केवळ पोलिसी चातुर्य कथाच लिहून न थांबता, आपल्या मनाप्रमाणे धाडसी जीवन जगलेले श्रीकांत सिनकर यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊ या त्यांचे जीवन आणि त्यांचे लेखन.
श्रीकांत सिनकर यांना विनम्र अभिवादन.
– संपादक
श्रीकांत सिनकर यांचे नांव वाचले आणि पोलीस चातुर्यकथा असतील असे वाटल्यामुळे मी “सैली १३ सप्टेंबर” हे पुस्तक वाचायला घेतले.
यापुर्वी मी श्रीकांत सिनकर यांची…
१ ] अलविदा ! अलविदा !! आणि इतर पोलिस चातुर्यकथा
२ ] आरामनगर पोलीस ठाणे
३ ] आरोपींच्या मागावर
४ ] इन्स्पेक्टर जयकरांच्या जयकथा
५ ] इन्स्पेक्टर पटवर्धन यांच्या चातुर्यकथा
६ ] इन्स्पेक्टर बागवानांच्या साहसकथा
७ ] कावेबाज
८ ] गुंतागुंत
९ ] गुप्तपोलिस कथा
१० ] चुनावाला मर्डर केस
११ ] बाराघरच्या बाराजणी
१२ ] बोलकी डायरी
१३ ] ब्यूटीपार्लर मर्डर केस
१४ ] मुंबई पोलिसांना आव्हान
१५ ] मुंबई पोलिस चातुर्यकथा
१६ ] यांतील खुनी हात कोणता ?
१७ ] रिमांड कस्टडी
१८ ] हॅलो इन्स्पेक्टर पेंडसे हियर
१९ ] हॉटेल हेरिटेज मर्डर केस.
ही पुस्तकं वाचली आहेत.
“सैली १३ सप्टेंबर” हे पुस्तक चाळत असताना श्रीकांत सिनकर यांच्या इतर पुस्तकांत आणि ह्या पुस्तकात खूप फरक आढळला. हा लेख संग्रह आहे की चातुर्य कथा संग्रह आहे याचा उलगडा होत नव्हता. या पुस्तकात सुरुवातीला श्रीकांत सिनकर यांचे मित्र सतीश तांबे यांनी “अधोलोकाची अनमोल शितं” या लेखाद्वारे पुस्तकाबद्दल व सिनकर यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आपले विचार मांडले आहेत. तसेच ज्येष्ठ साहित्यिक व श्रीकांत सिनकर यांचे स्नेही माधव मनोहर यांनी “प्रस्तावनेऐवजी” या लेखात पुस्तकाबद्दल व सिनकर यांच्याबद्दल आपली अभ्यासपूर्ण मतं मांडली आहेत.
![](https://newsstorytoday.com/wp-content/uploads/2025/01/IMG-20250104-WA0012-191x300.jpg)
सतीश तांबे यांच्या मते श्रीकांत सिनकर हे दादरच्या शिवाजीपार्क सारख्या उच्चभ्रू वस्तीत जन्माला येऊनही त्यांची उठबस पांढरपेशा लोकांमध्ये नव्हती तर अधोविश्वातील गयागुजऱ्या लोकांबरोबर होती आणि लिखाणाचा पिंड खरं तर पत्रकाराचा होता. त्याची उठबस पोलिसांमध्येही जास्त होती. त्यामुळे श्रीकांत आधी मराठीत ‘पोलिस चातुर्य कथा’ लिहायला लागला व त्याचे हिंदीत भाषांतर करुन ‘मनोहर कहानियां’ सारख्या लोकप्रिय मासिकातून त्या प्रसिद्ध होऊ लागल्या. या लेखनातून त्याला पैसा व लेखक म्हणून मान मिळायला लागला.
“सैली : १३ सप्टेंबर” ह्या पुस्तकात मटका व्यवसायातील जगन, हातभट्टीच्या दारूचा व्यवसाय करणारा दत्तू, वेश्या व्यवसाय करणारी नेपाळी वेश्या सैली आणि ए ग्रेड हॉटेल मधील वेश्यावृत्तीची एकाच वेळी अनेक पुरुषांना खेळवणारी जिन ‘जिमलेट’ या चार व्यक्तींच्या निमित्ताने श्रीकांत सिनकर यांनी बेटिंग, हातभट्टी, वेश्यागार आणि ए ग्रेड हॉटेल अशा चार जगात वयाच्या पंधरा वर्षापासून सर्व आयुष्य खर्ची करणाऱ्या श्रीकांत सिनकर यांनी आपले अनुभव कथन केले आहे. सिनकर हे वेश्यागमन करत असले तरी त्यांना त्यांच्या सहभोगापेक्षा सहवास प्रिय होता.
सिनकर यांचे नेपाळी असलेल्या सैली या वेश्येबरोबर प्रेम जमले होते. त्यांना तिच्याशी लग्न करायचे होते परंतु ते होऊ शकले नाही. १३ सप्टेंबर हा तीचा जन्मदिवस. त्यामुळे सिनकर यांनी पुस्तकाला “सैली : १३ सप्टेंबर” हे नांव दिले आहे. खरं म्हणजे साहित्यिक जयवंत दळवी यांनी या पुस्तकाला “आत्मचरित्राऐवजी” असे नाव सुचवले होते. हे पुस्तक म्हणजे श्रीकांत सिनकर यांचे आत्मनिवेदन आहे.त्यांनी त्यांच्या कुटुंबाबद्दल फारशी माहिती दिली नसली तरी सुंदर सावली सापडली या लेखात वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी शैला थत्ते या महिले बरोबर सिनकर विवाहबद्ध झाल्याबद्दल जी हकीगत कथन केली आहे त्यात मोठा भाऊ, लहान भाऊ, लहान बहीण आई वडिल असा ओझरता उल्लेख केला आहे.
सिनकर यांच्या लेखनशैली बद्दल ज्येष्ठ साहित्यिक माधव मनोहर म्हणतात की, या पुस्तकात सैली आणि जिन ही दोन प्रकरणं वेश्याविषयक असूनही त्यात दूरान्वयानेही अश्लिलता वाटत नाही.
व्यक्तिचित्रणात्मक पुस्तकांमध्ये सर्वात वाचकप्रिय पुस्तक पु.ल. देशपांडे यांचे १९६६ साली प्रकाशित झालेले “व्यक्ती आणि वल्ली” हे आहे. ह्या पुस्तकाच्या १९६६ पासून २०१३ पर्यंत २७ आवृत्या निघाल्या. परंतु श्रीकांत सिनकर यांच्या “सैली : १३ सप्टेंबर” ह्या व्यक्तिचित्रणात्मक पुस्तकाची पहिली आवृत्ती फेब्रुवारी १९८१ साली झाली तर दुसरी आवृत्ती जानेवारी २०१३ रोजी म्हणजे ३२ वर्षांनंतर प्रकाशित झाली यावरून मराठीतील वाचकांची मानसिकता अद्यापही कशी पांढरपेशी आहे हे दिसून येते.
श्रीकांत सिनकर यांची “पेटलेली अमावस्या “ही एकांकिका, “विळखा” ही कादंबरी तसेच “म्हातारी” ही वादग्रस्त कादंबरी प्रकाशित झाली.त्यांची लेखनशैली अशी होती की पुस्तक वाचताना ती घटना त्यांनी प्रत्यक्ष पहिली आहे आणि त्या गुन्ह्याचा त्यांनी प्रत्यक्ष तपास केला आहे असा भास होतो. त्यामुळे ज्यांनी त्यांना प्रत्यक्ष पहिले नसेल अथवा त्यांचे “सैली १३ सप्टेंबर” हे पुस्तक वाचले नसेल त्यांच्या डोळ्यासमोर अनुभवी इन्स्पेक्टरच्या वेशातील व्यक्ती डोळ्यासमोर आल्याशिवाय राहणार नाही. पण प्रत्यक्षात ते पोलिस खात्यात नोकरीला नव्हते तर त्यांची गुन्हेगारी विश्वाशी तसेच पोलिस खात्याशी जवळीक होती. पोलिस खात्याकडून मिळालेल्या माहितीवरून त्यांनी शब्दांकन करून कथा व लेख लिहिले.
श्रीकांत सिनकर यांनी जिन ‘जिमलेट’ या लेखात स्पष्ट उल्लेख केला आहे की, “माझ्या आयुष्यात मला ज्या ज्या शक्य झाल्या त्या त्या सर्व भानगडी मी केल्या. सर्वच अनुभव घेतले.माझ्या जीवनात मी जे जे काही केलं त्या सर्व गोष्टींना सर्वस्वी मीच जबाबदार आहे.जगात आपल्याला कोणीच नाही. आपण एकटेच आहोत ही भावना मनात घट्ट रुजवूनच जीवन जगलो.”
“सैली” ह्या मुंबईत वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेबरोबर श्रीकांत सिनकर यांना लग्न करायचं होतं. परंतु ते होऊ शकलं नाही. त्याऐवजी “शैला थत्ते” ह्या महिलेबरोबर वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी लग्न झालं. दोघांच्या वयात खूप अंतर होतं.
श्रीकांत सिनकर यांच्या इतर पुस्तकात आणि “सैली : १३ सप्टेंबर” ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. सैली : १३ सप्टेंबर हया पुस्तकात मटका व्यवसाय करणारा ‘जगन’ दारू विक्री करणारा ‘दत्तू’ , वेश्या व्यवसाय करणारी ‘सैली’, ‘ जिन जिमलेट’ ही अत्यंत मोहक, देखणी, मादक उच्चपदस्थ तरुणी अशा व्यक्तींबरोबर श्रीकांत सिनकर यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध होते. त्यामुळे ही रूढार्थाने व्यक्तिचित्रणं नाहीत तर श्रीकांत सिनकर आणि त्या व्यक्ती ह्यांच्यात जे काही घडलं त्याची “संबंध – चित्रणं” आहेत. त्यांच्या बरोबर वागताना सिनकर यांनी आपल्या बद्दल स्वतःबद्दल माहिती दिली आहे.
तसं बघायला गेलं तर गुन्हेगारी जगतात राहून प्रत्यक्ष अनुभव कथन करणारे नामदेव ढसाळ यांच्या व्यतिरिक्त श्रीकांत सिनकर एकमेव लेखक होते. सिनकर यांनी ‘म्हातारी’ ही पहिलीच कादंबरी लिहिली आणि त्यावर आचार्य अत्रे यांनी जबरदस्त टीका केल्यामुळे ते पुन्हा कादंबरी लेखनाकडे वळले नाहीत.
श्रीकांत सिनकर यांच्यासाठी ‘जग’ काय म्हणतय, यापेक्षा ‘मन’ काय सांगतय’ हे महत्वाचे होते. त्यांनी जगाची पर्वा केली नाही. असा हा साहित्य क्षेत्रांतील “अवलिया” १० फेब्रुवारी १९९६ रोजी वयाच्या अवघ्या ५६ व्या वर्षी आपल्यातून निघून गेला.
![](https://newsstorytoday.com/wp-content/uploads/2021/07/IMG_20210731_103826-150x150.jpg)
— परीक्षण : दिलीप गडकरी. कर्जत – रायगड.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
खुप छान माहितीपूर्ण लेख वाचायला मिळाला.
एका अवलिया विषयी इतकी सविस्तर माहिती देणारा लेख लिहिणे हे सुद्धा खूपच कौतुकास्पद आहे. त्यासाठी प्रथम दिलीप गडकरी सरांचे हार्दिक अभिनंदन. “सैली” पुस्तकाच्या निमित्ताने लिहिलेल्या लेखात श्रीकांत सिनकर ह्यांच्या संपूर्ण साहित्यिक प्रवासाची आणि थोड्या प्रमाणात वैयक्तिक जीवनाची माहिती मिळते. लेख खूपच छान आहे. मनःपूर्वक धन्यवाद दिलीपजी. 🙏💐
छान अभ्यासपूर्ण व त्यांच्या लेखनाविषयी व स्वभावाविषयीचा उत्तम लेख.
अभ्यासपूर्ण, अप्रकाशित पैलूंवर प्रकाश टाकणारा लेख. श्रीकांत सिनकर यांच्या पोलीसी चातुर्य कथांनी किशोर वयात गारुड केले होते.