“ब्रिस्टल”
दुसरा दिवस संस्मरणीय होता. मानवी जिद्द आणि अथक परिश्रमातून, अपयशाला पराभूत करून, अस्तित्वात आलेल्या एका महाकाय लोखंडी जहाजावरून मानवी जिद्दीचा विजयी नगारा ऐकायला मिळाला.
बाथपासून जेमतेम अर्धा तासावर ब्रिस्टल आहे. तिथे ‘SS Great Britain Boat Museum’ पाहायचं होतं. आजवर मी अनेक म्युझियम पाहिली आहेत, हेही तसंच असेल असं वाटलं. पण आत गेल्यावर मानवी चिकाटीचं उदात्त स्मारक पाहिल्याचा आनंद झाला.
काय पाहिलं?
SS Great Britain – १९ व्या शतकातील विश्वकर्मा इसांबर्ड किंगडम ब्रुनेलचं लोखंडी बोटीचं स्वप्न. त्याचं एकच स्वप्न होतं, एकाच तिकीटावर लंडन ते न्यूयॉर्क रेल्वेने ब्रिस्टलला जायचं, तिथून बोटीने अमेरिकेला.

त्यासाठी १९ व्या शतकाच्या मध्यात त्याने लोखंडी बोट बांधली. फक्त उच्चवर्णीयांनाच नाही, तर मध्यमवर्गीयांनाही प्रवास करता यावा म्हणून.
सुरुवातीला लोक हसले, “लोखंडाचा तुकडा पाण्यात बुडतो; आणि इथे तर बोट? ती कशी तरंगेल?” पण ब्रुनेलला स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास होता. तो दिवसाला १८-१८ तास काम करत राहिला. आणि एक प्रचंड लोखंडी बोट उभी राहिली.

सुरुवातीला तिला अनेक अपघातांना सामोरं जावं लागलं. पण नंतर तीच बोट हजारो लोकांसाठी जलप्रवासाचं साधन बनली.
ब्रुनेलच्या कर्तृत्वाच्या अनेक खुणा इंग्लंडभर आहेत. पण सतत काम, आर्थिक समस्या आणि लोकांच्या टिकेला तोंड देताना त्याला आयुष्य फार लाभलं नाही. इंग्लंडच्या राणीने त्याच्या अभियांत्रिकी कर्तृत्वासाठी ‘सर’ ही पदवी देऊन गौरवलं.

आजही ती बोट ब्रिस्टलमध्ये जतन करून ठेवली आहे. ती आजही पाण्यावर तरंगते आहे, जणू ब्रुनेलचा विश्वास आजही बुडत नाही. तिच्या डेकवर गाईड जो याने ही यशोगाथा सांगितली. मानवी जिद्दीचं जिवंत स्मारक पाहिल्यासारखं वाटलं.
ब्रुनेलच्या लोखंडी बोटीची गोष्ट मनात साठवून आम्ही Bristol Art Gallery and Museum ला गेलो. आत जगभरातील विविध संस्कृतींची चित्रं, शिल्पं होती. विविध प्राणी, पक्षी, जलचरांची माहिती होती. कधी संघर्षातून, कधी समन्वयातून सृष्टीचं वैभव उभं करणाऱ्या माणसाची कहाणी तिथे दिसली. जणू जगाच्या विकासाचा चलचित्रपट होता.

दोन दिवसांच्या उन्हातून धावपळ करून थकलो होतो. हॉटेलवर परताना, रस्त्यावर दोन गायक वाद्य घेऊन गाणी म्हणत होते. क्षणभर वाटलं – ते SS Great Britain च्या डेकवर गात आहेत. आजूबाजूला बोटीवरचे लोक ऐकत आहेत. एका कोपऱ्यात ब्रुनेल सिगारेटचे झुरके घेत बसला आहे. जवळ बसलेला जो म्हणतोय, “ऐकलं का? मी तुम्हाला सांगत होतो ना, हाच तो ब्रुनेल”.
क्रमशः

— लेखन : प्रा डॉ सतीश शिरसाठ. लंडन
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +91 9869484800
