जे जे उत्कृष्ट आहे ते ते शिवाचा स्पर्श असलेलं आहे. रामाने ऊत्तम आणि आदर्श असा राज्यकारभार केला म्हणुन त्याच्या राज्याला ‘रामराज्य’ म्हणतात. तसेच शिवरायांनी सर्व अंगानी ऊत्तम असा राज्यकारभार केला म्हणुन त्याला ‘शिवशाही’ म्हटले जाते. तर अन्याय अनाचार, लूटालूट कापाकापी, स्त्रीवर अत्याचार याला ‘मोगलाई’ म्हणतात.
आज साडेतीनशे वर्षानंतरही शिवशाहीचे गारूड आपल्यावर आहे म्हणजे महाराष्ट्रात किती आखीवरेखीव राज्य चालू होते पहा. सर्वधर्म समभाव या नुसत्या बोलायच्या गोष्टी नसून शिवरायांनी त्या अमलात आणल्या. त्यांच्या दरबारी नवरत्ने म्हणावीत अशी ऊत्कृष्ट माणसे होती. त्यातही हिंदू तसेच मुसलमानही होते. सैन्य, नाविक दल गडावरचे तैनात पथक, वेसकरी, बूरूजरक्षक, कोतवाली अशा असंख्य ठिकाणी मुसलमानही होते.
महाराज कुणाकडूनही जराही हयगय खपवून घेत नसत. सैन्याने शेतीला, पाणवठ्यांना जराही धक्का पोचवलेला त्यांना चालत नसे. देवळांचे जिर्णोद्धार, वतने, जमिनी, वर्षासने, इ. साठी भरघोस मदत देत. तसेच कायद्यांची कठोरपणे अंमलबजावणी करत. वृक्ष, वेली, राने वने यांची देखभाल होई. नवीन वृक्ष लागवड होत असे. त्यांचे गडावरचे धान्य विहिरी, घोडेपागा, इ. वर कसून लक्ष असे कारण जर शत्रूने वेढा घातला तर दोन तीन महिने चालून जायला हवीत, अशी त्यांची दूरदृष्टी होती.
मुसलमानांनी जागोजागी लूटपाट करून गोळा केलेला पैसा सुरतेत व्यापार्यांकडे साठवला होता. त्या साठी शिवरायांनी सुरतेवर स्वारी करून तो पैसा स्वराज्यास जोडला. स्वराज्यात कुशल मंत्र्यांचे अष्टप्रधान मंडळ होते. सेनापती नेमताना जात पात न बघता कर्तबगारी बघितली जायची. पुढची तजविज करणे, आंखणी करणे, धोका ओळखणे, संकटांची चाहुल घेणे, त्यानुसार नियोजन करणे याला दूरदृष्टी म्हणतात. म्हणुन त्यांना जाणता राजा म्हणतात.

जिजाऊने स्वप्न पाहिले आणि शिवरायांना तसे तयार केले. शिवरायांनी त्याचा ऊपयोग करून स्वराज्य ऊभे केले…
ते गड बुरूजांनी सजवले…. मावळ्यांसह संपन्न केले आणि टिकवले.
आज अनेक देशात शिवचरित्राची भाषांतरे होत आहेत. चारित्र्यसंपन्न, प्रजाहितदक्ष, न्याय प्रिय, कायदेपालक, पराक्रमी, गनिमी कावा चतुरपणे खेळणारा, चलाख, जाणता, उत्तम व्यवस्थापक आणि ऊत्तम नेतृत्व असे अष्टपैलू गुणसंपन्न शिवराय होते. भ्रष्टाचार, स्त्रीवर अत्याचार, फितूरी, काम चुकारपणा यासाठी कठोर शिक्षा होत्या. रयतेचा राजा म्हणुनच ते गौरवले गेले.
शिवरायांच्या आधी संतांचे कार्य फार महत्वाचे ठरले. त्यांनी समाजात, भूतदया, मानवता, जाती निर्मूलन, बंधूभाव निर्माण केला. जिजाऊने त्यांचे लष्करी व राज्यकारभाराचे शिक्षण अचूक करून घेतले. रामायण, महाभारत या गोष्टीतून संवेदनशील मन तयार केले. आज शिवरायांच्या नेतृत्व व्यवस्थापन व प्रजाहित, दूरदृष्टी याचा महाराष्ट्राला खूप उपयोग होतो आहे.
आता शिक्षा सौम्य झाल्या आहेत. धाक उरला नाही, जनतेचा पैसा जनतेसाठीच आहे हे तत्व विसरले गेले. मोह, लोभ याची चढाओढ होते आहे. शेतकरी नडला जातो. व्यवस्थापन नाही. नियोजन नाही. दूरदृष्टी नाही त्यामूळे भ्रष्टाचार बोकाळला आहे. स्त्रीया सुरक्षित नाहीत. गुन्हेगार मोकाट आहेत. त्यामुळे या सर्वांना धडा शिकवून वठणीवर आणायला हवेत एकच शिवराय.
छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा. असा राजा पुन्हा होणे नाही.

— लेखन : अनुराधा जोशी. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
