Sunday, February 1, 2026
Homeलेखस्पर्श

स्पर्श

स्पर्शाची महती काय असते, हे अखिल जगाला आकस्मिक आलेल्या या करोना पर्वाने चांगलेच दाखवून दिले आहे. या रोगाची शिकार झाल्याने एक व्यक्ती आपल्या निकटवर्तीयांना साधा स्पर्शही करू शकत नाही! स्पर्श तर दूरच पण त्या व्यक्तीला सर्वांपासून दूर, एकटे राहण्याची शिक्षा भोगावी लागते.

आपण आजपर्यंत जगत असलेले जीवन खरोखरच किती स्वच्छंदी होते, विनापाश कुठेही फिरायला आपण स्वतंत्र होतो, कुणाच्याही घरी जायला कोणाचीही आडकाठी नव्हती. ट्रेन, बस, टॅक्सी, रिक्षा यातून फिरायला जाताना कसलेही टेन्शन मनावर नव्हते. या सर्वांची किंमत आज आपल्याला कळत आहे. खरेच, किती अनमोल होते आपले आजपर्यंतचे आयुष्य!

साधा आपण आपल्या माणसाला केलेला एक स्पर्श दाखवून देतो त्या माणसाबद्दल आपल्या मनात असलेली आत्मीयता. आईवडिलांचा हात पकडून वाटचाल करत असलेली मुले त्यांच्या त्या कृतीतूनच दाखवून देतात ते त्यांच्यावर किती विसंबून आहेत म्हणून. एखाद्या अतीसुखद, आनंदाच्या प्रसंगी आपल्या पालकांना मारलेली गच्च मिठी, बहीण भावांमधील हळुवार तसेच खट्याळ प्रेम व्यक्त होताना एकमेकांना मारलेले धपाटे, आपले गुपित मित्र मैत्रिणींबरोबर उघड करताना त्यांच्या कानात सांगितलेल्या अनेक गुजगोष्टी, शाळेत मित्रांबरोबर डबा खाताना हक्काने त्यांच्या डब्यातील खाऊ हाताने काढून घेणे, मित्राला वाचवण्यासाठी प्रसंगी त्याच्या वाटचा मार शिक्षकांकडून स्वतःला घेणे, अशा अनेक गोष्टींतून आपण एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करतो. स्पर्शातून एक आगळेच नाते तयार होते व्यक्ती व्यक्तींमध्ये.

रस्ता ओलांडताना वृध्द अथवा अपंग व्यक्तींना हात देऊन मदत करणे, जिना चढताना एखाद्याच्या हातातील सामानाची पिशवी घेऊन त्यांना मदत करणे, खेळताना कुणी पडले तर त्याला मदतीचा हात देऊन उठवणे, प्रवासात एखाद्याला जागा करून देणे, ट्रेनमध्ये गर्दीच्या वेळी चढताना एखाद्याचा हात पकडून त्याला आत घेणे, या सर्व गोष्टीतून प्रथम पुढे होतो तो एखाद्याचा मदतीचा हातच.

एखाद्या दुःखद प्रसंगी मित्राच्या पाठीवर ठेवलेला नुसता हातच दर्शवतो त्याला आपणही या प्रसंगी त्याच्या बरोबरच आहोत म्हणून. एखाद्याचे कौतुक करताना, शाबासकी देताना त्याच्याशी जोरजोराने केलेले हस्तांदोलन त्याला पटवून देते आपले त्याच्यावरचे असलेले प्रेम. खूप दिवसांनी भेटलेल्या आप्तांना, नातलगांना मारलेली गच्च मिठी दाखवून देते आपल्याला त्यांचा किती विरह झाला होता ते. लहान बहीण भावंडांचा कान पिरगळताना, त्यांच्या पाठीत धपाटे मारताना, प्रसंगी त्यांना हळुवारपणे जवळ घेताना, शिस्तीचे धडे गिरवतानाच दिसतात. पुढील शिक्षणाकरिता अथवा नोकरीसाठी दुसऱ्या देशात जाताना आप्तगणांचे हातात घेतलेले हात सहजासहजी सोडवता येत नाहीत. हे सगळे विविधांगी एकमेकांना सहेतुक केलेले स्पर्शच तर आहेत एकमेकांना परस्परांबद्दल वाटत असणाऱ्या स्नेहाचे, आत्मीयतेचे, प्रेमाचे आणि सहृदयतेचे साक्षीदार.

प्रेम व्यक्त करताना त्यासाठी एकमेकांशी आपल्या भाषेतच व्यक्त व्हायला पाहिजे असे काही नाही, तर अगदी एका हलक्याशा स्पर्शाने देखील ते हृदयाहृदयातील मैलोंमैलांचे अंतर एका क्षणात पार करू शकते. स्पर्शाची भाषाच इतकी बोलकी आहे की तिला कोणत्याही भाषेचा अडसर राहत नाही. आपल्या माणसाला ती अचूक ओळखते, आणि आपल्या स्पर्शाच्या माध्यमातून बांधून ठेवते.

लेखिका – मानसी लाड

अंध व्यक्तींबद्दल तर स्पर्श हा त्यांना एखाद्या दैवी वरदानाप्रमाणेच लाभलेला आहे.त्यांचे स्पर्शज्ञान हे त्यांना लाभलेल्या सहाव्या इंद्रियाप्रमाणे आहे. डोळस व्यक्तीपेक्षाही अचूक अंदाज असतात त्यांचे या स्पर्श ज्ञानाच्या साहाय्याने.

मानवी जीवन हे स्पर्शाविना खरोखरच अपूर्ण आहे. ते अधिकाधिक आनंदी, निरोगी तसेच उत्साहवर्धक राहण्यासाठी त्याला एकमेकांच्या निकट सहवासाची म्हणजेच स्पर्शमय जादुई वातावरणाची नितांत गरज आहे आणि जोपर्यंत आपले एकमेकांच्या हातात हात आहेत, तोपर्यंत बाहेरील दू:शक्तीचा सामना करण्याचे बळ आपल्या हातात निश्चितच असेल. आपण शहाण्यासारखे वागून ते दिवस पुन्हा परत येतील, अशी आशा निश्चितच करू या.

– लेखन: मानसी लाड.
-संपादन: देवेंद्र भुजबळ. 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Anil Deodhar on झेप : 9
Vinod Ganatra on झेप : 9