“विचित्र संगीत दिन”
आंतरराष्ट्रीय विचित्र संगीत दिन दरवर्षी २४ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येतो.. लोकांना नेहमीच्या आणि परिचित संगीताच्या पलीकडे जाऊन काहीतरी नवीन, वेगळे आणि अनोखे संगीत ऐकण्यासाठी किंवा वाजवण्यासाठी प्रेरित करणे या साठी दरवर्षी २४ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय विचित्र संगीत दिन साजरा करण्यात येतो.
नाव जरी ‘विचित्र’ असले तरी या दिवसाचा उद्देश विचित्र नाही. उलट, हा दिवस आपल्याला आपल्या पारंपरिक व नियमित प्ले लिस्ट पलीकडे जाऊन काहीतरी नवीन, वेगळं आणि अनोखं संगीत ऐकण्याचं धाडस करायला शिकवतो.

आपल्या कानाला जेव्हा रोज त्याच गाण्यांचे सूर ऐकू येतात, तेव्हा मन हळूहळू कंटाळलेले असते. अशा वेळी अनोख्या संगीताचा आस्वाद घेतला की मनात नवीन ऊर्जा निर्माण होते. “विचित्र” म्हणजे केवळ गोंधळलेले किंवा न आवडणारे सूर नाहीत, तर असे सूर, जे कधी ऐकलेच नाहीत, अशा ध्वनीविश्वाचा अनुभव घेणे.

आंतरराष्ट्रीय विचित्र संगीत दिवसाची सुरुवात १९९७ मध्ये न्यू यॉर्क येथील संगीतकार पॅट्रिक ग्रँट यांनी केली. त्यांचा विश्वास होता की, “संगीत ऐकताना आपण जर पूर्वग्रह बाजूला ठेवले, तर आपला दृष्टिकोनही अधिक खुला होईल. ”ग्रँट यांनी आपल्या कलात्मक मार्गदर्शकाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि स्वतःच्या अल्बम “फील्ड्स आर अमेझिंग” च्या प्रमोशनसाठी हा दिवस निवडला. पुढे २००२ पर्यंत हा एक आंतरराष्ट्रीय उत्सव झाला. विविध कलाकार, संगीतप्रेमी, विद्यापीठे आणि महोत्सवांनी त्याला स्वीकारले. २०१२ मध्ये ग्रँट यांनी न्यू यॉर्कमधील संगीतकारांना एका विशेष परफॉर्मन्समध्ये सहभागी होण्यासाठी बोलावले. जॉली रेमी, द ड्रीमस्केप फ्लॉपीज, द ग्रूव्ह कमांडर्स यांसारख्या विचित्र बँड्सनी या कार्यक्रमात भाग घेतला. त्यानंतर न्यू यॉर्कपासून लंडनपर्यंत या दिवसाचे विविध सोहळे आयोजित होऊ लागले.

— संदर्भ : इंटरनेट, हर्षदा पाटोळे
— संकलन : संजीव वेलणकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
