संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे की –
“निंदकाचे घर असावे शेजारी।
येताति बाहेरी गुण दोष ।।
निंदक हा माझा कंठीचा ताईत।
त्याने सर्व हित केले माझे ।।”
“निंदकाचे घर असावे शेजारी,
परी चेष्टेकरी असू नये ।।
निंदा जोडीयते नाते,
चेष्टा तोडीयते बंध ।।”
या अभंगाचा साधा अर्थ असा आहे की, निंदक आणि टीकाकार आपल्या आजुबाजुला नक्कीच असावेत. आपल्या कार्यावर, वागणूकीवर जर योग्य टिका झाली तर सुधारण्याची संधीच मिळते. इथे संत तुकाराम महाराजांना योग्य टिका किंवा निंदा अथवा ताशेरे अपेक्षित आहेत. विघ्नसंतोषी बुद्धीने कुणालाही त्रास देण्याच्या हेतूने मुद्दाम चेष्टा म्हणून, टिंगल म्हणून एखाद्याच्या कामात किंवा वागण्यात दोष काढून अडथळे निर्माण केल्याने संबंध एकतर बिघडतात किंवा तुटतात. पण जर टिका टिपण्णी योग्य असेल तर त्याचा निश्चितच चांगला परिणाम होतो.

“शिवाजी राजे जन्माला यावे पण शेजारच्या घरात” हा मराठीतील एक वाक्यप्रचार आहे. ह्याचा अर्थ असा असावा की, एखादी क्रांती, महान कार्य, विशेष योग्य बदल इत्यादी घडून यावा पण; त्यामागील प्रयत्न, मेहनत, त्याग वगैरेची झळ आपल्यापर्यंत येता कामा नये. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर झाड लावण्यापासून ते त्याची मशागत करून त्याला फळे येइपर्यंत मी काहीच कष्ट करणार नाही; पण ती फळे चाखण्याचा माझा हक्क बजावायला मी विसरणार नाही.
आज कदाचित म्हणूनच गल्लीपासून दिल्ली पर्यंत जे काही घडत आहे ते आपण प्रत्येक जण उघड्या डोळ्याने बघत फक्त बघ्याची भूमिका घेत आहोत. एक श्रोता आणि वक्ता होऊन आपापसात चवीचवीने विषय चघळत मजा बघत फक्त ताशेरे ओढत आहोत. प्रत्यक्षात मांजराच्या गळ्यात घंटा बांधण्याची म्हणजेच उघडपणे आपली ठाम भूमिका किंवा मते मांडण्याचे धाडस करण्यासाठी सर्वसामान्य माणूस धजावत नाही. असे का हा विचार करण्याची आणि प्रत्येकाने आपल्या बुद्धिमत्तेनुसार, कुवतीनुसार आणि अधिकाराला अनुसरून योग्य; भले ती छोटी असली तरी कृती करण्यासाठी पुढाकार घेतला तर महाराजांना अपेक्षित अशा “स्व”राज्याची पुन्हा एकदा मोर्चे बांधणी होणे अशक्य नाही तसेच फितुरी आणि समाजविघातक कारवाया योग्यप्रकारे उघडकीस आणून समाजात अनुशासन आणण्याची जबाबदारी प्रत्येकाने ओळखून सहकार्य करून पुढाकार घेतला तर पुन्हा एकदा छत्रपतींनी त्या काळात पाहिलेले आणि साकारलेले स्वप्न पुन्हा एकदा सत्यात नक्कीच उतरेल आणि पुनःपुन्हा कुठल्याही संभाजीराजांना आपल्याला मुकावे लागणार नाही !
माझ्या मते, आज शिवजयंतीच्या निमित्ताने सिंहासनाधीश छत्रपती शिवाजी महाराजांना हीच आदरांजली असेल.
— लेखन : सौ योगिनी पंडित. डोंबिवली
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
