Wednesday, June 18, 2025
Homeबातम्याआरोग्य विज्ञान विद्यापीठ : वर्धापन दिन उत्साहात संपन्न

आरोग्य विज्ञान विद्यापीठ : वर्धापन दिन उत्साहात संपन्न

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 24 वा वर्धापन दिन कार्यक्रम नाशिक येथे काल उत्साहात संपन्न झाला. प्रारंभी विद्यापीठाच्या प्रांगणात मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प.,  अ.वि.से.प., वि.से.प यांनी आरोग्यशास्त्र महाविद्यालयांची गुणवत्ता वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे प्रतिपादन केले.

त्या पुढे म्हणाल्या की, आरोग्य विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालय चांगली कामगिरी करीत आहेत. विद्यार्थ्यांना अधिक सक्षम बनविण्यासाठी महाविद्यालयांच्या गुणवत्ता वाढीसाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे मूल्यांकन, प्रशिक्षण असे अनेक उपक्रम अधिक समर्थपणे राबविले जाणार आहेत. ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या उपयोग मोठया प्रमाणात उपयोग करावा. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर समाजसेवेचे व्रत हाती घ्यावे. सर्व शाखेतील विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे अधिक लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. विद्यापीठाकडून विविध संशोधन अभ्यासक्रम व उपक्रम राबविण्यात येत आहेत. माहिती व तंत्रज्ञानाचा वावर करुन विद्यार्थ्यांनी अधिक सक्षम होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि जल्लोष वाखानण्याजोगा आहे. विद्यार्थ्यांच्या गुणांना पाठबळ देण्यासाठी विद्यापीठ नेहमीच प्रयन्तशील राहिल.
विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ यांनी प्रास्ताविकात सांगितले की, माननिय कुलगुरु यांच्या व्हिजन डॉक्युमेंटनुसार विद्यापीठाची वाटचाल सुरु आहे. ग्रीष्मकालिन आंतरवासियता उपक्रम, ग्रीन कॅम्पस, मालेगांव मॅजिक, पुणे येथे जेनेटिक लॅबचा शुभारंभ, पदव्युत्तर पदवी महाविद्यालयासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयासमवेत सामंजस्य करार, नॅकच्या निर्देशानुसार ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळांचे आयोजन याबाबत कार्यवाही सुरु आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासाबरोबर संशोधन, वैज्ञानिक प्रयोग आणि इतर विद्वत्तापूर्ण तपासांमध्ये सैद्धांतिकज्ञान आणि विद्यार्थ्यांचे व्यावहारिक कौशल्ये विकसित होण्यासाठी विद्यापीठाकडून अनेक उपक्रमांना प्रारंभ करण्यात आला असून विद्यापीठाचा जागतिक स्तरावर लवकरच नावलौकिक होईल .

जीवन गौरव पुरस्कारार्थी डॉ. सदानंद सरदेशमुख यांनी मनोगतात सांगितले की, शिक्षणाचा उपयोग रुग्णसेवा व समाजाच्या हितासाठी करावा. वडिलांकडून मिळालेली शिकवण व प्रेरणा मला नेहमी दिशादर्शक आहे. या सन्मानात माझे सहकारी व कुटुंबियांचा सहभाग मोलाचा आहे. विविध विद्याशाखांनी एकत्रित येऊन उपचार पध्दतीचे तंत्र विकसित केले आहे. देशातील सुप्रसिध्द उद्योगपती, मा. राज्यपाल यांनी आमच्या कार्याचे कौतुक केले असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालीदास चव्हाण यांनी सांगितले की, विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांना प्रोत्साहनासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. तसेच दिल्या जात असणाऱ्या जीवन गौरव पुरस्कारांमुळे शिक्षकांना प्रेरणा मिळते.

मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांना मा. राष्ट्रपती यांच्या हस्ते नुकतेच परम विशिष्ट सेवा पदक व दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे लक्ष्मीबाई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यापीठ परिवाराकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले.

डॉ. सदानंद सरदेशमुख
आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान विद्यापीठातर्फे सन्मान करण्यात येतो. आयुर्वेद विद्याशाखेतील डॉ. सदानंद प्रभाकर सरदेशमुख यांना मानचिन्ह, शाल व जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
डॉ. सरदेशमुख यांनी चार दशकापेक्षा अधिक काळ आयुर्वेदाच्या क्षेत्रात अध्यापन आणि संशोधन क्षेत्रात अभूतपूर्व कार्य केले आहे. यापूर्वी मुंबई विद्यापीठातील आयुर्वेद विद्याशाखेचे डीन, सिनेट सदस्य, पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे डीन आणि आयुर्वेद महाविद्यालय, वाघोली, पुणे येथे ते प्राचार्य होते. कर्करोग आणि एड्सच्या आयुर्वेदिक उपचार पध्दती संशोधनात त्यांचे कार्य महत्वपूर्ण आहे.

डॉ. सरदेशमुख यांना भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाकडून राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्कार आणि महाआयुष कमल रत्न जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. परदेशात आयुर्वेदाच्या प्रचारात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

अन्य पुरस्कार
वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पुढील पुरस्कार प्रदान करण्यात आले. विद्यापीठातर्फे अहमदनगरचे व्ही.व्ही.पी.एफ वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. संदीप सिताराम कडू आणि एस. व्ही.एन.एच.टी आयुर्वेद महाविद्यालय डॉ. अनंतकुमार वसंत शेकोकर यांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार.

नाशिकचे वसंतराव वैद्यकीय महाविद्यालय कु. उल्फत इमरान परदेशी व पुण्याच्या टिळक आयुर्वेद महाविद्यालयाचा कु. शुभम रामनारायण दूध, संगमनेरच्या एम. एच. एफ. होमिओपॅथी महाविद्यालयचा कु. प्रशांत नरेश पाटील व मुंबईच्या श्रीमती एस. पी. गंभीरचंद नर्सिंग महाविद्यालयाची कु. अंजू मारीमिथु यांना उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार.

नाशिकच्या के.बी.एच. दंत महाविद्यालयाची
कु. कृष्णप्रिया प्रवीण गट्टाणी, इस्लामपूरच्या एल.आर.पी. आयुर्वेद महाविद्यालयाची कु. दामिनी पुंडलिक बागुल आणि पुण्याच्या पी. एस. मॉडर्न कॉलेज ऑफ फिजीओथेरपीचा कु. शौनक सुनील प्रसाद यांना उत्कृष्ट क्रीडा विद्यार्थी पुरस्कार

राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कारांमध्ये मुंबई विभागातून उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी म्हणून मुंबईच्या वाय.एम.टी. आयुर्वेद महाविद्यालयाचे डॉ. आशिष अरुण पुंडे, पुणे विभागातून टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या डॉ. ऐश्वर्या एम. रानडे आणि नाशिक विभागातून श्रीमती के. बी. आबाड होमिओपॅथिक महाविद्यालयाचे डॉ. अमित पी. जगझाप यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम पाच हजार सन्मानित करण्यात आले.

राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कारात मुंबई विभागातून वाय.एम.टी. आयुर्वेद महाविद्यालयाचा कु. अमित अनिल इरकर, पुणे विभागातून टिळक आयुर्वेद महाविद्यालयाचा कु. विराज दत्तात्रय भोसले आणि कु. ऐश्वर्या आनंद भुसे यांना तसेच नाशिक विभागातून मोतीवाला होमिओपॅथिक महाविद्यालयाची कु. कोमल गिरीश ब्रम्हेचा आणि कु. पवन सतीश बागुल यांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व रोख रक्कम दोन हजार देऊन गौरवण्यात आले.

उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना एकक मध्ये नाशिकच्या होमिओपॅथिक महाविद्यालयाच्या श्रीमती के. बी. आबाड महाविद्यालयाची कु. सना शेख यांना, इगतपुरीच्या एस.एम.बी.टी आयुर्वेदिक महाविद्यालयाची कु. पिल्लई फ्रॅन्को प्रिंस यांना गौरविण्यात आले.

शासनाच्या विविध उपक्रमात सहभागी व पुरस्कार प्राप्त संगमनेरचे एम. एस. फाउंडेशन होमिओपॅथिक महाविद्यालयाचे श्री. दिग्गज सोनवणे आणि मार्गदर्शिका डॉ. स्वाती जाधव यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.

कोविड काळात विद्यापीठाने ऑफलाईन परीक्षा घेतल्या. आव्हानात्मक परिस्थितीत कामकाज यशस्वी करणारे विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांचा याप्रसंगी विशेष सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास विविध डीन,प्राध्यापक, विद्यार्थी, पालक, विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

– टीम एनएमटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments