Tuesday, March 10, 2026
Homeपर्यटन"अद्भुत लोणार सरोवर"

“अद्भुत लोणार सरोवर”

निसर्ग, विज्ञान, इतिहास आणि अध्यात्माचा अद्भुत संगम म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर होय.

लोणार हे गाव आकाराने छोटे असले तरी त्याचे महत्त्व अत्यंत मोठे आहे. निसर्ग, विज्ञान, इतिहास, संस्कृती आणि अध्यात्म यांचा अद्भुत संगम येथे अनुभवायला मिळतो. म्हणूनच लोणार हे केवळ बुलढाणा जिल्ह्याचे नव्हे तर महाराष्ट्राचे आणि भारताचेही भूषण मानले जाते.

लोणार  गावात असलेले लोणार सरोवर हे पृथ्वीवरील अत्यंत दुर्मिळ नैसर्गिक चमत्कारांपैकी एक आहे. जगभरातील वैज्ञानिक, भूगर्भशास्त्रज्ञ, पर्यटक आणि संशोधकांसाठी हे एक महत्त्वाचे अभ्यासकेंद्र आहे. येथे आढळणाऱ्या खडकांची तुलना चंद्र आणि मंगळ ग्रहावरील खडकांशी केली जाते. म्हणूनच लोणार सरोवराला अनेक संशोधक “पृथ्वीवरील छोटा मंगळ ग्रह” असे संबोधतात.

प्रवासाची सुरुवात :
आमचे जिवलग मित्र डॉ. मनोहर सोनुने यांच्या सुपुत्राच्या स्वागत समारोहा साठी बुलढाणा येथे जाण्याचा नुकताच योग आला. कार्यक्रमानंतर मी आमचे परममित्र डॉ. रमेश सोनुने यांच्या घरी नेहमीप्रमाणे  मुक्कामाला राहिलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी गप्पांच्या ओघात लोणार सरोवराचा विषय निघाला. बुलढाणा जिल्ह्याचा अभिमान असलेले हे स्थळ प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा मी व्यक्त केली.डॉ. रमेश सोनुने आणि आमचे मित्र श्री. सुनील कोठाळे (माजी आकाशवाणी प्रमुख, अमरावती) यांनी लगेचच होकार दिला. २ मार्च रोजी सकाळी आम्ही तिघेही श्री. सुनील कोठाळे यांच्या गाडीतून लोणारकडे निघालो आणि साधारण सकाळी नऊ वाजता लोणार येथे पोहोचलो.

तेथून सुरू झाला आमचा अभ्यास आणि अनुभवाचा प्रवास.डॉ. रमेश सोनुने यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत साधे; पायात साधी चप्पल, कुठलाही बडेजाव नाही. पण प्रत्येक विषयावर त्यांचे सखोल ज्ञान पाहून माणूस थक्क होतो.गप्पांच्या ओघात ते जेव्हा माहिती सांगत होते तेव्हा आमच्यासमोर एक नवीन जग उलगडत होते.

आकाशातून आलेली घटना :
सुमारे ५०,००० वर्षांपूर्वी पृथ्वीवर एक प्रचंड उल्कापिंड अत्यंत वेगाने येऊन आदळले. त्या प्रचंड धडकेमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर गोलाकार विवर निर्माण झाले. कालांतराने त्या विवरात पाणी साचले आणि आजचे लोणार सरोवर तयार झाले.

या विवराचा व्यास सुमारे १.८ किलोमीटर असून खोली अंदाजे १३७ ते १५० मीटर आहे. विशेष म्हणजे हे डेक्कन ट्रॅपच्या बेसाल्ट खडकांमध्ये तयार झालेले जगातील एकमेव मोठे उल्कापात विवर आहे.

जगातील इतर उल्कापात विवरे :
पृथ्वीवर सुमारे १९० उल्कापात विवरे ओळखली गेली आहेत. त्यापैकी काही प्रसिद्ध विवरे पुढील देशांत आहेत —
कॅनडा – Pingualuit क्रेटर
कॅनडा – Clearwater Lakes
घाना – Bosumtwi Lake
अमेरिका – Arizona Meteor Crater
एस्टोनिया – Kaali Crater
परंतु लोणार हे त्यांच्यापेक्षा अनेक बाबतीत वेगळे आहे.

लोणारचे वैशिष्ट्य :
या सरोवराची काही विशेष वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत  .
* बेसाल्ट खडकांमध्ये तयार झालेले उल्कापात विवर

* अत्यंत खारट आणि क्षारीय पाणी

* दुर्मिळ सूक्ष्मजीव

* हजारो वर्षे जुनी मंदिरे

* परिपूर्ण गोलाकार संरचना

पाण्याचे अद्भुत वैशिष्ट्य :
लोणार सरोवराचे पाणी अत्यंत खारट आणि क्षारीय आहे. त्याचा pH साधारण १० ते ११ दरम्यान आहे. काही अभ्यासानुसार ते समुद्राच्या पाण्यापेक्षाही अनेक पटीने अधिक क्षारयुक्त आहे.

या पाण्यात दोन वेगवेगळे थर आढळतात :
वरचा थर – अत्यंत खारट
खालचा थर – कमी क्षारीय
हे दोन्ही थर पूर्णपणे एकमेकात मिसळत नाहीत.

गोमुख तीर्थ :
लोणार सरोवराजवळील गोमुख तीर्थ अत्यंत रोचक आहे. येथे गोमुखातून  वर्षभर एकसारख्या लयीत पाणी वाहताना दिसते. हे पाणी स्वच्छ, गोड आणि क्रिस्टलसारखे पारदर्शक आहे. काही अभ्यासकांच्या मते हे भूगर्भातील artesian spring असू शकते, परंतु त्याचे संपूर्ण रहस्य अजून उलगडलेले नाही.

पाण्यावर तरंगणारे दगड :
लोणार परिसरात काही दगड पाण्यावर तरंगताना दिसतात. हे दगड सहसा छिद्रयुक्त बेसाल्ट किंवा पुमिस प्रकारचे असतात. त्यांच्या रचनेत सूक्ष्म हवेचे फुगे असल्यामुळे त्यांची घनता कमी असते आणि त्यामुळे ते काही वेळ पाण्यावर तरंगू शकतात.

मातीतील खनिजे :
लोणार परिसरातील मातीमध्ये लोह, टायटॅनियम, निकेल, क्रोमियम आणि मॅग्नेशियम यांसारखी खनिजे आढळतात. उल्कापातामुळे येथे impact glass आणि shock minerals तयार झालेले आहेत.

आम्ही स्वतः एक छोटा प्रयोग केला. माझ्याकडील लोहचुंबक मातीच्या जवळ नेताच त्यातील लोहकण चुंबकाला चिकटले आणि माती वेगळी झाली. हा प्रयोग लोणारच्या भूगर्भीय वैशिष्ट्यांचा प्रत्यक्ष अनुभव देणारा होता.

प्राचीन मंदिरे आणि शिल्पकला :
लोणार परिसरात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. दैत्यसूदन मंदिर, कमलजा देवी मंदिर, गोमुख मंदिर आणि रामगया मंदिर ही प्रमुख मंदिरे आहेत. ही मंदिरे हेमाडपंती शैलीतील असून सुमारे हजार ते बाराशे वर्षे जुनी आहेत. काही मंदिरांमध्ये कातळ शिल्पे तसेच खजुराहो शैलीतील शिल्पकला पाहायला मिळते.

पुराण परंपरा :
स्थानिक परंपरेनुसार येथे लवणासुर नावाच्या राक्षसाचा वध भगवान विष्णूंनी केला आणि म्हणून या प्रदेशाला “लोणार” हे नाव पडले.
रामायण परंपरेनुसार रामगया येथे भगवान रामांनी पितृतर्पण केले असे मानले जाते. आजही येथे पितृकार्य करण्यासाठी भाविक येतात.

जैवविविधता :
लोणार परिसर सन २००० पासून वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. येथे मोर, कोल्हे, रानडुक्कर, ससे तसेच विविध स्थलांतरित पक्षी आढळतात.
या परिसरात कडुलिंब, बेल, तुळस, गुळवेल, बाभूळ, शतावरी, अर्जुन, करंज आणि साग यांसारख्या अनेक औषधी वनस्पतीही आढळतात.

सूक्ष्मजीवांचे जग :
पूर्वी असे मानले जात होते की लोणार सरोवरात कोणतीही जीवसृष्टी नाही. परंतु आधुनिक संशोधनात अत्यंत क्षारीय वातावरणात जगणारे सूक्ष्मजीव आणि विशेष प्रकारचे बॅक्टेरिया आढळले आहेत. अशा जीवांना extremophiles म्हणतात.

अंतराळ संशोधन :
या वैशिष्ट्यांमुळे अनेक वैज्ञानिकांनी येथे अभ्यास केला आहे. त्यात नासा तसेच भारतीय भूगर्भशास्त्रज्ञ आणि ग्रहशास्त्र संशोधकांचा समावेश आहे. म्हणूनच लोणारला “पृथ्वीवरील छोटा मंगळ” असेही म्हटले जाते.

न उलगडलेली रहस्ये :
* लोणार सरोवराबद्दल अजूनही काही प्रश्न अनुत्तरित आहेत.

* उल्का किती मोठी होती ?

* पाण्याचा रंग कधी बदलतो ?

* सूक्ष्मजीव इतक्या कठीण परिस्थितीत कसे जगतात ?

* क्रेटर इतके चांगले जतन कसे झाले ?

जागतिक मान्यता :
लोणार सरोवराला Geo-heritage site तसेच Ramsar wetland म्हणून मान्यता मिळाली आहे.

निष्कर्ष :
लोणार सरोवर म्हणजे भूगर्भशास्त्राचे विद्यापीठ, इतिहासाचे संग्रहालय, अंतराळ संशोधनाची प्रयोगशाळा आणि निसर्ग-अध्यात्माचा संगम आहे. सरोवराच्या कड्यावर उभे राहून खाली पाहताना असे वाटते की जणू पृथ्वीच्या हजारो वर्षांच्या इतिहासाचे साक्षीदार आपण उभे आहोत.
येथे आकाशातून आलेल्या उल्केची कथा आहे, पृथ्वीच्या खडकांची कथा आहे आणि मानवी संस्कृतीचीही कथा आहे.

हा प्रवास केवळ पर्यटन नव्हता; तो ज्ञान, निसर्ग आणि मानवतेचा अनुभव होता. प्रत्येकाने आयुष्यात किमान एकदा तरी लोणार सरोवराला भेट द्यावी, असा माझा आग्रह आहे.
या प्रवासात मला लोणारचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी डॉ. रमेश सोनुने आणि श्री. सुनील कोठाळे यांची मोलाची मदत झाली. त्याबद्दल मी त्यांचा मनापासून ऋणी आहे.

— लेखन : डॉ चंद्रकांत हलगे. नाशिक
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments