Homeलेखमाझी जीवन नौका : २१

माझी जीवन नौका : २१

पाहता पाहता फेब्रुवारी संपत आला. समुद्र अजूनही बऱ्यापैकी शांतच होता. त्यामुळे सेलिंग सुखावह होतं. हल्दिया तुतीकोरीन वाऱ्या सुरूच होत्या.

चिऊ आणि बाळ गाणी
चिऊचा दंगा दिसामासाने वाढत होता. पोर्टला असताना किनाऱ्यावरच्या चिऊ-काऊ तिला बघायला खूप आवडायच्या. डेकवर फेरी मारायला नेलं की खुश असायची. थर्ड ऑफिसर रामू किंवा कॅडेट्स हे पण तिला घेऊन डेकवर फिरवायचे.

मी तिला कडेवर घेऊन….
अडगुलं मडगुलं
सोन्याचं कडबुलं |
रुप्याचा वाळा
तान्ह्या चिऊबाळा |
तीट लावू ||
असं गाणं म्हणून मी तिला तिटी लावायला लागले की तिला खूप गंमत वाटायची. ती अगदी खिदळायची.

मी तिला आणखी एक गाणं शिकवलं होतं…
लवलव साळूबाई
मामा येतो,
खोबऱ्याची वाटी
हातामध्ये देतो |
मामी येते,
एवढासा तुकडा
मोडून देते ||
मी हे गाणं म्हणताना मुकुंदानी ऐकलं. ते म्हणाले, “अगं या गाण्याचा शेवट काहीतरी वेगळा आहे ना ? मामी खोबऱ्याची वाटी हिसकून घेते वगैरे असं मला आठवतंय.”
मी म्हटलं, “आमच्याकडे म्हटल्या जाणाऱ्या गाण्यात असली हिसका हिसकी नाही. उगाच मामीला नावं ठेवायची.”
माझी आई हे गाणं म्हणताना…
मामी येते
एवढासा तुकडा
मोडून देते

असं म्हणते.
मामा आणि भाचे दोघं मिळून ओल्या नारळाचा फन्ना उडवायला बसलेत. मग मामीने स्वयंपाकात काय घालायचं ? म्हणून दोघांनाही खोबऱ्याचा एवढासा तुकडा मोडून देते. असा त्याचा अर्थ मला माझ्या आईने सांगितलं होता.

सुचित्रा पण चिऊला एक खूप छान एक कोकणी गाणं म्हणायची. अजित सुचित्राची मातृभाषा कोकणी होती. यशोदा कृष्णाला उद्देशून हे गाणं म्हणते असा अर्थ होता. त्या गाण्यातल्या पहिल्या एक दोन ओळीच मला आठवतात….
पाव नंदन पाव नंदन धावरी पैया |
बाहिर गेल्लेल् नंदनाका घरांत आपय्या ||

एक छोटी टी पार्टी
तुतीकोरीनला असताना शिपचे एजंट मचॅडो यांची मुलगी एकदा शिप वर आली होती. आमच्या केबिनमध्ये सुचित्रा, ती आणि मी मस्त गप्पा रंगल्या होत्या. मला वाटतं तिचा नवरा, मचॅडोचा जावई, आपल्या सासऱ्यांच्या व्यवसायात मदत करत होता. तिनं एकदा तिच्या घरी आम्हाला चहाला बोलावलं.

तिच्या घरी गेलो. तिने तिचा नवरा कॉलेजमध्ये असताना तिला कसा भेटला, त्यांचं प्रेम कसं जुळलं, कॉलेजमधे प्रोफेसरचे लेक्चर सुरू असताना तिचं लक्ष फक्त त्याच्यातच कसं गुंतलेलं असायचं, कधी एकदा तास संपतोय आणि आपण दोघं हातात हात घालून बाहेर भटकायला कधी सटकायचं याचाच विचार ती कसा करत बसायची…  हे सारे सांगितलं !
अगदी एखाद्या हिंदी सिनेमातली प्रेमकथा समोरच बघतोय असं मला वाटलं. तेवढ्यात तिचा नवरा पण आला. त्याच्याशी ओळख करून दिली. तिची एक रोशे म्हणून मैत्रीण पण गप्पा मारायला आली होती.

त्यादिवशीच्या दुपारच्या चहात एक खास पदार्थ तुतीकोरीनची स्पेशालिटी म्हणून तिने पेश केला होता. ती म्हणजे तामिळनाडूची, तुतीकोरीनची, खास काजू मॅकरोनी काजूचं पीठ, तूप, साखर, इसेन्स घालून त्याच्या शंकूच्या आकाराच्या baked वड्या केलेल्या होत्या. त्या कमालीच्या चविष्ट खमंग आणि अगदी हलक्या होत्या….. इतक्या हलक्या की तोंडात घातल्याबरोबर विरघळाव्या !
त्या दिवशी तर दोन-तीन  डिश भरून तरी मॅकरोनी आम्ही संपवल्या. परत येताना तुतीकोरीनच्या मार्केट मधून काजू मॅकरोनी विकत पण घेतल्या. नवरे मंडळी खुश !

एकीकडे आमच्या गप्पा आणि दुसरीकडे चिऊ म्हणजे अनुश्रीची अखंड चुळबूळ आणि दंगा सुरू होता. तिच्यासाठी भरपूर खेळणी असूनही आमच्या हातातलीच प्रत्येक गोष्ट तिला ओढायची होती. या मुलीला सांभाळणं खरोखर अवघड काम होतं. सुचित्राला कधी एकदा परत शिपवर जातोय असं झालं होतं.

परत येताना कारमध्ये सुचित्रा मला वाटेतच म्हणाली, “खाली हम दोनो ये लडकी को फिरसे कभी अकेले बाहर नही लेके जायेंगे. इतना सताया है आज इसने !”असे

सेलिंग सुरू होतं. घरून आलेली पत्रे पुन्हा पुन्हा वाचून मी त्याची किती पारायणे केली असतील देव जाणे.

एकदा डेरुम मधल्या एका कपाटात अगदी तळाशी जुनं हिंदी वर्तमानपत्र मिळाले. आधीच्या कुठल्या तरी सेकंड इंजिनियरने आणलेला तो पेपर असावा. या पेपरची एक-दोनच पाने शिल्लक होती. माझी सहज नजर गेली. त्यात हिंदी लोकगीतांच्या वर एक लेख होता. नव्या लग्न झालेल्या मुलीला माहेरची सतत आठवण येते. ती त्या गाण्यात वडिलांना विनवत असते…
अबके बरस बाबुल
भैय्या को भेज ||
बाबा, सणासाठी मला माहेरी न्यायला या वर्षी तरी दादाला पाठवा ना. असं ती वडिलांना सांगते आहे.
ते वाचलं मात्र मला असं काही रडू आलं की ते आवरेच ना… मला सोसेना ! प्रसन्नदादा, अतुल आणि माहेरच्या आणि वृंदाच्या ही आठवणीने व्याकुळ व्हायला झालं.
आपल्या सगळ्या लोकांच्या पासून आम्ही दोघे इतके लांब होतो की आता कधी भेट होणार या विचाराने जीव गलबलून जायचा.

होळी आणि गुढीपाडवा
१ मार्चला दादा वहिनींच्या म्हणजे माझ्या सासू-सासर्‍यांच्या लग्नाचा वाढदिवस ! आम्ही हल्दिया मध्ये होतो. तिथून घरी फोन लावायचा प्रयत्न केला. पण फोन लागू शकला नाही. दादा वहिनींशी, वृंदाशी बोलता आलं नाही, याचं खूप वाईट वाटलं. अर्थात लग्नाच्या वाढदिवसाचे पत्र मी आधीच पाठवलं होतं.

त्यादिवशी होळी होती. लग्नानंतरची पहिली होळी. सकाळी उठल्याबरोबर दुधात थोडं कुंकू आणि केशर कालवून मुकुंदांच्या गालाला लावलं. चिऊच्या गालाला पण लावलं. मग मुकुंद काय सोडताहेत ! त्या लाल केशरी रंगात त्यांनी मला भिजवून टाकलं. शिपवर सर्वांनी मला चिडवून बेजार केलं. त्यात सगळ्यात पुढे होती सुचित्रा !

आमचं सेलिंग सुरू होतं. 11 मार्च माझे बाबा, 13 मार्च सासुबाई म्हणजे वहिनी आणि 16 मार्च माझी लाडकी वृंदा यांचे वाढदिवस. सर्वांना वाढदिवसाची पत्रे लिहिलेली होती. फोन करणं शक्यच नव्हतं.
१७ मार्चला गुढीपाडवा ! तुतीकोरीनला निघालो होतो. नवीन वर्षाचा पहिला दिवस. लग्नानंतरचा हा ही मोठा सण.
सासर माहेर सर्वांच्या आठवणीने मन उमळून येत होतं. सध्या जहाज हेच माझं घर होतं. जहाजाची सर्व मंडळी हेच आमचे आप्तस्वकीय होते.

मग चीफस्टुअर्ड आणि चीफ कुकला आधीच सांगून ठेवलं की उद्या मी सर्वांसाठी साखर भात करणार आहे.
हे म्हणाले, “अगं कशाला हा घाट घालते आहेस ? एवढं तुला सगळं करायला जमणार का ?”
मी म्हटलं, “अजिबात काळजी नको. आपल्या कमलाकाकू रुचिरामधून मदतीला आणि मार्गदर्शनाला उभ्या आहेतच ना !”

कुकला त्याच्या अंदाजाने आदल्या दिवशी रात्री तांदूळ धुऊन ठेवायला सांगितले होते. त्यादिवशी सर्वांसाठी मी साखर भात बनवला ! अर्थातच खाली गॅलीत जाऊन चीफ कुक, सेकंड कुक सगळ्यांची मदत घेऊनच !
बदाम, काजू, केशर, बेदाणे वेलची घालून अख्ख्या बासमती तांदुळाचा भात बनवला होता. नारळीभातात घालतो तसं भरपूर ओलं खोबरं पण घातलं. तुपात लवंगांची फोडणी केली आणि जहाजावरची भली मोठी हंडी भरून तयार झाकलेल्या साखर भाताचा घमघमाट सगळीकडे सुटला.

आम्ही दोघेही जेवायच्या वेळी नवे कपडे घालून सर्वांना पाडव्याच्या शुभेच्छा द्यायला मेस मध्ये गेलो. सर्वांना खूप आनंद झाला. अगदी आपल्या घरी असल्यासारखं वाटलं असं प्रत्येकाने आवर्जून सांगितलं. सर्व ऑफिसर्स आणि क्रू मेंबर्सनी मनसोक्त साखर भात खाल्ला. अगदी चट्टा-मट्टा उडवला !

आपण केलेला पदार्थ सर्वांनी आवडीने खाल्ला आणि तृप्त झाले की खूप समाधान मिळतं, असं आई नेहमी म्हणायची. त्याचा मी साक्षात अनुभव घेत होते. एकूण घाट घालून सगळ्यांना खायला प्यायला घालायच्या हौशीचे बीज आईच्या हाताखालीच रुजलं होतं. संसारातल्या गृहिणी पदात मी हळूहळू रूळत चालले होते.

दोन दिवसांनी तुतीकोरीनला पोहोचलो. संध्याकाळी बाजारातून भरपूर गजरे आणले आणि बेडरूम मध्ये मांडलेल्या देवांना विहिले. उदबत्ती लावली. बेडरूमच्या दाराला गजऱ्याचे तोरण लावलं. केबिनचं घर कधीच बनून गेलं होतं !

घरून दादा-वहिनी, आई-बाबा, वृंदा, अतुल, प्रसन्नदादा यांची पत्रं मिळाली. आम्ही आधाशा सारखी घरची पत्रे वाचून काढली. घरची ख्याली-खुशाली, बातम्या समजत होत्या. कोणा मैत्रिणींची ठरलेली लग्नं, धाकटी मामे भावंडं शाळेत होती. त्यांच्या परीक्षा, स्पर्धा यांच्या बातम्या समजत होत्या.

घरून आई-बाबांच्या पत्रातील एका बातमीने थोडी काळजी लागून राहिली होती. आमच्या अव्वाची – म्हणजे माझ्या आजीची, बाबांची आई, तब्येत बरी नव्हती.
बहुतेक वेळा ती आमच्याकडेच सांगलीला असायची. कधीतरी मोठ्या काकांच्याकडे मुंबईला, धाकट्या काकांच्या कडे तासगावला, अगर कोणत्यातरी आत्याकडे थोडे दिवस जाऊन यायची.
माझ्या लग्नाच्या वेळी ती हुबळीच्या आत्याकडे होती. तेंव्हा तिची तब्येत बरी नव्हती. त्यामुळे ती लग्नाला येऊ शकली नव्हती.

खूप दिवसात मला आईचं पत्र मिळालं नव्हतं. घरून येणारी पत्रे आम्हाला शिपवर मिळायला खूप उशीर लागायचा. कारण आम्ही sail out झालो आणि पत्रे एजंटकडे ऑफिस मध्ये येऊन पडलेली असली तर त्या पोर्टला येईपर्यंत पत्रे मिळण्यासाठी थांबायला लागायचं. शेवटी एकदा खूप दिवसांनी आईचं पत्र मला मिळालं.

आईच्या आठवणीने इतकं अधीर व्हायला झालं की मी आधीच्या एका पत्रात तिला अगदी रुसून लिहिलं होतं….आई, तुला माझी आठवणच येत नाही, दादा आणि अतुलंच तेवढे तुझे लाडके. तू माझ्यावर रागावली आहेस का…वगैरे !

सध्या अव्वाच्या आजारपणात आईची एकटीची केवढी धांदल उडाली होती याची मला कल्पनाच नव्हती. आई घरी शाळेतल्या मुलांच्या ट्युशन्स पण घ्यायची. सर्व जबाबदाऱ्या सांभाळून ती दिवसभर ते ही काम करत असायची.
माझ्या पत्रातल्या रुसण्यानं तिला फार वाईट वाटलं होतं. तिने मला लिहिलं होतं….अगं वेडे तुझ्यावर मी का बरं रागवेन ? असं कसं लिहितेस तू ?….

खरंच आपण आईकडे फक्त हट्ट करतो. सारं काही निभावून नेताना तिला किती अडचणी येत असतील, तिची किती दमछाक होत असेल याचा आपण विचारंच केला नाही, याचं मला फार फार वाईट वाटलं. आईचं पत्र वाचून अगदी रडूच कोसळलं !

तितक्यात सुचित्रा आली. तिनं मला खूप समजावलं. म्हणाली,“अरे शुरू शुरू में ऐसा ही होता है. मम्मी की बहुत याद आती है. फिर हम मम्मी पे ही गुस्सा होते है. देख मम्मी अपनी बेटी से कभी गुस्सा नही करेगी. तू शांत हो जा.” सुचित्राच्या मिठीत मी मनापासून रडले. मग खूप मोकळं वाटलं.

माझं आणि माझ्या आईचं नातं आई लेकीचं तर होतंच पण मैत्रिणींचं ही होतं !

बाबांच्या पत्रातून अव्वाच्या तब्येतीबद्दल कळलं. आता ती सांगलीला  आई-बाबांच्याकडेच परत आली होती. तिच्या पोटात दुखत होतं. सर्व तपासण्या होत होत्या. कॅन्सरचं निदान झालं होतं. औषधोपचार सुरूच होते.

आई- बाबा तिला सतत डॉक्टर कडे तपासायला घेऊन जाणे वैगरे करत होते. त्यांची खुप धावपळ होत होती. आईची तब्येत पण बरी नसायची. तिची कंबर अतिशय दुखायची. ते तर तिचं अनेक वर्षांचं दुखणं होतं. त्यामुळे मला इतक्या लांब अंतरावर फार काळजी वाटायची. माझी घालमेल बघून मुकुंद म्हणाले, “आपण मुंबईत असतो तर तू लगेच सांगलीला आईकडे तिच्या मदतीसाठी जाऊन राहू शकली असतीस.”

मोठा भाऊ प्रसन्न दादा C. A. ची Articleship करत होता. धाकटा भाऊ अतुल मिरज मेडिकल कॉलेजला  MBBS ला होता. तो अभ्यासासाठी हॉस्टेलवर जाऊन येऊन असायचा. पण अव्वाला बरं नाही कळल्यावर सतत येऊन तिला भेटून जायचा. त्याचं अव्वाला फार कौतुक वाटायचं. ती आईला म्हणाली, “मुक्ता तुझा अतुल फार निष्णात डॉक्टर होईल बघ. मला कुठे दुखते आहे ते त्याला बरोबर समजतं. तुझा प्रसन्न माझी खूप काळजी घेतो. तू किती प्रेमाने करतेस. तुला माझे आशीर्वाद आहेत”

माझे थोरले काका मुंबईत दादरला रहात. त्यांचे जावई, डॉ गाडगीळ नायरला हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होते. त्यांच्या सल्ल्याने मुंबईच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये अव्वाला ठेवून तिच्या सर्व  तपासण्या करून घ्याव्यात या साठी तिला मुंबईला घेऊन जायचं त्यांनी ठरवलं.

बाबांनी पत्रात लिहिलं होतं. निघताना अव्वा आईला जवळ घेऊन खूप रडली. म्हणाली, “मुक्ता, तुला सोडून मला कुठेही राहण्याची इच्छा नाही.”
आई म्हणाली, ” तुम्ही मला सोडून कुठेही जाऊ नका. तुम्हाला फक्त तपासण्या करण्यासाठी मुंबईला घेऊन जात आहेत. तुम्ही तर वडाळ्याला कुंदाताई, प्रकाश यांच्या कडेच राहणार आहात. कोणतीही काळजी करू नका. मुंबईच्या मोठ्या डॉक्टरांना दाखवलं, तिथल्या सर्व तपासण्या व्यवस्थित झाल्या की सांगलीला तुम्ही आपल्या घरी परत या”

मुंबईला त्यावेळेला माझा आतेभाऊ प्रकाशदादा, माझी मोठी आत्या – कुंदाआत्या हिचा मुलगा, बी पी टी मध्ये मोठ्या हुद्द्यावर इंजिनियर होता. अजून त्याचं लग्न व्हायचं होतं. वडाळ्याला त्याला छान प्रशस्त क्वार्टर्स राहायला मिळाल्या होत्या. माझी आत्या, तिचे यजमान, प्रकाशदादा असे सगळे तिथे राहत होते.

आत्यानं अव्वाला तिच्या घरी घेऊन जायचं ठरवलं होतं. आत्या आणि प्रकाशदादा तिला मुंबईला घेऊन गेले.

बाबांनी पत्रात लिहिलं होतं, ‘मुंबईत अव्वाच्या सर्व medical tests झाल्या. तिला पोटाचा कॅन्सर confirm झाला. तिच्यावर सर्व उपचार सुरू झाले आहेत व कॅन्सर वरचा उपाय म्हणून तिच्या पोटाचे ऑपरेशनही केले जाणार आहे’. ते वाचून माझ्या मनाची अस्वस्थता वाढत चालली होती.

त्यानंतर पुढे जहाज sail out होणं आणि सर्वांच्या घरून एजंटकडे त्याच्या ऑफिसात पत्रे जमा होणे यांच्या गोंधळात जवळजवळ तीन आठवडे जहाजावर कोणालाही कोणाचंच पत्र मिळू शकलं नाही.

मार्च महिना संपत आला होता. २३ मार्च मुकुंदांचा वाढदिवस. आमच्या लग्नानंतरचा तो त्यांचा पहिला वाढदिवस !
वाढदिवस जवळ येत चालला होता.
आम्ही तुतीकोरीनला पोहोचलो. त्या संध्याकाळी तुतीकोरीनच्या मार्केट मधून मुकुंदांसाठी वाढदिवसाचा मस्तपैकी शर्ट घेतला.

सुचित्रा, अजित कल्याणपूर आणि आम्ही दोघं चिऊला घेऊन विवेकानंद स्मारक, कन्याकुमारी, त्रिवेंद्रमला जायचं ठरवलं.
नेहमीप्रमाणे सर्व कामांची पूर्तता करून दोन दिवसांची सुट्टी मिळाली. स्पेशल कार ठरवली होती. सुमारे सव्वाशे किलोमीटर्सचा प्रवास होता. हॉटेलचं बुकिंग मिळालं होतं. त्यामुळे प्रवास निवांत होता.

सुभग सुभग तो दक्षिण देश
२२ मार्चला सकाळी सकाळी निघालो. कारमध्ये मागे मी, मध्ये सुचित्रा, शेजारी कल्याणपूर आमच्या मांडीवर चीऊ. पुढच्या सीटवर ड्रायव्हर जवळ मुकुंद अशी योजना झाली. त्यावेळी कार मध्ये बेबी सीट वगैरे लावायची पद्धत नव्हती. त्यामुळे हे बाळ आमच्या सर्वांच्या मांडीवर बागडत होतं.

अकरा वाजता कन्याकुमारी देवालयात पोहोचलो. पण तेथून प्रथम छोट्या बोटीतून विवेकानंद स्मारकावर गेलो.

वावातुराई, कन्याकुमारी, तामिळनाडू…. इथल्या तीनही सागरांच्या  संगमाजवळील खडकावर बसून स्वामी विवेकानंद यांनी ध्यान केलं होतं आणि त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले होते असा इतिहास आहे.
हा संबंध खडक विवेकानंद स्मारक म्हणून जतन करण्यात आला आहे. येथे विवेकानंदांचं सुंदर स्मारक बांधण्यात आलं आहे. त्यावेळी त्या खडकावर तमिळ संत तिरुवल्लुवर यांचा 133 फूट भव्य पुतळा अजून  बसवण्यात आला नव्हता. फक्त त्याच्या पायाभरणीचं काम सुरू होतं.
स्मारकाच्या आतील भागात  स्वामी विवेकानंदांचा  पितळेचा अतिशय देखणा पुतळा बसवण्यात आला आहे. साडेआठ फूट उंचीचा हा  पुतळा भारताकडे पहात उभा आहे.
भारतीय संस्कृती, हिंदू आणि सनातन धर्म यांच्या अस्मितेसाठी झगडणारा हा योद्धा संन्यासी ! भारताच्या दक्षिण टोकावरून आपल्या दयार्द्र दृष्टीने सर्व भारतवासीयांवर कृपेचा, मायेचा वर्षाव करतो आहे, भारतीयांना प्रेरणा, स्फूर्ती देतो आहे. आपल्याला…
उत्तीष्ठत, जाग्रत, प्राप्यवरान्निबोधत ! असं खणखणून सांगत आहे असं वाटलं.

मंदिरात खालच्या तळघरातल्या मोठ्या हॉलमध्ये ध्यान मंडप आहे. तिथे विलक्षण शांतता होती. कोणी एक शब्दही बोलत नव्हतं. आम्ही तिथे थोडा वेळ शांत बसून ध्यान केले. तेवढ्या वेळात चिऊताईने एक मस्त डुलकी काढली.

दर्शन घेऊन बाहेर पडलो. तेथे या खडकावर कन्याकुमारीच्या पावलाचा ठसा आहे. त्या स्थानालाही भेट दिली.

बाहेर येऊन हिंदी महासागर, बंगालचा उपसागर म्हणजेच गंगासागर आणि अरबी समुद्र अर्थात सिंधू सागर या तीनही सागरांच्या मनोहरी त्रिवेणी संगमाचे दर्शन घेतलं. त्रिवेणी संगमावर मनसोक्त भिजलो. एकेक जण आळीपाळीने बाहेर थांबून चिऊला सांभाळत होता. बाकी सगळे समुद्रात डुंबून आलो.

विवेकानंद स्मारक

भारताच्या महान भूमीचा हा दक्षिणेचा सर्वात शेवटचा बिंदू !
समुद्राकडे पाठ करून आपल्या देशाकडे पाहिलं की नारळी, ताड इत्यादी झाडांनी खचखचून भरलेला कंच हिरवा समुद्रकिनारा दिसतो. हे हिरवंगार महावस्त्र नेसलेल्या, तीनही सागरांनी सतत अभिषेक केल्या जात असलेल्या आपल्या मायभूमीच्या चरण कमलांचं हे दर्शन मोठं विलोभनीय होतं. मन अभिमानानं, अतिव आदरानं भरून आलं. मस्तक आपोआप झुकलं.
मायभूमीच्या चरणांना वाकून नमस्कार केला आणि किनाऱ्यावरची माती कपाळाला लावली.

कन्याकुमारी दर्शन
दुपारी हॉटेलवर आंघोळी जेवण खाणं वगैरे झालं. मग कन्याकुमारीच्या मंदिराला भेट दिली. सर्व दक्षिणात्य देवळात देव-देवता दुपारी विश्रांती घेतात. त्यामुळे दुपारी देवळे बंद असतात. संध्याकाळी पाचच्या सुमाराला मंदीर उघडलं.
पुरुषांना लुंगी घालून उघड्याने मंदिरात जावे लागते. मुकुंद आणि अजित लुंग्या नेसले. आम्ही दोघींनी छान जरीच्या साड्या नेसल्या. देवळातल्या दुकानातून पूजा साहित्य घेतले. सर्वजण मंदिरात गेलो.

हे मंदिर दक्षिण भारतीय स्थापत्य शैलीत बांधले असून, याला चार दिशांना चार दरवाजे आहेत. मंदिराच्या गर्भगृहात कन्याकुमारी देवीची (भगवती अम्मन) मूर्ती आहे.
हे मंदिर हजारो वर्षे जुने असून चोल, चेर, विजयनगर आणि नायक राजांच्या काळात या मंदिराचा जिर्णोद्धार व सौंदर्यवर्धन झाले आहे.

भगवती अम्मन कन्याकुमारी

शिल्पे चितारलेल्या ओवऱ्यातून आत गेलो. हे देऊळ,
मीनाक्षी मंदिरा एवढे मोठे नाही. पण थंड शांत आहे.
मीनाक्षी मंदिराचं रंगरूप प्रौढ असल्यासारखे वाटते तर या मंदिराचं कोवळं….. अल्लड !
हे मंदिर परशुरामाने बांधलं असेही म्हणतात.

दक्षिणेच्या कोणत्याच देवळात गाभाऱ्यात विजेचे दिवे लावत नाहीत.
तेलाच्या शेकडो दिव्यांच्या प्रकाशात हातात माला घेऊन शंकराची वाट पाहत कन्याकुमारी उभी आहे. काळ्या दगडाची ही पूर्णाकृती मूर्ती विलक्षण कोवळी, विलोभनीय आहे. तिच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. तिच्या हातात अक्षमाला आहे.
समुद्राकडे पाहत वर्षानुवर्षे, युगानुयुगे ती उभी आहे.

तिच्या दोन्हीही नाकपुड्यांच्यात दैदिप्यमान हिऱ्यांच्या चमक्या आहेत. हे हिरे टपोऱ्या शेंगदाण्याच्या एवढ्या आकाराचे आहेत. तसेच नाकपुड्यांच्या मधोमध हिऱ्याचा नाजूक बुलाख लटकतो आहे. तेलाच्या दिव्यांच्या प्रकाशात हे हिरे असे काही तळपत असतात की त्या साऱ्या ज्योतींचे तेज त्यांच्यापुढे फिकं पडावं.
दिव्यांच्या प्रकाशापेक्षा हिऱ्यांच्या तेजानेच गाभारा भरून जातो. इतर रत्नजडित अलंकार देवीला सणावारी घालतात. पण नाकातल्या अलंकाराच्या रत्नांचे तेज इतकं आहे की अनेक जहाजं हे दीपगृह समजून इथे भरकटत असत. पण आता पूर्वेकडील दरवाजा बंद ठेवून त्याचा बंदोबस्त केला आहे.

बाणासुर दैत्याने देव, ऋषिगण, मानव सर्वांनाच त्रस्त करून सोडले होते. त्याला कुमारीके शिवाय कोणाच्याही हातून मृत्यू येणार नाही असा वर होता. त्यामुळे तो फारच उन्मत्त झाला होता.

देवानी आदिशक्तीची करुणा भाकली. बाणासुराचा वध करण्यासाठी पराशक्तीने कन्याकुमारी रूपात भारताच्या दक्षिण टोकावर जन्म घेतला. पण कन्याकुमारीने भगवान शिवांना मनोमन पती मानले होते. त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी तिने तिथे तपश्चर्या सुरू केली. प्रसन्न झालेले शिव तिच्याशी विवाह करण्यासाठी वरात घेऊन निघाले. मुहूर्त मध्यरात्रीचा होता. तो चुकून चालणार नव्हता. पण हा विवाह झाला तर देवी कुमारी कशी राहणार आणि बाणासुराचा वध कसा होणार ? हा प्रश्न देवांना पडला.

समस्येतून सोडवायला नेहमीप्रमाणे नारदमुनी अवतरले. त्यांनी कोंबड्याचे रूप घेतले आणि कोंबडा आरवतो तसा आवाज काढला. शिवांना वाटलं पहाट झाली. विवाहाचा मुहूर्त टळला. आता जाऊन काय उपयोग ? म्हणून वरात घेऊन ते परत मागे फिरले.
इकडे हातात माला घेऊन, लग्नाची सर्व सिद्धता करून कन्याकुमारी रूपातील पार्वती त्यांची वाट पाहत राहिली. इतकी वाट पाहून ही शंकर येत नाहीत हे पाहून ती चिडली. म्हणाली की “तू येत नाहीस तर मी इथेच दगड होऊन पडते आणि तुझ्यासाठी केलेला सगळा स्वयंपाकही दगड होऊ दे.”
समुद्रांच्या त्रिवेणी संगमावरची तांबड्या रंगाची वाळू म्हणजे सांबार, पिवळ्या रंगाची वाळू डाळ आणि लांबट खड्यांसारखी पांढरी वाळू म्हणजे भात असे म्हणतात.
ती तर साक्षात पार्वती परमेश्वराच्या विवाहाची तयारी ! त्याचा स्वयंपाकही असाच भव्यदिव्य असणार !

कन्याकुमारी मंदिर हे आपल्या बावन्न शक्तिपीठातील एक महत्त्वाचे शक्तिपीठ मानलं जातं. दक्षयज्ञा मध्ये उडी घेतल्यावर सती देवीच्या दग्ध शरीराची पाठ इथे पडली आणि हे शक्तिपीठ तयार झालं अशी आख्यायिका आहे.

देवीची ओटी भरली. इथेही आमच्या दोघींच्या ओटीत नारळ केळी यांचा प्रसाद पुजाऱ्यांनी दिला. पुरुष मंडळींना ही प्रसादाचे नारळ दिले. प्रसादाचे भरपूर नारळ आणि केळी यांनी एक मोठी पिशवी भरली होती.

त्रिवेणी संगमावरचा सुंदर सूर्यास्त पाहिला. पण सूर्यास्त अतिशय सुंदर दिसतो तो मध्य समुद्रातच !

त्या रात्री त्रिवेंद्रम मध्ये बीच वरील एका हॉटेलमध्ये बुकिंग होतं. रात्री तिथे मुक्काम केला. उतरलो तर त्या हॉटेलमधलं पाणी गेलं होतं. त्यामुळे थोडी अडचण झालीच.

२३ मार्च, मुकुंदाचा वाढदिवस !
सकाळी उठून आम्ही दोघच कोवलम बीचवर गेलो. भरतीची वेळ होती. इथे तळात फक्त दोन फळ्या, दोन बांबू कडेला बांधलेले, एकच वल्हे आणि दोन्हीकडेच्या बांबूंवर ठेवलेली फळकुटे अशा चपट्या नावेतून समुद्रात चक्कर मारून आलो.
नाव कसली ती पडावाची इतिहास पूर्वकालीन आवृत्तीच म्हणा !  पाण्यात नाव की नावेत पाणी हा प्रश्नच होता. इथे म्हणजे साक्षात समुद्रातच उतरलो होतो. खूप भीती वाटत होती. पण त्या अचाट नावेतून चक्कर मारायला मजा ही आली.
समुद्रचक्कर झाल्यावर समुद्र स्नान केलं. पाण्यात मनसोक्त डुंबलो‌. इतक्या खोल पाण्यात उतरायचा माझा पहिलाच प्रसंग. भीती वाटत होती. मुकुंदांचा हात घट्ट धरून ठेवला होता. जोराची लाट आली की त्याखाली दडपून जायला होत होतं. इतर अनेक लोक आमच्या आजूबाजूला पोहोत होते. जोराच्या लाटांवर स्वार व्हायला मला मुकुंदांनी शिकवले. त्याची मजा ही वाटली आणि भीतीही वाटली. मग अंघोळ जेवण वगैरे केलं. बॅगांची आवरावरी झाली. चिऊ पण झोप-बीप काढून मस्त ताजी तवानी झाली होती.

तेथून नाय्यर डॅम वर चक्कर मारली. मैसूरच्या वृंदावन गार्डन सारखी एक सुंदर बाग इथे आहे. अर्थात तेवढी मोठी बाग नाही. पण बागेत आंब्याच्या झाडांवर भरपूर कैऱ्या लटकत होत्या त्या मात्र लगेच दिसल्या. डोंगराच्या घळीत बाग असल्यामुळे डोंगराचाच एक भाग असल्यासारखी वाटते.

दिवस कलत चालला होता. संध्याकाळ होत आली होती. जेवण घेतलं आणि शिप वर परत निघालो.

त्रिवेंद्रम आणि आसपासचा भाग निसर्ग सौंदर्याचे केवढं अफाट वरदान लाभलेला आहे. कमळांनी भरलेले जलाशय, पश्चिम घाटाच्या दूरवरच्या गोजिरवाण्या उतरणी, एक पाय वर घेऊन ध्यानस्थ उभे असलेले तलावातले बगळे, माड आणि नारळीच्या मैलोनमैल पसरलेल्या हिरव्यागार बागा, भाताची सर्व दूर पसरलेली हिरवी पिवळी शेते, छोटे अरुंद आणि वळणावळणाचे रस्ते, रस्त्याच्या  कडेला डोंगरांच्या मिळत येणाऱ्या उतरणी, संध्याकाळ बरोबर एक पवित्र नीरवता सर्वत्र पसरते, वळत जाणाऱ्या वाटा झाडांच्या गर्द रायातून अज्ञाताकडे आनंदमय वाटचाल करत आहेत असं वाटतं. पेंगुळलेल्या पक्षांचा किलबिलाट मंद होत असतो. दमून भागून गुरंवासरं घराकडे वळत असतात. अंधारात त्यांचे डोळे हिऱ्यांसारखे तळपतात.
मी तर एवढ्या मोठ्या कळपाचे अंधारात असे तळपणारे डोळे प्रथमच पाहिले. रात्री भात वाहून नेणाऱ्या  गाड्यांच्या बैलांच्या गळ्यातल्या घुंगुरमाळांचा आवाज कारच्या वेगाबरोबर खेचून नेला जात होता…
हे सारं सारं फार विलोभनीय होतं !

खरोखर किती सुभग सुभग हा दक्षिण देश !
क्रमशः

वेदवती कुलकर्णी

— छायाचित्रे सौजन्य : विकीमीडिया कॉमन्स
— लेखन : वेदवती कुलकर्णी. विलेपार्ले पूर्व, मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments