१. चंद्र…
हा चंद्र तुझ्या देहात
अन् चांदण्यांचा श्वास
मन कोमल नितळ
की तुझाच आहे भास.
अशी गंधित ही वेळा
वाजे तुझेही पैंजण
रात सावळी सावळी
येई सुगंध लेऊन.
चांद माखल्या देहात
पडे अत्तराचा सडा
वाऱ्यासवे लहरत
भरे श्वासात केवडा.
रात रंगात भरात
सवे वाऱ्याची ठुमरी
काही आर्त नाद नभी
रात जागते अंबरी
काही चांदण फुलांनी
गेला भरोनी पदर
काही शब्द फुले हाती
सखे झाक हे अधर.
२. आठवावे गाणे
कवडसा हा उन्हाचा
पाना पानात झिरपे
सावलीची लपाछपी
ऊन ओघळे तिरपे.
पक्षी एक आठवांचा
असा निवांत झाडीत
तुझ्या यादेचा पडदा
मनाच्या कोंदणात.
काही पाने काही फुले
विसावे तव मिठीत
काही आठवावे गाणे
नकळत या ओठात.
असे पारद पाखरू
बसे मनाच्या खोप्यात
याद तुझी असे सख्या
मुक्त मुक या ह्रुदयात.

— रचना : अनुपमा मुंजे. नागपूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800