जागतिक महिला दिन काल, 8 मार्च रोजी साजरा झाला. नेमका रविवार असल्याने, आपल्या पोर्टलला सुट्टी होती. त्यामुळे काल प्रसिद्ध करावयाच्या कविता आज प्रसिद्ध करीत आहे. पण या कवितांमध्ये एक वेगळेपण आहे. बघू या, हे वेगळेपण कोण कोण ओळखते ते !
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
— संपादक
1)
हे नाही तर ते,
हाती चाक असते
आजही काय ते
तिलाच बघावे लागते !
— रचना : देवेंद्र भुजबळ. नवी मुंबई.
2)
जाते केव्हाच गेले.
मदतीला दोन हात आले.
दोघेही कमवायला लागले.
घरचे चित्रच बदलले.
–– रचना : प्रा डॉ विजय पांढरीपांडे. माजी कुलगुरू, हैद्राबाद.
3) निश्चयी पाऊल
जातं सोडलं, चक्र धरलं,
तिने ओलांडला उंबरा,
काळाचं चक्र फिरवलं,
तिने निश्वास सोडला,
खूप काही सहन केलं,
उंबऱ्याच्या आतलं,
मन मारलं, ईच्छा सोडल्या,
कुणाला ना भान तिचं,
शेवटी ठरवून काही,
तिने पाऊले टाकली,
आणि अनेक चुकीची,
रीत तिने बदलली,
काही विरोध कडवे,
काही वर्मावर झेलले,
रक्ताचे अश्रू तिनेच,
अनेकदा किती गाळले,
शेवटी पेटून उठली,
आणि आव्हान वादळा दिले,
आज मुक्ती मिळते जराशी,
बरेच अजूनही राहिले…!!!
— रचना : हेमंत भिडे. जळगाव
4) ती !
महिला दिनानिमित्त ती भेटली
चव्वेचाळीस वर्षानंतर………
आता सारा इतिहास भूगोल
बदलला आहे
तरी का कोण जाणे
गुरुत्वाकर्षण आहे.
तिच्या लाजण्या मुरडण्यातून
तरूणपण आठवलं
बोरीच्या झाडाखाली
बोरं पाडताना
ती भेटली, हसली होती.
आता ते बोरीचं झाड नाही
मात्र आंबडगोड आठवणी आहेत.
ती दिसल्यावर त्या आठवल्या
ज्या काळजात साठविल्या आहेत.
— रचना : गज आनन म्हात्रे. करावेगाव, नवीमुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
