Homeलेख"अधिकमास : आधुनिक दृष्टिकोन" -1

“अधिकमास : आधुनिक दृष्टिकोन” -1

सध्या अधिकमास सुरू आहे. या अधिकमासानिमित्ताने परंपरेला आधुनिकतेची जोड कशी आवश्यक आहे, या बद्दलची चार भागांची लेखमाला आज पासून प्रसिद्ध करीत आहोत. ही लेखमाला सिंगापूर स्थित ऋचा कुलकर्णी लिहिणार आहेत.

अल्प परिचय : ऋचा उपेंद्र कुलकर्णी यांचे गेली २० वर्षे सिंगापुरमध्ये वास्तव्य आहे. त्या तिथे जवळपास १५ वर्षापासुन रसायनशास्त्राचे अध्यापन करीत आहेत. महाराष्ट्र मंडळ सिंगापूरच्या शब्दगंध उपक्रमामुळे त्यांना वाचनाची कवितेची आवड लागून पुढे ती जोपासली गेली. त्यांच्या काही कविता पुस्तक स्वरूपात प्रकाशित झाल्या आहेत तसेच आंतरराष्ट्रीय मंचावरून त्यांनी सदरीकरणही केले आहे .
न्यूज स्टोरी टुडे परिवारात ऋचा कुलकर्णी यांचे मनःपूर्वक स्वागत आहे.
– संपादक

सध्या अधिक मास चालू आहे, त्या निमित्ताने आपण पौराणिक कथा, व्रत-वैकल्ये या सर्वांची माहिती घेत आहोत आणि आजच्या धकाधकीच्या जीवनात हे व्रत नियम पाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत.

मी पुढील चार भागांद्वारे अधिक मास, दशावतार यांच्याकडे 21 शतकाच्या द्ष्टीकोनातून बघण्याचा प्रयत्न करणार असून त्याचा आपल्याबरोबरच पुढच्या पिढीसही फायदा होइल अशी आशा आहे.

अधिकमासाला पुरुषोत्तम मास असे म्हणतात. या महिन्यात भगवान विष्णुंच्या बरोबरीने त्यांच्या अवतारांची देखील आराधना करतात.

आपण या अवतारांचा क्रम बघितला, तर त्या फक्त देवकथा नाहीत तर जीवनाच्या उत्क्रांतीचे, मनाच्या विकासाचे आणि आत्मपरिवर्तनाचे दहा टप्पे आहेत, असे दिसून येते.

मानव उत्क्रांतीचे टप्पे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे. पाण्यातील एकपेशीय अमिबापासून ते आजचा बुद्धिमान अतिप्रगत मानव. जर बारकाइने विचार केला तर, दशावतारांमध्ये देखील या उत्क्रांतीचे टप्पे दिसून येतात. त्याचबरोबर यांचे साधर्म्य आपल्याला “Neural Pathways”, मेंदूची विचार करण्याची किंवा सवय बदलण्याच्या प्रक्रिये बरोबर जाणवले.

पुढे जाण्याआधी आपण थोडे मेंदूचे विज्ञान जाणून घेऊया .आपल्या मेंदूत एक भाग आहे ज्याला “Basal Ganglia” म्हणतात. हा भाग सवयी साठवतो. जेव्हा एखादं काम आपण पुन्हा पुन्हा करतो, तेव्हा मेंदू त्याची शॉर्टकट फाईल बनवतो आणि मग ते काम करायला कमी ऊर्जा लागते, विचार करावा लागत नाही ते आपोआप होतं. सकाळी उठल्यावर दात कसे घासायचे? उजवीकडून का डावीकडून हे आपण विचार करत नाही ते आपोआप होतं. मग समस्या ही आहे की वाईट सवयी ही अशाच आपोआप अंगवळणी पडतात .

प्लास्टिक सर्जन डॉक्टर मॅक्सवेल यांनी 1960 मध्ये एक गोष्ट बघितली. जेव्हा प्लास्टिक सर्जरीने रुग्णाचा चेहरा बदलला जायचा तेव्हा त्या रुग्णाला नवीन चेहऱ्याची सवय व्हायला किमान 21 दिवस लागायचे. त्यांनी सायको सायबरनेटिक्स नावाचं पुस्तक लिहिलं आणि 21 दिवसांचा सिद्धांत मांडला.

लंडनच्या फिलिपा लॅली यांनी 2009 मध्ये 96 लोकांवर प्रयोग केला. त्यांना नवीन सवय लावायला सांगितली आणि किती दिवस लागतात ते मोजलं. निष्कर्ष असा निघाला की सोप्या सवयींसाठी 18 ते 21 दिवस लागतात, मध्यम साठी 30 ते 40 दिवस आणि कठीण सवयींसाठी 66 किंवा जास्त दिवस लागतात म्हणजेच सरासरी 30 ते 35 दिवस.

आता बघा अधिक मास 32 ते 33 दिवसांचा असतो. आपल्या पूर्वजांना “Neural Pathways“ माहीत असतीलही कदाचित किंवा त्यांनी अनुभवातून हे गणित समजून घेतलं होतं आणि म्हणूनच अधिक मास अंतर्गत परिवर्तनासाठी राखून ठेवला होता.

आपण प्रत्येक अवताराचा मानव उत्क्रांती आणि सवयी बदलण्याचा मेंदूचा प्रवास म्हणजेच “Habit Change Process“ शी असलेला संबंध पुढील भागात बघू या.
क्रमश:

ऋचा कुलकर्णी.

— लेखन : ऋचा कुलकर्णी. सिंगापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +91 98694 84800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments