गीत : एक लड़की भीगी भागी सी
चित्रपट : चलती का नाम गाड़ी (१९५८)
दिग्दर्शन : सत्येन बोस
गीतकार : मजरूह सुल्तानपुरी
संगीतकार : एस.डी.बर्मन
कलाकार : किशोर कुमार, मधुबाला
सध्या पाऊस धुवांधार पडत आहे. पाऊस म्हटले की एक विलक्षण अनुभव असतो. आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीत पावसावर आधारित इतकी गाणी असतील की विचारायची सोय नाही आणि मला मुळातच पाऊस आवडत असल्याने अर्थातच पावसाची गाणी हा जिव्हाळ्याचा विषय.
त्यात मधुबालावर तर विशेष प्रेम आहे त्यामुळे मागच्या लेखात जेव्हा पावसाबद्दल लिहिले तेव्हाच खरे तर तिची तीव्र आठवण झाली होती. (मागच्या लेखाची लिंक https://newsstorytoday.com/भावलेली-गाणी-५/) कारण पाऊस आणि पावसात भिजेलेली नायिका हा तर आपल्या सिनेकर्त्यांचा लाडका विषय ! मग ‘एक लड़की भीगी भागी सी’ यातली मधुबाला आठवल्यावाचून कोण राहू शकेल बरं ?!!
मला किशोरदासुद्धा प्रचंड आवडतात ! अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले किशोर कुमार हे भारतीय संगीताच्या इतिहासातील महान आणि सर्वोत्तम गायकांपैकी एक तसेच भारतीय उपखंडातील सर्वकाळातील सर्वोत्कृष्ट गायकांपैकी एक. ते केवळ एक पार्श्वगायकच नव्हते तर एक उत्तम अभिनेता, गीतकार, संगीतकार, संगीत दिग्दर्शक, पटकथा लेखक, निर्माता, आणि दिग्दर्शक होते. त्यांना आठ वेळा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. लता मंगेशकर पुरस्काराचे १९८५-८६ चे ते मानकरी होते. १९९७ मध्ये, मध्य प्रदेश सरकारने त्यांच्या नावाने हिंदी चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी “किशोर कुमार पुरस्कार” सुरू केला होता.
किशोर कुमार म्हणजे एक अवलिया होते. त्यांचा मोठा मुलगा अमित कुमार यांच्या म्हणण्यानुसार, किशोरदांनी जवान आणि कॅन्सरच्या रुग्णांसाठी भरपूर चॅरिटी आणि मोफत शो केले पण त्याची कधीही वाच्यता केली नाही. लवकर उठे आणि लवकर निजे ही उक्ती ते पाळत असत. त्यांना अस्सल बंगाली खाद्यपदार्थ खूप आवडायचे. ते खूप भावनिक होते आणि तत्वज्ञानीही. तरी सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरवणाऱ्या या कलाकाराला एकही मित्र नव्हता. त्यांच्या बागेतली झाडेच त्यांचे मित्र होते. त्यांनी तर झाडांना पण नावे दिली होती आणि रोज ते आपल्या झाडांशी संवाद साधायचे.
या गाण्याविषयी एक गंमत सांगू ? खरे तर एस. डी. बर्मन अतिशय प्रतिभावान संगीतकार होते. त्यांनी अनेकानेक गाणी आपल्या संगीताने अजरामर केली आहेत. पण हे गाणे, अमेरिकन गायक टेनेसी अर्नी फोर्ड (Tennessee Ernie Ford) यांनी गायलेल्या सिक्सटीन टन्स् (Sixteen Tons) या गाण्याच्या चालीवर बेतलेले आहे. मूळ गाणे अमेरिकन कंट्री सिंगर अर्थात कंट्री म्युझिक गाणारा गायक, गीतकार आणि गिटार वादक, मर्ल ट्रेव्हिस (Merle Travis) याने बनवले होते. खाण कामगारांवर त्याने अनेक लोकगीते बनवली होती. १९४६ साली त्याने फोक साँग्ज ऑफ द हिल्स (Folk Songs of the Hills) या अल्बम मध्ये हे गाणे रिलीज केले होते. पण नऊ वर्षांनंतर १९५५ साली जेव्हा टेनेसी अर्नी फोर्ड ने थोड्या वेगळ्या पद्धतीने ते गायले तेव्हा हे गाणे प्रकाशझोतात आले. त्यांनतर त्याला बॉलिवूड मध्ये ‘एक लड़की भीगी भागी सी‘ या गाण्याने भारतात अधिक वलयांकित केले. गंमत म्हणजे किशोरदाना हे गाणे इतके आवडले की त्यांनी एस. डी. बर्मन साहेबांना आग्रह करून ती चाल असलेले गाणे बनवायला लावले !
एवढे करूनसुद्धा किशोरदांना हा चित्रपट पडावा असेच वाटत होते कारण त्यांना टॅक्स वाचवायचा होता ! पण झाले त्या उलट ! हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करून गेला. त्या काळी अडीच करोड एवढा धंदा या चित्रपटाने केला. हा पहिला विनोदी हिंदी चित्रपट होता जो हिट ठरला ! इतकेच नव्हे तर मधुबालाचा हा सलग चौथा चित्रपट यशस्वी झाला आणि पन्नास व साठच्या दशकातील उत्तम अभिनेत्रीचे तिचे स्थान पक्के करून गेला.
अशोक कुमार, किशोर कुमार आणि अनूप कुमार हे तीनही गांगुली बंधू असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सत्येन बोस यांनी केले होते. त्यांनी बरेच हिंदी आणि बंगाली चित्रपट केले असून त्यांना जागृती (१९५६) आणि दोस्ती (१९६४) या हिंदी चित्रपटासाठी फिल्म फेअर पुरस्कार मिळाला होता.

या चित्रपटाची कथा थोडीशी गमतीदार आहे. ब्रिजमोहन शर्मा (अशोक कुमार) एक मध्यमवयीन पुरुष असतो, जो प्रेमभंग झाल्यामुळे स्त्रीद्वेष्टा होतो आणि आपल्या लहान भावांना जगमोहन (अनूप कुमार) आणि मनमोहन (किशोर कुमार) यांना लग्न करण्यास मनाई करतो. परंतु दोन्ही भावांच्या आयुष्यात कोणीतरी खास येते आणि शेवटी ब्रिजमोहनला पण त्याची कामिनी (वीणा कुमारी) मिळते. एका रात्री मनमोहनची भेट रेणूशी (मधुबाला) होते. रेणूची गाडी बंद पडते आणि ती यांच्या गॅरेजवर येते. मनमोहनला झोपलेले बघून ती खूप चिडते. तिच्या बोलण्याने चिडलेला मनमोहन आधी तिची गाडी दुरुस्त करण्यास नकार देतो. पण नंतर तयार होतो. याच प्रसंगानंतर हे गाणे येते.
हे गाणे मला खूप आवडण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे किशोरदा आणि मधुबाला असले तरी गाण्याचे चित्रीकरण देखील मला खूप भावले. पावसात भिजलेली युवती युवकासमोर आली, पण किती सभ्यपणा दाखवला आहे. एका दृश्यात तर मधुबाला आपल्या ओल्या साडीचा पदर गाडीच्या आडोशाला जाऊन झटकून परत ओढून घेते. हे बघून किशोर कुमार लगेच खाली वाकतो. आताच्या जमान्यात असे बघायला मिळेल का एखाद्या गाण्यात ? तो जमानाच काही और होता ना ? ! आजकालची अतिशृंगारिक गाणी बघितली की त्या ब्लॅक अँड व्हाईट जमान्यातल्या गाण्यांची खूप आठवण येते. या गाण्यातला किशोरदांचा अभिनय किती संयत होता.
एक लड़की भीगी-भागी सी
सोती रातों में जागी सी
मिली एक अजनबी से
कोई आगे ना पीछे
तुम ही कहो ये कोई बात है
मधुबाला म्हणजेच, रेणूची होणारी चिडचिड गीतात मजरूह सुल्तानपुरी यांनी मस्त पकडली आहे ! तिची परिस्थिती सांगता सांगता किती तिला चिडवले आहे !

किशोर कुमारचे त्यातले हावभाव बघून तर खूपच हसू येते. सगळे बोलून सवरून, ‘मी नाही त्यातला अन् माझा गाव वेगळा’ अशा आविर्भावात त्यांचे काम चालू राहते. खट्याळपणा तर डोळ्यात ठासून भरला आहे ! किशोर कुमार यांचे मूळ नाव आभास कुमार गांगुली होते. इंदौरच्या ख्रिश्चन कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांनी भरपूर खोड्या केल्याचे सांगितले जाते. तोच खोडकरपणा या गाण्यातही दिसून येतो !
दिल ही दिल में जली जाती है
बिगड़ी-बिगड़ी चली आती है
मचली-मचली घर से निकली
पगली सी काली रात में
मिली इक अजनबी से…
प्रत्येक शब्दाला अगदी मस्त हावभाव आणि ठेका धरत किशोरदा गाण्यात अलगदपणे आपल्याला पुढे नेतात. मधुबालाचे हावभाव आणि नेत्र पल्लवींची अदा आपल्याला पूर्णपणे खिळवून ठेवते.
डगमग-डगमग लहकी-लहकी
भूली भटकी बहकी-बहकी
बलखाती हुई, इठलाती हुई
सावन की सूनी रात में
मिली इक अजनबी से…
तन भीगा है, सर गीला है
उस का कोई पेंच भी ढीला है
तनती झुकती, चलती रुकती
निकली अंधेरी रात में
मिली इक अजनबी से…
मधुबालाचे अनमोल हास्य, किशोरदांचा खट्याळपणा असलेले हे गाणे ऑल टाईम क्लासिक आहे, जे कायम आपल्या मनात ताजे राहील. रोमान्स आणि कॉमेडी यांचा सुरेख संगम असलेले हे गाणे जितके आवडले तितकेच भावले !

– लेखन : तनुजा प्रधान, अमेरिका
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
वाह! इतकी सुंदर प्रतिक्रिया वाचून लिहिण्यास नक्कीच हुरूप आला! खूप खूप धन्यवाद! 🙏💐💐
खळखळणारा पाउस आणि खळी पडणाऱ्या गालाने खळाळून हसणारी मधुबाला. लावण्य, निरागसता घेऊन जन्माला आलेली अभिनेत्री.
त्यात ह्या सुरेल समधुर गाण्याला उलगडून दाखवणारं लिखाण….
वाह एक के साथ एक फ्री…
मज्जा आली.