नवी मुंबई स्वच्छ करण्याचे श्रेय कचरावेचक भगिनींना जाते, असे गौरवद्गार महानगर पालिका आयुक्त राजेश नार्वेकर काढले. ते आंतरराष्ट्रीय कचरा वेचक दिनाच्या निमित्ताने स्त्रीमुक्ती संघटनेतर्फे नुकत्याच आयोजित केलेल्या कचरावेचक भगिनी- संवाद सभेत बोलत होते.
ते पुढे म्हणाले, “ज्या ठिकाणी कचरा गाडी जाण्याची यंत्रणा नाही तिथे जाऊन या महिला प्रामाणिकपणे काम करतात हे मी माझ्या स्वच्छता पाहणी दौऱ्यात पाहिले आहे. सध्या ज्या पाच ठिकाणी ‘स्लम मॉडेल’ म्हणून हे काम सुरू आहे त्यामध्ये वाढ करून अजून चार ठिकाणी हे काम सुरू करू. कचरा व्यवस्थापनाचे विकेंद्रीकरण करून सध्या दोन ठिकाणी ट्रान्सफर सेंटर उभारण्याचा मानस आहे. जेणेकरून या महिलांना सुका कचरा चांगला मिळेल त्यातूनच नवी मुंबई स्वच्छ व कचरा मुक्त होण्याचा मार्ग मोकळा होईल. कचरा वेचक भगिनीचा मुलगा आयएएस चे प्रशिक्षण घेत आहे याचा उल्लेख करून पाच वर्षांनी तो माझ्या ठिकाणी उभा असेल, ही मला अत्यंत समाधानाची बाब असेल. नवी मुंबई स्वच्छ करणे एव्हढाच मर्यादित हेतू नसून यातून या महिलांच्या व्यथा दूर करून त्यांचे उत्पन्न कसे वाढेल, त्यांच्या मुलांना उत्तम शिक्षण कसे मिळेल तसेच सगळे मिळते ते सर्वांच्या भल्यासाठीच आहे” हा उदात्त मानवतावादी विचार मांडताना तुडुंब भरलेल्या हाॅलमधील महिला हेलावून गेल्या.
प्रा. वृषाली मगदूम यांनी आपल्या प्रास्ताविकात कचरा वेचक महिलांना महापालिका प्रशासन व इतर संस्थांच्या माध्यमातून जी मदत झाली आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत कचऱ्यात काम करत असताना महिलांना येणाऱ्या समस्यांचा उहापोह केला.
स्त्री मुक्ती संघटनेच्या अध्यक्ष ज्योती मापसेकर यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कचरावेचकांना मिळणाऱ्या सुविधांचा उल्लेख करून त्या धर्तीवर सुरू असलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या कामाबद्दल प्रशंसोद्गार काढले.
विचारपिठावर डॉ बाबासाहेब राजाळे (उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन) श्री शिरीष आरदवाड (अतिरिक्त शहर अभियंता आणि क्षेपणभूमी व्यवस्थापन प्रमुख), श्रीराम राधाकृष्णन मेमोरियल ट्रस्टचे श्री राधाकृष्णन, गॅलेक्सी सरफॅक्टंटचे उपाध्यक्ष श्री आदर्श नय्यर उपस्थित होते.
श्री राधाकृष्णन यांनी आज कचरा वेचत असणाऱ्या भगिनींची पुढील पिढी याच कामात येऊ नयेत या उद्देशाने त्यांच्या मुला- मुलींच्या शिक्षणासाठी योगदान त्यांच्या ट्रस्टतर्फे केले जात आहे असे सांगितले.
स्त्री उन्नती व ग्यान संजीवनी या प्रकल्पांद्वारे मदत करणारे श्री आदर्श नय्यर यांनी नवी मुंबईच्या पर्यावरण विषयक कामासाठी योगदान देण्याचा मनोदय व्यक्त केला.
रोटरी क्लब ऑफ न्यू बॉम्बे सी साईड चे श्री अनिल कर्ता, श्री रामचंद्रन, कपिल आगरवाल तसेच परिसर भगिनी विकास संघ व परिसर सखी विकास संस्थांच्या अध्यक्ष सुशीला साबळे व रुक्मिणी पॉल, स्वच्छता अधिकारी दिनेश वाघुर्ले यांचा आयुक्तांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
डॉ मृण्मयी भजक यांनी कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन केले.
याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे, पत्रकार मनोज जालनावाला, अन्वय प्रतिष्ठान चे डॉ अजित मगदूम आदी मान्यवर उपस्थित होते.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800
देवेंद्र भुजबळ सर व अलकाताई ज्या वेगाने व तत्परतेने जगभरातील घडामोडींचा रोज आढावा घेत आहेत.ते कौतुकास्पद आहेच,पण कसे करतात,दिवस कसा पुरतो, असे अनेक प्रश्न पडतात . तुमच्या झंझावाती वाटचालीला शुभेच्छा, कचरा वेचक महिला कार्यक्रम दखल घेतली,व आपल्या पोर्टल वर बातमी दिलीत त्याबद्दल खूप आभार.
चे कचरा वेचक भगिनींच्या मेळाव्यात उपस्थित राहून माननीय आयुक्तांनी त्यांच्याविषयी आस्था व्यक्त करून त्यांच्या कामाविषयी कृतज्ञ भावनेने गौरवोद्गार काढले.
एवढेच नव्हे तर त्यांच्या अभ्युदयाविषयीही तळमळीने काही करण्याची इच्छा व्यक्त केली हे खरोखरच वाखाणण्याजोगे आहे
अभिमानास्पद आणि प्रेरणादायक सत्य
कहाणी.