Homeबातम्याअरणगाव : 2 हजार वृक्षांचे रोपण !

अरणगाव : 2 हजार वृक्षांचे रोपण !

जगप्रसिध्द अवतार मेहेरबाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अहिल्यानगर जवळील अरणगाव परिसरात अवतार मेहेरबाबा परपिच्युअल चॅरीटेबल ट्रस्ट च्या वतीने नुकतीच २००० झाडांची लागवड करण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष फरमरोज मिस्त्री यांनी दिली. या वृक्षारोपणात फळ झाडांबरोबरच औषधी वृक्षांचेही प्रमाण मोठे आहे.

याविषयी अधिक बोलताना मिस्री म्हणाले कि, १५ वर्षांपूर्वी कृषीतज्ञ तथा मेहेरबाबांचे भक्त दादी केरावाला यांच्या संकल्पनेतुन आम्ही वृक्ष लागवडीचा हा स्तुत्य उपक्रम सुरू केला.

हा उपक्रम सर्व ट्रस्टी अग्रक्रमाने सातत्याने राबवित असुन आज १५० एकर ट्रस्टच्या जागेवर सुमारे ७० ते ७५ हजार वृक्ष डौलाने उभी आहेत. यात निवासी जागेचाही समावेश आहे. अनेक अडचणीच्या, पाणी टंचाईच्या वेळी या वृक्षांना टँकरद्वारे देखील पाणी देऊन ती जगवली आहेत. यात विविध देशातुन, राज्य, प्रांतातुन येणाऱ्या भक्तांचा सहभाग मोलाचा असतो. ट्रस्टी – मेहेरनाथ कलचुरी, रमेश जंगले, डॉली केरावाला, प्रसाद राजु, अमृतदारा इराणी, गोपीकाला, योहान नोबल, राखी शर्मा यांचे चांगले मार्गदर्शन व रोटरी क्लबचे राकेश गागरे, नितीन थाडे व सर्व पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे.

फरमरोज मिस्त्री

यंदाच्या या वृक्ष लागवडीच्या उपक्रमाबद्दल बोलताना बाबांचे हैद्राबाद येथील अनुयायी इंजि. राजेंद्र मेहेर म्हणाले कि, रस्त्यावरील मेहेरबाबा सेंटर पाशी २०० नारळाची व २०० आंब्यांच्या विविध प्रजातींची झाडे लावण्यात आली आहेत. या वृक्ष लागवडीसाठी वाशिम, वर्धा, अमरावती येथील मेहेरबाबा सेंटरचे भक्त मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.

४ दिवसांच्या वास्तव्यात त्यांनी वृक्षारोपणासाठी सर्वतोपरी सहकार्य केले. पहाटे ५ वाजल्यापासुन दुपारी विश्रांतीची वेळ सोडता त्यांनी वृक्ष लागवड पूर्ण केली.या वृक्षांसाठी जवळच एक कृत्रिम पाण्याच्या साठवण तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. या वृक्षांचे संरक्षण व संवर्धन उत्तम व्हावे यासाठी कुंपण लावण्यात आल्याचे ते म्हणाले. राहिलेल्या वृक्षांची लागवड थोड़ा पाऊस सुरू झाल्यावर केली जाईल. कारण सद्या उन्हाळा कडक आहे असेही मेहेर म्हणाले.

भक्तांनी अरणगाव सेंटरला भेट देऊन समक्ष अनुभव घ्यावा, येथील प्रसन्नता अनुभवावी असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

— लेखन – छायाचित्रण : अनिल शाह. नगर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments