“तुकाराम मुंढे”
धडाकेबाज, प्रामाणिक आणि निर्भयपणे कर्तव्य बजाविणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांनी त्यांच्या जीवनात कशी झेप घेतली आहे, ते पाहणे नक्की प्रेरणादायी आहे. मुंढे सरांना “न्यूज स्टोरी टुडे” परिवारातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
— संपादक
घरी शिक्षणाची काहीही पार्श्वभूमी नसताना श्री तुकाराम मुंढे यांनी मिळविलेले दैदीप्यमान यश हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील तरुण, तरुणींसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.

श्री तुकाराम मुंढे यांचा जन्म बीड जिल्ह्यातील ताडसोना या गावात ३ जून १९७५ रोजी एका शेतकरी कुटुंबात झाला. दहावी पर्यंतचे त्यांचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत तर महाविद्यालयीन शिक्षण छत्रपती संभाजीनगर येथे झाले. इतिहास, सामाजिक शास्त्र या विषयांमध्ये बीए तर राज्यशास्त्र विषयामध्ये ते एम ए झाले आहेत.
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर श्री तुकाराम मुंढे ह्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २००१ मध्ये राज्य सेवा परिक्षेद्वारे त्यांना राजपत्रित अधिकारी म्हणुन महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागात नोकरी मिळाली. ही नोकरी मिळाली तरी, त्यांचे मूळ ध्येय हे आय ए एस अधिकारी होण्याचेच होते. त्यामुळे आपल्या ध्येयापासून विचलित न होता, त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरूच ठेवला आणि या अभ्यासाचे फळ त्यांना 2005 साली आय ए एस साठी निवड होऊन मिळाले. या परीक्षेत ते भारतात विसावे आले. उच्च गुण मिळविल्याने त्यांना महाराष्ट्र केडर मिळाले.
मसूरी येथील लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमीतून प्रशिक्षण घेतल्यानंतर श्री तुकाराम मुंढे यांच्या सेवेची सुरवात सहायक जिल्हाधिकारी म्हणुन सोलापूरातून झाली. नंतर त्यांची नेमणूक धारणी या आदिवासी भागात प्रकल्प अधिकारी म्हणून झाली. पुढे ते जेव्हा २००८ मध्ये नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी झाले, तेव्हापासुन त्यांची चमकदार कामगिरी चर्चेचा विषय ठरत गेली. रुजू झाल्याच्या पहिल्याच दिवशी त्यांनी जिल्हा परिषदेच्या काही शाळांना अचानक भेटी देऊन गैरहजर असलेल्या शिक्षकांना तत्काळ निलंबित केले. त्यामुळे शिक्षकाचे १०-१२ टक्के असणारे गैरहजरीचे प्रमाण १-२ टक्क्यावर आले. जिल्हा परिषदेच्या काही वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनियमितता पाहून त्यांनी काही वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही निलंबित करण्याचे धाडस केले. तो पर्यंत असे धाडस कोणत्याही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने केल्याचा काही दाखला मिळत नाही.

नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणुन एका वर्षात धडाडीने केलेल्या कामगिरीबद्दल त्यांच्यासाठी नाशिक येथील आदिवासी आयुक्तालयात “अतिरिक्त आदिवासी आयुक्त” हे विशेष पद निर्माण करून त्यांना त्या पदावर नियुक्त करण्यात आले. तर मे २०१० मध्ये त्यांची बदली खादी व ग्रामोद्योग महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणुन मुंबईत करण्यात आली.
मुंढे साहेब, जातील तिथे कायमची छाप सोडतील, हे जणू काही एक समीकरणच होत गेले. जालना जिल्ह्य़ाचे जिल्हाधिकारी असताना त्यांनी जायकवाडी धरणातून जालन्याला पाणी आणण्याचे सहा वर्षापासून रखडलेले काम तीन महीन्यात करून दाखविले. पुढे २०११-१२ मध्ये सोलापूर जिल्ह्याचे ते जिल्हाधिकारी झाले. त्यांची ही कारकीर्द सुद्धा लक्षणीय ठरली. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या प्रशासनात लक्ष घालून त्यांनी काही आमूलाग्र बदल घडवून आणले.
त्यावेळी मुख्यमंत्री वगळता इतरांसाठी त्यांनी व्हीआयपी दर्शनाची पद्धत मोडीत काढली. पंढरपूर वारीसाठी १४-१५ लाख वारकरी येत असतात. त्यापैकी नाईलाजाने बहुतांश उघड्यावर शौचविधी करतात.त्यातून नदी प्रदूषित होते. शिवाय साथीच्या रोगांची भीती असते. हे सर्व टाळण्यासाठी त्यांनी अवघ्या २१ दिवसात तीन हजार शौचालयाची व्यवस्था केली. या शिवाय सोलापूर जिल्ह्य़ातील त्यांची कामगिरी म्हणजे जलयुक्त शिवार योजनेमध्ये त्यांनी २८२ गावातील कामांमध्ये त्यांनी लोक सहभाग घेतला. यात लोकांचे ५०-६० कोटींचे योगदान होते. फक्त १५० कोटी रूपयांमध्ये त्यांनी ही कामे केली. तसेच वर्षाला लागणार्या ४०० टँकरची संख्या ३०-४० वर आणली.

तुकाराम मुंढे यांची सप्टेंबर २०१२ मध्ये सोलापूर जिल्हाधिकारी पदावरून मुंबई येथे वस्तू व कर विभागाच्या सह आयुक्तपदी बदली झाली. या पदावर बदली झाल्यापासून त्यांनी अल्पावधीतच 143 कोटी रूपयांचा महसूल 500 कोटीवर नेऊन दाखविला.
मुंबई येथून त्यांची बदली नवी मुंबई महापालिका आयुक्तपदी झाली. मी स्वतः नवी मुंबईत रहात असल्याने त्यांच्या कामाची पद्धत जवळून पाहता आली. येथे त्यांनी राबविलेल्या, सकाळच्या वेळी ‘आयुक्तासोबत चाला आणि बोला’ हा उपक्रम नवी मुंबईकरांमध्ये खूपच लोकप्रिय झाला. नवी मुंबई महानगर पालिकेच्या अनेक बेशिस्त अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना त्यांनी निलंबित केले. तर अशी पाळी आपल्यावर येऊ नये म्हणून काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली.
मुंबई- पुणे – सातारा – कोल्हापूर- बंगलोर महामार्ग तसेच मुंबई- कोकण- गोवा महामार्ग हे नवी मुंबई शहरातून जातात. त्यामुळे या शहरात वाहनांची वर्दळ खूप असते. ही वाहतुक सुरळीत व्हावी म्हणून त्यांनी रस्त्याच्या बाजूला बसणारे फेरीवाले व अनधिकृत विक्रेते यांना अटकाव केला. यामुळे नागरिक सुखावले पण काही हित संबधित दुखावले. त्यामुळे त्यांची बदली करण्यात आली. पण त्यांची ही बदली टाळावी म्हणुन नवी मुंबईकर रस्त्यावर उतरले होते.
पुणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचे अध्यक्ष असताना तुकाराम मुंढे यांनी या सेवेची महिन्याला सहा लाख लोकांची असणारी प्रवासी संख्या नऊ लाखांवर नेली. पुणे परिवहन बस ही देशातील पहिली रियल टाइम इ -टिकीटींग बस म्हणून दावा करण्यास सज्ज झाली होती.
पुण्यानंतर तुकाराम मुंढे यांची बदली नाशिक महानगरपालिका आयुक्त म्हणुन झाली. इथे त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे लोकप्रतिनिधी आणि त्यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला. अखेर तिथून त्यांची बदली मुंबईत मंत्रालयात नियोजन विभागाच्या सहसचिवपदी करण्यात आली.
तुकाराम मुंढे यांनी कोरोना काळात नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली. तिथून त्यांची बदली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव म्हणून झाली.
पुढे दिव्यांग विभागाचे सचिव म्हणुन तुकाराम मुंढे यांनी अनेक बोगस दिव्यांग सरकारी कर्मचारी शोधून त्यांना नोकरीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. ही मोहीम खर्याखूर्या न्याय मिळवून देण्यासाठी महत्वाची ठरली.
तुकाराम मुंढे सध्या अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त म्हणून किती तडफदारपणे काम करीत आहेत, हे आपणास प्रसार माध्यमातुन कळत असल्यामुळे त्या कामगिरीची पुनरावृत्ती येथे टाळत आहे.

नुकतेच काही काळापूर्वी तुकाराम मुंढे यांच्या आईचे निधन झाले. पण पारंपारिक कर्मकांड न करता आईच्या नावे वृक्षारोपण करून त्यांनी आणि त्यांच्या परिवाराने एक नवा पायंडा पाडला आहे.
असे हे लोकाभिमुख, धडाडीने काम करणारे तुकाराम मुंढे शतायुषी होवोत, या त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा.
(काही संदर्भ : गुगल)

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
