टोरोंटो : शुगर मेपलचे शहर
जुलै २०२६ मध्ये म्हणजे अगदी अलीकडेच माझी कॅनडा येथील टोरोंटो शहराला भेट देऊन झाली. गेली काही वर्ष, मी कॅनडा या देशाच्या ‘समर’ म्हणजे उन्हाळ्यात – जुलै, ऑगस्ट या महिन्यात दर वर्षी जाते. याचे कारण माझी मुलगी. ती तिथे स्थायिक झाल्यामुळे, मायेचा व्हिसा मला तिथे जाण्याचे गेट उघडून देतो. नाहीतर उष्ण प्रदेशात जन्मलेल्या आणि घाम गाळत मोठी झालेल्या मला आणि आता सिंगापूरसारख्या उष्ण देशात राहणाऱ्या माझ्या सारख्या स्त्रीला आठ महिने बर्फाळ प्रदेशात कसे बरे राहता येईल ? हा प्रश्न शारीरिक त्रासाचा नसून, मानसिक जडण घडणीचा आणि दृष्टिकोनाचा आहे.

असे आहे ना, सकाळ संध्याकाळ आणि मनात आले की चप्पल किंवा वॉकिंग शूज पायात सरकवून घराबाहेर पडण्याची मला सवय लागली आहे. कॅनडात इतकी थंडी असते की काही विचारू नका ! शिवाय बाहेर बघितले की हिवाळ्यात पांढरा शुभ्र भुरुभुरु उडणारा बर्फ. कापसासारखा दिसत असला तरी कापसासारखी ऊब काही देत नाही. चोहो बाजूनी दिसणारी गर्द झाडी, प्रचंड मोठे वृक्ष , पांढऱ्या शुभ्र बर्फाचे ब्लॅंकेट चोवीस तास पांघरून बसलेले दिसतात . सहज मनात विचार आला, की ह्यांची शुभ्र ब्लॅन्केटस, पांघरुणं कधी मळत कशी नाहीत ? नशीबवान आहेत. ठीक आहे. बसू दे निवांत त्या बापड्यांना ! मला थोडेच असे पांघरूण घेऊन बसून राहता येणार आहे ? त्यांना तसे बघून समाधान मानायचे असे ठरवले.
तर काय सांगत होते? मी उन्हाळ्यात कॅनडातील टोरोंटोत नुकतीच जुलै महिन्यात जाऊन आले. तर आजूबाजूची सृष्टी हिरवे कपडे पांघरायला लागली होती. या पूर्वी आले होते तर दूरवर नजर टाकावी तिथे शुभ्र रंगाची उधळण, बसक्या बुटक्या इमारती त्याही शुभ्र ब्लँकेट्स पांघरलेल्या. त्यांना बघून पवित्र, भक्तिमय वातावरणात आल्यासारखे वाटले होते. पण त्यावेळी वातावरण ढगाळलेले होते. आसमंत नि:शब्द. मधूनच झोंबणारा थंडगार वारा मला बाई झोपच यायला लागली. कसली तरी हुरहूर लागली आणि उगीचच निराश झाल्यासारखे वाटले. हे काय बाई भलतेच ? क्षणात मी सावरले. विचार करताना लक्षात आले, हा फक्त त्या वातावरणाचा परिणाम नसून, माझ्या मानसिकतेशी निगडित आहे.
कारण निसर्ग असा भेद कधीच करणार नाही. तो त्याच्या मनासारखा वागणार आणि त्याला पाहिजे तेच करणार. सर्वाना सारखं मुक्त हस्ताने देणार. मग मी मला वाटणारी अस्वस्थता, कारण नसताना आलेले नैराश्य बाजूला सारून, काहीतरी कारणं देऊन निष्क्रिय बसण्यापेक्षा, निसर्गाने निर्मिलेले टोरोंटो तील प्राणी, पक्षी आणि वृक्ष वल्लींची माहिती काढायला लागले आणि मग ते आश्चर्य घडले. टोरोंटोतील झाडे, पक्षी, प्राणी मला त्यांच्या विषयी ‘सत्य कथा’ सांगू लागली.
कॅनडात जी अनेक प्रकारची लहान, मोठी झाडं दिसतात ती हजारो वर्षांपासून तिथल्याच मातीत जन्मलेली आहेत. कॅनडा हा जगातील सर्वाधिक वनसंपत्ती असलेल्या देशांपैकी एक आहे. या देशाच्या सुमारे 38% भूभागावर जंगले आहेत. येथील जंगले वन्यजीव, हवामान नियंत्रण आणि लाकूड उद्योगासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. आश्चर्य आणि कौतुक करण्यासारखे म्हणजे स्थानिक कॅनेडियन लोकांनी आणि सरकारने सुद्धा झाडांची बेसुमार कत्तल न करता त्यांना संरक्षण दिलेले आहे. या झाडांची व्यवस्थित निगा राखली आहे. पद्धतशीरपणे झाडांना वेगवेगळी खतं देऊन त्यांना मुक्त वाढू दिले आहे.
आजचा हा लेख निसर्गाने सांगितलेल्या सत्य कथेवर आधारित आहे. ही कथा सर्वानी वाचावी आणि त्यानिमित्ताने आपल्या पर्यावरणाची आणि निसर्गाची काळजी घ्यावी असा त्यांचा निरोप आहे.
शुगर मेपल : –
या झाडाला हे नाव पडण्याचे मुख्य कारण म्हणजे त्याच्या रसापासून गोड मेपल सिरप बनवला जातो.
शुगर म्हणजे साखर / गोडवा 🍁
शुगर Maple म्हणजे मेपल झाडाचा प्रकार 🌳
वसंत ऋतूमध्ये या झाडाच्या खोडातून गोडसर रस (sap) मिळतो. हा रस उकळून त्यातील पाणी कमी केले की मेपल सिरप तयार होते. त्यामुळे त्याला Sugar Maple असे नाव मिळाले.

कॅनडाचे राष्ट्रीय प्रतीक असलेले हे झाड मला अतिशय आवडते. विशेषतः शरद ऋतूत हे लाल दिसते. नंतर केशरी आणि पिवळे दिसते. त्यातील तीन पानांसारखा दिसणारा आकार मला भावतो. इतकी रंग बदलणारी पाने मी पहिल्यांदा कॅनडा त पाहिली. या झाडाला कॅनडाचे राष्ट्रीय प्रतीक मानले जाते. माझ्या मुलीच्या लग्नात जे विशिष्ट प्रकारच्या काचेच्या बरण्या आम्ही पाहुण्यांना दिल्या त्यावर ह्या मेपल च्या झाडांची पाने एम्बॉस केली होती. ही पाने सौन्दर्य आणि संपन्नता यांचे प्रतीक आहे. याच झाडापासून प्रसिद्ध मेपल सिरप तयार केले जाते. कॅनडात फिरला असाल तर महत्त्वाच्या दुकानात मेपल सिरपच्या बाटल्या, डबे विकायला ठेवलेले दिसतात. या झाडाची पाने राष्ट्रीय ध्वजावर पाहताना अभिमान वाटतो.
यानंतर उत्तर कॅनडातील जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळणारे व्हाइट स्प्रूस या झाडाचा नंबर लागतो. याचा उपयोग कागद बनवण्यासाठी केला जातो. तर लाकूड बांधकामासाठी वापरले जाते.
ही झाडं थंड हवामानात चांगली वाढतात. रेड ओक, ब्लु स्प्रूस, ब्लॅक वॉलनट, व्हाईट पाईन अशी सरळसोट असणारी झाडं इथली मुख्य वनसंपदा आहे. यांची पाने निमुळती उतरती, कोकणातील कौलारू छपरासारखी. म्हणजे याच्यावर बर्फ साठणार नाही अशी निसर्गाने केलेली उपजत सोय. व्हाईट पाईन हे कॅनडातील सर्वात उंच स्थानिक वृक्षांपैकी एक आहे आणि लाकूड उद्योगात या झाडाचा मुख्य वापर होतो.
आपण लहानपणी भूगोलात शिकलेले जंगलाचे महत्त्व आता मला प्रकर्षाने आठवायला लागले. जंगलं ही हवेतील कार्बन डायॉक्साईड शोषून हवामान बदल कमी करण्यास मदत करतात. जंगलांमुळे हजारो वनस्पती, किडे, पशु , पक्षी जिवंत राहतात. लाकूड, कागद आणि इतर अनेक उत्पादनांसाठी जंगलांचा वापर होतो. ज्या राजाला जंगलांचे महत्त्व कळले आणि त्याने जंगलांना मानाने वाढवले त्याची जनता कायम सुखी, समाधानी राहणार हे नक्की. पूर्वी आपण अशी पुस्तक वाचत असू, की ज्यात काहीतरी शिकवणाऱ्या गोष्टी असत. उदा. एक आटपाट नगर होते. तिथली जनता सुखी समाधानी होती. याचे कारण राजाने आपल्या सर्व प्रजेला झाडं, जंगलं आणि पाणी वाचवायचे मार्ग शिकवले होते. प्रत्येकाने एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करावे अशी राजाने आज्ञा दिली होती. प्रजाही त्याच्या हुकुमाचे पालन करत असे. म्हणून ती सुखी समाधानी होती. कॅनडातील वनसंपदा पाहून मला त्या गोष्टीची आठवण झाली. जंगलांचे सुद्धा विविध प्रकार आहेत हे जंगलांचा अभ्यास करताना लक्षात येते. कॅनडामध्ये विविध प्रकारची जंगले आढळतात :
— बोरियल वन (Boreal Forest) – हा देशातील सर्वात मोठा वनप्रकार आहे.
— समशीतोष्ण वर्षावन (Temperate Rainforest) – ब्रिटिश कोलंबिया मध्ये स्थित आहे.
— पानझडी जंगले (Deciduous Forests) – विशेषतः दक्षिण ओंटारिओमध्ये आढळतात.
किती प्रकारची जंगलं ! यापैकी मला पानझडीची जंगलं माहित होती, पण इतर दोन प्रकार मात्र आता कळले. वृक्षवल्लीं सोबत प्राणी जिवाभावाने राहतात हे आपल्याला माहित असेलच. मी स्वतः याचा अनुभव घेतला आहे. मुलीच्या बॅक यार्डमध्ये ससे, खारी, स्कंक असे वेगवेगळे प्राणी रोज दिसत असत. त्यांना असे अंगणात बागडताना पाहून मला प्रचंड आनंद झाला. स्वतःचे अंगण असणे ही आनंदाची गोष्ट आहे असे मला वाटते. आणि आपल्या स्वतःच्या अंगणात सुंदर गोजिरवाणे प्राणी आणि सुंदर लाल, केशरी रंगाचे फुललेले गुलाब पाहून, वाटले सुख सुख म्हणतात ते आणि काय वेगळे असते ? ससे आणि खारी अगदी गरीब दिसत. दिवसा आणि रात्री यांचे दर्शन व्हायचे. सतत घाबरलेले म्हणून सावध असतात. स्कंक आणि रॅकून रात्री दिसत. काळ्या खारी आणि रॅकून वेगळे ओळखायला कठीण जात असत. मुलीने बॅकयार्डला कॅमेरा लावलेला होता. त्यात हे सगळे प्राणी मधून मधून दिसत असत.
या प्राण्यांशिवाय मूस, बीव्हर आणि पोलर बिअर हे स्थानिक प्राणी आहेत. या प्राणी वर्गापैकी मूस, बीव्हर कॅनेडियन लिंक्स इत्यादी प्राणी कॅनडात आढळतात.
— मूस (Moose) हा कॅनडातील सर्वात मोठा हरिणाच्या जातीत नातलग प्राणी आहे. हा जंगल आणि दलदलीच्या भागात आढळतो.
— बीव्हर (Beaver) हा कॅनडाचा राष्ट्रीय प्राणी आहे. धरणे (Dams) बांधण्यात हा प्राणी प्रसिद्ध आहे. (वाचून मला आश्चर्य वाटले.)
— ध्रुवीय अस्वल (Polar Bear) हे उत्तर कॅनडाच्या बर्फाळ प्रदेशात राहते. हा उत्कृष्ट पोहणारा आणि शिकारी प्राणी आहे.
— कॅनेडियन लिंक्स (Canadian Lynx) ही मध्यम आकाराची वन्य मांजरं आहेत. बर्फाळ जंगलांमध्ये आढळते.
— वुड बायसन (Wood Bison) उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठा स्थलचर सस्तन प्राणी. संरक्षित जंगलांमध्ये आढळतो.
— ग्रे वुल्फ (Grey Wolf) कळपाने राहणारा बुद्धिमान शिकारी प्राणी आहे. कॅनडाच्या अनेक जंगलांमध्ये आढळतो.
या प्राण्यांचे वैशिष्ट्य अभ्यासताना मला मोठी गम्मत वाटली. निसर्गाने सगळ्या प्राण्यांची पोटापाण्याची आणि राहण्याची कशी सोय केली आहे बघा.

आणखी काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी अशा आहेत, बीव्हर हा कॅनडाचा राष्ट्रीय प्राणी आहे. कॅनडामध्ये 80,000 पेक्षा अधिक ध्रुवीय अस्वलांपैकी मोठा हिस्सा राहतो.
कॅनडातील जंगले आणि राष्ट्रीय उद्याने अनेक दुर्मिळ प्राण्यांचे सुरक्षित निवासस्थान आहेत.
कॅनडात अनेक प्रकारचे पक्षी मला दिसले. त्यांची नावे मला माहित नव्हती म्ह्णून त्यांच्या विषयी वाचायला लागले. तेव्हा बाल्ड ईगल (Bald Eagle) हा कॅनडाचा राष्ट्रीय पक्षी असून तो उंच आकाशात झेप घेतो आणि नद्यांच्या किनारी माशांची शिकार करतो ही माहिती कळली.
व्हेल व सील (Whales and Seals): किनाऱ्यालगतच्या थंड प्रदेशात, बेलुगा व्हेल, ब्लू व्हेल आणि विविध प्रकारच्या सील माशांचे वस्तीस्थान आहे. आता हे प्राणी, पक्षी टोरोंटो या शहरात किंवा कॅनडा देशातील अनेक शहरात का आढळतात ?
याचे उत्तर म्हणजे यांना हिवाळ्यात राहणे अनुकूल ठरते. तीव्र थंडीचा सामना करण्यासाठी प्राण्यांनी स्वतःमध्ये शारीरिक बदल केले आहेत. काही प्राणी जाड केस आणि त्वचेखालील चरबीच्या थरामुळे उबदार राहतात.काही अस्वल व सस्तन प्राणी हिवाळ्यात दीर्घ झोपेची (हायबरनेशन) पद्धत वापरतात. म्हणूनच बर्फ पडायला लागला की रोज दिसणारे प्राणी गुप्त होतात. ते एकदम उन्हाळा आला (दोन महिने) की प्रकट होतात.
टोरोंटोच्या या मुक्कामात मी प्राणी पक्षी यांचा सहवास अनुभवताना त्यांचा इतिहास पाहिला. त्याचबरोबर टोरोंटो झू पाहिला. (Toronto Zoo) हे कॅनडातील सर्वात मोठा प्राणिसंग्रहालय आहे, जो ओंटारियो प्रांतातील टोरोंटो (स्कारबोरो) शहरात २००० मेडोव्हले रोड येथे स्थित आहे. हे प्राणिसंग्रहालय सुमारे २८७ हेक्टर (१.१ चौरस मैल) क्षेत्रात पसरलेला असून येथे ७०० पेक्षा जास्त प्रजातींचे ५,००० हून अधिक प्राणी नैसर्गिक अधिवासात ठेवण्यात आले आहेत. ही माहिती मिळाल्यावर मला झू पाहायची ओढ लागली. त्यामुळे माझ्याबरोबर माझा भाऊ, आई आणि कन्या व जावई हे सुद्धा झू पाहायला बरोबर आले.
या प्राणी संग्रहालयात प्राण्यांचे वर्गीकरण त्यांच्या मूळ खंडांनुसार ७ भौगोलिक विभागांमध्ये केले गेले आहे : –
- इंडो-मलाया (Indo-Malaya) : येथे भारतीय गेंडा, वाघ आणि ओरंगुटान पाहायला मिळतात.
- आफ्रिकन सव्हाना (African Savanna) : हा सर्वात लोकप्रिय विभाग असून येथे सिंह, चित्ता, जिराफ आणि पांढरे गेंडे आहेत.
- कॅनेडियन डोमेन (Canadian Domain) : कॅनडाचे स्थानिक प्राणी जसे की मुज, क्युगर (Cougar) आणि लांडगे येथे आहेत.
- टुंड्रा ट्रेक (Tundra Trek) : उत्तर ध्रुवीय अस्वल (Polar Bear) आणि आर्क्टिक कोल्हे पाहण्यासाठी हा विभाग प्रसिद्ध आहे.
- नवे आकर्षण : नुकताच ऑगस्ट २०२६ मध्ये येथे एका अतिशय दुर्मिळ अशा पिग्मी हिप्पो मादी पिल्लाचा जन्म झाला आहे.
जाता जाता एक सांगावेसे वाटते. कॅनडात पर्यावरणाची काळजी घेतली जाते. कशी ते एक उदाहरण देऊन सांगते. अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूने, काही प्राचीन झाडं मुक्तपणे वाढलेली दिसतात. तर काही माणसांच्या वसाहती बाजूला. मध्यम आकाराची झाडं, व्यवस्थित रांगेत लावलेली दिसतात. प्लास्टिक कचरा इथे तिथे पडलेला क्वचितच दिसला. ओला कचरा, सुखा कचरा नेमाने वेगळा ठेवलेला दिसतो. तसा इथला कायदा आहे. स्थानिक लोक या कायद्याचा मान ठेवतात. रिसायक्लिंग ला महत्व दिले जाते. रिसायक्लिंग करण्या सारख्या बाटल्या, इलेक्ट्रॉनिक कचरा, खाद्यपदार्थांचे खोके सक्तीने बाजूला ठेवले जातात. प्रत्येक कुटुंबाला थोडी मेहनत घ्यावी लागते, पण इथे हे नियम, कायदे गंभीरपणे पाळले जातात. सिंगापूरला या बाबतीत थोडे वेगळे कायदे आहेत. पण सिंगापूरची स्वच्छता एक पायरी वरती आहे हे नक्की.
सिंगापूरला माझ्या कडे रोजच्या रोज कचऱ्याची गाडी येऊन सोसायटीचा कचरा घेऊन जाते तर टोरोंटोत आठवड्यातून एका ठराविक वारी कॉलनीत कचऱ्याची गाडी येते. प्रत्येक घरासमोर, आपापले हिरव्या रंगाचे आणि लाल रंगाचे कचऱ्याचे डबे, त्या ठरलेल्या दिवसाला कचरा भरून ठेवावे लागतात.

— लेखन : मोहना कारखानीस. सिंगापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
