Homeयशकथा“आजीबाईंची शाळा”

“आजीबाईंची शाळा”

माझ्यासाठी आणि माझी मुलगी “शिफा” हिच्यासाठी कालचा दिवस आयुष्यातील अविस्मरणीय दिवस ठरला. त्याचे कारण म्हणजे, आम्ही ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात असलेल्या फांगणे गावातील “आजीबाईंची शाळा” पाहण्यासाठी गेलो होतो.

खरं सांगायचं तर, त्या शाळेत पाऊल ठेवताच माझ्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली. तिथे गेल्यावर मला जाणवलं की, शिक्षणाला वयाचं बंधन नसतं, स्वप्नांना मर्यादा नसतात आणि जिद्द असेल तर आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर नवा अध्याय सुरू करता येतो.
ही शाळा आदरणीय योगेंद्र बांगर सरांनी २०१६ साली सुरू केली. सध्या ८ मार्चपासून शाळेला सुट्टी आहे, तरीसुद्धा बांगर सरांनी आमच्यासाठी वेळ काढला आणि सर्व आजीबाईंशी भेट घडवून आणली. त्या दीड तासात वेळ कसा गेला हे आम्हाला कळलंच नाही.

प्रत्येक आजीच्या चेहऱ्यावर एक निरागस हास्य होतं, डोळ्यांत शिकण्याची ओढ होती आणि मनात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द होती. या शाळेत सध्या ६० वर्षांपासून ते ९७ वर्षांपर्यंतच्या आजीबाई शिकत आहेत. विचार करा, ज्या वयात बहुतांश लोक “आता काय उरलंय ?” असं म्हणतात, त्या वयात या आजीबाई अक्षर ओळखत आहेत, गाणी म्हणत आहेत, कविता करत आहेत आणि आयुष्य पुन्हा नव्याने जगत आहेत. ही गोष्टच किती मोठी प्रेरणा देणारी आहे !

दोन आजीबाई त्या दिवशी गावात नसल्यामुळे भेटू शकल्या नाहीत. विशेषतः ९७ वर्षांच्या त्या आजीबाईंची भेट मला घेता आली नाही, ज्यांना “कौन बनेगा करोडपती”त स्वतः अमिताभ बच्चन ने शुभेच्छा दिल्या होत्या,त्यांना भेटण्याचा योग यावेळी आला नाही, पण पुढच्या वेळी मी नक्कीच त्यांची भेट घेणार आहे.

आज या शाळेत एकूण २५ आजीबाई शिकत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान, आनंद आणि शिकण्याची तळमळ पाहून मन अक्षरशः भरून आलं. मिशन आयएएस अमरावतीचे संस्थापक आदरणीय डॉ. नरेशचंद्र काठोळे सर आणि अल्हमद एज्युकेशन सोसायटी मुंबईच्या अध्यक्षा सौ. परवीन कासार यांच्या वतीने सर्व आजीबाईंना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तो क्षण खरोखरच डोळ्यांत पाणी आणणारा होता.
यावेळी आजीबाईंनी स्वतः रचलेलं गाणं सुद्धा गायलं. त्या गाण्यात त्यांच्या आयुष्याचा संघर्ष होता, वेदना होत्या, पण त्याचबरोबर एक नवीन आशा होती. त्यांच्या आवाजात ताकद होती, अनुभव होता आणि मनाला भिडणारी प्रामाणिकता होती. मी त्या क्षणी स्वतःला रोखू शकलो नाही. माझ्या डोळ्यांत अश्रू आले. कारण त्या गाण्यात मला फक्त शब्द ऐकू येत नव्हते, तर त्या प्रत्येक आजीबाईंचं आयुष्य बोलत होतं.

आदरणीय योगेंद्र बांगर सर हे केवळ “आजीबाईंची शाळा” चालवत नाहीत, तर त्यांनी “भाकरीची शाळा” आणि “आईची शाळा” असे अनेक उपक्रम सुरू केले आहेत. “भाकरीची शाळा” या उपक्रमातून त्यांनी अनेकांना स्वयंरोजगाराची संधी दिली आहे.अनेक महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची ताकद दिली आहे. आज अनेकांच्या घरात चूल पेटत असेल, अनेकांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च निघत असेल, तर त्यामागे बांगर सरांची दूरदृष्टी आणि समाजासाठीची तळमळ आहे.

“आजीबाईंची शाळा” ही भारतातील पहिली अशी शाळा आहे आणि या शाळेची नोंद लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली आहे. एवढंच नाही, तर बीबीसी लंडन, आर्य मासिक तसेच अमेरिका, कॅनडा, रशिया, जर्मनी अशा अनेक देशांतील पत्रकारांनी येथे येऊन या उपक्रमाची दखल घेतली आहे. पण एवढं मोठं कार्य करूनही बांगर सर अत्यंत साधे, नम्र आणि प्रेमळ आहेत. त्यांच्या बोलण्यात कुठेही अहंकार नाही. त्यांच्या डोळ्यांत फक्त समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याची इच्छा दिसते.

त्या दीड तासात मला स्वतःलाही माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळाली. मी त्या सर्व लाडक्या, प्रेमळ, जिद्दी आणि मनाने हळव्या अशा आजीबाईंसाठी एक पत्र लिहिलं होतं. ते पत्र मी त्यांच्या समोर वाचून दाखवलं. त्या प्रत्येक आजीबाईंच्या डोळ्यांत पाणी होतं. त्यांनी मला आशीर्वाद दिले. त्या क्षणी मला वाटलं की, आयुष्यात कितीही मोठं यश मिळालं तरी या आजीबाईंच्या आशीर्वादासारखं मोठं काहीच नाही.

आदरणीय योगेंद्र बांगर सरांबद्दल सुद्धा माझ्या भावना मी पत्राच्या रूपाने व्यक्त केल्या. कारण अशा व्यक्तींबद्दल बोलण्यासाठी शब्द कमी पडतात. काही लोक स्वतःसाठी जगतात, काही कुटुंबासाठी जगतात, पण काही लोक समाजासाठी जगतात. योगेंद्र बांगर सर हे अशाच लोकांपैकी एक आहेत.

मित्रांनो, आजच्या काळात आपण सतत तक्रारी करत असतो. वेळ नाही, संधी नाही, साथ नाही, परिस्थिती नाही… पण या आजीबाईंकडे पाहिल्यावर जाणवतं की, जर इच्छा असेल तर अशक्य असं काहीच नाही. ६०, ७०, ८०, ९० वर्षांच्या वयात त्या शिकू शकतात, तर आपण का नाही ? त्या हसत जगू शकतात, तर आपण का नाही? त्या नव्याने स्वप्न पाहू शकतात, तर आपण का नाही ?

महाराष्ट्रात अजूनही अशी माणसं आहेत जी स्वतःचा विचार न करता समाजासाठी झटत आहेत. अशा लोकांचं कौतुक झालं पाहिजे, त्यांना साथ मिळाली पाहिजे, त्यांच्या कार्याला हातभार लागला पाहिजे. आपण प्रत्येकाने किमान एकदा तरी फांगणे गावातील या शाळेला भेट दिली पाहिजे. त्या आजीबाईंची भेट घेतली पाहिजे. त्यांच्याशी दोन शब्द बोलले पाहिजेत. कारण त्या आपल्याला आयुष्याचा खरा अर्थ शिकवतात.

जर तुम्हालाही आदरणीय योगेंद्र बांगर सरांच्या या महान कार्याबद्दल त्यांचे कौतुक करायचे असेल, त्यांना शुभेच्छा द्यायच्या असतील किंवा पुढील कार्यासाठी प्रेरणा द्यायची असेल, तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता. त्यांचा मोबाईल नंबर आहे, 9272704744

माझी सर्व मित्रांना नम्र विनंती आहे की, हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. कारण समाजात चांगलं काम करणाऱ्या लोकांना आपली साथ आणि प्रोत्साहन मिळणं खूप आवश्यक आहे.
आज मी जे पाहिलं, जे अनुभवलं, ते मी कधीही विसरणार नाही. त्या आजीबाईंचं प्रेम, त्यांचे आशीर्वाद, त्यांचं हास्य आणि योगेंद्र बांगर सरांचं कार्य माझ्या आयुष्यात कायम स्मरणात राहील.

खरंच, काही लोक देवासारखे असतात. ते मंदिरात नसतात, पण माणसांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करत असतात. योगेंद्र बांगर सर हे अशाच देवमाणसांपैकी एक आहेत.

मेहबूब कासार.

— लेखन : मेहबूब कासार. निवृत्त उपायुक्त, सेवा कर विभाग, महाराष्ट्र शासन, नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️+91 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments