Tuesday, June 17, 2025
HomeUncategorizedओठावरचं गाणं.....

ओठावरचं गाणं…..

नमस्कार मंडळी  🙏
ओठावरचं गाणं या सदरात सर्व रसिकांचं मन:पूर्वक स्वागत.

“अत्तराचा फाया तुम्ही मला आणा राया”, “आवाज मुरलीचा आला”, “वेड्या बहिणीची वेडी ही माया”, “खुलविते मेंदी माझा रंग गोरापान” ही कवी संजीव यांची काही गाजलेली गाणी आजही आपल्या ओठावर येतात. आज मी, कवी संजीव यांच्या “खुलविते मेंदी माझा रंग गोरापान” या गाण्याचं रसग्रहण करणार आहे.

गोरा गोरापान जसं केवड्याचं रान |
खुलविते मेंदी माझा रंग गोरापान
भाऊबीज चित्रपटातल्या कवी संजीव यांच्या या गीताला संगीतकार वसंतकुमार मोहिते यांनी इतकं अप्रतिम संगीत दिलं आहे कि पायानं धरलेल्या ठेक्यासोबत कानही हे शब्द ऐकायला अधीर होतात. गोरा रंग हा नेहमीच स्त्रीचं सौंदर्य दुपटीने वाढवतो असं म्हणतात. कवी संजीवांनी म्हणूनच त्या गो-या हाताला केवड्याच्या रानाची उपमा दिली आहे. केवड्याच्या रानाची चपखल उपमा या गो-या रंगाची महती तर वाढवतेच पण अशा या गो-यापानावर हातावर काढलेल्या आणि रंगलेल्या या मेंदीमुळे गो-या रंगाच्या त्या स्त्रीचं सौंदर्य शतपटीने वाढलं आहे.

दोन डोळे नंदादीप पेटले हे आपोआप |
काजळली पापण्यांची बदामी कमान
गो-या रंगाबरोबरच स्त्रीचे डोळे ही तिच्या सौंदर्यात मोलाची भर घालतात. हे डोळे म्हणजे शांतपणे तेवणारे नंदादीप आहेत आणि काजळ घातलेली पापण्यांची बदामी कमान या नंदादीपांचं सौंदर्य अजूनच वाढवते आहे. माझ्याकडे पहात रहा असंच जणू ते तिच्या प्रियकराला सांगतायत.

नीलमणी नयनात हिरकण्यांचे हो दात |
ओठ लाललाल माझे माणकासमान
परमेश्वराने या स्त्रीला घडवताना मुक्तहस्ताने तिच्यावर सौदर्याची उधळण केली आहे. डोळ्यांच्या बुबुळांना कवी संजीव यांनी नीलमण्यांची उपमा दिली आहे तर कुंदकळ्यांसारख्या दातांना हिरकण्यांची उपमा दिली आहे. लालबुंद ओठांना नेहमीच डाळींबी ओठ असं संबोधलं जातं पण संजीव मात्र इथे ओठांना त्याहून भारी अशा माणकांची उपमा देतात.

नवी लाज लाजते मी नवा साज साजते मी |
लाज-या मनास माझ्या करा बंदिवान
शरीराच्या सौंदर्याबरोबरच लज्जा हा स्त्रीचा असा दागिना आहे जो तिच्या देहाचं सौंदर्य आणखीनच वाढवतो‌. अशी ही सौंदर्याची पुतळी प्रियकराला आपल्या लाज-या मनाला बंदिवान करायला सांगते आहे म्हणजेच माझं मन तू ओळख असंच ती आडून आडून सुचवते आहे.

सुलोचना दीदींवर चित्रित झालेलं हे गाणं पहाताना या गाण्याचं महत्व आणखीनच पटत जातं आणि मेंदीमुळे सौंदर्यात भर घालणा-या गो-या रंगाचं हे वर्णन आशा भोसले यांच्या मधाळ आवाजात ऐकताना आपण इतके तल्लीन होऊन जातो कि गाणं संपलं तरी ते मनामध्ये मात्र रेंगाळत रहातं.

विकास मधुसूदन भावे

– लेखन : विकास मधुसूदन भावे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

11 COMMENTS

  1. तुम्ही गाण्याचे केलेले रसग्रहण खरोखरच गाण्याचे माधुर्य खुलवते.
    प्रत्येक कडव्याचे रसग्रहण वाचतांना चित्र समोर उभे राहते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments