Monday, February 16, 2026
Homeकलासूर्यपक्ष्यांचा वसंतोत्सव…

सूर्यपक्ष्यांचा वसंतोत्सव…

हा आहे फुललेला पळस…
निस्संग, नागवा… जणू दिगंबरी दीक्षेतला संन्यासी!
तो फुलला की पाने टाकून देतो… आणि अरण्याचा सारा अंतर्दाह अग्नीरूपात शृंगारतो.

‘फ्लेम ऑफ द फॉरेस्ट’ म्हणून ओळखला जाणारा हा वृक्ष. मराठीत “पळसाला पाने तीन” ही म्हण रूढ आहे. पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचा आराध्य वृक्ष मानला जाणारा पळस होळीच्या दिवसांत जणू स्वतःच रंगोत्सव साजरा करतो.
त्याच्या केशरी-लाल फुलांपासून पूर्वी नैसर्गिक रंग तयार केले जात; होळीचे रंगही या अग्नीफुलांतूनच उजळत.

पळसाचा हा अग्निशृंगार विविध पक्ष्यांना आमंत्रण देतो…
विशेषतः सूर्यपक्षी — म्हणजेच शिंजीर !
हा लहानसा, चपळ पक्षी वसंतात रंगात येतो. नर शिंजीर प्रजनन काळात गडद जांभळ्या-निळसर झळाळीत उजळतो, तर मादी फिकट पिवळसर-हिरव्या छटेत साधी पण मोहक दिसते.
हा त्यांचा विणीचा हंगाम…
पळसफुलात तो हळुवार चोच खुपसतो, मध प्राशन करतो, आणि त्या मधुरतेत आपल्या जोडीदारासोबत धुंद होतो.
फुललेला पळस जसा अग्नीफुलांनी उजळतो, तसाच शिंजीरही आपल्या अंतःकरणात रंग भरतो.
तो आपल्या शिंजीरीणीचा अभिसार करतो, तिची काळजी घेतो, घरट्याच्या उभारणीत सहभागी होतो. संवेदनशील, जागरूक, आणि प्रेमळ !

वसंताचा हा उत्सव न्यारा असतो —
पळस आतून फुलतो…
शिंजीर रंग बदलतो…
आणि सारा आसमंत मोहरतो, माणसांसह.
होळी म्हणजे केवळ रंगांची उधळण नाही;
ती आहे अंतर्दाहातून उमलणाऱ्या नव्या जीवनाची चाहूल.

निसर्ग जळतो, फुलतो आणि पुन्हा नव्याने जन्म घेतो.
शांत मन, गोड विचार, आणि थोडं हसू —
यांनीच दिवस सुंदर होतो.
आनंदी रहा…
स्वतःवर प्रेम करा…
आणि या बदलत्या निसर्गात स्वतःलाही नव्याने फुलू द्या.

विजय होकर्णे

— वृत्तचित्र : विजय होकर्णे. नांदेड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

मृदुला राजे on उज्ज्वल जीवन
Kavitha Tenny Nadar on झेप : 11