बहराचा !!
मोहरली फळझाडे
बहरली फुलझाडे !!
झटकून पाचोळ्यास
डवरली स्वागतास !!
कदंबासी गेंद डुले
शिरीषाची लाल फुले !!
केशरीच पळसाला
पीत वर्णी बहव्याला !!
बहुरंगी उधळण
उल्हासाची पखरण !!
सुगंधाने रान भरे
भारावले खग स्वरे !!
कण-कण निसर्गाचा
खेळ खेळे होऽ रंगाचा !!
रंग खेळू या आपण
आला आला होळी सण !!
भरुनिया पिचकारी
देऊ एक ललकारी !!
— रचना : विजया केळकर. हैदराबाद
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
रंगपंचमी लेख कविता छान
रंग चढला अंकावर