Homeलेखजीवन म्हणजे काय ? - 20

जीवन म्हणजे काय ? – 20

“मानस मुद्रा”

जीवनरुपी या अथांग सागरात आयुष्याच्या प्रवासात जन्मापासून मृत्यूपर्यंत केलेल्या चांगल्या वाईट कर्माची गोळाबेरीज हीच माणसाच्या आयुष्याची खरी किंमत असते. पण हे तत्वज्ञान आपण जगताना कुठेतरी विसरून जातो व अहमपणामुळे किंवा दूर्गुणामुळे स्वतःचीच किंमत स्वतः शून्य करून बसतो, नाही का ?

खरंच जो सकारात्मक जगतो, त्याच दृष्टीने जग बघतो तोच यशस्वी होतो. जीवन हे एक कोरे पान आहे. त्यावर सूर्योदय रेखाटायचा की सूर्यास्त रेखाटायचा हे मात्र आपल्या कल्पनाशक्तीवर अवलंबून असते. काहीही रेखाटले तरी ते उत्तम प्रतीचे व्हावे यासाठी मात्र त्याला दक्षता व प्रयत्न करावाच लागतो. त्यात यथा योग्य रंग भरावाच लागतो.
तात्पर्य सुख असो वा दुःख त्यावर मात करून ते आनंदाने स्वीकारणे हा खरा मनुष्यधर्म आहे.

सुख कुणाला नको असते ? पण त्या मागून दुःखाचं वारं सुद्धा अंगाला लागेलच हे आपण विसरू नये. ज्या क्षणाला सुखाची अनुभूती मिळते त्या क्षणी ते क्षण अधाशासारखे गिळून मनसोक्त आनंद लुटावा याशिवाय आपल्या हाती काय बरे असते ? खरंच, सकाळ ते संध्याकाळपर्यंत उठल्यापासून आपण सुख समाधान शोधण्याच्या प्रयत्नात असतो.

त्यानुसार आयुष्यभर आपण जीवापाड श्रम करतो. बऱ्याच प्रमाणात भौतिक सुखे मिळवतो देखील. ही सर्व सुखे पारा गोळा करावा आणि गोळा करताच तो हातातून निसटून जावा अशा स्वरुपाची असतात. वास्तविक खरे सुख आपल्या अंतर्यामीच असते. परंतु अज्ञानामुळे आपण ते उगाच इकडे तिकडे शोधत असतो. कस्तुरीचा सुगंध शोधण्यासाठी हरिण संपूर्ण रानोमाळ फिरते. फिरल्यानंतर अतिशय थकल्यामुळे ते एका जागी शांतपणे पहुडते व नंतर त्यास कळते, अरे ! ज्या सुगंधासाठी आपण वणवण फिरलो, तो कस्तुरी सुगंध तर आपल्याच नाभीतूनच येत आहे. आहे ना ! खरंच, आपलंही तसेच. हिऱ्याची खाण आपल्याजवळ असते पण आपण काचेचे मणी शोधत बसतो. असे असते सुख, ते कशातही नसते, असते ते समाधानात, आहे त्या परिस्थितीला सामोरे जाण्यात, त्यातून मिळालेल्या आनंदातच ते असते, हो ना ?

खरंच,जीवन हे स्वतःसाठी जगण्यात, स्वतःच्या विश्वात रमण्यासाठी असतं का ? किंवा तसे जगणारे खरे जीवन जगतात का ? कारण दुसऱ्याकडून काही घेतले तर त्याला आपल्याला काही तरी द्यावे लागेल, किंवा आपल्याला दुसऱ्याकडून काही हवे असेल किंवा अपेक्षा असेल तर आपल्याला काही तरी त्याला द्यावे लागेल हा सृष्टीचा नियम आहे.

आपण जे घेतो त्यातून स्वतःचे आयुष्य जगतो व जे दुसऱ्यांना देतो त्यातून आपण दुसऱ्यांचे जीवन बनवितो. त्यामुळे हे आपल्यावर अवलंबून आहे की स्वतःचे आयुष्य जगण्यात अर्थ आहे की दुसऱ्यांचे हे जीवन बनविण्याचे आपले कर्तव्य आहे.? या कर्तव्याची भावना, जाणीव असणे किंवा ते कर्तव्य पार पाडणे म्हणजेच जीवनाचे सार्थक होय,असे मला वाटते.

मनुष्य जीवनाची व्याख्या तीन काळातून कशी होईल बघा,
“गत आयुष्याबद्दल- अलिप्तता असणे.
वर्तमानाबद्दल- जागरूकता असणे. व
भविष्याबद्दल – स्वप्नमयी असणे”.
या तिन्ही अवस्थेतून खरे जीवन जगता येईल. जीवनाचेही पैलू अनेक असतात. कधी मनमोहक, तर कधी रुक्ष, कधी काट्याहुनही बोचट, तर कधी वसंतातला बहार असतो. तसे प्रत्येक क्षण उपभोक्ताना, आपल्यावरही अवलंबून असते की तो क्षण नंदनवन बनवायचा की रुक्ष वाळवंट.

तसे तर सुगंध देणाऱ्या गुलाबालाही काटे असतात, त्याची तमा बाळगायची नसते. अंगावर काटे असूनही तो आपल्याला अविरत प्रफुल्लित व टवटवीत दिसतो. तसेच आपले जीवन अनेक दुःखे असली तरी, स्वतःच्या आत्मबलाने, आत्मविश्वासाने यशस्वी होऊन सदा टवटवीत ठेवावे.

चांगले पेरले तर चांगलेच उगवते.चांगला विचार केल्यास आपल्या हातून चांगलेच कर्म होईल. फक्त स्वतःच्या मनाशी, कार्याशी प्रामाणिक असणे आवश्यक आहे. स्वतःच्या ध्येयाशी, कर्तव्याशी एकनिष्ठ असणे व त्याच मार्गाने कृती करणे हा गुण प्रत्येकाने अंगी बाळगला तर अपयश कधीच कुणाच्या जवळ जाणार नाही आणि हे सर्व साध्य शेवटी स्वतःच्या परिश्रमावरच अवलंबून राहील. असाध्य उद्दिष्टही सफल करण्यासाठी आत्मविश्वास व बुद्धिचातुर्य कष्टाचीच गरज भासते. मग साध्यत्वाच्या दृष्टिकोनातून स्वप्नांची परिपूर्णता करणे हे त्याच्या कर्तुत्वावर व शेवटी थोड्याफार प्रमाणात प्रारब्धावर विसंबून असते.
“मनी वसे ते स्वप्नी दिसे” यापेक्षा “स्वप्नी दिसे ते कृतीत ठसे” म्हणून त्याने सार्थ करावी.

फक्त स्वतःसाठी जगण्यापेक्षा दुसऱ्याला फुलविणारया आनंदाची मजा काही निराळीच असते. त्यासाठी निसर्गाची शिकवणच त्याला योग्य दिशा देईल. जसे नदी वाहून वाहून सागराला मिळते, थकलेल्या वाटसरूंना वृक्ष छाया देतो, फुलांनी आसमंत दरवळतो, तर मुके प्राणी मनुष्याहुनही प्रामाणिक असतात.

मानवी जन्माच्या पुण्याई चे फळ एकदाच मिळते मग त्याचा पुरेपूर त्याने आस्वाद, फायदा घ्यायला हवा. त्यासाठी डोंगराएवढे दुःख पचवून चिमूटभर मिळालेल्या सुखातही कुणीतरी भागीदार मिळवून वाटत वाटत स्वतःसोबत इतरांनाही त्या सुखाचा आनंद दिल्यावर, त्याच्या हास्यातून, समाधानातून जेवढे सुख मिळते ते त्या सुखापेक्षा ही कितीतरी पटीने जास्त असते.

प्रत्येकाजवळ कुठली ना कुठली कला असते किंचित का होईना त्याचे ज्ञानही असते. कुणाजवळ नृत्यकला, तर कुणाजवळ संगीत असते, चित्रकला, साहित्य, पाककला व इतर कलेतून माणसाला जीवन आनंदी बनवण्याचे एक साधन मिळते. जीवनात यशस्वी होण्याची आशा यातून फुलते. परमानंदाची अनुभूती यातून मिळते. स्वतःचे कर्तृत्व, अस्तित्व यातून आपण त्रयस्थ व्यक्तीला दाखवू शकतो.
“एकतरी असावी अंगी कला
नाही तर काय तुझ्या जन्माला”

हे मात्र खरेच म्हणता येईल. कारण त्यातूनच आपण आपली ओळख, स्वतःची प्रतिमा इतरांना जगासमोर दाखवू शकतो. नाहीतर चार काटक्यांनी बांधलेल्या घरात संसार करण्याची बुद्धी तर कुत्रे मांजरे जनावरांना सुद्धा देवांनी दिली पण प्राणी मात्रातुन कलेची देणगी फक्त परमेश्वराने माणसाला दिली. मग त्या देणगीचा उपयोग करून प्रत्येकाने आपले जीवन आनंदी करावे, यशस्वी करावे. इतरांपेक्षा वेगळे भासवून स्वतःची एक क्षमता किंवा आदर्श व्यक्तिमत्व या कलेतून बनविण्याची ही सुवर्णसंधीच म्हणावी लागेल नाही का ?

जगताना आपण असे जगायला हवे की कुठे आपल्या माणुसकीला डागही लावला जाऊ नये आणि हा कलंक फक्त “मी” पणा अंगात शिरला की लागतो.
“मी मी म्हणत जिणं जगायचं
माझे माझे म्हणून सुख ओरपायचं
यातच पूर्ण माणूसपणं हरवायचं
कारण सुख असतं दुसऱ्याचं
जिणं असतं स्वतःच”…
तुम्हालाही समजेल हे जगणं किती चुकीचे आहे जगाला हसवण्यासाठी स्वतःचं वैयक्तिक दुःखही विसरावं लागतं यासाठी सर्वसामान्य सर्कशीतला जोकर आपल्यासाठी का आदर्श असु नये ? जळून फुलायचं, झिजून कष्टायच, रडूनही हसायचं हे मात्र चिरंतन, शाश्वत टिकणार एक अदृश्य सत्य आहे.

यशस्वी जीवन जगण्यासाठी मनुष्याला प्रचंड आत्मविश्वास, अजोड धाडस, प्रबळ इच्छाशक्ती, मनाची संयमित, वेळेचा काटेकोरपणा, दुसऱ्यांशी सुसंगत स्वभाव, वेळेची मौलीकता, तीक्ष्ण मनू:चक्षु, भाषेत मितभाषीपणा, मुखात गोडवा, मनगटात ताकत, बुद्धिचातुर्य, नशीब, मनाची औदार्यता, सकारात्मक विचार शक्‍ती, मोठ्याप्रती आदरभावना, व विचारांची प्रगल्भता या सर्व भांडारातील काही मोती जरी आपण आपल्या आत्मबळावर पदरात टाकून घेऊ शकलो तर जग जिंकणे सुद्धा कुणाला अशक्य होणार नाही. म्हणून जग जिंकण्याच्या अभिलाषेत दुसऱ्यांचे मनही जिंकता यायला हवे.

जोपर्यंत अंतर्मन जागृत होत नाही तोपर्यंत विचारांची आकलनशक्ती ला जोर येत नाही व तो आचारला जात नाही. त्यामुळे दुसऱ्यांचा आधार बनण्याअगोदर स्वतः मजबूत असणे किंवा दुबळ्यांचा आधार बनण्यासाठी, स्वतःची शक्ती व मनगटात बळ आणणे आवश्यक ठरेल. तेव्हाच वटवृक्षा सारखे तटस्थ राहून इतर आजूबाजूच्या लतावेलीना आधार देवु शकू.

आपल्याही सर्वसामान्य जगण्यातून कुणीतरी असामान्य होऊ शकेल एवढे सामर्थ्य आपल्या कृतीत असू शकते.
“मनुष्य जन्मा आला, स्वतः सम जगला
झाले त्याचे जगणे, दुसऱ्यासाठी काय झिजला
व्यर्थ ते जीवन, काय अर्थ बोध घ्यावा
सांगणे एक उद्देश, जीवनाचे सार समजणे
त्याचे दुसरे नाव जगणे…

या सर्व जगण्याच्या तऱ्हा आपल्या प्रत्येकाला माहिती असतात, कळतात पण उमजत नाही. असं काहीतरी होतं. म्हणूनच म्हणतात, प्रत्येक चांगली गोष्ट आपल्या हातून घडावी, आपणच त्याचा श्रीगणेशा करावा. मग आदान-प्रदानातून ते पसरत जातं. आपले एक शब्द कुणाचे जीवन बनु शकते, नाही तर जीव घेणे ही ठरू शकते. विचार, आचार, उच्चार या तिन्हीचा सुसंगम असावा म्हणजे प्रवाह हा स्वच्छ व निथळ राहील. चुका तर सर्वांच्याच हातून होतात पण त्या सावरणे जास्त महत्वाचे असते.

तसेच प्रत्येक क्षमाशील असावा, म्हणजे दुसर्‍यांच्या चुका क्षम्य करता येईल.दुबळ्याचा आधार, दिशाभुलांना दिपस्तंभ असणारे कर्तुत्व घेऊन जगणेच खऱ्या अर्थाचे जगणे ठरेल. त्याग व समर्पणातच सर्व काही असतं. विचारांचे खतपाणी घालून आचारांचा एक वटवृक्ष होऊ शकतो. प्रत्येकाच्या जीवनात नियतीचा खेळ असतो आणि ते एक कटू का होईना पण सत्य असतं. मरण शाश्वत असतं ते सर्वांना येणारच. याची जाणीव ठेवूनच प्रत्येक कर्म करावी कारण
“मरतांना सर्व कर्म घेऊनी जातात,
बाकी सर्व कमवलेले खातरजमा होतात”.

केलेल्या सुकर्मावरच मुक्ती मिळते व प्रत्येकाला तेच हवे असते. या सर्व गोष्टी, जीवनाचे तत्वज्ञान मी आपणासमोर मांडू शकली व या सर्व गोष्टी गिळुन आत्मसात करण्यासाठी,जीवन सार्थकी करण्यासाठी मला व सर्वांना बुद्धी देवो.

या निमित्ताने मी माझ्या विचारांची उजळणी करू शकली व आपणा पर्यंत शेवटी ही माझी कविता लिहून या मानस मुद्रेचा शेवट करते. खरंच जीवनाचे सार्थक दुसऱ्यांसाठी देह झिजवण्यातच आहे. यातून मिळणाऱ्या स्वानंदाची गोडी अवीट आहे, त्यातून मिळणारे सुख काळाच्या अनंतापर्यंत टिकणारे चिरकाल आहे.
जीवनाचा अर्थ, समजला ज्याला
देह सार्थक करण्याची, जोपासली त्याने कला
माझे माझे करीत, आयुष्य संपविले
सारे मूल्यवान जीवन लालसातच गमविले
लक्ष चौसष्ठ यौन्या, करू नका व्यर्थ
सत्कारणी देह लावून, जीवन करा सार्थ…

— लेखन : शिल्पा तगलपल्लेवार गंपावार. केमन आयलँड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +91 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments