Thursday, February 12, 2026
Homeसाहित्यमावळतीचे रंग..

मावळतीचे रंग..

रंगकुंचला घेऊनी भास्कर
क्षितिजाच्याही पार निघाले
मावळतीचे रंग अनोखे
जाता जाता शिंपून गेले

तांबूस करड्या रंग छटांनी
पश्चिमेस नभ व्यापुन जाई
रूप देखणे लोभसवाणे
मुग्ध होऊनी अवनी पाही

हिरव्या पाचुवरी झाकले
जणू केशरी रेशीम शेले
मावळतीचे रंग अनोखे
जाता जाता शिंपून गेले

गुरेवासरे परतू लागे
घुंगरवाळी खुळखुळ झाली
किलबिल करिती पक्षी इवले
घरट्याची का ओढ लागली ?

रामराउळी सांजआरती
घणघण घंटा निनाद झाले
मावळतीचे रंग अनोखे
जाता जाता शिंपून गेले..

अल्लड वारा गिरक्या घेता
उमलू लागे कळी पाकळी
दरवळणाऱ्या अंगणातला
दीप उजळतो संध्याकाळी

देवापुढती शुभंकरोती
बोल बोबडे घुमू लागले
मावळतीचे रंग अनोखे
जाता जाता शिंपून गेले..

भाग्यश्री खुटाळे

– रचना : भाग्यश्री खुटाळे. फलटण.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Kavitha Tenny Nadar on झेप : 11