Homeलेख"अधिकमास : आधुनिक दृष्टिकोन" - २

“अधिकमास : आधुनिक दृष्टिकोन” – २

“मत्स्य अवतार – दिवस एक ते तीन”

पृथ्वीवर जीवनाची सुरुवात कुठे झाली? समुद्रात सुमारे चार अब्ज वर्षांपूर्वी पाण्यात पहिले एक कोशिक जीव निर्माण झाले. मग त्याच्यापासून मासे विकसित झाले. मासा हा जलचर आहे. त्याचं आयुष्य, श्वास, अन्न सगळं पाण्यात. पाण्याबाहेर तो जगू शकत नाही. प्रसंगी प्रवाहाविरुद्ध पोहत राहतो पण पाणी सोडत नाही.

मत्स्यवतारात विष्णूंनी माशाचे रुप घेतले आणि प्रलय काळी मनू, सप्तर्षी आणि वेदांना एका नावेत बसवून वाचवले. प्रलयाच्या महाजालात ते तरंगत राहिले, बुडले नाहीत, टिकून राहिले.

सवयी बदलण्याचा यशस्वी प्रवास आणि प्रयत्न आपण सर्वांनीच कधी ना कधीतरी केलेला आहे. माझ्या बाबतीत तर, नवीन वर्ष सुरू झाले की अजूनही प्रयत्न चालू होतात.

सवय बदलण्याचे पहिले तीन दिवस म्हणजे प्रलय ! सगळे नवीन आहे, सगळं कठीण आहे, सगळं अनोळखी आहे . मेंदू ओरडतोय जुनंच बरं होतं, शरीर सहकार्य करत नाही आणि मन म्हणते उद्यापासून सुरू करू.

म्हणजेच वैज्ञानिक दृष्ट्या मेंदूतील Pre Frontal Cortex( विचार करणारा भाग) आणि Limbic System (सवयीचा भाग) यात जोरदार लढाई होते. पहिल्या तीन दिवसात सवयीचा भाग जोरात असतो.

या टप्प्यात एकच ध्येय ठेवायचे, टिकून राहा. माशासारखं तरंगत रहा, बुडू नका. मोठे टार्गेट्स नकोत. परफेक्ट असायची गरज नाही. जर व्यायाम सुरू केलाय तर पहिल्या तीन दिवसात फक्त पाच मिनिटे चाललात तरी पुरे.

“कूर्मावतार – दिवस चार ते सहा”

मासे पाण्यातच राहिले असते तर पृथ्वीवरील जीवन पुढे गेलं नसतं. काही माशांनी धाडस केलं, ते पाण्याबाहेर आले. त्यांना फुप्पुसे विकसित करावी लागली, पाय विकसित करावे लागले. ते उभयचर बनले. पाण्यातही राहू शकणारे आणि जमिनीवरही. कासव हे याचं उत्तम उदाहरण आहे.

कूर्मावतारात विष्णूंनी समुद्रमंथनाच्या वेळी पर्वताला खालून आधार दिला. ते स्थिर होते. हलले नाहीत. डगमगले नाहीत.

चौथा ते सहावा दिवस हा सवयीचा, फाउंडेशन बिल्डिंगचा काळ असतो. इथे मेंदूत नवीन न्यूरल पाथवेज तयार होऊ लागतात पण ते अजून कमजोर असतात.

या दिवशी आपण संक्रमणामध्ये (Transition) असतो. जुन्या सवयीतून नव्या सवयीकडे. कधी जुनी कडे ओढ वाटते तर कधी नवीकडे. या टप्प्यात स्थिरता आणली- जागा नक्की केली,रुटीन बनवली – रोज सकाळी सहा वाजता व्यायाम तडजोड नाही,असे ठरवले तर कूर्मा सारखे आपण स्थिर होतो.

वराह अवतार – सातवा ते दहावा दिवस

इथे उभयचरा पासून पूर्ण स्थलचर प्राणी विकसित झाले. वराह म्हणजे रान डुक्कर, हा जमिनीवर राहणारा सस्तन प्राणी आहे. तो जमिनीत खणतो. खोलवर जातो. मूळ शोधतो.

वराहतारात विष्णूंनी पृथ्वीला पाताळातून वर काढली. त्याच्यासाठी त्यांना समुद्राच्या तळाशी जावं लागल.

सवय बदलण्याच्या प्रवासात सातव्या ते दहाव्या दिवसात आपल्याला पण तेच करावे लागते किंवा सगळे करतात. मी हे का करते आहे ? Why हे शोधणे. फक्त नवीन वर्ष संकल्प म्हणून करते आहे का खरंच मला याची गरज आहे.

आमच्या एका स्नेह्याचे काही वर्षांपूर्वी खूप वजन वाढलं होतं. डॉक्टर म्हणाले, व्यायाम करा नाहीतर डायबिटीस होईल. पहिले सहा दिवस कसेबसे गेले. सातव्या दिवशी मन म्हणाले देउ या आज सोडून, आज कंपनीचे खूप काम आहे. त्या रात्री त्यांची बारा वर्षांची मुलगी म्हणाली, “बाबा तुम्ही माझ्या लग्नात नाचाल ना ?” त्या एका वाक्याने त्यांना त्यांचं Why ‘का’ करायचं हे सापडले आणि दुसऱ्या दिवसापासून त्यांनी कधीच आपला मॉर्निंग वॉक सोडला नाही.

नरसिंह अवतार – दिवस 11 ते 15

उत्क्रांतीच्या या काळात सस्तन प्राण्यांपासून वानर विकसित झाले आणि त्यापासून आदिमानव. नरसिंह म्हणजे अर्ध मानव अर्धसिंह. प्राणी आणि मानव या मधला टप्पा.

नरसिंह अवतारात हिरण्यकश्यपूचा वध झाला. हिरण्यकश्यपू म्हणजे अहंकार, मोह, तात्काळ सुखाची ओढ.

सवय बदलण्याच्या टप्प्यातला हा सर्वात कठीण टप्पा. अकराव्या ते पंधराव्या दिवशी आपल्या आत मधला हिरण्यकश्यपू सर्वात जोरात बाहेर येतो. आज सोडू, उद्या करू, एक दिवसाने काय फरक पडतो ? अशी कारणे सुरू होतात.
Stanford University च्या Marshmallow प्रयोगामध्ये, मुलांच्या समोर Marshmallow ठेवले व त्यांना सांगितले की, पंधरा मिनिटे तुम्ही थांबलात तर अजून Marshmallows खायला मिळतील. फक्त पंधरा मिनिटं तुम्ही हे खाऊ नका. जी मुलं पंधरा मिनिटे थांबू शकली, ती पुढे आयुष्यात खूप यशस्वी झाली असे दिसून आले. जे तात्काळ सुख सोडून दीर्घकालीत फायद्यासाठी थांबतात, ते जिंकतात. त्यामुळे आपला ‘नरसिंह मोमेंट’ आला हे ओळखून आतल्या मोह (Temptations ) रुपी हिरण्यकश्यपूला आपल्याला हरवायचे असते.
क्रमश:

— लेखन : ऋचा कुलकर्णी. सिंगापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +919869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments