घे जन्म तू फिरूनी…
ऑफिसमधल्या सहकाऱ्याकडे लग्न होते. अशा प्रसंगी अनेकांच्या फार वर्षांनी भेटी होतात. बदली झालेले, रिटायर झालेले कित्येकजण अनपेक्षितपणे भेटतात.
अशीच परवा तेथे अरुणा भेटली. येताना दोघी कॅब करून आलो. ट्रॅफिकमुळे भरपूर वेळ लागत होता. मोठा सिग्नल संपून कॅबने जरा वेग घेतला, तोच कॅब चक्क थांबली.
“टीट्रॅफिक आहे खूप, रस्ता अर्धा खणून ठेवला आहे ..” कॅब ड्रायव्हरने सांगितले.
“जाताना बरं बाई मेट्रोने गेलो ! लागू दे वेळ. मारू गप्पा. किती वर्षांनी खूप वेळ बोलायला मिळतं आहे. ”मी गप्पांच्या मूडमध्ये होते.
“नाही गं. टेन्शन येतंय, उशीर होतोय. “तिचं सुरू झालं. “आई आहे घरी.”
“मुलं लहान म्हणून टेन्शन यायचं. स्टेशन गाठायसाठी कशा धावायचो आपण ! आता आई. ”मला जरा गंमतच वाटली.
“आईचं म्हणजे काय गं.
बाई आहे तिच्यासाठी ठेवलेली, पण तिची ड्यूटी संपायची वेळ झाली. थांबेल तशी ती म्हणा. थोडी कुरकुरेल… “
अरुणा माझ्यापेक्षा पाच वर्षांनी सिनिअर. मी आता रिटायर होऊन दोन वर्षे झाली. हिची आई. मी हिशोब करत होते. तेवढ्यात तीच म्हणाली. “अगं नव्वदीच्या पुढे कधीच पोचली आई ! मला भीती वाटते आहे, ती अमर आहे की काय !”
मी एकदम दचकूनच पाहिलं.
तिनं तिची सल सांगायला सुरवात केली.
“बाबा जाऊन पंधरा वर्षं झाली. बाबा गेल्यानंतर आई अगदी विरक्त झाली. स्वाभाविक आहे ते. पोथीवाचन, स्तोत्रपठण ह्यात बराचसा वेळ घालवू लागली. अरुणाला दोन भाऊ आहेत. त्यांच्या बायका समंजस आहेत. आलटून पालटून आई रहात असे. सणवार दादाकडे. त्यामुळे जास्त मुक्काम दादाकडे. वाद किंवा तंटे नाहीत. नातवंडे हसून खेळून असायची.
एक दिवस अचानक लक्षात आले, आई पोथीचे पान उलटत नाहीये. टीव्ही बघताना पेंगते, हल्ली. काल बघितलेल्या कथानकाची लिंक लागत नाही की काय ? हेही लक्षात आले की, अलीकडे नातवंडांना ती शोना किंवा पिलू असे म्हणते आहे. एकूण सिरियल डोक्यात शिरत नाही. बातम्यांचा अर्थ कळत नाही. नावे लक्षात राहात नाहीत. आमची शंका खरी ठरली. डॉक्टर म्हणालेच अल्झायमर आहे.”
“ही गोष्ट साधारण बारा वर्षांपूर्वीची. लगेच ट्रीटमेंट चालू केली खरी. पण तिचे ‘माणूस‘ असणेच कमी होत गेले. आईपण तर संपलेच म्हण. तीच आता लहान बाळ झाली. कपडे घालायला मदत केली की, ”मी काय लहान आहे का“ असे ओरडत असे पूर्वी. आता तसेसुद्धा ओरडत नाही. तिला स्वतःच्या वयाची जाणीवच नसणार. स्वतःची ओळखच विसरली आहे.
अपत्य म्हणून आमची कोणाचीच डोळ्यात ओळख नाही. तिचे डोळे किती मायेने हसायचे गं. ते आठवले तरी माझे डोळे भरून येतात.”
” ‘ही माझी आई आहे, हिने मला जोजवले, वाढवले आहे.’ असे सतत स्वतःला बजावावे लागते.
दादाच्या मुलीला मुलगी झाली. म्हणजे ती पणजी झाली. भाईचा मुलगा जर्मनीला गेला. माझी मुलगी यू. एस. ला गेली. आईपर्यन्त ते काही पोचलेच नाही गं.”
“त्याहून वाईट म्हणजे दादाला हार्ट अटॅक आला. पंधरा दिवस हॉस्पिटलमध्ये होता. आईला ना काळजी ना खेद.
हळूहळू ती एक जिवंत गोळा होऊन गेली आहे. अंघोळ घालायची. कपडे बदलायचे. अन्न भरवायचे. डायपर बदलायचे.
आमचा दादा तर अगदी वर जाऊन आला, म्हण. माझी शुगर हाय असते. भीती वाटते, आम्ही किती दिवस पुरणार ? आमचंही म्हातारपण सुरू झालंय आता.”
“आई आहे ती. कधी जाईल ही, असा विचार मनात आला तरी कमालीची लाज वाटते. ह्या विचाराचा उच्चार केला तर लोक हसतील. पण खरं तर भीतीच वाटते हिच्या बाबतीत मृत्यू द्यायला देव विसरला की काय !
हीच आई जन्मोजन्मी मिळावी असे वाटत असतेच प्रत्येकाला. पण आम्हाला पुनर्जन्म आता घ्यायची वेळ येईल, तरी आई इथेच असेल की काय !”
“दोन्ही भाऊ आणि वहिन्या ह्यांना आराम मिळावा, म्हणून अरुणा आईला तिच्या घरी घेऊन आली आहे. अरुणा मुलीकडे गेली तेव्हा मुक्काम भावाकडे होता. कोणीच टाळत नाही. हेळसांड करत नाही. पण त्याचबरोबर सर्वांच्याच वयोमानाप्रमाणे तक्रारी सुरू झाल्यात आता.”
“आजाराची चिंता करण्याने माणूस खचतो, आपलं कोणाला तरी करावं लागतंय ह्या संकोचाने झुरतो. इथे ती शक्यताच नाही. हळहळ वाटली खूप. अरुणाचा एकेक शब्द घरं पाडत होता, काळजात. अशा जगण्यात रुतलेली आई ! फिरुनी तिच्याच पोटी जन्मास येण्याची इच्छा करणारी तिची अपत्ये… तिच्या निर्वाणासाठी प्रार्थना करणारी ! मन अक्षरश: पिळवटून गेले.”
अरुणा भेटली त्याला दोन दिवस झाले. पण तो विषय माझ्या मनात ठाण मांडून बसला आहे.अमेरिकेसारख्या प्रगत देशात देखील अल्झायमर हा राक्षस वाढतोय. त्याचे वाढते प्रमाण आणि माणसाचे वाढणारे आयुर्मान हे गणित सोडवणे पेशंटच्या कुटुंबियांसाठी आव्हान आहे. तूर्त तरी ह्यासाठी सुडोकू आणि कोडी सोडवणे, संवाद साधत रहाणे हे उपाय प्रतिबंधात्मक मानले जातात.
काळजी करून प्रश्न सुटत नाहीत. काळजी करू नका, असे सांगून काळजी थांबतही नाही. खरे तर ह्या प्रश्नाला काही सरळसोट उत्तर किंवा उपाय नाही. पण काळजी घेणे तर आपल्या हातात आहे. आपण आपल्याच अपत्यांना भार होऊ नये ह्याचा प्रयत्न तर करायला हवा.
क्रमशः

— लेखन :’वसुंधरा घाणेकर, ठाणे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
