Homeबातम्याअशी रंगली विद्यार्थ्यांची धोंडा पार्टी !

अशी रंगली विद्यार्थ्यांची धोंडा पार्टी !

पुणे जिल्ह्य़ातील आळे येथील ज्ञानमंदिर हायस्कूलच्या १९७९ सालच्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या व्दितीय स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेली “धोंडा पार्टी” सर्व उपस्थितांना अविस्मरणीय अनुभव देऊन गेली.

उकडीचे धोंडे, पूरण पोळी, गोड गोड आमरस, गावठी तूप, चटकदार सार, भात, कांदाभजी आणि पापड अशा मिष्टांन्नाचा आस्वाद ४५ माजी विद्यार्थ्यांचीनी घेतला.

या माजी विद्यार्थ्यांचे पहिले स्नेहसंमेलन गेल्या वर्षी १ जूनला संपन्न झाले होते. तर या वर्षीचे संमेलन ५ जून रोजी आयोजित करण्यात आले होते. योगायोग म्हणजे भगवान विष्णूला समर्पित असलेला अधिक मास सध्या सुरु आहे. याचे औचित्य साधून या दहावीच्या बॅचशी प्रथमपासून जोडले गेलेले शाळेचे अध्यक्ष नेतादादा डोके, साईलिलाचे संचालक मुन्नाशेठ कुऱ्हाडे यांनी ही धोंडा पार्टी आयोजित केली होती.

“असा असतो धोंडा”
धोंडा हा मराठमोळा पदार्थ आहे. तो पुरण भरुन तयार केला जातो. या पुरणात वेलची, जायफळ, गुळ घातलेले असते. हे पुरण छोटी पुरी लाटून त्यात भरले जाते. चोहोबाजूंनी दुमडून त्याला गोल धोंड्यासारखा, दगडासारखा आकार येतो. या नंतर एका पातेल्यात पाणी टाकून त्यावर भाताच्या, साळीच्या काड्या गवत टाकून त्यावर हे धोंडे ठेवून पातेल्यावर झाकन टाकून उकडले जातात. हे गरमागरमा धोंडे जावई बापुंना वाढले जातात. हे धोंडे गोल दगडासारखे होतात म्हणून या पदार्थास आपल्या पूर्वजांनी धोंडा हे नाव दिलेले असावे. हे धोंडे तीन वर्षांतून एकदाच फक्त अधिक मासात आस्वाद घेण्यासाठी घरोघरी होतात.

माजी विद्यार्थ्याची पार्टी, तरुणांची पार्टी असे शब्द हल्ली पालकांना ऐकू आले की त्यांच्या छातीत धस्स होते. पणआपली संस्कृती, आपले मराठमोळे खाद्यपदार्थ, आपल्या संस्कृतीची मूल्ये विसरु नका. असा संदेश या धोंडा पार्टीतून महाविद्यालयीन तरुणांपर्यत पोहचला आहे.

या स्नेहसंमेलनास ज्ञानमंदिर हायस्कूलचे निवृत्त शिक्षक गंगाराम गुंजाळ सर यांनी प्रत्यक्ष तर याच हायस्कूलचे इंग्रजीचे प्रख्यात निवृत्त शिक्षक यशवंत माळी यांनी मोबाईलवरून लक्षवेधी भाषण करुन माजी विद्यार्थ्यांची मने जिंकली.
अशीच संमेलने यापुढेही तुम्ही विद्यार्थी आयोजित करीत जा. यामुळे तुमच्यातील गोडवा वाढेल. तुम्ही गुण्या गोविंदाने राहाल, असे प्रतिपादन गंगाराम गुंजाळ सर यांनी केले.

“तुम्ही तुमचेच शिल्पकार” – माळी सर
सोने आगीतून निघाले की ते अधिक तेजस्वी होते. तद्वत आपण सर्व माजी विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षण, नोकरी, व्यवसाय यशस्वीपणे करुन उजळून निघाला आहात. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार झालात याचा मला मनस्वी आनंद आहे असे प्रतिपादन यशवंत माळी सर यांनी केले.

“एरंडे सर यांचा शुभ संदेश”
प्रकृती बरी नसल्यामुळे याच हायस्कूलचे निवृत्त प्रा.मधुकर एरंडे सर हे या संमेलनास उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र त्यांनी बेडवर बसून मोबाइलवर स्वतःच टाइप केलेला हृदयस्पर्शी शुभ संदेश आपल्या या विद्यार्थ्यांना व्हाट्सअपवर पाठवून विद्यार्थ्यांची मने जिंकली.

“दिवंगत वर्गमित्रांना श्रध्दांजली”
दहावी १९७९ च्या बॅचचे माजी विद्यार्थी जालिंदर निवृत्ती जाधव यांचे अलिकडेच निधन झाले. त्यांना आणि यापूर्वी देहावसान झालेले या बॅचचे सर्व दिवंगत माजी विद्यार्थी, दिवंगत निवृत्त शिक्षकांना सर्वांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

“विलास बनकर, होणाजी गुंजाळ यांचा सत्कार”
माजी विद्यार्थी गिर्यारोहक विलासराव बनकर यांनी यशस्वीपणे जगातील सर्वात उंच असलेल्या माऊंट एव्हरेस्ट बेस अर्थात पायथ्यापर्यंतचे गिर्यारोहण मे महिन्यात यशस्वीपणे पूर्ण केले. तसेच त्यांनी यापूर्वी १०८ वेळा त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरीची परिक्रमा पूर्ण केली. तर होणाजी गुंजाळ यांनी नर्मदा परिक्रमा यशस्वीपणे केली. याबद्दल या दोन माजी विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी नेताजीदादा डोके यांच्या हस्ते करण्यात आला.

“सांस्कृतिक कार्यक्रम”
या स्नेहसंमेलनात माजी विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमही झाला. यात रोजच्या धावपळीच्या जीवनात त्रिकाल संध्या नित्यनेमाने करणे आवश्यक असल्याचे सोपानराव तितर यांनी उत्तमरीत्या विशद केले. याशिवाय त्यांनी गुजराती भावगीत “मारा जीवनने अर्चन बनावो” (जीवन एक वरदान बनवा) सादर करीत स्नेहसंमेलनात धमाल उडवून दिली. गिर्यारोहक विलासराव बनकर यांनी माऊंट एव्हरेस्ट बेसची सफर मोजक्या शब्दात वर्णन केली. ह.भ.प. बाळकृष्ण कुऱ्हाडे, संजय शहा, सुरेश राहिंज सर यांनी आपल्या जीवनात आलेल्या अनुभवांचे कथन केले. तर सुरेखा गणोरे काळे यांनी स्वरचित दोन कविता आपल्या मंजुळ आवाजात सादर करुन वाहव्वा मिळवली. इतरही माजी विद्यार्थ्यांनी यावेळी विविध हिंदी, मराठी गीते सादर करुन या रंगत आणली. या स्नेहसंमेलनाची सांगता सुग्रास धोंडा पार्टीने झाली.

या स्नेहसंमेलनास विलासराव बनकर, सोपानराव तितर, सुरेश राहींज सर , पांडुरंग गडगे सर , शिवाजी भुजबळ, रवी गुंजाळ, ज्ञानेश्वर शिंदे, रवींद्र वाघोले सर, रमेश फणसे सर, नाथा बामणे, वसंत पिंगळे, मंगल व-हाडी, मीना डोके, सुरेखा गणोरे – काळे, साधना अंगरकर- वाव्हळ, मीनाक्षी पाठक- मिसर, शरद जाधव, विलास जाधव, राजेंद्र गुंजाळ, मी स्वतः (पत्रकार नारायण जाधव) अशोक डावखर, अ‍ॅड मनोहर जोशी, संजय शहा, होणाजी गुंजाळ, ह.भ.प. बाळकृष्ण कुऱ्हाडे, पुरुषोत्तम साबळे, संजय जाधव सर, देवीदास वेल्हाळ, संजय कुऱ्हाडे आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.

— लेखन : नारायण जाधव. मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments