शब्दांकित साहित्य मंच हा लातूर मधील साहित्यासाठी वाहिलेला एक नामांकित मंच ! कोविड काळात सारेच व्यवहार ठप्प झाल्याने काही साहित्यिक मैत्रिणी एकत्र येत या मंचाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. प्रा. डॉ. नयन राजमाने, विजया भणगे, शैलजा कारंडे, वृषाली पाटील या कवयित्रींनी पुढाकार घेत ऑन लाईन कवी संमेलन सुरु केले. त्याला उत्तम प्रतिसाद ही मिळत गेला. संस्थापक अध्यक्ष या नात्याने डॉ. नयन राजमाने मॅडमनी या मंचाला एक विधायक वळण देत कवी संमेलना बरोबरच पुस्तकावर बोलू काही, अनेक कवयित्रींच्या कविता एकत्र करुन काव्यसंग्रह, अनेकींच्या कथा घेऊन कथासंग्रह प्रकाशित करणे असे विविध उपक्रम घेतले जाऊ लागले. सध्या विजया भणगे या अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. आज असंख्य महिला या मंचशी जोडल्या गेल्या आहेत.
शब्दांकित साहित्य मंच मध्ये केवळ शिक्षण क्षेत्रातील नव्हेतर डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षिका, व्यावसायिक, गृहिणी, वकील अशा सर्व स्तरातील महिला सहभागी आहेत. विशेष म्हणजे जेष्ठ महिलांचा ही त्यात मोठा सहभाग आहे.
अध्यक्षा विजया भणगे यांचा “काव्य मंजुषा” हा कविता संग्रह नुकताच प्रकाशित झाला. कवयित्री विजय भणगे या माजी नायब तहसीलदार म्हणून निवृत्त असून त्यांचा सर्वच साहित्यिक उपक्रमात सहर्ष सहभाग असतो.
“काव्य मंजुषा” या काव्य संग्रहाला प्रस्तावना देण्याचा सुंदर योग माझ्या वाट्यास आला. 81व्या वर्षात पदार्पण केलेल्या गृहिणी पण तरुण कवयित्री मंगला सास्तुरकर यांचा “रंग अंतरीचे” या काव्य संग्रहाचे प्रकाशन ही नुकतेच पार पडले. असा हा ग्रुप हरहुन्नरी आणि सदैव सक्रीय असतो.
पश्चिम महाराष्ट्रापेक्षा मराठवाडा आज ही तहानलेला आहे. पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असून पेरण्या अद्याप झालेल्या नाहीत. पण माणूस आशावादी आहे. आज ना उद्या नक्कीच पाऊस येईल आणि सारं कसं सुरळित होऊन जाईल.

या पार्श्वभूमीवर शब्दांकित साहित्यमंचकडून नुकतेच कवी संमेलन पार पडले. मला ही त्यात सहभाग घेता आला. हे संमेलन डॉ.नयन राजमाने यांच्या निवासस्थानी घेण्यात आले. या सुंदरशा कार्यक्रमाला प्रा. डाॅ.विनोद
चव्हाण सर, श्रीयुत महेश राजमाने, प्रा. डाॅ. नयन राजमाने, अध्यक्षा विजया भणगे, श्रीमती मंगला सास्तुरकर, इंजिनिअर शैलजा कारंडे, डॉ. स्वाती जोशी, प्रिया माळी, निलिमा देशमुख इत्यादींनी आपल्या कविता उत्स्फूर्तपणे सादर केल्या या कवी संमेलनाची “पाऊस” ही मुख्य थीम होती.
प्रथम डॉ.विनोद चव्हाण यांचा शाल श्रीफळ व ग्रंथ देऊन श्री. महेश राजमाने यांनी सत्कार केला.विशेष म्हणजे याच कार्यक्रमात कवयित्री शैलजा कारंडे यांची “आज ही” ही कविता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बी. ए. तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झाल्या निमित्त कवयित्री शैलजा यांचा ही शाल, ग्रंथ व बुके देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलिमा देशमुख यांनी केले. या संमेलनाच्या अध्यक्ष स्थानी जेष्ठ कवयित्री मंगला सास्तुरकर होत्या. या प्रसंगी डॉ. विनोद चव्हाण सरांनी आपले मनोगत व्यक्त करताना उपस्थित कवयित्रींचे मनापासून कौतुक केले. कवितेच्या माध्यमातून वैचारिक देवाणघेवाण होते, नवनवीन कल्पना सुचतात, इतरांच्या सहवासात आपल्याला ही प्रेरणा मिळते, त्यासाठी एकत्र येणे खूप गरजेचे असल्याचे नमूद केले.
आम्हा सर्व मैत्रिणींना कवयित्री शैलजाचा अभिमान वाटतो. वास्तविक ती व्यवसायाने इंजिनिअर आहे. पण तिच्या ठिकाणी एक संवेदनशील व तरल मन लपलेले आहे. सहज ओघवत्या शैलीत भावमधूर काव्याच्या ओळी तिच्या जिव्हेवर तरळत असतात. सामाजिक प्रश्नाला हात घालणारी, अंतर्मुख करणारी तिची कविता जी विद्यापीठीय अभ्यासक्रमात लागू झाली, आमच्या आग्रहास्तव तिने सादर केली. ती कविता इथे देत आहे.
“आजही”
आजही गावागावातील
वाडी वस्ती तांड्यावरच्या मुली
झाडाची पाने फुले ओरबाडून
मोठ्या भक्तीभावाने करीत असतात अर्पण
वाळूच्या केलेल्या महादेवाला…
मनासारखा महादेव मिळावा म्हणून
मन:कामनापूर्तीचे व्रत उपवास ही
करत असतात या गावागावातील
या कुमारी पार्वती……
तरी ही फार कमी प्रमाणात ऐकिवात आहे
तिला आहे तसा स्वीकारणारा
मोठ्या मनाचा महादेव
पावलेल्या पार्वतीची कहाणी….
आता तिला कळायला हवं
नाही आता आपण तिला सांगायला हवं
तिला सन्मानाची उच्च पद प्राप्त करुन देणारं
तिच्या सामर्थ्याची ओळख करुन देणारं
जोतिबाच्या सावित्रीचा व्रत…!
बाई पार्वती !
झाडाची पाने नको ग तोडू
अखंडपणे चाळत राहा
पुस्तकांची पानं
आणि मग बघ
एक दिवस
तुझ्या प्राप्तीसाठी
करत राहतील मनकामनापूर्तीचे व्रत उपवास
गावागावातील हे चिरंजीव महादेव….!!
— शैलजा कारंडे.

निलीमा देशमुख “पाऊस” या कवितेत…
रिमझिम रिमझिम पाऊस बरसला
कवेत खिडकीच्या जाऊन बसला
चहाच्या कपातून वाफ निघाली
जुन्या आठवणींना पालवी फुटली….!!!
प्रिया माळी आपल्या “तुझा पाऊस” या कवितेत म्हणते…
तु घरात असताना ही त्याने
चोरुन पाहिलंय तुला…
काल पावसाने सारं खरं कळवलंय मला…
बरसत्या रात्री ही तू जागाच होतास
तिच्या आठवणीत म्हणे चिंब भिजला होतास…
आत आत भिजताना
सरी वर सरी कोसळत होत्या…
दाबून ठेवल्या हुंदक्या सोबत
अश्या कश्या रे ओघळत होत्या…!
अध्यक्षा विजया भणगे, आपल्या “परिमल मातीचा” या कवितेत म्हणतात..
आला पाऊस पाऊस
बरसल्या पावसाच्या धारा
ल्याली साज हिरव्या पाचूचा
जशी नटली नवरी
आला पाऊस पाऊस
झाली धरती ओलीचिंब
सुटे मातीचा सुगंध
जसा जाई जुईचा गंध…!!!
शब्दांकित साहित्य मंचच्या मुख्य प्रवर्तक प्रा. डाॅ. नयन राजमाने आपल्या “झिम्माड पाऊस” या कवितेत म्हणतात…
असा वाचाळ पाऊस
गुज मनिचे वाचतो
चिंब ओल्या थेंबांनी
रान सारं भिजवितो
असा झिम्माड पाऊस
सखे रोज खुणवितो
सजणाच्या भेटीसाठी
मला रोज झुरवितो…!
मराठवाडा अद्याप पावसासाठी तहानलेला आहे लोक हवालदिल झाले आहेत. ही खंत व्यक्त करताना प्रभा वाडकर आपल्या “अरे पावसा” या कवितेत म्हणतात….
अरे पावसा पावसा
का रे तुझा हा रुसवा
मनी असू दे समभाव
करु नको रे भेदभाव
माना टाकल्या अंकुरांनी
पिकास लागली तुझी आस
वाट बघती तुझी रात्रं दिन
लेकरांचा जीव कासावीस…
“पाऊस धारा” या कवितेत कवयित्री मंगला सास्तुरकर म्हणतात…
अवखळ वारा धावून आला
हळूच छेडतो ढगा ढगाला
झरझर झरल्या पाऊस धारा
तृषार्त धरणीला तृप्त कराया …!!

ही सुंदरशी कविता सादर करीत त्यांनी या संमेलनाचा अध्यक्षीय समारोप ही केला.
अशा पावसाच्या चिंब भिजवणाऱ्या कविता ऐकताना वेळ कसा निघून गेला कळलंच नाही. तना मनाला त्या उन्हाळ्या सारख्या तप्त उन्हातही मनाली उभारी मिळाली. नक्कीच पाऊस येईल, धरतीवर आनंदी आनंद होईल या आशावादात डाॅ. स्वाती जोशी यांनी कवितेतून संमेलनाची सांगता केली.

— लेखन : डाॅ. प्रभा वाडकर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
