Homeलेखमाझी जीवन नौका : १०

माझी जीवन नौका : १०

“लोक पालक – आमचं घर”

आता गृहिणीच्या भूमिकेत मी हळूहळू रुळत चालले होते. अनेक प्लास्टिकच्या पिशव्यांच्या मध्ये स्वयंपाकाचे मसाले जिरं मोहरी वगैरे पदार्थ भरलेले होते. जेवण घेऊन करवालो केबिनमध्ये आला की आज भाजी वगैरे काय काय आहे ते मी उघडून बघायची. गरम मसाला घातलेली कोबीची भाजी मी कधीच पाहिली नव्हती. मग त्याच भाजीला नवं रूप द्यायचं ठरवलं.
मदतीला आले कांदा आणि बटाटा ! कांदा बटाटा यांचा स्वयंपाकघरात गृहिणीला केवढा मोठा आधार असतो याचे अचानक ज्ञान होऊ लागलं. आई आणि वहिनी-सासुबाई काही झालं तरी घरात कांदे बटाटे आणि डाळीचे पीठ कायम हवंच असं का म्हणतात ते पूर्णपणे लक्षात आलं.

बाजारातून आणलेली थोडी कोथिंबीर, कढीपत्ता फ्रीजमध्ये शिल्लक होताच. दोन कांदे, दोन बटाटे नव्या सोलण्याने सोलून मस्तपैकी चिरून घेतले. ते फोडणीवर घातले. कढीपत्ता घातला. परतवून वाफ आणली आणि ती मसाल्याची भाजी त्याच्यावर ओतली. चवीचं मीठ, साखर, खोबरं, कोथिंबीर घालून ढवळली. झाकण देऊन दणदणीत वाफ काढली. खोलीभर फोडणी कढीपत्त्याचा सुगंध पसरला.
मनातल्या मनात माझीच पाठ थोपटून घेतली‌. मला तर नवा शोधच लागला होता !

फक्त प्लास्टिकच्या पिशव्यातून फोडणीचे सामान शोधून घालताना तारांबळ व्हायला लागली. असं पिशव्या पिशव्यातून डोकावणं फारच कटकटीचं होतं.एकदम घरातल्या फोडणीच्या पंचपाळयाची आठवण आली. निदान छोट्या छोट्या प्लास्टिकच्या किंवा काचेच्या बरण्या आणायला हव्यात असं वाटलं. मग काय काय वस्तू लागतील याची एक छोटी यादीच तयार केली. त्यात थोडे मसाले, थोड्याशा भाज्या वगैरे पण होतं.

जहाजाच्या इंजिनिअर रूमसाठी लागणाऱ्या वस्तूंची हरी आणि मुकुंद यांच्यात रोज चर्चा व्हायची. त्याचं indent तयार केलं जायचं. जहाजाच्या maintenance साठी लागणारे Spare parts वगैरेंच्या खरेदीसाठी जी यादी तयार केली जाते तिला indent म्हणतात, हे मला समजलं होतं. ऑफिस ने approve करावे लागते.

दुपारी जेवायला मुकुंद आणि हरी आले. भाजीचा वेगळा प्रकार खूपच आवडला. जेवण झाल्यावर माझ्या भांड्याकुंड्यांचं, भाजी-मसाल्याचं indent मी मुकुंद समोर approval साठी सादर केलं. झालं…… !
त्यावर या दोघांनी मला चिडवून डोक्यावरंच घेतले.

लगेच हरी म्हणाला, बापू,अभी देखो इंजिनरूम का, indent और ये मेम का किचन indent ! दोनो तुझे संभालना पडेगा. तुम्हे बहुत मजा आ जायेगा.
मुकुंदाना घरी सगळेजण बापू म्हणतात. त्यामुळे हरी पण त्यांना बापूच म्हणतो.
हरी, तू भी शादी करके देख. सारा मजा मुझे अकेले को क्यूं ? तुझे भी थोडी मजा और सजा चखनी चाहिये ना ! मुकुंदांनी ताबडतोब वार परतवून लावला.
झालं…… !
एवढी सजा वाटते तर तुम्ही नवरे लोक चांगलं धडाम-धुडूम करून, शेकडो लोकांना बोलवून, जेवणावळ्या करून कशाला लग्न लावून घेता हो ? मी विचारलं.
तर एकूण असं आमच्या संसारातलं मुहूर्ताचं भांडण झालं !

हरीला अगदी मनापासून हसू येत होतं. मग मुकुंद म्हणाले, तू अभी जो हसना है हस ले, बाद में मैं भी देखने वाला हूॅं

विषय एकूण आपल्यावरच उलटणार हे लक्षात आल्यावर पराभवाचं पांढरं निशाण दाखवणार कोण ? तर लग्गेच विषय बदलत हरी अगदी चतुरपणे म्हणाला,
प्रज्ञा, कोबी की सब्जी का तुमने जो overhauling किया वो एकदम फँटॅस्टिक था !
पाकक्रियेतल्या माझ्या प्रयोगाचं कौतुक ऐकून मला एकदम मास्टरशेफ झाल्यासारखं वाटलं.

हरी मला माझ्या माहेरी म्हणतात तसं प्रज्ञा म्हणायचा.
खरं तर वेदवती आणि प्रज्ञा ही दोन्ही माझी माहेरचीच नावं आहेत.
प्रज्ञा हे नाव माझ्या कृष्णामावशीने ठेवलेलं आहे.
माहेरी कागदोपत्री वेदवती हेच नाव लागलं आहे, तरी घरी मला प्रज्ञाच म्हणतात.
मग त्याचे बोलणाऱ्याच्या मूड प्रमाणे पनी, पने, पनू असे अनेक (अप)भ्रंश अस्तित्वात आलेले आहेत. माझी आई जोपर्यंत पनू अशी हाक मारते आहे तोपर्यंत कसलाही धोका नाही याची खात्री असायची. पण तोच थोडा मोठा आवाज काढून प्रज्ञाssss अशी शुद्ध, जोरदार हाक आली की आपण काहीतरी माती खाल्ली आहे, आता बोलणी खावी लागणार हे समजायचं !

लग्नात वेदवती हेच नाव मुकुंदांनी ठेवलं. तेच सासरी रूढ झालं‌.नवं लग्न झालेलं असतानाची वेदवती या नावाची झालेली गंमत सांगते.

माहेरी मला प्रज्ञा किंवा त्याच्या कुठल्यातरी अपभ्रंशाची सवय. वेदवती या नावाने मला तिथं कोणीच हाक मारत नसे. इकडे सासरी मात्र सगळे वेदवती म्हणायला लागले. सुरुवातीला सासरी कोणी हाक मारली की कोणाला हाक मारत आहेत कुणास ठाऊक असंच मला वाटायचं.
ही वेदवती कोण ही माझी मलाच ओळख पटायला काही दिवस जावे लागले….. अगदी ते माहेरचंच नाव असून सुद्धा !

हरी आणि सगळी प्रधानमंडळी मला प्रज्ञा या नावानेच बोलावतात. त्यामुळे मला अगदी माहेरी आल्यासारखं वाटतं.

मग परत हरीच म्हणाला, “अरे बापू, तुमने प्रज्ञा को अभी तक इंजिन रूम नहीं दिखाई ? कैसा हसबंड हो तुम ?” (हे मला खुश करण्यासाठी आणि आपल्या मित्राची बाजू बळकट करण्यासाठी होतं हे सूज्ञास सांगणे न लगे) तेवढ्यात मुकुंद हळूच म्हणाले, “क्या यार, तुमने मरवा दिया, अभी इसको इंजिन रूम लेके जाना पडेगा” पण ते मला ऐकूच आलं नाही असं मी दाखवलं.

मुकुंद काम करतात ती इंजिनरूम बघायची मला पण खूप उत्सुकता होती‌.

मग दुपारी चहा नंतर मला इंजिनरूम दाखवायला मुकुंद घेऊन गेले. अगदी अरुंद, लोखंडी जिन्याने खोल खोल पाताळात उतरल्यासारखे एका मागे एक मजले उतरत इंजिन रूमचे अनेक प्लॅटफॉर्मस पार करत तळाशी पोहोचलो. पहिला जिना उतरून खाली गेलो तर दर्शन झालं ते पाच सहा सिलिंडर हेड्सचं !

सर्व इंजिनरूम म्हणजे स्टील तसंच अग्निविरोधक धातूंनी बनवलेलं, पाताळात उतरत जाणारंं एक आगळं वेगळं अजस्त्र जगंच होतं.

यंत्रांची अखंड घरघर सुरू होती. जनरेटर सुरू होता त्यामुळे त्याचा प्रचंड आवाज सर्व इंजिनरूम मध्ये भरून राहिला होता. मुकुंदनी मला त्या आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून ear plugs घालायला दिले. किंबहुना इंजिन रूममध्ये एवढ्या मोठ्या आवाजापासून कानांचं रक्षण व्हावं म्हणून इयर प्लग्ज घालावेच लागतात.

इंजिन रूमच्या सुरुवातीलाच एक मजला उतरलं की एक मोठी स्वतंत्र control room होती. तिथे कितीतरी इंडिकेटर्स होते. ती रूम संपूर्ण air conditioned आणि sound proof केली होती. त्यामुळे बाहेर असलेला जनरेटर्स आणि इंजिनचा मोठा आवाज आत अजिबात ऐकू येत नव्हता. तिथलं तापमान खूपच कमी होतं. तिथे अनेक अलार्म्स पण बसवले होते. निरनिराळ्या नोंदी होत होत्या. ड्युटीवर असलेले इंजिनियर्स त्यांची सतत देखरेख करत होते. जहाजावरचे प्रत्येक मशीन बरोबर चालत आहे की नाही, या साठी ते इंडिकेटर्स होते. कुठे धोका असेल किंवा आग लागली तर ताबडतोब सूचना देणारे अनेक safety alarms आणि fire alarms होते. ही सगळे अतिशय नाजूक आणि महत्त्वाची मशिनरी सुरक्षित राहून सतत कार्यक्षम राहावी म्हणून बनवलेली खास खोली होती.

तिथून बाहेर आलो. एकूणच इंजिनरूमचं तापमान खूप जास्त होतं. ते साधारण 35 ते 40 डिग्रीपर्यंत असतं म्हणे. त्या सततच्या भयंकर गर्मीत, यंत्रांच्या जोरजोरात आवाजात हे इंजिनियर्स बारा-बारा तास अखंड काम करत असतात.

मुकुंदनी माझी पहिली ओळख करून दिली ती मेन इंजिनशी ! ते महाकाय इंजिन एका मोठ्या खोलीएवढ्या आयताकृती आकाराच्या भल्या थोरल्या प्लॅटफॉर्मवर बसवलेले होतं. सर्व इंजिन्सचा हा महाराजा होता. साधारण माझ्या उंची एवढं टर्बोचार्जर नावाचं एक मशीन मेन इंजिनला जोडलेलं होतं. मेन इंजिनला विशिष्ट प्रेशरने हवा देणे हे या प्राण्याचे काम !
त्यावेळेला जहाज जेट्टीला उभं असल्यामुळे मेन इंजिन बंद होतं.

याच्या बाहेर निरनिराळ्या प्लॅटफॉर्म्सवर तीन जनरेटर्स, कुलर्स, हीटर्स, बॉयलर, प्यूरिफायर्स, अनेक प्रकारचे पंप्स यांचं साम्राज्य पसरलं होतं. याच्या बरोबरीने अनेक प्रकारच्या पाईप्स आणि इलेक्ट्रिक केबल्स यांचं जाळच वरपासून खालपर्यंतच्या सर्व प्लॅटफॉर्म्स वरती पसरलेलं होतं.

इंजिनरूमचा बहुतेक सर्व भाग हा पाण्याच्या खाली असणाऱ्या जहाजाच्या भागात असतो. त्यामुळे तिथे भल्या मोठ्या ब्लोअर्सनी ताजी हवा पुरवली जाते. उजेडासाठी अर्थातच सर्वत्र विजेचे दिवे, ट्यूब्ज सुरू असतात.

निरनिराळ्या मजल्यावर पसरलेली ती प्रचंड मशीनरी पाहून खरोखर थक्क व्हायला झालं.

मी मुकुंदांना विचारलं, यातल्या सगळ्या पाईप्स, ह्या एवढ्या केबल्स कुठून कुठे जातात, ही यंत्र काय काय आणि कशी कामं करतात, त्याच्या रीडिंगचे अर्थ काय एवढं सगळं तुमच्या लक्षात कसं राहतं ? त्यावर काही न बोलता मुकुंद फक्त हसले. स्वतःबद्दल बोलणं हा त्यांचा स्वभावच नाही. पण त्यांना किती अभ्यास करावा लागला असेल, केवढी प्रचंड जबाबदारी त्यांच्यावर आहे याची एक छोटीशी चुणूक मात्र मी प्रथमच पहात होते.

ही इंजिन्स म्हणजे अख्ख्या जहाजाचं हृदयंच आहे. मुख्यतः जहाज चालवणं हे इंजिनरूमचं सर्वात महत्त्वाचं काम. पण त्याच्याच बरोबरीने सर्व केबिन्स मधला एसी, गॅलीला स्वयंपाकासाठी लागणारी सर्व मशिनरी आणि विजेच्या शेगड्या, तसेच समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून शुद्ध पाणी तयार करणे आणि वीज निर्मिती साठीचे जनरेटर्स यासारख्या असंख्य गोष्टींची काळजी इंजिनियर्स घेत असतात.
ही सर्व यंत्रे उत्तम तर्हेने चालली पाहिजेत, त्यांच्यात बिघाड झाला तर तो ताबडतोब दुरुस्त करता आला पाहिजे, तसंच त्यांची नियमित होणारी स्वच्छता…. त्यांचा maintenance इत्यादी सर्व जबाबदारी इंजिनरूमची असते….. मुकुंद मला सांगत होते. त्या अजब गोष्टी ऐकून मला आश्चर्याने अवाक व्हायला होत होतं. त्या इंजिन रूमच्या भुलभुलय्यात निरनिराळ्या प्लॅटफॉर्मवर असलेली नेमकी कामाची ठिकाणं, मशीनरी त्यांना कशी सापडत होती ते त्यांचं त्यांनाच माहित.

इंजिनरूमच्या या पाण्याखालच्या पाच-सहा मजल्यांवरून तसेच जहाजाच्या वरच्या भागातल्या निरनिराळ्या मजल्यावरच्या अनेक इंजिन्स साठी दिवसाकाठी पाच सहाशे पायऱ्या कित्येकदा सहज चढ उतार कराव्या लागत. इंजिन रूम मध्येच
बारा-बारा तास काम असते. इंजिनच्या आवाजांची धडधड, घरघर, प्रचंड उष्णता आणि ही वर खाली सतत होणारी पळापळी हा तर इंजिनियर्सच्या कामाचा अविभाज्य भागच असतो.
त्या पलीकडे जाऊन इंजिनची काळजी, कामाची आखणी आणि कमालीच्या तत्परतेने सतत केली जाणारी कामे. जहाजातली इंजिनियरची नोकरी ही मानसिक आणि शारीरिक ताकदीची सततची परीक्षाच असते.

एखाद्या डॉक्टरला माणसाच्या शरीराच्या आतल्या अवयवांची अचूक माहिती असणं जितकं महत्त्वाचं तितकंच या इंजिनियर्सना जहाजाच्या आतल्या सर्व मशीन्सची, त्यांच्या रचनेची, अगदी त्यांच्या बारीक-सारीक वायर्स आणि पाईप्सची माहिती असणं अत्यंत महत्त्वाचं असतं. त्या साऱ्या जंजाळातून अचूकपणे काम करणं याला त्यातलं पूर्ण ज्ञान, सततची जागरूकता, मनाची एकाग्रता आणि कौशल्य हे सर्व गरजेचं असतं.

कोट्यावधी रुपये किमतीची शिप, त्यात तेवढाच किमती भरलेला माल आणि जहाजावरची काम करणारी सर्व मंडळी या सगळ्यांची सुरक्षितता आणि जबाबदारी यांच्या जागरूकतेवर आणि सक्षमतेवर अवलंबून असते‌.

आपल्या घरापासून, बायको-मुलां पासून, आई-वडिलांपासून दूर, सतत समुद्राच्या पाण्यात, बंदिस्त वातावरणात, स्वतःला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम ठेवून हे काम अखंड करत राहणं ही सोपी गोष्ट नाही. किनाऱ्यावरच्या लोकांना याची कल्पना येणं फार कठीण आहे.

B.E .(Mech) ची First class मधे degree घेतल्यानंतर हे सतत आव्हानांनी भरलेलं करियर मुकुंदांनी निवडलं होतं. त्यांचे कष्ट, जिद्द आणि त्याच्या जोडीला असलेला स्वभावातला शांत – समंजसपणा यांची जाणीव मला न कळत होत होती.
त्यांच्या कामाचं हे स्वरूप बघून खरंच मन आनंदाने आणि अभिमानाने भरून येत होतं.

इंजिन रूम मधली मशीन्स दाखवत असताना त्यांची नावे मुकुंदानी सांगितली. त्यातली थोडीशीच माझ्या लक्षात राहिली. पण ती मशीन्स मला ओळखता येतील असं वाटत नाही, एवढा तो अवावाढव्य आणि प्रचंड गुंतागुंतीचा प्रांत आहे.

ही परिचय परेड करून आम्ही वर केबिन मधे आलो. चहा घेत होतो तेवढ्यात एक फिटर इंजिनरूम मधून धावत आला. कुठल्यातरी मशीन मध्ये काहीतरी बिघाड झालाय असं मुकुंदाना सांगू लागला. जाताना एकच वाक्य पुटपुटला, “आज मॅडम इंजिन रूम मे आयी थी ना, तो ये ब्रेकडाऊन होना ही था” हा काय प्रकार आहे, हे मला समजेना. माझ्या चेहऱ्यावरच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून मुकुंद परत इंजिनरूम कडे पळाले. हे कधी येतात त्याची मी वाट बघत बसले होते.अर्ध्या-पाऊण तासाने परत आले. जो काही प्रॉब्लेम आला होता तो निपटला होता.

मुकुंद आल्याबरोबर मी विचारलं, “जाताना तो फिटर असं का पुटपुटला हो ? मी तिथे आले म्हणून ब्रेक डाऊन आला का ? हे काय प्रकरण आहे.? ब्रेक डाऊनशी माझ्या येण्याचा काय संबंध ?
मुकुंद म्हणाले, “या शिप्सच्या जगात अशी एक श्रद्धा म्हण अंधश्रद्धा म्हण…. आहे की एखादी स्त्री इंजिन रूम मधे जाऊन आली की, काही ना काही तरी ब्रेक डाऊन नक्की ठरलेला आहे.

शिप, इंजिनरूम या सगळ्या स्त्रीलिंगीच ! या स्त्रियांना बायकांचं वावडं का असावं ?
असं म्हणतात मरीनरचं पहिलं प्रेम हे त्याची शिप असते आणि मरीन इंजिनियरचं खास प्रेम तर त्याची इंजिनरूम !मग या बायकांना सवती मत्सर वाटत असावा. म्हणूनच बहुतेक इंजिन रूमला इंजीनियरची बायको आलेली आवडली नाही.लगेच ती रुसली आणि काहीतरी ब्रेकडाऊन काढून बसली. तिचा रुसवा काढायला मुकुंदांना जावंच लागलं‌. तिची समजूत घालून, तो ब्रेक डाऊन दुरुस्त करून दमून भागून मुकुंद केबिनमध्ये आले.

बापरे ! लोक पालक ही तर माझी पहिली सवत. आता आयुष्यभर अशा अनेक सवतींना माझा नवरा सांभाळणार होता तर !

या सगळ्या गडबडीत खूप उशीर झाला. त्यादिवशी बाहेर जाता येणं शक्यच नव्हतं. माझं छोट्या बरण्या, बाटल्या, मसाले यांचं indent मात्र तसंच राहिलं.
क्रमशः

— लेखन : वेदवती कुलकर्णी. विलेपार्ले पूर्व, मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. Pradnyatai, तुम्ही इंजिन रूमचे वर्णन खूप छान केले आहे. तुमच्या hilarious गप्पा पण वाचायला मजा आली😀

  2. सुंदर लिखाण …. प्रत्येक भागात नवीन माहिती मिळतेयं आणि पुढे काय ? अशी उत्सुकता वाढतेयं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments