कवी प्रा अशोक बागवे यांचा आज 75 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने लवकरच प्रकाशित होत असलेल्या माझ्या “संवादभूषण” या पुस्तकातील बागवे सरांवर लिहिलेली जीवन कथा पुढे देत आहे. सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
कल्याण येथील नूतन विद्यालयाच्या प्रांगणात 2023 सालचे वार्षिक स्नेहसंमेलन सुरू होते. प्रमुख पाहुण्यांपैकी मी ही एक होतो. विद्वान वक्त्यांची भाषणे सुरू होती. पुढे बसलेल्या मुलामुलींकडे बघून स्पष्टपणे दिसत होतं की, ही भाषणे ऐकुन ती मुले, मुली कंटाळून गेली आहेत आणि ते साहजिकच होते म्हणा, कारण प्रत्येकाला ओढ होती ती, मनोरंजनाचा कार्यक्रम कधी एकदा सुरू होतो, त्याची ! तेव्हढ्यात पुढचे वक्ते म्हणुन कवी, प्रा अशोक बागवे सरांचे नाव पुकारण्यात आले. मी विचार केला, आता आणखी दहा पंधरा मिनिटे या बिचार्या मुलांना आणि आपल्यालाही हे भाषण ऐकावे लागणार ! मनाची तशी तयारी करून, मी गंभीर चेहरा करून बसलो.

आणि चमत्कार झाला ! माईक हातात घेतल्यापासून बागवे सर जणू सर्व मुलांमधले एक असल्यासारखे त्यांच्याशी संवाद साधू लागले, नाचू लागले, बागडू लागले, आपल्या कविता गाऊ लागले आणि मुलांनाही त्यात सामिल करून घेऊ लागले. केवळ सर्व मुलांच्याच नाही तर स्टेज वर बसलेल्या सर्व “मोठ्या “मंडळींच्या चेहर्यावर देखील हास्य फुललं. समोरचा श्रोतूवर्ग पाहून, त्याच्याशी कसा संवाद साधावा, याचे मला जणू प्रात्यक्षिक पाहायला मिळाले. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बागवे सरांशी पहिल्यांदा ओळख झाली आणि यथावकाश ओळखीचे रूपांतर मैत्रीत होत गेले, ते सरांच्या ऐसपैस आणि निर्व्याज स्वभावामुळे.

एकदा सरांकडून काही माहिती हवी होती, म्हणुन सरांशी मला बोलायचे होते, त्यासाठी कधी फोन करू ? अशी विचारणा करणारा संदेश त्यांच्या मोबाईल वर पाठवला. दिवस भरात कधी तरी उत्तर मिळेल, अशी माझी अपेक्षा होती. पण काय आश्चर्य ! स्वतः सरांनीच लगेच स्वतःहून फोन केला आणि म्हणाले, बोला काय माहिती हवी ? पुढे आम्ही किती वेळ बोलत राहिलो, याचे काही भानच राहिले नाही.
कवी म्हणुन सर थोर आहेतच पण माणूस म्हणूनही ते फार थोर आहेत. अन्यथा माझ्या चाळीस बेचाळीस वर्षांच्या प्रसार माध्यमातील नोकऱ्यांमध्ये मला काही इतकी “थोर थोर” माणसे पाहायला मिळाली आहेत की, एकेकाचे अनुभव, किस्से लिहायला घेतले तर, त्याचे एक चमकदार पुस्तक होईल ! त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर मला बागवे सर जगावेगळे वाटतात.
बहुतेक प्रत्येक जण, कोणत्या ना कोणत्या सत्तेला किती हपापलेला असतो, हे आपण दैनंदिन जीवनात अनुभवत असतो. त्या सत्तेमुळे त्या व्यक्तिच्या वागण्याबोलण्यात झालेला बदल (अर्थातच नकारात्मक अर्थाने) आपण बघत राहतो. परंतु असल्या क्षुद्र सत्तेच्या आहारी जायला लागु नये, म्हणुन सरांनी त्यांना मिळत असलेले प्राचार्य पद नाकारून, उलट स्वेच्छानिवृत्ती पत्करली आणि होत्या नव्हत्या, त्या प्राध्यापकाच्या नोकरीच्या बंधनातून मुक्त होऊन ते कवी म्हणून मुक्त विहार करू लागले. नोकरी मुळे येणार्या सुरक्षेची, नियमित उत्पन्नाची हमी, प्रतिष्ठा आणि इतरही काय काय, अशी सर्व कवच कुंडले झुगारून देऊन, सामान्य माणसात यायचे, ही गोष्ट एखादा असामान्य माणूसच करू शकतो, अशा माणसांपैकी सर एक असामान्य आहेत.
अशा या थोर कवीचा, माणसाचा औपचारिक परिचय करून द्यायचा म्हणजे सरांचे शिक्षण एम.ए., डि.एच.ई इतके झाले आहे. इतकेच नव्हे तर ते मुंबई विद्यापीठाच्या एम.ए च्या परीक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले आहेत. ठाणे येथील महाविद्यालयात शिकवत असतानाच, सर कविता लिहू लागले. ते नुसतेच कविता लिहिणारे कवी नाहीत तर बहारदारपणे कविता सादर करणारे, लोकप्रिय कवी आहेत. आता पर्यंत त्यांचे ३४ कविता संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. कदाचित हा एक विक्रमच म्हणावा लागेल. या शिवाय त्यांचे सृजनसावली, काय वर्णावी ती गोडी..!, बोरू म्हणे, दृष्टीसृष्टीचे आगर अशी ४ ललित गद्य पुस्तके प्रकाशित झाली आहेत. “माझ्या झेन कथा” हा कथा संग्रह, “प्रिय सालस” ही कादंबरी, ५ नाटके, १० एकांकिका, ४ समीक्षा ग्रंथ, काही वृत्तपत्रात त्यांचे सदर लेखनही प्रसिद्ध झाले आहे. सरांनी सर्वोत्कृष्ट मराठी कविता-1977, कवितारंग या दोन पुस्तकांचे संपादन केले आहे. याशिवाय त्यांचे “गाणी..अशी कहाणी..!” हे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
सरांनी दूरदर्शन, आकाशवाणी वरील अनेक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे त्यांनी ८४ व्या, ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमंत्रित कविसंमेलनांचे अध्यक्ष पद आणि अमळनेर येथे झालेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य साहित्य संमेलनातील परिसंवादाचे अध्यक्षपद भूषविले आहे.

“पसायदान : कालचे व आजचे” यावर सरांनी 400 व्याख्याने दिली आहेत. सी बी एस इ बोर्डाच्या दहावी (मराठी) पाठ्यपुस्तकात, “माझा मराठीचा बोल” ही त्यांची कविता समाविष्ट आहे.
१० सीडी आणि चार दिवस सासूचे, अशक्य, फक्त तुझ्यासाठी आणि अचानक, अकल्पित, आई छुमछुम छननन, एस युवर ऑनर या ८ मालिकांची शीर्षक गीते त्यांनी लिहिली आहेत.
सरांनी अवघा रंग एकचि झाला, संन्यस्त ज्वालामुखी, जन्मगाठ, रघुपती राघव राजाराम, संगीत शंकरा चि.सौ.कां.रंगभूमी घासीराम कोतवाल.. (हिंदी), विश्वनायक.. (हिंदी) या नाटकांसाठी तसेच अनुराधा, संकल्प, शर्यत, बोकड, खेळ मांडिला, पोरका, गोजिरी, मुक्काम पोस्ट लंडन, रास्ता रोको, सर्जा राजा,संदुक, जगावेगळी पैज, सत्या, प्रेमाचा रंग, मन, ध्रुव आणि या चित्रपटांसाठी गीत लेखन केले आहे.
सर केवळ कविता, गीत लेखन करूनच थांबले नाहीत तर त्यांनी दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरील “श्रीमंताची लेक” या मालिकेत आपल्या अभिनयाची चमक दाखवली आहे !
सरांना आतापर्यंत अनेक मान सन्मान, पुरस्कार मिळाले आहेत. त्यापैकी काही महत्वाचे म्हणजे, सर्वोत्कृष्ट कविता संग्रहाचा कवी केशवसुत पुरस्कार, सर्वोत्कृष्ट कवितासंग्रहाचा बालकवी पुरस्कार, सर्वोत्कृष्ट गीतकारासाठी ग दि मा पुरस्कार असे महाराष्ट्र शासनाचे ३ पुरस्कार, कोकण मराठी साहित्य परिषदेचे “कविता राजधानी” कवी आरती प्रभु हे २ पुरस्कार, गेय कवितेसाठी असलेला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कवी ना घ देशपांडे पुरस्कार, जनकवी पी सावळाराम स्मृती पुरस्कार, सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून झी गौरव पुरस्कार आदी होत.
सरांचे चित्र काव्य “शब्द” हे न्यूज स्टोरी टुडे पोर्टल वर प्रसिद्ध झाले आहे.त्यांचे हे चित्र काव्य चित्रकार श्री विष्णू थोरे यांनी चितारले होते. असे हे सर, लिहिता लिहिता, गाता गाता चक्क पंचाहत्तरीचे झाले आहेत. या निमित्ताने त्यांची मित्र मंडळी, सुहृद, चाहते एक गौरव ग्रंथ प्रकाशित करीत आहेत, ही अत्यंत समयोचित बाब आहे.
या गौरव ग्रंथामुळे सर, सरांचे जीवन, काव्य अधिक चांगल्या प्रकारे समजायला नक्की मदत होईल, म्हणुन मी या ग्रंथाची आतुरतेने वाट पहात आहे.
सरांना शतायुषी होण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
