Homeबातम्यामुंबई साहित्य संघाचा वर्धापन दिन आणि पुरस्कार समारंभ संपन्न

मुंबई साहित्य संघाचा वर्धापन दिन आणि पुरस्कार समारंभ संपन्न

मुंबई मराठी साहित्य संघाचा ९१ वा वर्धापन दिन आणि वाचक दिन नुकताच मुंबई मराठी साहित्य संघाच्या डॉ. अ. ना. भालेराव सभागृहात संपन्न झाला.

या समारंभाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ नाट्यकर्मी मा. रोहिणी हट्टंगडी यांनी भूषविले. भालेराव कुटुंबीयांतर्फे देण्यात येणाऱ्या यशवंत पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे उपस्थित होत्या. मंगल विजय केंकरे यांना या कार्यक्रमात ‘सहचारिणी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी साहित्य संघाचे मुखपत्र असलेल्या साहित्य दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. या अंकाचे संपादन श्री. एकनाथ आव्हाड, प्रा. प्रतिभा बिस्वास आणि श्री. चंद्रशेखर गोखले यांनी केले आहे. तसेच साहित्य संघ प्रकाशित “मराठी गजल : एक दृष्टीक्षेप “या प्रा. प्रतिभा सराफ संपादित पुस्तकाचे प्रकाशन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमात साहित्य शाखा कार्यवाह प्रा. प्रतिभा सराफ यांनी सर्वांचे स्वागत केले तर डॉ. उज्वला मेहेंदळे यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख कार्यवाह डॉ. अश्विनी भालेराव-गांधी यांनी आभार मानले.

या प्रसंगी डॉ. मांगीलाल राठोड, मराठी भाषा अभ्यासक डॉ. विणा सानेकर, व्यंगचित्रकार प्रदीप म्हापसेकर, सुनील तांबे, सुनीला सोवनी राजीव करडे, सचिन मणेरीकर, देवदत्त परुळेकर, विलास सिंदगीकर, अनघा प्रकाशन इत्यादींना विविध साहित्य गौरव पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

साहित्याच्या अभ्यासाने जी प्रगल्भता येते त्याचे वर्णन करताना अश्विनी भिडे म्हणाल्या, “साहित्याच्या वाचनाने मला, माणसामाणसांची नाती समजून घ्यायला, माणसाचे मन समजून घ्यायला मदत झाली. प्रशासनाची कामे करताना माणसाशी संबंध येतो आणि त्यांना समजून घेण्याची वृत्ती असेल तर काम पुढे जाऊ शकते.”

या कार्यक्रमाच्या अध्यक्ष रोहिणी हट्टंगडी म्हणाल्या, “नाट्यसृष्टीत काम करताना आम्ही विविध भूमिका साकार करतो. निरनिराळ्या पात्रांमध्ये परकाया प्रवेश करताना, आणि प्रयोगात मागून प्रयोग करताना आमच्यावर त्या पात्रांचा परिणाम होत असतो, जसं कस्तुरबा साकार केल्यानंतर माझ्यातील क्षमाशील वृत्ती वाढली. साहित्याचा आपल्यावरती असा सकारात्मक परिणाम होत असतो.”या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रतिभा बिस्वास यांनी केले.

या कार्यक्रमानंतर मुंबई मराठी साहित्य संघाच्या ९० वर्षाच्या काळातील आजी-माजी अध्यक्षांच्या म्हणजेच द. के. केळकर, प्रभाकर पाध्ये, न. र. फाटक, गंगाधर गाडगीळ, दाजी भाटवडेकर, जयंत साळगांवकर, मधु मंगेश कर्णिक, अचला जोशी, उषा तांबे इत्यादींचे नाट्यप्रवेश, कवितागायन आणि साहित्यसंपदा साभिनय वाचन रूपात सादर करण्यात आल्या.यात राजन ताम्हाणे, श्रीनिवास नार्वेकर, सुप्रिया विनोद, हेमंत साने आणि संजय मोने हे नाट्यकर्मी सहभागी झाले. या संपूर्ण कार्यक्रमाचे संहिता लेखन शिल्पा सुर्वे यांनी केले तर सूत्रसंचालन सुप्रसिद्ध अमेय रानडे यांनी केले. यात ‘तुझे आहे तुजपाशी’ नाटकातील प्रवेश सादर झाला त्यात काकाजींची महत्त्वाची छोटेखानी भूमिका उन्मेश गोळे, धनेश कानेटकर, स्वरूप काळे, पद्मजा बापये, लुब्धा भोपटकर, डॉ. मनोज वराडे इ. ज्याचे अतिशय उत्तम असे दिग्दर्शन अजित भोपटकर यांनी केले.

या समारंभासाठी साहित्य संघाच्या अध्यक्ष उषा तांबे, कोषाध्यक्ष आनंद बिर्जे यांची आणि नाट्य, साहित्य, संगीत, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सदाशिव रामचंद्र पोटे on पुस्तक परीक्षण
पूजा टंकसाळे सातारा on कोणी तरी असावे….