Homeलेखडॉक्टरकी : दुसरी बाजू !

डॉक्टरकी : दुसरी बाजू !

राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या अहवालानुसार, भारतात गेल्या 5 वर्षात एमबीबीएस करणार्‍या 64 तर एमडी, एम एस करणार्‍या 58 अशा 122 विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्या आहेत. तर 1270 विद्यार्थी आणि विद्यार्थिनीनी हे अभ्यासक्रम मध्येच सोडून दिले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर वैद्यकीय क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे की, मुळात मला या क्षेत्राची आवड आहे का ? मी डॉक्टर का होऊ इच्छितो ? त्याच बरोबर पालकांनी देखील हा विचार केला पाहिजे की, माझ्या मुलाची, मुलीची डॉक्टर होण्याची खरच इच्छा आहे का ? अशा या सर्व बाबींचा विचार करणारा, स्वानुभवावर आधारित योग्य ते मार्गदर्शन करणारा हा लेख, आपल्याला नक्कीच मार्गदर्शन करणारा ठरेल, असा विश्वास वाटतो.
— संपादक

“स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली आपण मुलांना ध्येय देतोय की निर्णयपंगुत्व? ”मोठं स्वप्न असावंच; पण त्यासाठी आयुष्यातली मौल्यवान वर्षं, आनंद आणि स्वत्व गमावायचं का ? एमबीबीएस मिळालं नाही म्हणून आयुष्य संपत नाही; पण योग्य वेळी निर्णय न घेतल्यास आयुष्य अडकू शकतं. पर्याय उपलब्ध असतानाही ते न स्वीकारणं, हेही एक प्रकारचं अपयश ठरू शकतं.आणि मोठी पदवी मिळाल्यानंतरही माणूस, नाती आणि जगण्याचा ओलावा हरवत असेल, तर त्या यशाचा अर्थ काय ?

गेल्या तीन-चार वर्षांत परिचित कुटुंबांमधील अनेक मुलांचे NEET चे अनुभव जवळून पाहिले. कुणाला अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले, कुणाला अपेक्षित अभ्यासक्रम मिळाला नाही, कुणाला मिळालेला पर्याय स्वीकारता आला नाही, तर कुणी पुन्हा एक वर्ष देण्याचा निर्णय घेतला. परीक्षेतील अनिश्चितता, निकालाबाबतचा संभ्रम आणि फेरपरीक्षेच्या प्रकरणामुळे काही विद्यार्थ्यांना आलेले वाईट अनुभवही पाहायला मिळाले.

या सगळ्याकडे पाहताना मला केवळ परीक्षा, गुण किंवा प्रवेश यांचाच विचार करावासा वाटला नाही. या प्रक्रियेत मुलांच्या आयुष्यातील किती वर्षं, किती आनंद, किती ऊर्जा आणि किती मानसिक अवकाश खर्च होत आहे, हा प्रश्न अधिक महत्त्वाचा वाटू लागला. मी अनेक वर्षे BAMS मध्ये नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध महाविद्यालयांत जात असतो. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना एक गोष्ट वारंवार जाणवते, अनेकांनी NEET साठी आपल्या आयुष्यातील महत्त्वाची दोनतीन वर्षं दिलेली असतात. काहींनी एकापेक्षा अधिक प्रयत्न केलेले असतात. त्यांच्यापैकी अनेकांची वैद्यकीय क्षेत्रात जाण्याची इच्छा स्वतःची असते; पण काहींच्या बाबतीत ही इच्छा पालकांच्या अपेक्षा, सामाजिक प्रतिष्ठा, नातेवाईकांची तुलना आणि “डॉक्टरच व्हायचं” या आधीच आखून ठेवलेल्या चौकटीतून तयार झालेली दिसते.

ही धाव अनेकदा नववी-दहावीपासूनच सुरू होते.शाळा, ज्युनिअर कॉलेज, इंटिग्रेटेड क्लास, वेगळा क्लास, टेस्ट सिरीज, सततचं मूल्यमापन, रँक, टक्केवारी आणि इतर विद्यार्थ्यांशी तुलना—मुलांच्या दिवसातील जवळजवळ प्रत्येक तास आधीच नियोजित केलेला असतो.
खेळ, छंद, मित्रमैत्रिणी, कुटुंबासोबतचा निवांत वेळ, सण-समारंभ, प्रवास, वाचन किंवा केवळ काहीही न करता शांत बसणं या गोष्टी “वेळ वाया घालवणाऱ्या” समजल्या जातात. पण किशोरवयात खेळणं, भटकणं, मित्रांशी भांडणं, पुन्हा जुळवून घेणं, कधी जिंकणं, कधी हरणं, स्वतःचे छोटे निर्णय घेणं आणि त्यांच्या परिणामांना सामोरं जाणं हाही शिक्षणाचाच भाग आहे. शरीर, मन, सामाजिक कौशल्यं आणि व्यक्तिमत्त्व यांची वाढ फक्त पुस्तकांतून होत नाही.

पूर्वी वर्गात साठ टक्के मिळवणारी मुलंही असायची आणि नव्वद टक्के मिळवणारीही. साठ टक्के मिळवणारा प्रत्येक विद्यार्थी कमी बुद्धिमान होता, असं अजिबात नव्हतं.अनेकदा तो खेळत होता, मित्रांमध्ये मिसळत होता, चुका करत होता, शिक्षकांची बोलणी खात होता, विविध अनुभव घेत होता आणि हळूहळू स्वतःला ओळखत होता. त्याचा शैक्षणिक आलेख कदाचित परिपूर्ण नसेल; पण त्याचं जीवन अनेक अनुभवांनी भरलेलं असे.

आज मात्र आपल्या कानावर प्रामुख्याने नव्वद-पंच्याण्णव टक्के मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशकथा येतात. गुण महत्त्वाचे आहेत आणि मेहनतीचं कौतुकही व्हायलाच हवं.पण या यशकथांच्या सततच्या प्रकाशझोतात मध्यम कामगिरी करणारी मुलं अदृश्य होतात. त्याहून गंभीर बाब म्हणजे प्रत्येक मुलाने असामान्य यश मिळवलंच पाहिजे, अशी सामूहिक अपेक्षा तयार होते.मग यशाचा अर्थही अतिशय अरुंद होतो. वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळाला तरच यश. त्यातही MBBS मिळालं तरच खरं यश. ठरावीक महाविद्यालय मिळालं तरच समाधान.

बाकीचे पर्याय म्हणजे तडजोड, पराभव किंवा कमीपणा—अशी मानसिकता नकळत तयार होते.इथेच निर्णयपंगुत्व सुरू होतं. अपेक्षित पर्याय मिळाला नाही, पण उपलब्ध असलेला दुसरा चांगला मार्ग स्वीकारायचा की नाही?पुन्हा परीक्षा द्यायची की पुढे जायचं ? एक वर्ष द्यायचं की अभ्यासक्रम बदलायचा? याचा निर्णय अनेक विद्यार्थ्यांना घेता येत नाही.
“आता हा पर्याय घेतला आणि पुढे यापेक्षा चांगला पर्याय मिळाला असता तर ?” या एका विचारात महिने निघून जातात. यालाच FOBO — Fear of Better Option असं म्हणतात.

आपल्याकडे उपलब्ध असलेला योग्य पर्याय स्वीकारताना, भविष्यात कदाचित यापेक्षा अधिक चांगला पर्याय मिळेल या भीतीने निर्णय न घेणं. पर्यायांची संख्या वाढली की निवड सोपी होईल, असं आपल्याला वाटतं; पण प्रत्यक्षात अनेकदा उलट घडतं.प्रत्येक पर्यायाचे फायदे-तोटे तपासत राहण्यातच ऊर्जा खर्च होते. शेवटी निर्णय होत नाही किंवा घेतलेल्या निर्णयाबद्दल कायम शंका राहते. पुन्हा प्रयत्न करणं चुकीचं नाही.
एखाद्या विद्यार्थ्याची क्षमता, तयारी, मानसिक स्थैर्य आणि ध्येय स्पष्ट असेल, तर दुसरा प्रयत्न योग्य ठरू शकतो.
पण पुन्हा प्रयत्न करण्याचा निर्णय स्वतःच्या क्षमतेच्या प्रामाणिक आकलनातून आलेला आहे का, की मिळालेला निकाल स्वीकारता येत नाही म्हणून ?

▪️ मागील प्रयत्नात नेमकी कमतरता कुठे होती ?
▪️ गुणांमध्ये वास्तववादी सुधारणा शक्य आहे का ?
▪️ त्या वर्षाचा आर्थिक, मानसिक आणि सामाजिक खर्च विद्यार्थी व कुटुंबाला पेलणार आहे का?
▪️ पुन्हा प्रयत्न करण्याची इच्छा विद्यार्थ्याची आहे की पालकांची ?
हे प्रश्न शांतपणे विचारले गेले पाहिजेत. कारण वर्ष वाया जाणं म्हणजे केवळ दिनदर्शिकेतील बारा महिने नाहीत. त्या वर्षासोबत आत्मविश्वास, उत्साह, संबंध आणि मानसिक आरोग्य यांचाही प्रश्न जोडलेला असतो. अपयशाचं संपूर्ण खापर परिस्थिती, परीक्षा व्यवस्था, स्पर्धा, आरक्षण, प्रश्नपत्रिका किंवा इतर घटकांवर फोडणं काही काळ मनाला दिलासा देऊ शकतं.

यांपैकी काही घटक खरोखरच विद्यार्थ्यांच्या नियंत्रणाबाहेर असतात. व्यवस्था निर्दोष आहे, असंही म्हणता येणार नाही.पण परिस्थितीला दोष देऊन पुढचा निर्णय टाळला, तर त्यातून मार्ग निघत नाही. “माझ्याबाबतीत अन्याय झाला” या भावने सोबतच “आता माझ्या हातात काय आहे ?” हा प्रश्नही विचारावा लागतो.

मला वाटतं, कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेच्या तयारीपूर्वी केवळ शैक्षणिक पात्रता तपासून भागणार नाही.
विद्यार्थ्याची—
▪️ विषयातील रुची
▪️ आकलनक्षमता
▪️ स्मरणशक्ती आणि एकाग्रता
▪️ सातत्य
▪️ ताण सहन करण्याची ताकद
▪️ अनिश्चितता स्वीकारण्याची क्षमता
▪️ निर्णय घेण्याची शैली
▪️ त्या व्यवसायाच्या प्रत्यक्ष स्वरूपाशी जुळणारा स्वभाव
यांचंही मूल्यमापन व्हायला हवं.

“ब्रेन मॅपिंग” हा शब्द आकर्षक वाटतो; पण कोणतीही एक चाचणी मुलाचं भविष्य ठरवू शकत नाही.वैज्ञानिक aptitude assessment, psychometric testing, career counselling, विषयवार क्षमता विश्लेषण, अनुभवी शिक्षकांचं निरीक्षण आणि त्या क्षेत्रात प्रत्यक्ष काम करणाऱ्या व्यक्तींशी संवाद यांचा एकत्रित उपयोग अधिक योग्य ठरू शकतो.

अशा प्रक्रियेचा हेतू मुलाला एखाद्या क्षेत्रापासून परावृत्त करणं नसावा. उलट त्या क्षेत्रासाठी आवश्यक असलेली तयारी, वास्तव, स्पर्धा, मानसिक दबाव आणि पर्यायी मार्ग आधीच समजावून सांगणं हा असावा.

दोन ते चार वर्षं एका परीक्षेसाठी देण्यापूर्वी विद्यार्थ्याने स्वतःला काही प्रश्न विचारले पाहिजेत—
▪️ मला हे क्षेत्र खरंच आवडतं का ?
▪️ या व्यवसायातील दैनंदिन जीवन मला स्वीकारता येईल का ?
▪️ या मार्गात यश न मिळाल्यास माझे पर्याय कोणते ?
▪️ माझं स्वप्न खरंच माझं आहे की इतरांनी माझ्यासाठी ठरवलेलं आहे ?

पण प्रश्न इथेच संपत नाही. समजा मोठी पदवी मिळाली, अनेक वर्षांची मेहनत फळाला आली आणि विद्यार्थी डॉक्टर झाला. त्यानंतरही एक वेगळा दबाव सुरू होतो.शिक्षणासाठी झालेला खर्च, दिलेला वेळ, कुटुंबाच्या अपेक्षा, समाजातील प्रतिष्ठा, व्यावसायिक स्पर्धा आणि स्वतःला सिद्ध करण्याची घाई यांचा हिशेब मनात सुरू होतो. “आता एवढं गुंतवलं आहे, तर ठरावीक काळात भरपूर पैसा मिळायलाच हवा.” उत्तम उत्पन्न मिळवण्याची इच्छा चुकीची नाही. ज्ञान, कौशल्य आणि कष्ट यांची योग्य किंमत मिळालीच पाहिजे. आर्थिक स्थैर्य हेही जीवनातील महत्त्वाचं वास्तव आहे.

पण जेव्हा समोरचा रुग्ण माणूस न राहता आपल्या गुंतवणुकीचा परतावा मिळवण्याचं साधन बनतो, तेव्हा व्यावसायिकता आणि व्यापारीकरण यांच्यातील सीमारेषा धूसर होते.दहा-बारा तास काम करणं, अधिकाधिक रुग्ण पाहणं, मोठं क्लिनिक उभारणं, कर्ज फेडणं, प्रतिष्ठा मिळवणं आणि ठरावीक वयात आर्थिक ध्येय गाठणं—याला यशाची मापं मानली जातात.
पण त्या बदल्यात काय हरवतंय, याचा हिशेब फार कमी जण ठेवतात.
कुटुंबासोबतचा वेळ, मुलांशी संवाद, जोडीदारासोबतची निवांतता, मित्रांसोबतची मस्ती, स्वतःचे छंद, निसर्ग, शांत झोप आणि कुठलाही उद्देश नसलेला मोकळा वेळ — हे सगळं हळूहळू कमी होत जातं. कमाई वाढते; पण जगण्याची जागा कमी होते.
काही काळानंतर व्यक्ती बाहेरून यशस्वी दिसते; पण आतून थकलेली, चिडचिडी, एकाकी आणि भावनिकदृष्ट्या कोरडी झालेली असते.

मग प्रश्न पडतो—
“मी आयुष्य जगतोय की माझ्या शिक्षणाचा खर्च, कर्ज आणि अपेक्षांचे हप्ते भरतोय ? ”वैद्यकीय क्षेत्रात हा प्रश्न अधिक संवेदनशील आहे. कारण समोरचा रुग्ण केवळ “केस” नसतो. त्याच्या वेदना, भीती, आर्थिक मर्यादा, कुटुंब आणि आशा उपचाराचा भाग असतात.
ज्ञानासोबत संवेदनशीलता हरवली, तर पदवी मोठी राहते; पण वैद्यक लहान होतं.

म्हणूनच करिअर निवडताना केवळ “या क्षेत्रात किती कमाई आहे ?” हा प्रश्न विचारून भागणार नाही.
▪️ या कामासाठी मी किती वेळ देणार ?
▪️ या व्यवसायातील ताण मला पेलणार आहे का ?
▪️ माझ्या नात्यांना, शरीराला आणि मनाला किती जागा उरेल ?
▪️ मला प्रतिष्ठा हवी आहे, पैसा हवा आहे की अर्थपूर्ण जीवन ?
हे प्रश्नही स्वतःला विचारावे लागतील.

अर्थात, साधेपणाच्या नावाखाली महत्त्वाकांक्षा कमी करण्याचा किंवा मेहनतीला नकार देण्याचा हा विचार नाही. ध्येय मोठं असावं. त्यासाठी शिस्त, सातत्य आणि प्रयत्नही हवेत. पण ध्येयाच्या प्रेमात पडताना एका पदवीच्या प्रेमात अडकू नये. अपयश आलं तर जीवन थांबत नाही.आणि यश मिळालं तरी जीवन केवळ करिअरपुरतं मर्यादित होत नाही. कधी पुन्हा प्रयत्न करणं योग्य असतं. कधी उपलब्ध पर्याय स्वीकारणं शहाणपणाचं असतं.

कधी दिशा बदलणं पराभव नसून परिपक्वता असते आणि कधी “पुरेसं चांगलं” स्वीकारणं हाच सर्वात योग्य निर्णय ठरतो. “पालकांनी आपल्या मुलांच्या पंखांचा आकार न पाहता त्यांच्यासाठी आकाश ठरवू नये. ”डॉक्टर होणं प्रतिष्ठेचं आहे; पण आनंदी, संवेदनशील, सक्षम आणि स्वतःचे निर्णय घेणारा माणूस होणं त्याहून मोठं आहे !”
आपल्या मुलांनी उंच भरारी घ्यावी, ही इच्छा स्वाभाविक आहे. पण त्या भरारीत त्यांचं बालपण, तारुण्य, आरोग्य आणि मन हरवू नये, एवढी काळजी आपण घेतली पाहिजे. शेवटी परिपूर्ण पर्याय अस्तित्वात नसतो. परिपूर्णता ही परिस्थितीनुसार बदलते.

योग्य वेळी घेतलेला विचारपूर्वक निर्णय, त्यानंतर केलेली प्रामाणिक मेहनत आणि त्या प्रवासात जगलेलं समतोल जीवन—यातूनच समाधान मिळतं. पदवी मिळवण्यासाठी आयुष्यातील काही वर्षं खर्च करणं समजू शकतं; पण पदवी मिळाल्यानंतरही पूर्ण आयुष्य फक्त तिची किंमत वसूल करण्यात गेलं, तर त्या यशाचा अर्थ पुन्हा तपासण्याची वेळ आलेली असते.

“ध्येय गाठताना जीवन-प्रवासातला आनंद हरवू नये.” कारण “करिअर हा आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे — संपूर्ण आयुष्य नाही.”
तुम्हाला काय वाटते ? जरूर कळवा.

वैद्य प्रशांत वाघमारे

— लेखन : वैद्य प्रशांत वाघमारे. आयुर्वेदाचार्य, नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Vedvati Kulkarni on खरा डॉक्टर
सौ श्वेता चंद्रकांत गांधी on प्राणांचे झुंबर…
सौ श्वेता चंद्रकांत गांधी on आम्ही सिद्ध लेखिका : ठाणे, पुणे वृत्तांत
सौ श्वेता चंद्रकांत गांधी on सुभाषित विवेचन : 2
सौ श्वेता चंद्रकांत गांधी on शिक्षण : भारतीय मानसिकतेचा शोध