Homeबातम्यामुंबई : विज्ञान कथा दिन साजरा

मुंबई : विज्ञान कथा दिन साजरा

राष्ट्रीय विज्ञान कथा दिनाच्या निमित्ताने ‘मुंबई मराठी साहित्य संघ’, ‘मराठी विज्ञान परिषद’, चुनाभट्टी आणि ‘आर्यन एज्युकेशन सोसायटीचे हायस्कूल’, गिरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आय.सी.एस.ई बोर्डातील इयत्ता दहावीच्या परीक्षेत भारतातून पहिला क्रमांक मिळवणारा, राष्ट्रीय व जागतिक पातळीवरच्या विज्ञान व गणित ऑलिम्पियाड स्पर्धांमध्ये अनेक सुवर्णपदके मिळवलेल्या सतरा वर्षाच्या परम भयवाल याची प्रमुख उपस्थिती ही या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली.

यावेळी परम ने ‘भविष्यवेध ए.आय.’ ही स्वरचित अतिशय रंजक विज्ञान कथा उत्तमरीत्या सादर केली. त्याच बरोबर त्याने ऑलिंपियाडच्या तयारीपासून ते त्याला मिळालेल्या सुवर्ण पदकांसाठीच्या अभ्यासाविषयी उत्तम माहिती देऊन शालेय विद्यार्थ्यांनी ऑलिंपियाडकडे का वळावे, त्याचा आयुष्यात शैक्षणिक क्षेत्रातील उत्तुंग कामगिरीसाठी, स्पर्धा परीक्षांसाठी आणि इतर क्षेत्रातील प्रगतीसाठी कसा उपयोग होतो, याविषयी मार्गदर्शन केले. ऑलिम्पियाडच्या प्रवेशांच्या तारखांपासून ते त्याच्या अभ्यासाची पुस्तके कुठून मिळवायची इथपर्यंत प्रत्येक माहिती देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.

मराठी विज्ञान परिषद तर्फे आलेल्या प्रा. माणिक टेंबे यांनी गणिताच्या गमतीजमती प्रत्यक्ष कागदांद्वारे साकारून दाखवल्या तसेच त्या मागचे ज्ञान, कौशल्य आणि शास्त्र याचीशी ओळख करून दिली.

यावेळी मुंबई मराठी साहित्य संघाच्या साहित्य शाखा कार्यवाह प्रा. प्रतिभा सराफ यांनी राष्ट्रीय विज्ञान कथादिनाबद्दल सविस्तर माहिती देताना सांगीतले की “महान भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर सी. व्ही. रमण यांनी २८ फेब्रुवारी १९२८ लावलेल्या ‘रामन इफेक्ट’ या शोधासाठी त्यांना नोबल पारितोषिक प्राप्त झाले. विज्ञानाचे महत्त्व तसेच वैज्ञानिक संशोधनाला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने १९८७ पासून ‘२८ फेब्रुवारी’ हा दिवस, ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. तर मराठी विज्ञान साहित्याला समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ व लेखक डॉ. जयंत नारळीकर यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून मराठी विज्ञान कथा लेखनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मराठी विज्ञान परिषदेने सन २०२२ पासून १९ जुलै रोजी ‘राष्ट्रीय विज्ञान कथा दिन’ म्हणुन साजरा करण्यास सुरुवात केली.”

शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वंदना नागरगोजे यांनी प्रास्ताविक केले. आयर्न एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलचे अध्यक्ष श्री. अमोद उसपकर यांच्या हस्ते पुस्तकभेट आणि स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी मुंबई मराठी साहित्य संघाचे मुखपत्र त्रैमासिक साहित्य (जुलै- ऑगस्ट- सप्टेंबर) ‘विज्ञानदिन विशेषांकाचे प्रकाशन संपन्न झाले. श्री चंद्रशेखर गोखले यांनी उत्कृष्ट संपादन केलेल्या या अंकात, डॉ. बाळ फोंडके, मेघश्री दळवी, स्मिता पोतनीस, श्रीराम बापट, गजानन परब आदी लेखकांसहित दहा विज्ञान लेखकांच्या कथा समाविष्ट केलेल्या आहेत.

याप्रसंगी मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्याध्यक्ष डॉ. उज्ज्वला मेहेंदळे यांनी विज्ञान कथा विशेषाकांच्या काही कथांचा परामर्श घेत अभ्यासपूर्ण विवेचन केले. विद्यार्थ्यांनी या कथा आपल्या पालकांकडून, शिक्षकांकडून समजून घ्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

श्रीमती शोभा बोडके यांनी कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन केले.

या संपूर्ण कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments