Saturday, May 17, 2025
Homeकला'स्नेहाची रेसिपी' : १०

‘स्नेहाची रेसिपी’ : १०

उन्हाळा स्पेशल .. ३
समरस्पेशल  थंडगार  रोज फालुदा
उन्हाळा सुरु झाला की सर्व थंडगार पदार्थ बनवण्याची आणि खाण्याची लगबग सुरु होते. मुलांना शाळेला सुट्टी लागली की मग खरा उन्हाळा एन्जॉय करणे सुरु होते त्यांचे.

खरे तर  उन्हाळा हा सर्वांनाच नकोसा वाटणारा ऋतू आहे. पण विविध प्रकाराची आईस्क्रीम, लस्सी, सरबते, ज्यूसेस, मस्तांनी, मॉकटेल्स, डेझर्ट्स, कलिंगडे, खरबूज, द्राक्षे, आंबा, संत्री यासारखी रसदार  फळे हे डोळ्यांसमोर आले की मग मात्र उन्हाळा कधी सुरु होतो असे वाटते. प्रत्येक ऋतूचे वेगवेगळे वैशिष्ट आहे. जसे थंडीत थंडगार पदार्थ नकोसे होतात. गरम सूप, चहा, कॉफी, तळलेले पदार्थ, मसालेदार् पदार्थ खावेसे वाटतात, तसे उन्हाळ्यात वर्षाची पापड, लोणची, मुरांबे, कुरडया, यासारखे वाळवणाचे पदार्थ, बनतात. खायलाही मजा येते. आमरस वर्षभरही मिळतो आता, पण  त्याची खरी मजा उन्हाळ्यातच ! असाच आज एक सर्वांना आवडणारा थंडगार फालुदा आपण बनवूया.

साहित्य : अर्धा लिटर दूध, 3..4 चमचे साखर, क्रिस्टल जेली 1 पॅकेट , 100 ग्राम शेवया,  रोज सिरप, 1 वाटी भिजवलेले सब्जा बी, 1 स्कूप व्हनीला किंवा रोज, स्ट्रॉबेरी आईस्क्रीम, सजावटी साठी गुलाब पाकळ्या किंवा डाळिंबदाणे, ड्रायफ्रुट्स, चेरी.

कृती : सर्वांत आधी सब्जा भिजत टाकावा. मग गॅसवर  अर्धालिटर पाणी उकळायला ठेवावे. आता एका बाऊलमध्ये जेली पॅकेट मधील दोन्ही पावडर काढून एकत्र करून घ्याव्यात. मग उकळलेले पाणी त्यात टाकावे व व्यवस्थित ढवळुन कोमट झाले की तासभर थंड होण्यासाठी फ्रीझ मध्ये ठेवावे. तासाभरात सेट होऊन मस्त जेली बनते.
दुसऱ्या गॅसवर 1 लिटर पाणी घालून ते उकळले की त्यात शेवया घालून चमक येऊन ट्रान्स्फरन्ट होईपर्यंत उकळू द्यावी. नंतर ती चाळणीत काढून त्यावर थंड पाणी ओतावे म्हणजे शेवया छान सुट्या होतील आणि एकमेकांना चिकटणार नाहीत.
गॅसवर जाड बुडाच्या भांड्यात दूध उकळायला ठेवावे. दुधाला उकळी आली की त्यात 4 चमचे साखर घालून थोडेसे आटवावे म्हणजे फालुदा टेस्टी बनतो. आता ते व्यवस्थित थंड होऊ द्यावे. सर्व तयारी मस्त झालेली आहे. आता छान काचेच्या ग्लासमध्ये फालुदा बनवायला सुरु करूया. सर्वांत आधी ग्लासमध्ये काठापासून खालपर्यंत आतून रोज सिरप घालावे म्हणजे ग्लास सुरेख दिसेल . नंतर त्यात 2 चमचे सब्जाचे भिजवलेले बी घालावे  व थोडिशी जेली घालावी. मग थोड्या शेवया घालून त्यावर 2..3 चमचे रोज सिरप घालावे. त्यानंतर ग्लास पाऊण होईपर्यंत दूध घालावे व वरती आईस्क्रीमचा स्कूप घालावा. शेवटी सजावटी साठी वरती लाल गुलाब पाकळी, डाळिंब दाणे, ड्रायफ्रुट्स घालून वरती चेरी ठेवावी. आता हा थंडगार, रोज फालुदा सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.

फालूदा

वैशिष्टय : फालुदा एक खास पद्धतीने बनवलेले दिसायला अतिशय आकर्षक, चव  लाजवाब, शेवया, आईस्क्रीम यामुळे पोटभरीचे, सब्जा आणि गुलाब यामुळे शरीरात थंडावा निर्माण करणारे, उन्हाळ्यात  थंडगार आणि गोड असे एक परिपूर्ण शीतपेय आहे. नक्की करून पहा.

२ – ‘वन ग्लास मील’ !
हल्ली प्रत्येकजण तंदुरुस्त राहण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्यासाठी काही ना  काही उपाय करत असतो. बाह्य सौन्दर्य  जितके महत्वाचे असते तितकेच आंतरसौन्दर्य सुद्धा महत्वाचे असते .आतून सर्व उत्तम असले तरच बाह्यसौन्दर्य जास्त खुलून दिसते. त्यासाठी व्यायामाबरोबरच उत्तम आहाराचीही आवश्यकता असते. म्हणूनच आता झटपट बनणारे पदार्थ जे हेल्दी असतात तसेच बनवण्याकडे सर्वांचा कल असतो त्यासाठी बरेचदा भाज्यांचे, कडधान्याचे, फळाचे विविध पदार्थ बनवतात. चवीपेक्षा त्यातून मिळणारे फायदे पाहिले जातात. पण आज आपण ड्रायफ्रुटस्, सीड्स, या पासून एक असे पेय बनवू जे बहुगुणी तर आहेच पण टेस्टी सुद्धा तितकेच आहे. झटपट बनणारे आणि पोट भरून बराच काळ भूक न लागणारे असे हे पेय थंडीत, पावसाळ्यात, उन्हाळ्यात तिन्ही ऋतूत उत्तम आहे. मग उत्सुकता न वाढवता लगेंच बनवायला चला…

साहित्य : 6..7 बदाम, 8..10 काजू, 3 अक्रोड, 7..8 पिस्ते, पाव चमचा वेलचीपूड किंवा आवडीनुसार 4 थेंब इसेन्स, 1 जर्दाळू, 2 अंजीर, 1 चमचा मनुका, 1 चमचा सब्जाचे बी, 1 चमचा तीळ, 2 बी काढलेले खजूर, 1 केळ, 1चमचा खवलेला नारळ, अर्धा कप गायीचे दुध.

कृती : प्रथम गॅसवर एका कढई मध्ये काजू, बदाम, अक्रोड, पिस्ते, तीळ  मंद आचेवर मस्त गरम करून घ्यावेत. नंतर ते मिक्सरच्या भांड्यात घालून वेलची पूड घालावी व फिरवून बारीक पावडर बनवून घट्ट झाकणाच्या बाटलीत भरून ठेवावी. ही पावडर बरेच दिवस टिकते.
आता रात्री झोपण्यापूर्वी अंजीर, मनुका, जरदाळू, सब्जाचे बी, खजूर, सर्व एका बाऊलमध्ये कपभर पाणी घालून भिजवावे. सकाळी उठल्यावर ते मस्त फुगून सॉफ्ट झालेले असेल. बहुतेक सर्व पाणी शोषले गेले असेल. मग हे सर्व मिक्सरच्या भांड्यात घालून त्यात केळीचे तुकडे करून, नारळ व दूध घालून व्यवस्थितपणे भरपूर  फिरवावे. मग यातच इसेन्स आणी 2 चमचे ड्रायफ्रुट्सची पावडर घालून पुन्हा छान एकजीव होईपर्यंत  मस्त फिरवावे. आता काचेच्या ग्लासमध्ये काढून त्यावर सजावटी साठी  ड्रायफ्रुट्सचे काप घालून सर्व्ह करावा.

वन ग्लास मील

वैशिष्ट्य : हा ज्यूस घट्ट असल्यामुळे पोटभरीचा होतो. ‘वन्  ग्लास मिल’ असे हे मस्त आणि टेस्टी ड्रिंक आहे. गार व गरम अशा दोन्ही प्रकारे दुधातून आपण हे घेऊ शकतो. पावडर एकदा बनवून ठेवली की ती बरेच दिवस उपयोगी येते. व्हित्यामीन्स, खनिजे, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फायबर्स प्रचंड प्रमाणात मिळतात त्यामुळे  ताकद, प्रतिकारशक्ती खूपच वाढते. केसांपासून ते नखापर्यत मजबूत होऊन सौन्दर्य खुलते. त्यामुळे साहजिकच आत्मविश्वास वाढून मनाचे आरोग्य सुद्धा उत्तम राहते. असा हा जादूई ज्यूस नक्की बनवा, दररोज प्या आणि  स्वस्थ आणि मस्त रहा.

३ – कैरीचे सरबत : बाहेर हिरव्यागार कैऱ्या दिसायला लागल्या की उन्हाळ्याची जाणीव होते. मग कैरीचे आंबट गोड चवीचे असंख्य पदार्थ डोळ्यासमोर  येऊन तोंडाला पाणी सुटते. कैरीच्या चटण्या, लोणची आंबेडाळ, कायरस, मुरांबे, सरबत, पन्हे … यादी संपतच नाहीये. चैत्रागौरीचे आगमन होते. मग हळदीकुंकवाचे मुख्य आकर्षण म्हणजे  खमङ्ग् आंबेडाळ  आणि आंबटगोड, थंडगार, पुन्हा पुन्हा प्यावेसे वाटणारे कैरीचे पन्हे. हे पन्हे 4..6 दिवस टिकणारेही बनवता येते आणि सरबत तात्पुरते सुद्धा बनवता येते आणि  वर्षभरात  मनात आले , ईच्छा झाली की  कधीही, कुठेही झटपट बनवून पिता येण्यासारखे  असेही बनवता येते. अगदी प्रवासातसुद्धा उन्हाळ्यात खूपच त्रासदायक वाटतो अशावेळी लगेंच बनवून प्यायले की फ्रेश वाटते .. एनर्जी मिळते. आपण आज वर्षभर व्यवस्थित  टिकणारे सरबत  बनवूया.

वर्षभर टिकणारे आणि झटपट बनणारे कैरीचे  सरबत.
४ – कैरीचे  सरबत :  सरबत आणि पन्हे यामधील मुख्य फरक
म्हणजे सरबत हे कच्च्या कैरीचे  बनवतात तर पन्हे हे कैरी उकडून त्याचे बनवतात.

साहित्य : 2 आंबट पक्क्या कैऱ्या, 3 कप म्हणजेच तिप्पट साखर, 10..12 थेंब हिरवा फूड कलर पाव चमचा मिठ, वेलदोड्याची पावडर, चाट मसाला, जिरे पावडर.

कृती : 2 आंबट पक्क्या कैऱ्या स्वच्छ धुवून, पुसून साल काढून घ्याव्यात. मग  कापून आतील कोय काढुन टाकुन तुकडे करून  मिक्सरच्या भांड्यात घालून एकदम बारीक वाटून घ्यावा. मग गर जेवढा असेल त्याच्या तिप्पट साखर भांड्यात घालावी कारण कैरी थोडीशी आंबट असल्यामुळे साखर भरपूर घातली तर सरबताला आंबटगोड टेस्ट छान येते. आता साखर व चवीसाठी  मीठ घालुन घालून गर भरपूर फिरवून घ्यावा. म्हणजे साखर बारीक होऊन मस्त एकजीव होईल. मिठामुळे जास्तच लज्जत येते. आता त्यात खाण्याचा हिरवा रंग घालून पुन्हा सर्व एकदा फिरवून घ्यावे. मग स्टीलच्या ताटात जास्तीत जास्त पातळ थर पसरून  ताटावर पातळ कापड झाकून उन्हात  वाळवण्यासाठी ठेवावा म्हणजे त्यात धूळ जाणार नाही. दुसऱ्या दिवशी उलथने किंवा सुरीने खालची बाजू वर करून ओलसर असेल त्यामुळे पूर्ण सुकवावी. दोन दिवसाच्या उन्हात हे एकदम  कडकडीत सुकते.
मग ते काढून मिक्सरच्या भांड्यात घालून मस्त बारीक पावडर करून ठेवावी. म्हणजे मग काय, आपल्याला हवे तेंव्हा हवे तेवढे कैरीचे  झटपट सरबत बनवू शकतो, ते ही अगदी वर्षभर !
आता आपण ही पावडर घालून कैरीचे सरबत बनवू .त्यासाठी एका काचेच्या ग्लासात 2 चमचे पावडर घालून त्यात चिमूटभर वेलची पावडर घालावी. थंडगार पाणी घालून चमच्याने मस्त ढवळावे व  जास्त थंड आवडत असेल तर 1..2 आईसक्युब्ज  घालावेत. आवडत असेल तर चाट मसाला आणि  थोडी भाजलेली जिरपूड घातली तर भन्नाट टेस्ट येते. आता हे थंडगार हिरवेगार कैरीचे सरबत सर्व्ह करावे.

कैरीचे सरबत

वैशिष्टय : तसे कच्ची कैरी साल काढून खिसून किंवा तुकडे करून मिक्सर मध्ये घालून त्यात दुप्पट साखर, वेलदोडा घालून फिरवून त्यात बर्फ आणि पाणी घालून फिरवून गाळून बहुतेक घरात बनवतात. पण हे तात्पुरते बनते. पण आज आपण वर्षभर टिकणारे सरबत पाहत आहोत.
या सरबताचा हिरवगार रंग फक्त आकर्षक दिसत नाही तर बाहेरच्या रणरणत्या उन्हात डोळ्यांना थंडावा सुद्धा देतो. वेलची  पावडर आयत्यावेळी घातली म्हणजे त्याचा स्वाद ताजा राहतो आणि लज्जत वाढते. घट्ट् झाकणाच्या काचेच्या बाटली मध्ये भरून ठेवून ओलसर  चमचा घातला जाणार नाही याची काळजी घेतली तर वर्षभर ही पावडर छान राहते .आणि मूड बनला की लगेच आस्वाद घेऊ शकतो. जर ऊन नसेल तरीही काळजी नसावी. सतत मोठ्या फॅनखाली ठेवावे व उलटे सुलटे करून व्यवस्थीत  सुकवून घ्यावे. यात एखादा दिवस जास्त लागतो. पण सरबत तसेंच टेस्टी बनते. आता उन्हाळा सुरु झाला आहेच, यंदा वर्षभरासाठी  झटपट बनणाऱ्या सरबताची सोय करायची ना मग ? …
क्रमशः

— लेखन : सौ. स्नेहा मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

गोविंद पाटील on आमचा वाडा…
कविता बिरारी on पहलगाम
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on स्नेहाची रेसिपी’ – १३
अजित महाडकर, ठाणे on माझी जडणघडण : ४८
विजया वाळुंज on जशाच तसे
अरविंद विनायक ढवळे on “पद्मश्री” उदय देशपांडे
पुरुषोत्तम रामकृष्ण रामदासी on माझी जडणघडण : ४८
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माध्यम गोंधळ : संनियंत्रण आवश्यक
Pratibha Saraph on काही अलक
शितल अहेर on जशाच तसे
प्रदीप पाटील on जिचे तिचे आकाश : ८