आपल्या देशात अनेक उत्तमोत्तम डॉक्टर आहेत व होऊन गेले आहेत. भारतरत्न डॉ. बिधान चंद्र रॉय हे आपल्या देशाला लाभलेले एक अनमोल रत्न. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचं योगदान केवळ अतुलनीय आहे. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भारतात डॉक्टर्स डे १ जुलै ला साजरा केला जातो. १ जुलै १८८२ ला त्यांचा जन्म बिहार राज्यातील पाटणा येथे झाला तर याच दिवशी 80 वर्षानंतर त्यांचा मृत्यू झाला. त्यांना आदरांजली म्हणुन १९९१ पासून त्यांचा १ जुलै हा जन्मदिवस
भारतात डॉक्टर्स डे म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली.
डॉ. बी. सी. रॉय यांनी १९११ मध्ये लंडन येथे एम.आर.सि.पी. व एफ.आर.सि.पी. हि डिग्री घेतल्यानंतर भारतात रुग्णसेवा चालु केली. ते एक उत्तम चिकित्सक होतेच पण त्याचबरोबर नावाजलेले स्वातंत्र्य सेनानी होते. ते पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री होते. १९६१ मध्ये भारत सरकार तर्फे त्यांना भारतरत्न बहाल केलं गेलं !!

भारतरत्न सन्माननीय डॉ.बी.सी.रॉय यांचा काळ वेगळा होता. डॉक्टर म्हणजे देवाचं दुसरं रूप असं म्हटलं जायचं तेव्हा !!…आज सगळीकडे व्यावसायिकता आली असली तरी आपण उपचार करत असलेल्या रुग्णाचं वाईट व्हावं असं कोणत्याच डॉक्टरला वाटणार नाही.
प्रत्येक व्यवसायात काही “ब्लॅक शिप्स” असतातच परंतु वैद्यकीय व्यवसायातील या मोजक्याच “काळ्या मेंढरांमुळे” आज डॉक्टरी पेशाला काळिमा लागलेला आहे.
खरं सांगायचं झालं तर माणुसकी, प्रामाणिकता, कळकळ, संवेदना आजही या पेशात शिल्लक आहे. स्वतःचं पूर्ण कौशल्य, बुद्धी, वापरून कधी कधी वेळेचं, खाण्या पिण्याचंहि भान न ठेवता जवळ जवळ सर्वच डॉक्टर्स अनेक दुर्धर आजाराने पीडित रुग्णांना बरे करतात, आपले सर्वस्वपणाला लावून काम करतात परंतु सर्व काही चांगलं करण्याच्या हेतूने उपचार होऊन देखिल एखादा आजार जेव्हा रुग्णाच्या जीवावर बेततो तेव्हा जी डॉक्टरची कुचंबणा होते ती थांबावी. किमान एवढे तरी या योग्य व महत्वाच्या दिवशी वाटते. अशा प्रकारच्या काही वाईट प्रसंगी जेव्हा एखाद्या डॉक्टरला मारहाण होते अथवा रुग्णालयाची तोडफोड, नासधूस होते तेव्हा त्या डॉक्टरने बरे केलेल्या सर्व रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी त्या अडचणीत असलेल्या डॉक्टरच्या पाठीशी ठाम उभं राहावं असं आवाहान या दिवशी करावंसं वाटतंय !!
आज कोरोना पँडेमिकच्या दुष्ट चक्रामध्ये डॉक्टरांना अनेक दुषणांना सामोरं जावं लागत आहे. खाजगी दवाखाना एखाद्या सोसायटीत असेल तर तिथल्या लोकांचं दडपण, दवाखान्यात येऊन गेलेल्या रुग्णास कोरोना झाला तर त्याचं दडपण, स्वतःस कोरोना झाल्यास त्याची नामुष्की, शस्त्रक्रिया करण्यापूर्वी डॉक्टरने स्वतःची कोरोना टेस्ट करावी कि नाही याच्यावर उलट सुलट चर्चा, उपचारांची व्यावसायिक फी व इतर बिलांबाबतीत नाहक चर्चा, सरकारचं, मीडियाचं प्रेशर या सर्व बाबी ध्यानात घेऊन मागील वर्षी डॉक्टर्स डे ची संकल्पना “आत्मसम्मान दिवस” हि होती. परंतु या वर्षी मात्र, “बिल्डिंग द फ्युचर विथ फॅमिली डॉक्टर्स..” असं इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र ने जाहीर केलंय.
या दिवशी आम्ही डॉक्टर्स व आमच्या इंडियन मेडिकल असोसिएशन अलिबागच्या वतीने आरोग्यविषयक बरेचसे सामाजिक उपक्रम राबवतो. मग तो एखादा मेडिकल चेकअप कॅम्प असेल, अथवा मुला-मुलींसाठी शाळा कॉलेजेस मध्ये आरोग्य विषयी चर्चा सत्रे असतील किंवा स्त्रियांना आरोग्य विषयी मार्गदर्शन असेल. नमुद करण्यासारखी आणखीन एक गोष्ट... आम्ही या दिवशी न चुकता रक्तदान करतो. दुसऱ्यांना सांगण्यापूर्वी स्वतः हे श्रेष्ठ दान करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. मागील वर्षी वृक्षारोपणहि केले होते.
या दिवशी संध्याकाळी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन असते आणि ते म्हणजे ज्या डॉक्टरांनी या शहरातील लोकांचे आरोग्य सुरक्षित रहावे म्हणुन अहोरात्र रुग्णसेवा दिली अशा वरिष्ठ डॉक्टरांचा सन्मान !!….कोरोनाच्या कोपामुळे यंदा कदाचित काही गोष्टी शक्य होणार नाहीत परंतु पुरेसा न्याय या दिवसाला देण्याचा मात्र आमचा नक्कीच प्रयत्न राहील….
कोरोना महामारीच्या अविस्मरणीय दुष्ट काळात कोरोना बाधित रुग्णांचे उपचार करणे जितके गरजेचे होते किंबहुना त्याहून अधिक गरज होती नॉन कॉवीड रुग्णांचे उपचार करणे व त्यांची योग्य ती काळजी घेणे आणि नेमका हाच समतोल साधलाय सर्व सरकारी व खाजगीतील डॉक्टरांनी. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आज खऱ्या अर्थाने पूर्णत्वास आल्या सारखी वाटतेय. असोसिएशनच्या वतीने कॉवीड 19 रुग्णांची सेवा व उपचार करणाऱ्या डॉक्टर व परिचारीकांचा यथोचित गौरव तर आम्ही करूच पण कोविडेतर आजारांच्या रुग्णांसाठी अविरत रुग्ण सेवा देणाऱ्या सर्व डॉक्टर व परिचारीकांचाहि या निमित्ताने योग्य तो सन्मान केला जाईल.
खरं तर अशा प्रकारचा वरिष्ठ डॉक्टरांचा, कॉवीड वॉरियर्स, नॉन कॉवीड वॉरियर्स चा सन्मान जनतेने करावयास हवा !!...या दिवशी अनेक शुभेच्छा याव्यात असंहि राहून राहून वाटत असतं !!…. येतातही….. पण तुरळक.
वीस वर्षाच्या कालावधीत एक सद्गृहस्थ या दिवशी संध्याकाळी न चुकता शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ घेऊन येतात व सर्वांतर्फे आभार मानून जातात हि मुद्दाम नमुद करण्यासारखी गोष्ट. त्यानंतर मात्र कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं !!…..
आज माझ्याकडून माझ्या सर्व डॉक्टर बंधू व भगिनींना “डॉक्टर्स डे” च्या खुप खुप शुभेच्छा. “हॅपी डॉक्टर्स डे”. “मित्रहो, डॉ.बी.सी.रॉय यांच्या जवळपासहि आपल्याला जाता येणार नाही कदाचित….. परंतु त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन व त्यांचे पुण्यस्मरण करुन रुग्णसेवेचा हा वसा असाच चालु ठेवु यात”.
आज “डॉक्टर्स डे” च्या दिवशी सर्व रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना आणि सर्वांना एकच विनंती करावीशी वाटते आणि ती म्हणजे, “जरा समजुन घ्या”, आम्हाला……. डॉक्टरांनाही !!”…… धन्यवाद.
– लेखन : डॉ राजेंद्र गणपत चांदोरकर.
एम डी, बालरोगतज्ञ, अलिबाग
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800