नमस्कार मंडळी.
आज आपल्या न्यूज स्टोरी टुडे परिवारात स्वागत करू या सिंगापूर येथील कवयित्री ऋचा उपेंद्र यांचे. त्यांचे सहचर श्री उपेंद्र कुलकर्णी यांचे साहित्य आपल्या पोर्टलवर प्रसिद्ध होत असतेच.
ऋचा उपेंद्र यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
— संपादक
शहराच्या गजबजाटात, सिमेंटच्या जंगलात,
उंच मजल्यावरून समोर बघितले की
दिसतात फक्त खिडक्या
काही सुस्त, काही मस्त तर काही बंदिस्त
प्रत्येक खिडकीतून दिसत असतो कवडसा
घरामध्ये राहणाऱ्यांच्या जीवनाचा
काही खिडक्या झबली टोपडी मिरवितात
बाळा चे गोंडस हसू दाखवत हसतात
खिडकीतून कधी भरारी घेत कागदी विमान
तर कधी दिसतात कसरती गमतीदार
आनंदाचा वारा अशाच खिडक्यातून असतो वहात
मधूनच दिसतात काही झरोके
जे रात्रीच जिवंत होतात
दिवसभराच्या मेहनती नंतर थकले जीव
घरी टीव्ही समोर बसून जेवण करतात
आजकाल मात्र बऱ्याचशा खिडक्या असतात बंद
घरातले सगळेच बाहेर आपापल्या व्यापात गुंग
कधी आले घरीच तरी नाही खिडकी उघडायला वेळ
हातातील आभासी खिडकीत चालला आगळा खेळ
भयभीत होते मन
जर चालू राहिला असाच हा खेळ अनिर्बंध
पुढील पिढी करेल का निसर्गाशी संग
शिकतील का ते जपायला मानवतेचे बंध…
अंतर्मनाची खिडकी उघडायचा लागेल का त्यांना छंद
— रचना : ऋचा उपेंद्र. सिंगापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +91 9869484800
