(ओळखून आहे) सारे तुझे बहाणे
मधुकाका आमच्या घराजवळ रहात. गावात राहणारे नात्याचे असे ते एकच. बाबांच्या चुलत भावाचा मावसभाऊ ! आई म्हणायची हा कसला भाऊ, हा आउचा काऊ ! तो चुलतकाका लंडनला स्थायिक झालेला. हेच केव्हाही टपकायचे. आयत्या वेळी आईला भात पुन्हा टाकावा लागायचा. किंवा कधी थालिपीठं लावायची जास्तीची.
त्यांचे लग्न झाले. वाटलं आता काकूच्या हातची चव कळेल. पण छे ! काकू केवळ गप्पा मारायची, त्या मात्र ऐकत राहावे वाटायचे.
“माझी मालूआत्या कळीदार मोदक करते, जणू पांढरा शुभ्र मोगरा !”
“आईची सांज्याची पोळी इतकी मऊ होते, दुधावरची साय जशी.”
कधी त्यांच्या घरी गेलं की, अशाच गप्पांचा नुसता भुसा पडायचा ! काकूच्या नात्यात कुणीतरी साच्यात घातल्यासारख्या पुऱ्या लाटणारी असायची किंवा घरगुती बिस्कीटं बनवणारी कुणी तिची काकू – बिकू ! रसाळ वर्णन सुरू.
निघताना पायात चपला अडकवल्या की आईला ती म्हणायची, “हे काय हो वहिनी निघालात. एव्हाना पोहे तरी झाले असते…”
मधुकाका भोळे म्हणावे, निर्बुद्ध म्हणावे, की लबाड की बायकोचे बाहुले ?
कारण ते म्हणायचे, “तस्से निघताय सगळे बघा, मी किती वेळा जेवलो आहे, तुमच्या हातचं…”
आमच्या घरात बेसन घालून केलेला रव्याचा स्वादिष्ट लाडू तिच्या जिभेवर असताना, ”लाडू करायचे तर खव्या- रव्याचे !” हे बोलायला तिला सुचायचं. मग तिची मावशी ते कसे करायची, बेळगावहून खवा मागवायची ह्याचे यथास्थित वर्णन. ऐकूनच ढेकर यायची.
माझं लग्न ठरलं तेव्हा, “केळवणाला कंटाळली असशील, गोड खाऊन. चहालाच या सगळे.“ असं म्हणून केळवणाची बोळवणच केली, ह्या बोलघेवडीने.

दादाचे लग्न ठरले तेव्हा आमच्या घरी शकुनाच्या करंज्या करणे हा हौशीचा कार्यक्रम झाला. सर्वांनी मिळून तेव्हाच केळवण करायचे अशी टूम होती. दोघी आत्या आपापलं कौशल्य दाखवायला उत्सुक होत्या. पाहुणे मंडळीनी टेरेस भरून गेली होती. गावातच असूनही तयारीला काका-काकू मुळी आदल्या दिवशी राहायला आले ! सोनू – मोनू नाचऱ्या करवल्या.
मटारच्या करंज्या, खाजाच्या करंज्या, कानवले, साटोऱ्या, तिरंगी करंज्या इत्यादी प्रकार वर्णन करून काकूने सर्वांची मने जिंकली. तेव्हा तिच्या हाताच्या बोटांना सांध्यात त्रास होत होता. त्यामुळे पारी लाटणे, करंजी भरणे, तळणे ह्या कामातून ती बाद होती. जीभेला हाड किंवा सांधा नसतो ते एक बरं आहे !
निघताना मधुकाका बाबांना म्हणाले, “दमवतो हो तुझा लेक ! लग्नानंतर तर मंगळागौर, बारशी, वाढदिवस बघायला नको.”
दमवतो ह्या शब्दाला संदर्भ आहे. काकू मध्येच जाऊन दमल्याचे सुस्कारे टाकत होती.
”लाटलेली करंजी सुकू नये म्हणून ओलं फडकं अलगद धरून बसले मी. हात दुखले किती माझे !“
“तूप काढावं लागलं दोन वेळा, फ्रीजच्या पलीकडे फडताळ आहे. खाली बायका लाटायला बसलेल्या. मी बारीक म्हणून जाऊ शकले त्या फटीत..”
अशा प्रसंगी सहसा मधुकाका नेहमीच कृतकृत्य की काय म्हणतात ती नजर उधळतात तिच्यावर ! तशी ती उधळली आणि म्हणाले, ”घरी गेल्यावर काही करू नकोस, सोनू – मोनूसाठी. रात्री पिझ्झा मागवू.”.
पुनः प्रश्न पडतो, मधुकाका भोळे म्हणावे, निर्बुद्ध म्हणावे, की लबाड की बायकोचे बाहुले ?
मी माहेरी गेले तरी क्वचितच भेट व्हायची अलीकडे. लग्नसमारंभात अधूनमधून भेटत असत.
माझ्या आईचं शेवटचं आजारपण सुरू झालं. ते खूपच लांबलं. दादा -वहिनी होतेच. तरीही मी माहेरी जाऊन राहिले. आऊच्या काऊंची सपत्नीक फेरी व्हायची.
“सांजा खावासा वाटतो का ? खीर आवडेल का ?” काकूचं सुरू व्हायचं.
शेवटी मला निक्षून सांगावेच लागले.
“काकू, नुसती नावं घेत जाऊ नकोस. जात्या जीवाची इच्छा राहून जाईल. तिला बोलता येत नाही. प्रतिसाद पण देऊ शकत नाही ती. आणून द्यायचं काही, तर आणून दे,. आई एखादा चमचा खाते कसाबसा. तिनं खाल्लं की हवं आहे असं समजायचं…”
आई गेली. तेराव्याला नातलगांना बोलावलं. दादानं टेरेस शाकारून घेतली. चटणीपासून जेवणाचं सगळं कंत्राट दिलेलं. गुरुजींना सकाळी पोहे, चहा तेव्हढा आम्ही घरी करणार होतो. आईला ताजी करंजी फार आवडत असे. म्हणून वहिनीने तो पसारा घालायचं ठरवलं होतं.
आम्ही करंजा करायला घेत होतो. तेवढ्यात जोडी हजर.
“काही करायचं आहे का ?“
मी मिसेस आऊच्या काऊंसमोर कोथिंबीर, मिरच्या सुरी आणून ठेवले. तिला मदत हे लेबल तरी लावता येईल. थोड्या वेळाने मधुकाकांकडे तिनं तक्रार गायलीच, “हाताची आग होतेय. हिरव्या मिरच्या भारी झोंबतात. कोथिंबीर पण राठ होती. तिची पांढरी फुलं चावतात.”
करंज्या भरून झाल्यावर वहिनी मला म्हणाली, “मी तळते. तू पोहे करायला घे. दूध तापत आलं बघ.”
तेवढ्यात काकू घाबऱ्याघुबऱ्या आली, ”अगं, माझी अंगठी मिळत नाहीये.“
“बाप रे… घरीच तर राहिली नसेल ?”
“नाही. होती मघाशी. बोटांची आग झाली ना तेव्हा सरकवली गेली असेल…..“
मी निवडलेली कोथिंबीर शोधली. घरात शोधली. नंतर कचऱ्याचा डबा उलटा केला. त्यात मिळाली. अर्थात मी पुन्हा आंघोळ केली.
“तुम्ही मोनूच्या बारशाला आणलेली …” मधुकाकांकडे गोड कटाक्ष टाकत ती म्हणाली. “अंगठी सैल होते आहे. नवी करायला हवी. बोटं पातळ झालीत अगदी.“ मधुकाका कौतुकाने म्हणाले.
कृतकृत्य की काय म्हणतात ती नजर आता काकूची होती !
क्रमशः

— लेखन : वसुंधरा घाणेकर. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
