Saturday, May 17, 2025
Homeलेखहसा आणि हसवा, लोकहो !

हसा आणि हसवा, लोकहो !

मे महिन्यातील पहिला रविवार हा “जागतिक हास्य दिवस” म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानुसार काल, ४ मे रोजी “जागतिक हास्य दिवस” साजरा झाला. आपण हसण्याला, हसण्यावारी घेऊ नये म्हणून हा लेखन प्रपंच ! आपणा सर्वांना हास्य दिवसाच्या हसत हसत शुभेच्छा…..

आपल्याकडे उगाचच सदा गंभीर राहणाऱ्या, चेहरे पाडून बसणाऱ्या व्यक्तीस उगाचच खूप मानाचं स्थान दिलं जातं. या उलट हसणाऱ्या व्यक्तीस मात्र हसण्यावारी घेतलं जातं. त्याच्याकडे कुत्सितपणे पाहिल्या जातं. त्याला उथळ समजल्या जातं. “टवाळा आवडे विनोद” असं तर पूर्वापार म्हटलं गेलंय.

खरं म्हणजे हसण्याचे खूप फायदे आहेत. हसण्याने आपले ताण तणाव दूर होतात. आपले स्नायू मोकळे होतात. हसण्यामुळे प्रतिकार शक्ती वाढते.प्रतिकूल परिस्थितीला आपण सहज तोंड देऊ शकतो. जास्त हसणारी माणसं जास्त काळ, जास्त छान जगतात. “हसणं हे उत्कृष्ट औषध आहे” असं, (अर्थातच इंग्रजी !) सुभाषित आहे.

जगात दिवसेंदिवस खूप भौतिक, वैद्न्यानिक, तांत्रिक, आर्थिक प्रगती होत आहे. पण यामुळे माणूस यशस्वी झाल्याचे समजण्यासाठी कृत्रिम निकष लावल्या जाऊ लागलेयत. नैसर्गिक भाव भावना मागे पडू लागल्या आहेत, त्या इतक्या की माणूस रडणं, हसणंही विसरत चाललाय. मनातल्या भावनांचा वेळीच यथा योग्य निचरा होत नाहीय. त्यामुळे शारीरिक, मानसिक आजार वाढत आहेत. आत्महत्या करण्याचे, आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्याचे, मानसिक, मनोशारीरिक आजारांचे प्रमाण चिंताजनकरित्या वाढत आहे. प्रगत समजल्या जाणारे देशही यास अपवाद नाहीत.

अशा या सर्व गंभीर परिस्थितीत भारताने जगाला एक छान भेट दिलीय. ही भेट आता जागतिक चळवळ झालीय. ही भेट म्हणजे हास्य चळवळ होय. मुंबई येथील डॉ. मदन कटारिया यांच्या असं लक्षात आलं की, त्यांच्या कडे येणाऱ्या असंख्य रुग्णांमध्ये मनोशारीरीक रुग्णांचं प्रमाण लक्षणीय आहे. म्हणजे लक्षणं जरी शारीरिक असली तरी कारणं ही मानसिक आहेत.

डॉ मदन कटारिया यांनी हसण्याचे फायदे ओळखून जगात सर्वत्र लोक हसावेत, आनंदी रहावेत, निरोगी असावेत यासाठी १९९५ साली “हास्य योग चळवळ” सुरू केली. पत्नी आणि चार मित्रांसह मुंबईत सुरू झालेल्या या उपक्रमाकडे सुरुवातीला हसण्यावारीच बघितल्या जाऊ लागलं. हळूहळू जाहीरपणे हसण्याचें फायदे कळायला लागल्यावर लोक मोठया प्रमाणात हास्य चळवळीत सहभागी व्हायला लागले. ठिकठिकाणी हास्य क्लब निर्माण होऊ लागले. आपण कधी आपल्या घराजवळच्या बागेत जात नसाल तर अवश्य जायला लागा. तिथे गेल्यावर हसणाऱ्या माणसांकडे दुरूनच पाहून हसू नका.त्यांच्यात सामील व्हा. निर्भयपणे, निर्भेळपणे हसायला लागा.

हास्य चळवळ सुरू होऊन यावर्षी ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. आता १०० पेक्षा अधिक देशांमध्ये हास्य चळवळ पसरली आहे. एखाद्या बागेत, सभागृहात, सार्वजनिक ठिकाणी, सर्व सदस्यांनी दररोज एकत्र यायचं आणि शास्त्रीय पद्धतीने विकसित करण्यात आलेला हास्य योग करायचा असा हा उपक्रम असतो. वेगवेगळ्या देशांमध्ये स्थानिक पातळीवर बदल, सुधारणा ही करण्यात आल्या आहेत आणि येत असतात. हास्य योगाच्या निमित्ताने एकत्र आलेले लोक, विविध प्रकारचे उपक्रम ही हाती घेत असतात.

जगात मोठ्या प्रमाणात हास्य चळवळीला यश मिळाल्या नंतर ११ जानेवारी १९९८ रोजी मुंबईत पहिला जागतिक हास्य दिवस साजरा करण्यात आला. जगभरातून जवळपास १२ हजार प्रतिनिधी उपस्थित होते. हा आकडा खराच असणार, कारण त्या दिवशी जेवण्यासाठी १२ हजार ताटं लागली होती ! पुढे मात्र सर्व सहमतीने मे महिन्यात येणारा पहिला रविवार जागतिक हास्य दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे.

जगात आणि दैनंदिन जीवनात सध्या ताणतणाव खूप वाढला आहे. त्यामुळे आपण सर्वानी एकच दिवस नाही तर रोजच हास्य दिवस साजरा करू या. मित्र मंडळी,नातेवाईक यांना विनोदी व्हिडीओ पाठवा, निखळ, निर्भेळ विनोद पाठवा, ऐकवा. कधी आपल्या जीवनात विनोदी प्रसंग, परिस्थिती निर्माण झाली असेल तर मोकळेपणाने सांगा, स्वतःवर लोकांना हसू द्या. प्रत्येक जण जीवनात अशा प्रसंगांना सामोरा गेलेलाच असतोच.
आता हेच बघा ना, नुकतेच झालेल्या आंतरराष्ट्रीय कवी संमेलनात सहभागी होण्याचे निमंत्रण अमेरिकेतील नयना ताईंनी मला दिले. खरं म्हणजे त्यांनी इकडच्या तिकडच्या वेळा व्यवस्थित कळविल्या होत्या. पण तरीही माझा व्हायचा तो घोटाळा झालाच. मी आपल्या कडील वेळेनुसार सकाळी ९.४५ पासून छान पैकी तयार होऊन कधी एकदा संमेलन सुरू होतेय, याची आतुरतेने वाट पहात बसलो. १० वाजून पुढे आणखी १५ मिनिटे झाली तरी संमेलन सुरू होईना, स्क्रीन वर सारखा मेसेज येत होता..? “Host is not ready !” मनातल्या मनात मी म्हणत होतो, अमेरिकेतील लोकं तर वेळा खूप कटाक्षाने पाळतात आणि हे काय चाललंय ? शेवटी न राहवून मी त्यांना विचारले की, उशीर का होतोय ? तर बहुतेक माझा वेळेचा झालेला घोटाळा ओळखून चाणाक्ष नयनाताईनी सांगितले, इकडची (म्हणजे नवी मुंबईतील) वेळ संध्याकाळी ७.३० ची आहे आणि अमेरिकेतील वेळ सकाळी १० ची आहे ! तर असा माझा चांगलाच पचका झाला !

आपण दुसऱ्याला हसविलं की तो ही आपणास निश्चितच हसवेल, अशी अपेक्षा करू या. अर्थात एकमेकांच्या जोडीदारांना हसविण्याआधी त्यांचा मूड बघा. मगच हसविण्याचं धाडस करा. एकमेकांच्या सासवा, मेहुणे, मेव्हण्या यांच्यावर विनोद करू नका. अन्यथा ते अंगलट आल्यास देवेंद्र भुजबळ जबाबदार असणार नाहीत !

थोर विनोदी अभिनेता चार्ली चॅप्लिन म्हणूनच गेलाय की, ज्या दिवशी आपण हसलो नाहीत, तो आपला दिवस वाया गेला, असं समजा. काही लोक तर आयुष्यच वाया घालवतात. त्यांना काय म्हणावं ? असो. अजून जास्त काही लिहून मी आपल्या चेहऱ्यावर हे सर्व वाचून कदाचित काही हसू आलंच असेल तर ते घालवू इच्छित नाही.

खरं म्हणजे, मी लिहितो, ते किती जण खरंच वाचतात, हा प्रश्नच आहे. कारण काही मित्र मंडळी माझं काही लिखाण त्यांना मिळता क्षणीच तत्परतेने लगेच अंगठा दाखवतात. खरंच वाचलं का म्हणून चिकाटीने, आशेने विचारलं तर काही कळवत नाहीत. यावरून आपण समजून घ्यायचं, मित्राने आपल्याला खरंच अंगठा दाखवलाय म्हणून ! असू द्या, ते असं करत असले तरी, शेवटी ते मित्रच आहेत. त्यामुळे देवा, त्यांना माफ़ कर. काही पाप लागू देऊ नकोस.

पण मित्रांनो, आज तरी आपण मला नुसता अंगठा दाखवू नका. लिहायचा कंटाळा असेल तर एखादा छानसा विनोद पाठवा. हसा आणि हसवा. आपल्याला हास्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐

देवेंद्र भुजबळ

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. खूपच छान विनोदी लेख आहे व जोडीला छान संदेश ही आहे. हास्या शिवाय एक दिवस घालवणे म्हणजे तो दिवस वाया घालवणे असते. हास्य हे जगणे किती सोपे करते आम्ही रोज योग वर्गात खळखळून हसतो अशी दिवसाची सुरुवात सुंदर होते….तुम्ही पण हसता ना..☺️☺️

  2. 😁😁😁लेख छान आहे सर. शेवटून दुसरा paragraph चा अंगठा 👍वाला विनोद भारीच आहे. मनातल्या मनात खळखळून हसले.😁😁

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

गोविंद पाटील on आमचा वाडा…
कविता बिरारी on पहलगाम
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on स्नेहाची रेसिपी’ – १३
अजित महाडकर, ठाणे on माझी जडणघडण : ४८
विजया वाळुंज on जशाच तसे
अरविंद विनायक ढवळे on “पद्मश्री” उदय देशपांडे
पुरुषोत्तम रामकृष्ण रामदासी on माझी जडणघडण : ४८
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माध्यम गोंधळ : संनियंत्रण आवश्यक
Pratibha Saraph on काही अलक
शितल अहेर on जशाच तसे
प्रदीप पाटील on जिचे तिचे आकाश : ८